शब्द झाले मुके 45
जेव्हापासून मानसी ऑफिसमधून गेली होती तेव्हापासून राजन मात्र त्याच्या कामांमध्ये गुंतला होता आणि मेघना सुद्धा तिचे काम पटापट करू लागली होती. जेणेकरून लग्नापर्यंत त्यांना त्यांचे काम पूर्ण करून द्यायचे होते. दिवसभर कामाच्या गडबडीत असल्यामुळे त्या दोघांना मानसीचा विचार अजिबात आला नाही; पण संध्याकाळी मात्र मानसी जे काही शब्द बोलली ते त्याच्या कानात घुमत होते. 'खरंच, मेघना ही पैशासाठी माझ्याशी लग्न करत आहे हे मला नक्की माहित आहे; पण ती काही दिवसांनी मला सोडून जाईल का? जर मेघना मला सोडून गेली तर पुढे काय? ती सोडून जाणार असेल तर या लग्नाचा काय उपयोग?' असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये सुरू होते.
काहीही करून या सगळ्या गोष्टीचा आढावा घ्यायला हवा. मेघना जर टाईमपास म्हणून हे लग्न करत असेल तर वेळीच ते थांबवायला हवे, नाहीतर इतका आटापिटा करून मला आई आणि स्वराच्या भावनांशी अजिबात खेळायचे नाही. एकदा जे काही भोगले ते पुन्हा भोगण्याची माझ्यामध्ये तरी क्षमता नाही आणि आई तरी हे कसे सहन करेल? स्वरा देखील पूर्णपणे तुटून जाईल. तिचा या सगळ्या वरचा विश्वास निघून जाईल. तिचे पुढचे आयुष्य कसे होईल? असा विचार राजन करत बसला होता.
इकडे राजनची आई आणि स्वरा मात्र लग्नाच्या तयारीत गुंतले होते. अगदी घरीच हे कार्य करण्याचे ठरले असल्यामुळे राजनच्याच घरी हे कार्य करण्यात यावे असा राजनच्या आईने जणू हट्टच धरला होता आणि त्यानुसार घरामध्ये सजावट वगैरे त्या अगदी स्वतः लक्ष घालून करून घेत होत्या. दोन दिवसांवर लग्न येऊन ठेपले असल्याने त्यांची खूप धांदल उडाली होती. इकडे मेघनाच्या आईची गोष्ट तर वेगळीच होती. त्या तर लेकीला काय काय देऊ आणि काय काय नको असे पाहत होत्या. त्या रात्री त्यांनी मेघनाला आपल्या जवळ बोलावून घेतले. मेघना सुद्धा आईजवळ जाऊन बसली आता पुन्हा असे लेकीसोबत वेळ घालवता येईल की नाही माहित नाही या विचाराने तिच्या आईचे हृदय भरून आले होते. तरीही लेकीसमोर अश्रू काढायचे नाहीत या विचाराने त्या शांत झाल्या. त्यांनी एक बॉक्स काढला आणि त्यातून एक सोन्याचा हार मेघनाच्या समोर धरला.
"मेघना, हा बघ हार तुझ्या बाबांनी तू लहान असताना घेतला होता. लेकीच्या लग्नात हा हार घालायचा तोपर्यंत तू वापर असे त्यांनी मला म्हटले होते; पण मी हा हार एकदाही माझ्या अंगाला लावला नाही." मेघनाची आई सांगत होती.
"अगं आई, तू मला काहीही देऊ नकोस. हे आपल्या छोटीसाठी असू दे. तिच्याही लग्नाची तजवीज करावी लागणार आहे. त्यापेक्षा आता मला काहीच नको छोटीसाठी ठेवून दे." असे म्हणून मेघना आईला समजावून सांगत होती. खरंतर तिला आईची काळजी होती. मेघनाला सांभाळून घेणारी सासू मिळाली होती त्यामुळे तिला कोणीच काहीच विचारणार नव्हते; पण छोटीचे कसे होईल हा प्रश्न आहे तिच्या मनामध्ये लागून राहिला होता, म्हणूनच ती हे सारे काही बोलत होती.
"अगं, हे तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी म्हणून केले होते. त्यांचा आणि माझा आशीर्वाद म्हणून तर तू हे घे. छोटीचा तू विचार करू नकोस. तिच्यासाठी हे बघ हा दुसरा हार बनवून ठेवला आहे. हा खरंतर तुझ्या आजोबांनी म्हणजे माझ्या बाबांनी माझ्या लग्नात दिला होता. तो मी छोटीसाठी म्हणून जपून ठेवला आहे, त्यामुळे हा हार तू घे." असे मेघनाची आई म्हणाली.
"अगं आई, पण या सगळ्याची काहीच गरज नाही. मला काहीच नको." मेघना म्हणाली.
"अगं, हा फक्त हार नाही. याच्यामध्ये माझी आणि तुझ्या बाबांची स्वप्नं आहेत. आम्ही तुझ्यासाठी जी काही स्वप्नं पाहिली होती ती या हारामध्ये आहेत. आमच्या दोघांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहो म्हणून हा हार घे. तू हा हार घातलास तर तुला तुझ्या आई आणि बाबांची दोघांचीही प्रेमळ माया मिळेल. ते नेहमी तुझ्या पाठीशी आहेत असे तुला वाटेल, त्यामुळे यासाठी तू नको म्हणू नकोस." मेघनाची आई मेघनाला समजावत होती. तेव्हा इमोशनल होऊन मेघनाने तो हार घेण्यास होकार दिला आणि तेव्हाच तिने तिच्या आईला मिठी मारली.
"हे काय तुम्ही इतके इमोशनल का होत आहात? अजून बिदाई झालेली नाही. आपल्याकडे दोन दिवस बाकी आहेत, त्यामुळे आपण हे दोन दिवस मस्त एन्जॉय करायचे. ताई, तू उद्या एक दिवस तरी सुट्टी घे ना. परवा दिवशी तर तुझे लग्न आहे. तू सासरी जाणार आहेस. शेवटच्या क्षणापर्यंत असे काम करत राहिलीस तर आमच्या सोबत दिवस घालवणार तरी कसे?" असे छोटी म्हणताच मेघना मात्र इमोशनल होऊन तिच्याकडे पाहू लागली. छोटी इतकी जबाबदार कशी झाली? याचे तिला आश्चर्य वाटू लागले आणि खरंच आहे ना, मोठी बहीण आता इथे नसणार म्हटल्यावर छोट्याने घरची जबाबदारी घ्यायला हवी.
मेघनाने दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. तिने जवळपास आठ दहा दिवसांची सुट्टी घेतली होती. कारण एकदा का लग्न झाले की लगेच ऑफिस जॉईन कसे करायचे त्यापेक्षा थोड्या दिवसांनी आपण ऑफिस जॉईन करूया असा विचार तिने केला होता. एकदा का सासरी रुळले की मग आपण ऑफिस जॉईन करूया तसेही ऑफिस घरचेच होते; पण तरीही आपली काही जबाबदारी आहे असे तिला वाटत होते.
लग्न उद्यावर येऊन टेकले होते, तरीही दोन्ही घरची मंडळी अजून तयारीच करत होते. तयारी जवळपास होत आली होती.
****************
आज राजन आणि मेघनाचे लग्न होणार होते. अखेर लग्नाचा दिवस उजाडला. दोन्ही घरची मंडळी सकाळपासूनच घाई गडबडीत होते. मेघनाला मात्र काहीच सुचत नव्हते. ती संपूर्ण घर सकाळी उठल्यापासून न्याहाळत होती. आता हे घर आपल्यापासून दुरावणार. लहानपणापासून या घरात आपण कष्टाने एक एक वस्तू उभी केली होती. आईचे आजारपण जसे सुरू झाले तसे हे घर आपल्या हातात आले होते. आता आपला या घरावरील अधिकार संपत आला आहे या गोष्टीचे तिला वाईट वाटत होते. आपण उभा केलेले आपले घर सोडून आता परक्या घरात जायचे त्यामुळे तिच्या भावना दाटून आल्या होत्या. अगदी लहानपणापासून तिने एक एक गोष्ट जपून ठेवली होती. त्या प्रत्येक वस्तू वरून ती हात फिरवत होती, त्या प्रत्येक गोष्टीला ती न्याहाळत होती. आता या वस्तूंची साथ इथंपर्यंतच होती असे तिला वाटत होते. तिने पुन्हा एकदा स्वयंपाक घरात जाऊन पाहिले. स्वयंपाक घरातील सर्व भांडी, तो किचन कट्टा त्यावर ती मायेने, प्रेमाने हात फिरवत होती. घरामध्ये काय सामान आहे काय नाही हे पाहण्यापासून ते संपूर्ण स्वयंपाक करून विरजन लावण्यापर्यंत सर्व कामे ती एकटी करत होती. आता माझ्यानंतर ह्या घराचे कसे होईल हा विचारही तिच्या मनात येऊन गेला होता. एक क्षण तिला वाटले की, नको हे लग्न, नको हा संसार आपण इथेच आपल्या आई सोबत कायमचे राहावे; पण नंतर पुन्हा तिचे मन सावरले आणि ती तिथून बाहेर आली.
वधू वेशात ती घर न्याहाळत होती. घरातून तिची पावले बाहेर पडत नव्हती. मेघनाची आई आणि बहीण दोघीही तयार झाल्या. सगळे काही सामान त्यांनी बाहेर आणून ठेवले आणि आता त्या दोघी मेघना बाहेर येण्याची वाट पाहत होत्या.
"छोटी, जा बघू जरा ताई काय करतेय बघून ये जा. ती अशीच घरात रेंगाळत राहणार. तिची पावले घराबाहेर पडणार नाहीत. मला माहित आहे तिचा स्वभाव; पण कितीही केले तरी एक ना एक दिवस तिला जावे तर लागणारच ना. जा जरा ताई कुठे आहे पाहुन ये." असे म्हणून मेघनाच्या आईने मेघनाच्या बहिणीला ती कुठे आहे हे पाहून येण्यास सांगितले. तेव्हा मेघनाची बहीण आत गेली. तिने घरभर मेघनाला शोधले; पण मेघना कुठेच दिसली नाही.
"आई, अगं ताई घरात कुठेच नाहीये." मेघनाची बहिण धापा टाकत टाकत बाहेर येत म्हणाली.
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा