शब्द झाले मुके 47

कथा एका प्रेमाची.. कथा तिच्या कर्तव्याची..
शब्द झाले मुके 47

डोळ्यावरची पट्टी काढताच मेघना ओरडली. "तू!" तिला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. हा असे काही करू शकेल यावर तिचा विश्वासच नव्हता. ती प्रचंड घाबरली होती. आज तिचे लग्न होते आणि असे काही तिच्यासोबत घडेल याची तिला अजिबात जाणीव नव्हती. गाडीतून येताना तिला तिच्या आई आणि बहिणीचा चेहरा आठवत होता. आई आता टेन्शनमध्ये असेल. ती नाही नाही तो विचार करेल. आधीच ती आजारी आहे आणि या अशा टेन्शनमध्ये तिचे काय झाले असेल असा विचार तिच्या मनात येत होता; पण तरीही तिने कितीही प्रयत्न केला तरी ती काहीही करू शकत नव्हती.

जेव्हा तिच्या डोळ्यावरील पट्टी काढली गेली तेव्हा तिला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. तिने आजूबाजूला पाहिले तर ती एक सुनसान जागा होती. म्हणजे तिथे कोणीच येत नसलेली ती एक बाग होती. हो हो तीच भाग ज्या बागेमध्ये राजनने तिला त्याच्या भूतकाळातील घडलेल्या घटना सांगितल्या होत्या.

ती त्या बागेत आली होती. याचाच अर्थ तिला तिथे राजनच घेऊन आला होता; पण राजनने असे का केले असेल? त्याचे तर मेघनासोबत लग्न होणार होते. ती त्याची हक्काची बायको होणार होती. तिला जेव्हा पाहिजे तेव्हा जाब विचारता आला असता मग तो आज लग्नाच्या दिवशीच मेघनाला इथे का घेऊन आला असेल असा प्रश्न तिच्या मनात येऊन गेला; पण तरीही ती शांत राहिली.

"तू हे लग्न फक्त पैशासाठीच करत आहेस का?" राजनने मेघनाच्या दोन्ही दंडाला गच्च पकडले आणि तिला प्रश्न केला. हे ऐकून मेघनाचे हातपाय गळाले, तिला भीती वाटू लागली. तिला काय बोलावे ते समजेना. तिच्या तोंडावाटे एकही शब्द फुटेना. ती तशीच आश्चर्याने राजनकडे पाहत उभा राहिली.

"बोल ना! मला तुझ्या तोंडावाटे ते उत्तर ऐकायचे आहे. तू हे लग्न नक्की कशासाठी करत आहेस?" राजन मेघनावर ओरडला, तशी तिच्या डोळ्यातून आसवे ओघळू लागली.

"घ्या! आता रडायला सुरू.. जरा काही बोललं नाही तोपर्यंत डोळ्यातून घळाघळा पाणी गळायला लागलं. जे काही सत्य आहे ते बोलायचे हिंमत नसेल तर उगीच या कचाट्यात पडू नये. जे सत्य आहे ते बोलण्याची धमक असावी." राजन बडबडत होता आणि मेघना मात्र त्याच्याकडे टक लावून पाहत होती. तिला काय बोलावे ते समजत नव्हते.

"मला तुझ्याकडून उत्तराची अपेक्षा होती." असे राजन तिरकसपणे म्हणाला.

"मी हे लग्न फक्त आणि फक्त स्वरासाठी करत आहे. बाकी मला कोणाशी काहीही देणं घेणं नाही." मेघना रागाने म्हणाली. तिला याक्षणी राजनचा प्रचंड राग आला होता. 'आज लग्न होणार आहे. इतके दिवस हा काय झोपला होता का? याला एवढ्या दिवसात काही विचारता आले नव्हते का? आता या वेळेला इथे घेऊन येऊन तो विचारत आहे. घरचे काळजी करत असतील. आईला तर किती टेन्शन आले असेल! तिच्या मनात नाही नाही ते विचार आले असतील. याला इथे बसून काय जाते.' असे मेघना मनातच म्हणत होती.

"अच्छा, ठीक आहे. मी सुद्धा हे लग्न स्वरासाठीच करत आहे. बाकी मलाही कोणाशी काही देणंघेणं नाही." राजनही रागानेच म्हणाला आणि तो झपझप पावले टाकत गाडीत जाऊन बसला. राजन बराच वेळ गाडीत जाऊन बसला तरी मेघना तिथेच उभी होती. राजनने गाडीतून हॉर्न वाजवले. तेव्हा मेघना भानावर आली आणि ती पटकन गाडीत जाऊन बसली. खरंतर तिला तिच्या आईचा चेहरा दिसत होता. तिला किती टेन्शन आले असेल? आधीच ती आजारी, त्यात आता हे टेन्शन म्हटल्यावर तिची अवस्था काय झाली असेल? हा विचार तिच्या मनामध्ये घुमत होता. गाडी काही क्षणातच राजनच्या दारात येऊन उभा राहिली. दोघेही गाडीतून उतरले आणि आत जावू लागले. ते दोघे दरवाजात गेले नाहीत तोच सगळेजण त्यांच्या भोवती येऊन गोळा झाले. सर्वांना आनंदवजा राग आला होता.

"हे काय? आज तुमचे लग्न आहे आणि तुम्ही दोघेही ऑफिसला कामानिमित्त कसे काय गेला आहात. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यापेक्षा काम महत्वाचे वाटत आहे की काय?" राजनची आई जवळपास दोघांनाही ओरडली.

"आणि इतका काय तो बेजबाबदारपणा! जाताना निदान आम्हाला सांगून तरी जायचे ना. न सांगताच गेलात. आम्हाला किती टेन्शन आले होते याची तुम्हाला कल्पना आहे तरी काय?" मेघनाची आई देखील दोघांवर ओरडलीच.

"हे काय ताई, अगं जाताना सांगून जरी जायचं. मी तर तिथेच होते ना आणि तू फोनही घेऊन गेली नाहीस. आम्हाला काय वाटणार? आम्हाला खूप टेन्शन आले होते." मेघनाची बहिण देखील म्हणाली.

ते सर्वजण इतके बडबडत होते की त्या दोघांना बोलण्याचा चान्सच मिळत नव्हता. इतक्यात छोटी स्वरा ओरडली, "थांबा थांबा" तेव्हा सगळेच शांत झाले.

"अरे, जे काही आहे ते राहू दे. तुम्ही नंतर यांना ओरडा; पण आता मुहूर्त टाळायला नको. अजूनही मुहूर्त आहे तोपर्यंत या दोघांचे लग्न लावून टाका. नाहीतर पुन्हा आणि यांना कोणतेही कामं यायला नको." असे स्वरा म्हणताच सगळेजण गालातच हसले आणि त्या दोघांना आत नेऊन बसवले. ते दोघे जाऊन बसताच भटजींनी मंत्र उच्चारण सुरू केले आणि अखेर दोघांच्या लग्नाला सुरुवात झाली. दोघांचेही लग्न सुरू होते; पण त्यांचे त्यामध्ये अजिबातच लक्ष नव्हते. दोघेही प्रचंड रागामध्ये होते. या मंगल कार्याची सुरुवात अशी रागातच सुरू झाली होती, की पुढे काय होणार अशी चिंता सर्वांना सतावत होती. मात्र या सगळ्यांमध्ये छोटी स्वरा खूप आनंदात होती कारण तिला तिची आई मिळाली होती.

अखेर दोघांचेही लग्न व्यवस्थितरित्या पार पडले. इतका गोंधळ होऊनही अखेर शेवट गोड झाला जो त्या दोघांनाही कधीच रुचणार नव्हता. आता दोघांनाही एकत्र राहावे लागणार याचे सर्वात जास्त मेघनाला टेन्शन आले होते. स्वरासोबत राहणार याचे तिला समाधान होते. त्या मुलीची जबाबदारी तिच्यावर होती. तसेही ती आयुष्यभर फक्त कर्तव्य बजावत होती. आता हे आणखीन एक कर्तव्य तिच्यामध्ये भर पडले होते. तिच्या आईला सर्वात जास्त समाधान झाले होते कारण लेकीच्या डोक्यावर अक्षता पडाव्यात आणि ती सुखी राहावी इतकी तिची अपेक्षा होती. आता या एका जबाबदारीतून ती पार पडली त्यामुळे तिला समाधान वाटत होते. राजनच्या आईला आपण एका कर्तव्यातून मुक्त झालो याचे समाधान वाटत होते. राजनला सांभाळणारी आणि स्वराला सांभाळणारी त्यांच्या हक्काचे कोणीतरी त्यांना मिळाले हे पाहून तिचे डोळे भरून आले.

राजनला मात्र आणखीन एक जबाबदारी पुढ्यात आली म्हणून थोडे वाईट वाटत होते. आता हिला आयुष्यभर झेलायचे कसे? तिचा राग सहन कसा करायचा असे त्याला वाटले; पण काही क्षणातच ही खरंच आयुष्यभर मला साथ देईल का की अर्ध्यावर डाव मोडून सोडून जाईल! अशी शंकाही वाटू लागली. त्यामुळे तो व्दिधा मनःस्थितीत होता.

अशाप्रकारे त्या दोघांचे लग्न अगदी व्यवस्थितरित्या पार पडले. मेघनाची आई आणि बहीण थोडा वेळ थांबून त्या त्यांच्या घरी गेल्या. आता मात्र मेघनाला अवघडल्यासारखे होत होते. काय करावे आणि कसे करावे याची तिला काहीच कल्पना नव्हती. ती गोंधळलेल्या अवस्थेत तशीच बसून होती. राजनच्या आईने मेघनाला सर्व काही सूचना सांगितल्या होत्या. कधी, काय आणि कसे करायचे हेही तिला समजावून सांगितले होते. शिवाय राजनला काय आवडते आणि काय आवडत नाही याचीही तिने सूचना दिली होती; पण यातील कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कोणत्या नाही या गोंधळात मेघना होती. घरात स्वयंपाकाला नोकर चाकर होते; पण जे काही करायचे ते पुढाकार घेऊन मेघनालाच करावे लागणार होते. शिवाय राजनने आईची आणि स्वराची संपूर्ण जबाबदारी मेघनावर सोपवली होती. या सगळ्या जबाबदारी ती व्यवस्थित पार पाडू शकेल का अशी शंका मेघनाला वाटत होती.