Login

शब्द झाले मुके 43

कथा एका प्रेमाची.. कथा तिच्या कर्तव्याची..
शब्द झाले मुके 43

लग्नाची तारीख ठरली आणि सगळेजण लग्नाच्या तयारीला लागले. लग्न अगदी साध्या पद्धतीने करण्याचे ठरवले असले तरीही त्यातील कोणतेही रितीरिवाज चुकता कामा नये याकडे राजनची आई कटाक्षाने लक्ष घालत होती. जे काही करायचे ते अगदी रितीरिवाजाप्रमाणे करायचे असे तिने जणू मनाशी ठामपणे ठरवले होते. त्यामध्ये कोणतीही चूक होता कामा नये असे तिला वाटत होते.

अगदी हसते खेळते घर असे एका क्षणात रिकामे झाले, त्यातून या सर्वांना बाहेर पडण्यास खूप अवधी लागला. त्यामध्ये मेघनाच्या रूपाने आता त्या घराचे स्वर्ग बनवण्यासाठी देवाने तिला पाठवले होते. ती आता स्वराची आणि राजनची काळजी घेईल. या घराचे घरपण जपून याला स्वर्ग बनवेल असा विश्वास राजनच्या आईला होता आणि ती मेघना घरी आल्यानंतरची स्वप्नं रंगवत होती; पण इकडे राजनला मात्र मेघनाचा प्रचंड राग आला होता. तो तिला पत्नी या स्वरूपात पाहण्यास तयार नव्हता; पण आईसाठी आणि स्वरासाठी त्याने हे लग्न करण्याचे ठरवले होते. आता पुढे काय होईल हे लग्न झाल्यानंतर समजेल. राजनचे मेघनावर प्रेम होईल का की मेघना सुद्धा त्याला सोडून निघून जाईल? खरंच मेघना हे पैशासाठी करत आहे का असे अनेक प्रश्न यामध्ये पडलेले आहेत.

**************

लग्नासाठी सगळी खरेदी सुरू झाली होती. मेघनाचा शालू फायनल करायचा बाकी होता. मेघना आणि राजन दोघेही शालू फायनल करण्यासाठी दुकानात गेले होते; पण मेघनाला मात्र त्यातील एकही पसंत पडेना. तिला नक्की कोणता कलर घेऊ हे समजत नव्हते. ती बिचारी तशीच प्रत्येक साडीकडे पाहत बसली होती. राजनला मात्र तिथे बसून बसून खूप कंटाळा आला होता. कधी एकदा बाहेर पडतो असे त्याला झाले होते त्यामुळे त्याने पटकन लाल रंगाची साडी हातामध्ये घेतली आणि ती मेघना समोर धरली.

"साडी पसंत करायला इतका वेळ लागतो का? एक दिवस तर घालायचा आहे." राजन तुसडेपणाने म्हणाला.

"साडी घालत नसतात तर नेसतात." मेघना हळूच म्हणाली.

"तेच ते" राजन रागातच म्हणाला.

"एक दिवस नेसायचा असला तरी आम्हाला त्या दिवशी छान दिसायचे असते, त्यामुळे आपल्याला शोभणारा रंगच घ्यायचा असतो." असे मेघना म्हणाली.

"हा रंग तुझ्यावर खुलून दिसेल." असे राजे म्हणताच मेघना लाजली. राजनने पसंत केलेली साडी तिने फायनल करून टाकली. आता तिच्या साड्या सगळ्या फायनल झाल्या होत्या. त्यानंतर तिला लागणारी ज्वेलरी घ्यायला ते दोघे जाणार होते. बिल करून साडी घेऊन मग ज्वेलरीच्या दुकानात जावे असे त्यांनी ठरवले. बिल घेण्यासाठी ते दोघे काउंटरवर आले. बिल करून झाल्यानंतर मेघनाने बिल पाहिले तर ती साडी साठ हजार रुपयांची होती ते पाहून मेघना दचकली.

"सॉरी सॉरी, मला ही साडी नको आहे. मी दुसरी साडी पाहते." असे म्हणून मेघना गडबडीने आत जाऊ लागली तेव्हाच राजनने तिचा हात पटकन पकडला.

"काय झालं? मगाशी तर तुला ही साडी आवडली होती ना! आणि आता असे अचानक काय झाले आहे? काही नाही. हीच साडी घ्यायची. चल आता आपण जाऊयात, खूप उशीर झालाय. तसेही मला आणखी खूप काही काम आहेत. इथे तुझ्या मागे मागे फिरायला मी काही रिकामा नाही." राजन रागाताच म्हणाला.

"अहो, पण मला ही साडी नको आहे. मला दुसरी साडी पहायची आहे." मेघना हळूच म्हणाली.

"मगाशी तर साडी आवडली होती, आता काय झाले? मला कारण सांग, मग मी तुला दुसरी साडी घ्यायला पाठवून देईन नाहीतर चल." असे राजन म्हणाला.

"अहो, या साडीची किंमत पाहिली का? साठ हजार रुपयांची साडी आहे! एका साडीसाठी मी इतके पैसे खर्च करू शकत नाही हं. मला ही साडी अजिबात नको. मी दुसरी कुठली तरी पाहीन." असे म्हणून मेघना आत जाऊ लागली.

"असू दे ना, मग काय झाले त्यात?" राजन सहजच बोलून गेला.

"साठ हजार रुपये! खूप झाले. इतके महागडी साडी मी नाही घेऊ शकत." स्वरा आश्चर्याने म्हणाली.

"आता तू राजनची बायको होणार आहेस त्यामुळे पैशांचा विचार अजिबात करायचा नाही. तुला आवडली असेल तर घेऊन टाक." असे म्हणून राजन तिथे बिल पे करून पुढे जाऊ लागला. मेघना मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तिथेच उभी होती. राजन जाऊन गाडीत बसला आणि गाडी त्याने दुकानासमोर आणली. तो हॉर्न वाजवू लागला. त्या हॉर्नच्या आवाजाने मेघना भानावर आली आणि पटकन गाडीत जाऊन बसली.

'इथे माझ्या आईकडून पैसे उकळवत आहे आणि माझ्यासमोर साधेपणाचा आव आणतेय. नाटकं करत आहे. तिला चांगलंच माहीत होतं की लग्नाची साडी आम्ही घेणार आहोत तरी इतके पैसे म्हणून नाटक करण्याची काय गरज होती. मला तर वाटत आहे ही मुद्दामच करत आहे. सुरुवातीला मुद्दामच इतकी महाग साडी तिने सिलेक्ट केली असेल आणि नंतर नको म्हणून साधेपणाचा आणत असेल. अशी नाटकी लोकं मला अजिबात आवडत नाहीत.' असे राजन स्वागतच म्हणाला.

त्यानंतर ते दोघे ज्वेलरीच्या दुकानात मेघनासाठी ज्वेलरी घेण्यासाठी गेले होते. तसेही राजनच्या आईने तिचे काही आधीचे दागिने होते ते मेघनाला देण्याचे ठरवले होते; पण तरीही काही नवीन मेघनाच्या आवडीचे दागिने तिच्यासाठी करावेत असे तिच्या आईची इच्छा होती म्हणूनच आईच्या सांगण्यावरून राजन मेघनाला तिथे घेऊन आला होता. नाहीतर त्याची अजिबात इच्छा नव्हती. तसेही ती नाटकं करत आहे आणि थोड्या दिवसांसाठीच आमच्या घरात राहणार आहे तर कशाला इतका खर्च करायचा असे त्याला वाटत होते; पण तरीही आईच्या इच्छेखातर तो हे सर्व काही करत होता. ज्वेलरीच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तिथे राजनने मेघनाला जे काही आवडेल ते घेण्यास सांगितले; पण मेघनाला तिथे काही घ्यायची इच्छा नव्हती. आपण स्वतःहून इतके महागडे दागिने कसे घ्यायचे हा प्रश्न तिला पडला होता; पण तरीही तिने राजन आणि राजनच्या आईच्या इच्छेखातर एक सुंदर असे दोन वाट्यांचे मंगळसूत्र पसंत केले. ते मंगळसूत्र मेघनाला खूप आवडले असल्याने तिने तेच घ्यायचे फायनल केले आणि ती जे काही घेणार होती ते तिने राजनला दाखवले. राजनने जेव्हा त्या मंगळसूत्राकडे पाहिले तेव्हा त्यालाही ते प्रचंड आवडले. त्याला मेघनाची पसंती समजली. त्याने ते मंगळसूत्र फायनल केले.

"तुला आणखी काही घ्यायचे असेल तर तू घेऊ शकतेस." राजन स्पष्टपणे म्हणाला.

"नाही. मला आणखी काही घ्यायचे नाही." मेघना म्हणाली.

"संधी आहे, बघ जे काही हवे ते पोत्याने भरून घे. काय माहित नंतर काय होईल ते?" राजन सहजच बोलून गेला; पण त्याच्या या वाक्याने मेघनाला खूप वाईट वाटले. तिचे डोळे भरून आले; पण तिने डोळ्यातील पाणी हळूच टिपले.

"काही घेणार आहेस का?" राजन म्हणाला तेव्हा मेघनाने मानेनेच नकार दिला.

"अगं घे गं. तसेही पैसे मीच देणार आहे. तू तुझ्या कमाईतून देणार नाहीस. फुकटचे मिळत आहे तर घ्यायचे गं. असे लाजायचे नाही. चल मी घेऊन देतो तुला." असे म्हणून राजन मेघनाचे हात धरून तिला वेगवेगळे नेकलेस गळ्याला लावून पाहत होता. त्याचे हे विचित्र वागणे पाहून मेघनाच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागले.

"अगं रडतेस काय? बिनधास्त घे की. तसेही माझ्या आईला लुबाडलेस तर मी काय चीज आहे." राजन खूप काही बोलत होता आणि मेघना आसवे टिपत तिथेच उभी होती.
क्रमशः


🎭 Series Post

View all