Login

शब्द झाले मुके 49

कथा एक प्रेमाची.. कथा तिच्या कर्तव्याची..
शब्द झाले मुके 49

स्वराचा आवाज ऐकून तिची आजी रूममध्ये आली. तिने दरवाजा ठोठावला तेव्हा राजन आणि मेघना मनातून खूप घाबरले. आता आई काही बोलतील का? हा प्रश्न त्या दोघांच्या मनात होता. हळूच राजनने दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय समोर आई आली होती. तो थोडासा दचकलाच.

"आई, तू इथे कशी काय आलीस? तुला काही हवं आहे का?" राजनने प्रश्न केला.

"अरे, मला काही नको आहे. मला तुमच्या खोलीतून स्वराच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी इकडे आले. काही झाले आहे का? ती का रडत आहे?" राजनच्या आईने राजनला प्रश्न केला.

"अगं, काही नाही. ती कुठे रडतेय! आता तर आम्ही झोपत होतो. ती झोपेल आमच्या सोबत. तू झोप जा." असे म्हणून राजन त्याच्या आईला बाहेरच्या बाहेर घालवण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात स्वराला तिच्या आजीचा आवाज ऐकू आला. तिने आजीला हाक मारली.

"आजी, याची इकडे ये ग." असा स्वराचा आवाज ऐकून स्वराची आजी त्यांच्या खोलीत गेली. तिथे जाऊन ती पाहते तर काय रूममध्ये सगळे सामान अस्ताव्यस्त पसरले होते. पांघरून एका साईडला तर उशा दोन्ही बाजूला पडल्या होत्या. सगळे सामान विस्कटलेले दिसले तेव्हा राजनच्या आईने डोक्याला हात मारला.

"अरे, हे काय? आत्ताच तर रूममध्ये आलात आणि इतक्यात एवढा पसारा केला! बापरे! अवघड आहे तुमचं. स्वरा, हा पसारा तू केलास? असं करायचं नाही बाळा. तुला इथे झोपायचं नव्हतं तर मला आधीच सांगायचं ना. मी तुला म्हटले होते की माझ्यासोबत झोप चल; पण तू ऐकले नाहीस." स्वराची आजी म्हणाली तशी स्वरा रडायला सुरुवात केली.

"अगं बाळा, तू अशी का रडतेस? रडू नकोस. शांत हो. काय झालं तुला? स्वराची आजी स्वराला समजावत म्हणाली.

"आजी, हे मी केलं नाही. हे या दोघांनी केले आणि तू मला ओरडत आहेस. अगं, मी तर इथे शांत बसले होते. हे दोघेच एकमेकांशी भांडत होते, मग मी काय करू? मला यांचं भांडण पाहून रडायला आले आणि म्हणून मी ओरडत होते. मला इथे झोपायचे नाही. आजी, मी तुझ्यासोबत झोपायला येते चल." असे म्हणून स्वरा पळत जाऊन तिच्या आजीला मिठी मारली.

"मी तुला आधीपासूनच सांगत होते की, तू माझ्यासोबत झोप चल; पण तू ऐकले नाहीस." आजी आणि नातीचे हे बोलणे चालू असताना राजन आणि मेघना मान खाली घालून गुपचूप उभे होते.

"बरं, चल बाळा. तू माझ्यासोबत झोप चल." असे म्हणून मी स्वराच्या आजीने स्वराला सोबत येण्यास सांगितले. त्या दोघी रूमच्या बाहेर पडणार होत्या इतक्यात पुन्हा स्वराची आजी वळून म्हणाली, "आता तुम्ही दोघेही झोपा. भांडण करायला अख्खं आयुष्य पडलंय." असे म्हणून ती खोलीतून निघून गेली. तेव्हा राजन आणि मेघना एकमेकांकडे पुन्हा रागाने पाहत होते. इतक्यात मेघना झपाझप पावले टाकत रागाने चादर आणि उशी घेऊन सोफ्यावर झोपायला निघून गेली. राजनने मात्र बेडवर मस्त अंग टाकून घेतले.

सकाळ झाली. मेघनाला नेहमी लवकर उठण्याची सवय असल्याने ती लवकर उठून तिचे आवरून खाली आली. तिने लग्नानंतरच्या सर्व विधी व्यवस्थित पूर्ण केल्या. आता मात्र त्यांच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती; पण त्या दोघांचे मन कधी जुळेल हे मात्र सांगणे अवघड होते. कारण मेघना जरी एक पाऊल पुढे टाकणार असली तरीही राजनच्या मनात असलेला गैरसमज दूर झाल्याशिवाय तो काही पाऊल पुढे टाकणार नव्हता. त्याला मेघना देखील इतर मुलींसारखीच वाटत असल्याने तो तिच्यावर पटकन विश्वास ठेवत नव्हता. मेघना मात्र तिचे कर्तव्य पूर्णपणे पार पाडत होती. ती अगदी स्वराची व्यवस्थित काळजी घेत होती. स्वराला सकाळी लवकर उठवून तिला अंघोळ वगैरे घालून तिला शाळेला जाण्यासाठी तिने तयार केले. राजन जेव्हा आवरून आला तेव्हा त्याला मेघना स्वराला तयार करत होती हे दिसले आणि त्याच्या मनात मेघनाची जागा निर्माण व्हायला सुरुवात झाली. मेघना हे सगळे काही निःस्वार्थीपणे करते की यामागे तिचा काही हेतू आहे अशी शंका मात्र त्याच्या मनात डोकावत होती; पण त्याने ते सारे काही बाजूला सारले आणि मेघना, स्वराचे सारे काही करत आहे एवढेच जाणले. आता मात्र हे असे किती दिवस चालू राहील हे तो पाहत होता. कारण नव्याचे नऊ दिवस झाले की दहाव्या दिवसापासून प्रत्येकाचे खरे रूप समजायला लागते असे त्याचे मत होते. मेघना देखील अशीच निघेल का अशी शंका त्याच्या मनात होती; पण सध्या तरी तो शांत बसला होता. सुरुवातीला ती जे काही करत होती ते निरखून पहावे, तिला पारखून पाहून मगच आपलंसं करावं असा विचार त्याने केला होता.

राजन स्वराला शाळेत सोडण्यासाठी घेऊन गेला. स्वराला शाळेत सोडून तो ऑफिसला निघून गेला होता. मेघनाने आज खूप छान नाश्ता बनवला होता; पण तिला त्याचा फिडबॅक मिळाला नव्हता. राजन नाष्टा कसा झालाय ते सांगेल याकडे ती आतुरतेने पाहत होती; पण राजन काहीही न बोलता गुपचूप नाष्टा करून गेला होता. घरामध्ये इतर कामांसाठी लोक असल्याने मेघनाला फारसे काही काम नव्हते; पण घरातील स्वयंपाक तरी आपण स्वतः करावा या उद्देशाने ती ते काम करत होती. तसेही तिला लहानपणापासूनच कामाची सवय असल्याने त्याचे फारसे काही वाटले नाही.

सारे आटोपून मेघना बाहेर जाऊन बसली तेव्हा तिची सासू तिथेच पेपर वाचत बसली होती. मेघना देखील मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसली होती.

"मेघना, मी काय म्हणत होते. तुम्ही कुठेतरी दोघेजण फिरायला जा, कारण हे सगळे करण्यासाठी आयुष्य बाकी आहे. आता हे सुरुवातीचेच दिवस खूप छान असतात. या दिवसातच जे काही एन्जॉय करायचे ते करून घ्या. तुम्ही कुठे जायचं ते ठरवा मी तिकीट बुक करायला सांगेन." असे मेघनाच्या सासूने सांगताच मेघना अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहतच बसली. खरंतर तिला कुठेही जायची इच्छा नव्हती, कारण प्रत्येक क्षणी राजन तिच्यासोबत फक्त भांडणच करत होता. तिला समजून घेत नव्हता त्यामुळे त्याच्यासोबत तर राहण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती. आता हे सासूला कसे सांगावे या विचारात ती तशीच बसून होती.

"अहो आई, आता कुठे स्वराची शाळा सुरू झाली आहे. तिचा अभ्यास घ्यायचा असतो. हे शाळेचे सुरुवातीचे दिवस खूप महत्त्वाचे असतात. शाळेत एकदा का अभ्यासक्रम मागे पडला की पुढे खूप अवघड होऊन जाईल. शिवाय तुमचे औषध, पथ्य वगैरे सर्व काही सांभाळून करावे लागते त्यामुळे फिरायला वगैरे कशाला? नको त्यापेक्षा आम्ही इथे छान आहोत." असे म्हणून मेघनाने त्यावर सारवासारव केली.

"तू काल परवा या घरात आली आहेस आणि लगेचच इतक्या मोठमोठ्या गोष्टी बोलत आहेस! मला हे काही पटत नाही आणि तू तरी कारण अजिबात देऊ नकोस. तू यायच्या आधी आमचं सगळं व्यवस्थित चालू होतच ना? मग आता दोन-चार दिवसांनी काही फरक पडणार आहे का? ते काही नाही. तू माझं ऐकायचं म्हणजे ऐकायचं. तुम्ही दोघेही निवांत एकांतात कुठेतरी जाऊन या. राजनला मी सांगेन. तू फक्त बॅग भरायला घे." असे म्हणून जणू राजनच्या आईने मेघनाला ऑर्डर दिली होती.

आता मात्र मेघनाला काय बोलावे ते समजेना. ती तशीच शांत बसली. तिला खूप टेन्शन आले होते. म्हणजे जी व्यक्ती आपल्या सोबत दोन शब्दही प्रेमाने बोलत नाही तिच्यासोबत आपण चार दिवस कसे घालवायचे हा प्रश्न तिच्या समोर पडला होता. काहीही झाले तरी आपण जायचे नाही असा पक्का निर्धार तिने मनाशी ठरवला होता. ऐनवेळी काय होईल ते पाहू असा विचार करून ती शांत बसली होती.
क्रमशः