शब्द झाले मुके 44
राजन आणि मेघना दोघेही खरेदीसाठी घराबाहेर गेले होते. साड्यांची खरेदी करून दागिने खरेदी करण्यासाठी ते दोघे आले असताना हा सगळा राडा झाला होता. राजनला मेघनाचा खूप राग आला होता. तो त्या दुकानांमध्ये तिच्यावर सगळा राग काढत होता; पण मेघना मूळची स्वभावाने शांत असल्यामुळे ती एकही शब्द बोलत नव्हती. तिला भांडायला अजिबात आवडत नव्हते. चूक ही स्वतःची असो किंवा समोरच्याची ती नेहमी शांत बसून राहायची. लहानपणापासून परिस्थितीमुळे असो किंवा घरच्या जबाबदारीने असो किंवा घरची मोठी मुलगी म्हणून असो लहानपणापासूनच हा पोक्तपणा तिला आला होता. समोरच्याचे म्हणणे अगदी शांतपणे ऐकून घ्यायचे, एकही शब्द उलट न बोलता त्याच्यासोबत व्यवस्थित बोलायचे, समोरचा कितीही ओरडू लागला आकांत तांडव करू लागला तरीही आपण शांतच राहायचे हा तिचा मूळचा स्वभाव असल्यामुळे यावेळी देखील ती काहीच बोलली नाही. राजन जेव्हा तिला खूप काही बोलत होता तेव्हा ती तशीच शांत उभी होती.
मेघना तिच्या स्वभावाने जरी शांत उभी असली तरी तिचा प्रचंड राग राजनला येत होता. त्याचा हा राग पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते; पण तरीही ती एकही शब्द बोलली नाही.
"इथे सर्वांसमोर रडून उगीच तमाशा करू नकोस. चल गाडीत बसून घे, मी बील पे करून येतो." असे म्हणून राजन तिच्यावर खेकसला.
मेघनाने फक्त मानेनेच होकार देऊन ती गाडी जवळ उभी राहिली. राजन इकडे बील पे करून गाडी जवळ गेला तर मेघना बाहेरच उभी होती.
"तुला आत जाऊन बस असे एकदा सांगितलेले ऐकू येत नाही का? प्रत्येक गोष्ट दोन-तीनदा तुला सांगावे लागते का?" असे म्हणून राजन पुन्हा तिच्यावर ओरडला.
"ते गाडीला लॉक असल्यामुळे मी आज बसले नाही." असे मेघनाने शांतपणे राजनला उत्तर दिले तेव्हा मात्र त्याला त्याची चूक समजली.
"गाडीची किल्ली मागून घ्यायची" असे राजन हळूच म्हणाला आणि त्याने लॉक उघडून मेघनाला बसण्यासाठी दरवाजा उघडला. मेघना शांतपणे आत जाऊन बसली, दार बंद करून राजन सुद्धा आत जाऊन बसला आणि त्याने गाडी सुरू केली. गाडीतून जाताना त्याने एक कटाक्ष मेघनाकडे टाकला. कदाचित तिचा हा शांत स्वभावच त्याला आवडला असावा. हिच्या जागी जर दुसरी कोणती मुलगी असती तर आज आपल्याला सगळे आहे ते मिळत आहे म्हणून भरपूर खरेदी केली असती, शिवाय मी ओरडत असताना मला उलट उत्तर देऊन आम्हा दोघांमध्ये खूप भांडण झाले असते; पण मेघना तशी नाही. हिच्यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळेपण आहे हे राजनला पुन्हा एकदा जाणवले. राजन गाडीमध्ये अगदी शांतपणे बसला होता. त्याला खरंतर आपल्या चुकीची थोडीशी का होईना जाणीव झाली होती; पण त्याला मेघनाचा मूळ स्वभाव समजत नव्हता त्यामुळेच त्याची ही चिडचिड होत होती.
राजन मेघनाला तिच्या घरात सोडून तो त्याच्या घरी गेला. घरी स्वरा आणि त्याची आई त्याची वाट पाहत बसले होते.
*****************
आज राजन सकाळी लवकरच ऑफिसला आला होता. आता दोन दिवसावर लग्न येऊन टेकले होते, त्यामुळे नंतरची कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी या विचाराने तो लवकरच ऑफिसला आला होता. ऑफिसमध्ये मेघना सुद्धा लवकर आली होती. तिची उरलेली कामं ती सुद्धा पूर्ण करणार होती. जवळपास सगळ्याच स्टाफला राजनने लवकर बोलवले होते. तो त्याच्या केबिनमध्ये लॅपटॉपवर काम करत बसला होता. इतक्यात दारावर टकटक असा आवाज झाला. त्याने "कम इन" म्हणून बोलावले.
"हाय राजन, कसा आहेस?" असा आवाज त्याच्या कानावर पडला. आवाज ओळखीचा वाटला म्हणून त्याने वर पाहिले आणि तो आश्चर्यचकित झाला.
"तू तर मला पूर्णपणे विसरूनच गेला आहेस; पण मी तुला विसरू शकलो नाही. मला आज माझी चूक समजली आहे. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरे कोणाचेही स्थान नाही. माझे खरे प्रेम तुझ्यावर होते आणि ते तुझ्यावरच असणार आहे, म्हणून सगळ्या चुका माफ करून मी तुझ्याशी लग्न करायला तयार झाले आहे." हे वाक्य ऐकून राजन अवाक् होऊन तिच्याकडेच पाहू लागला.
"अरे, असा का पाहतोयस? तुझे सुद्धा माझ्यावर प्रेम आहे ना. तू सुद्धा मला विसरू शकला नाहीस ना." असे मानसी म्हणाली. हो हो तीच मानसी होती. जिने राजन सोबत प्रेमाचे नाटक केले होते; पण आता तिला तिची चूक समजून आली होती. तिला राजनच्या प्रेमाची आता आठवण आली होती म्हणूनच झाले गेले विसरून ती पुन्हा नव्याने सुरुवात करणार होती आणि त्यासाठी ती राजनकडे आली होती; पण तिला येण्यास खूपच उशीर झाला होता.
"एकच मिनिटं." असे म्हणून त्याने फोन करून मेघनाला आत बोलावून घेतले. मेघना देखील लगेच आत गेली. राजनने मेघनाला स्वतःच्या जवळ उभे केले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून, "ही मेघना, माझी होणारी बायको." असे म्हणून तिची माहिती दिली. तेव्हा मानसी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती.
"नाही राजन, हे शक्य नाही. तुझे माझ्यावरच प्रेम होते आणि तू माझ्याशी लग्न करणार. हे प्रेम नाही. अरे, तिला तुझ्याबद्दल काहीच माहित नाही म्हणून ती तुझ्यावर प्रेम करत आहे. जेव्हा तिला सत्य समजेल तेव्हा मात्र ती तुला सोडून निघून जाईल. बघ, माझा शब्द आहे." मानसी राजनचा मन वळवण्याचा प्रयत्न करत होती; पण राजन ते ऐकून गालातच हसला.
"मानसी, तिला सगळे काही माहित आहे. तिला माझ्याबद्दल सगळी कल्पना देऊनच हे लग्न पुढे जात आहे." राजन हसतच मानसीला बोलला.
"अच्छा, मग ही तुझ्यावर अजिबात प्रेम करत नाही. ही तुझ्या पैशावर प्रेम करत आहे. नाहीतर अशी कोणती मुलगी करू शकेल जिला स्वतःचे असे मूल नको आहे! अशी कोण स्त्री या जगामध्ये असेल? ही नक्कीच तुझ्या पैशासाठी तुझ्याशी लग्न करत आहे." मानसी म्हणाली.
"तू जे काही समजायचे आहे ते समज; पण आता तुझी संधी गेली. तू खूप काही गमावलं आहेस हे नक्की. हिने मला एका झटक्यात साथ देण्याचे कबूल केले आणि त्यामुळेच आमचे लग्न होणार आहे. ठीक आहे. आता तू जाऊ शकतेस." राजन स्पष्टपणे म्हणाला.
"अरे राजन, माझं थोडं ऐकून तरी घे. हे बघ, आपण दोघांनी पाहिलेली स्वप्नं, आपण नव्याने पूर्ण करूयात. तुला आठवते का?" मानसी बोलत होती.
"तू जातेस की सिक्युरिटीला बोलावू." राजन मनाला.
"ठीक आहे, जाईन; पण मी पण पाहते ही किती दिवस तुझ्या आयुष्यात राहील. एक ना एक दिवस हिला तुझ्या आयुष्यातून जावे लागेलच, कारण असेच पैशासाठी लग्न केलेल्या मुली मनापासून संसार करत नाहीत. पैशासाठी ही तुझ्यासोबत आयुष्यभर राहिली तरी पण मनाचे काय? ही तुझ्याशी कधीच मनापासून संसार करणार नाही. हा माझा शब्द आहे." असे मानसी तरातरा निघून गेली. राजन मात्र तसाच खुर्चीत बसला. एकही शब्द बोलला नाही. त्याने डोळे बंद करून घेतले आणि तो तसाच शांत बसला. मेघनाला मात्र काय करावे ते समजेना. ती तशीच बराच वेळ उभी होती.
बऱ्याच वेळाने मेघना बाहेर गेली. आता मात्र तिच्या मनामध्ये असंख्य प्रश्नांनी थैमान माजले होते. 'ही मानसी म्हणजे राजनची प्रेयसी होती! तिला इतक्या उशिरा तिच्या प्रेमाची जाणीव कशी काय झाली असेल? मग त्यावेळी असे काय घडले असेल की जेणेकरून ही राजनच्या प्रेमाला झुडगारून स्वतंत्र राहिली असेल! तिला कोणी दबाव आणला तर नसेल ना? की ही आता पुन्हा राजनच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी आली असेल? काही समजायला वाव नव्हता; पण ती इथे इतक्या सकाळी आलीच कशी? आज राजन किंबहुना सर्व स्टाफ ऑफिसला लवकरच आला होता हे तिला समजलेच कसे?' असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये तयार झाले होते.
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा