शब्द झाले मुके 48
खऱ्या अर्थाने मेघनाच्या आयुष्यातील परीक्षा आता सुरू होणार होती. तिच्या जीवनाला एक नवे वळण येणार होते. यामध्ये प्रवास करत असताना राजन तिला साथ देणार नव्हता. तो तिच्यासोबत नव्हता. तिला एकटीलाच हा रस्ता पार करावा लागणार होता. धडपडत रडतकुढत का होईना तिला चालत राहावे लागणारच होते आणि मेघना देखील इतकी जिद्दी होती की ती सारे काही एकटीने पार करणार होती.
संध्याकाळी सर्वजण आपापल्या घरी गेल्यानंतर घरामध्ये मेघना, राजन, स्वरा आणि राजनची आई असे चौघे जण होते. मेघनाला थोडे अवघडल्यासारखे वाटत होते; पण जेव्हा ती अवघडून बसली होती तेव्हा स्वरा तिच्याजवळ गेली.
"मेघना आई, तू आता इथेच राहणार ना आमच्यासोबत. आता ना खूप मज्जा येईल. आपण सर्वजण मिळून छान गमतीजमती करू. चालेल ना तुला." छोटी स्वरा म्हणाली.
"चालेल नाही तर पळेल. आपण खूप छान गमतीजमती करू. मी आता तुझ्या सोबतच असणार आहे." मेघना म्हणाली. तेव्हा स्वराला थोडे बरे वाटले. त्या दोघींच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या, गमती जमती करत त्या दोघी खळखळून हसत होत्या. ते पाहून राजनच्या आईला समाधान वाटले. आज कित्येक दिवसांनी त्या घरामध्ये हसण्याचा खळखळाट आवाज येत होता. नाहीतर कित्येक दिवस त्या घरात कोणी हसलेच नाही असे वाटत होते. स्वरा तर अवघडून नेहमी वावरायची. आज मात्र ती मेघना सोबत रमली होती. त्या घरात मेघना आल्याचा सगळ्यात जास्त आनंद स्वराला झाला होता हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
'परमेश्वरा! अखेर तू माझ्या पदरात हे सुख टाकलेसच. यांच्या चेहऱ्यावर असेच हसू ठेव. माझ्या स्वराला कशाची कमतरता भासू देऊ नकोस. माझे हे घर असेच आनंदाने भरलेले असू दे. आता यांना माझीच दृष्ट लागेल की काय?' असे म्हणून राजनच्या आईने त्यांची नजर उतरवली.
राजनची आई राजनच्या जवळ गेली आणि तिने राजनसमोर मेघनाचे भरभरून कौतुक केले. खरंच ही मुलगी अजून घरात आली नाही तोपर्यंत घरचे वातावरणच बदलून गेले. असेच हसते खेळते घर राहू दे. आता हे सर्व तुझ्या हातामध्ये आहे. तू त्या मुलीला सांभाळून घेतलास तर ती मुलगी आम्हाला सांभाळून घेईल. त्यामुळे तू तिची काळजी घे, तिला दुखवू नकोस, तिच्या भावनांशी खेळू नकोस, तिचा व्यवस्थित सांभाळ कर म्हणजे ती आमचा सांभाळ करेल. जर तिचे मन आनंदी असेल तरच ती घराकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकेल ना? तेव्हा जे काही आहे ते आता पूर्णपणे तुझ्या हातामध्ये आहे." असे म्हणून राजनची आई राजनला समजावून सांगत होती. राजन मात्र तिरकसपणे मेघनाकडे पाहत होता.
'ही या घरामध्ये पैशासाठी आली आहे हे नक्की. किती दिवस इथे राहिल काय माहित आणि हिची काळजी मी घ्यायची! ते कदापि शक्य नाही. मी असल्या व्यक्तीसोबत राहू शकत नाही.' राजन मनात म्हणत होता. 'ही फक्त आईच्या आणि स्वराच्या भावनांची खेळू नये म्हणजे झाले. जे काही व्हायचे आहे ते माझ्यासोबत होऊ दे. या दोघींनी काय केलंय?' असा विचार करत राजन तिथेच बसला होता. बराच उशीर झाला होता म्हणून राजनच्या आईने त्या दोघींना थांबवले. खरंतर त्या दोघींना तसे अर्ध्यावर थांबवणे तिला जड जात होते; पण खूपच उशीर झाला होता शिवाय दिवसभर काम करून सर्वजण थकले होते. त्यामुळेच आता झोपावे अशा उद्देशाने तिने त्या दोघींना मध्येच थांबवले.
"स्वरा, चला बाळा. आता झोपायला जाऊ. उद्या सकाळी लवकर उठायचे आहे ना? खूप उशीर झालाय. मेघना आई सुद्धा दमली असेल. तिलाही झोपायचे असेल ना. चल बघू." असे म्हणून राजनची आई स्वराला बोलावत होती; पण स्वराची तिथून उठण्याची अजिबात इच्छा नव्हती.
"आजी, मी आज मेघना आईसोबत झोपते ना. मेघना आई तुला चालेल ना?" स्वरा म्हणाली.
"स्वरा बाळा, माझ्यासोबत चल बघू. तसेही रोज माझ्यासोबतच तर झोपतेस आणि आज काय झाले आहे तुला? तुला आजीला एकटीला सोडायचे आहे का?" असे केविलवाणा चेहरा करून राजनची आई म्हणाली.
"अगं आजी, आत्ताच तर मेघना आई आली आहे आणि तू आता बोलू पण देत नाहीस. ती मला छान छान गोष्टी तरी सांगेल ना. प्लीज आजी, फक्त आज एकच दिवस." स्वरा म्हणाली.
"नको बाळा, चल प्लीज. आई दमली असेल." राजनची आई म्हणाली.
"आई राहू दे ना. स्वरा आज माझ्यासोबत झोपेल." मेघना म्हणाली तेव्हा राजन अवाक् होऊन तिच्याकडेच पाहत होता.
"अगं पण मेघना, तू आजच इथे आली आहेस आणि कशाला उगीच. तुम्ही दोघे थोडा वेळ एकमेकांसोबत घालवा. या जबाबदाऱ्या आयुष्यभर तुझ्या सोबत असतीलच. आत्ताच तर तू या घरामध्ये आली आहेस आणि लगेचच ही जबाबदारी तुझ्यावर मला ढकलायचे नाही. तुझ्याही काही इच्छा असतील. तुझेही काही स्वप्नं असतील जे तू आधी पाहिली असशील. मला तुझ्या भावनांशी खेळायचे नाही. आधी तुमचे पती-पत्नीचे नाते व्यवस्थित तयार करा आणि मग मुलीची जबाबदारी घ्या. तोपर्यंत मी आहेच की आणि स्वरा काय लगेच कुठे चालली आहे का? ती तर इथेच आहे. मग दिवसभर तिच्यासोबत असशीलच ना तू." राजनची आई मेघनाला समजावून सांगत होती.
"हो आजी; पण आज थोडं स्पेशल आहे ना. आज पहिल्यांदा मेघना आई आली आहे, त्यामुळे मी तिच्यासोबतच झोपणार." असा जणू स्वराने हट्ट धरला होता.
स्वराने इतका हट्ट धरला असल्यामुळे त्या सर्वांना तिचे म्हणणे मान्य करावे लागले. स्वरा, मेघना आणि राजन सोबत राजनच्या रूममध्ये झोपणार होती. ती खूप आनंदात होती आणि इकडे राजन आणि मेघनाला देखील खूप बरे वाटले होते. कारण त्या दोघांमध्ये अजून काही सुरळीत झाले नव्हते. असा अवघडलेपणा नात्यात घेऊन काय उपयोग? नात्याची सुरुवातच अशी अवघडून झाली तर पुढे कसे होणार? असा प्रश्न दोघांनाही पडला होता. स्वरा ही त्यांच्यासोबत येणार आहे म्हटल्यावर त्या दोघांनाही बरे वाटले.
रूममध्ये गेल्यावर आता इथे कसे झोपायचे हा प्रश्न मेघनाच्या मनात घोळत होता. कुठून तरी सुरुवात करायलाच हवी असा विचार करून ती स्वराला म्हणाली, "स्वरा, आपण दोघी इथे बेडवर झोपू आणि तुझे बाबा खाली झोपतील." हा मेघनाचा इशारा पाहून राजनला राग आला. तो तिरक्या नजरेने मेघनाकडे पाहू लागला.
"स्वरा, आपण दोघे वर झोपू आणि तुझी मेघना आई खाली झोपेल बरं." राजन म्हणाला. झालं! त्यामध्येच त्या दोघांचे तू तू मैं मैं सुरू झाले आणि पुन्हा दोघांच्या भांडणाला सुरुवात झाली. ते पाहून स्वरा घाबरली. हे दोघे असे लहान मुलांसारखे काय भांडत आहेत हा प्रश्न तिच्या मनामध्ये सुरू झाला. ती त्या दोघांकडे एकटक पाहत होती.
आता या दोघांचे भांडण संपेल, नंतर संपेल असे म्हणून ती दोघांकडे पाहत होती; पण ते दोघे खाली वर करत भांडतच होते. आता मात्र स्वराला काही समजेना. ती त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती; पण तिचे कोणीच ऐकत नव्हते. इतक्यात ती जोरात ओरडली. "थांबा, शांत व्हा. दोघेही शांत व्हा." असे स्वरा अचानक ओरडताच ते दोघेही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. ते दोघेही अचानक घाबरले. स्वरा इतक्या जोरात ओरडली म्हणून दोघेही तिच्या जवळ आले.
"स्वरा, काय झाले तुला? अशी का ओरडतेस? हे बघ आम्ही दोघेही शांत बसलोय. आता तू शांत रहा. रडू नकोस." असे म्हणून स्वराची समजूत घालत होते. कारण तिच्या आवाजाने राजनची आई त्या खोलीत येऊ नये याची ते दोघेही खबरदारी घेत होते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा