शब्द झाले मुके 50
आता दुपारची वेळ झाली होती. स्वरा शाळेतून येण्याची वेळ झाली असल्याने मेघना सारे काही आवरून स्वरा येण्याची वाट पाहत बसली होती. सकाळपासून स्वरा घरात नसल्याने तिला एकटे एकटे वाटत होते. दिवसभर घरात बसून तिला सवय नव्हती. नेहमीच्या ऑफिस आणि घरचे काम तसेच घरची जबाबदारी यात ती गुंतून गेली होती. आज इतक्या दिवसांनी तिला असे एकटे निवांत बसायला मिळाले होते; पण त्याचवेळी तिला ते घर खायला लागले होते. सवय नसल्याने तिला खूप वेगळेपणा जाणवत होता. स्वरा आली की तिच्या सोबत मन रमेल आणि आपल्या मनातील मरगळही निघून जाईल असे तिला वाटत होते. इतक्यात स्वरा आलेली तिला दिसली.
"मेघना आई, मला आज शाळेत काहीच करमले नाही. मला तुला सोडून खरं तर आज शाळेला जायचेच नव्हते; पण बाबा ओरडेल म्हणून मी शांत झाले; पण कधी एकदा शाळा सुटेल आणि तुझ्याजवळ येईन असे मला वाटत होते बघ. आज शाळेत मला फक्त तुझी आठवण येत होती." स्वराचे हे बोलणे ऐकून मेघनाला भरून आले.
"किती गोड गं माझी राणी. मलाही अगदी तसेच झाले होते बघ. तू शाळेला गेली होतीस तेव्हापासून मला काहीच करमले नाही. मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून कधीची बसले आहे. आता येशील मग येशील म्हणून तुझी वाट पाहत बसले आहे." असे मेघना म्हणतात स्वरालाही खूप आनंद झाला आणि ती पटकन येऊन मेघनाला बिलगली.
"खरंच मेघना आई, चल आपण छान मज्जा करूया." असे म्हणून त्या दोघी आत आल्या. मेघनाने पहिल्यांदा स्वराला फ्रेश होऊन आल्यानंतर काहीतरी खायला दिले आणि मग त्या दोघीजणी खेळण्यात गुंग झाल्या. त्यांना आजूबाजूचे काहीच भान राहिले नाही. मेघना मातृत्वाचे सुख अनुभवत होती तर स्वरा तिच्या आईकडून सगळे हट्ट करून घेत होती. त्या दोघींनाही तो सहवास खूप सुखद वाटत होता.
जेव्हापासून मेघना त्या घरात आली होती तेव्हापासून स्वराला रोजचा दिवस हा खूप छान वाटत होता. तिला प्रत्येक वेळी आत्ताचा हा क्षण पुढे जाऊच नये असे वाटत होते. मेघनाचा सहवास तिला सुखद वाटायचा. तिला आता तिची आई परत मिळाली होती. स्वराला आई बाबा दोघांचेही प्रेम मिळत होते त्यामुळे ती खूप आनंदात होती आणि स्वराच्या सहवासाने मेघना देखील आनंदी झाली होती. ते हसते खेळते दोघींचे नाते पाहून राजनच्या आईला देखील खूप छान वाटत होते. आता हे घर हसते झाले त्यामुळे तिलाही समाधान वाटत होते. मुळात स्वराची चिंता मिटली होती. दिवसभर त्या दोघी मजेत होत्या.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर राजन जेव्हा घरी आला तेव्हा त्याला घरामध्ये जोरात हसण्याचा आवाज आला. त्याला खूप आश्चर्य वाटले. तो आत येऊन पाहतो तर काय मेघना आणि स्वरा दोघी खेळत होत्या. स्वरा पुढे पुढे पळत होती आणि तिच्या मागे मेघना तिला पकडण्यासाठी जात होती. घरात असा दंगा पाहून त्याला खूप छान वाटले. महत्त्वाचे म्हणजे स्वराच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून त्याला समाधान वाटले; पण त्याची येण्याची चाहूल लागताच मेघना मात्र जागीच थबकली. आता राजन आला आहे हे पाहून ती सावध झाली. ती तशीच थांबली असल्यामुळे स्वराला मात्र थांबावे लागले.
"ए आई, ये ना ग. तू अशी का थांबली आहेस? चल ये पटकन. बाहेर जाऊया." असे म्हणून स्वरा तिच्या तंद्रितच बाहेर जात होती. इतक्यात ती धावत जात असताना राजनला येऊन धडकली. जेव्हा तिने वर पाहिले तेव्हा तिला राजन दिसला. स्वराने अलगदच जीभ चावली.
"अरेच्चा! बाबा तुम्ही आलात. चला ना आम्ही दोघी खेळत आहोत. तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चला." असे म्हणून स्वरा राजनला बोलावू लागली. तेव्हा राजनने मेघनाकडे एक कटाक्ष टाकला.
"नको बाळा, तुम्ही खेळा. मी आत्ताच ऑफिस मधून आलोय ना. फ्रेश होऊन येतो." असे म्हणून राजन फ्रेश व्हायला गेला. तेव्हाच मेघनाला मात्र एक वेगळीच प्रचिती आली. खरंच स्वराने राजनला पितृत्वाचे सुख दिले होते आणि तो ते अगदी योग्य पद्धतीने निभावत होता हे तिला जाणवले.
राजन फ्रेश होऊन खाली आला. त्याला जाम भूक लागली होती त्यामुळे तो डायनिंग टेबलवर आला आणि त्याने सुमन काकींना आवाज दिला. सुमन काकी म्हणजे त्यांच्या घरातल्या स्वयंपाकी होत्या. त्या स्वयंपाक करून राजनला, राजनच्या आईला रोज वाढत होत्या. त्यामुळे नेहमीप्रमाणे राजनने सुमन काकींना आवाज दिला.
"सुमन काकी, प्लीज मला लवकर वाढा. आज खूप भूक लागली आहे." तेव्हाच त्याला आतून मेघना स्वयंपाक घेऊन डायनिंग टेबलवर येत आहे हे दिसले आणि तो आश्चर्याने तिच्याकडेच पाहत राहिला. तिने सर्वांसाठी ताट घेतले आणि प्रत्येकाला ती वाढू लागली. स्वरासाठी सुद्धा तिने छोटेसे ताट घेतले आणि तिलाही ती वाढत होती. आज सगळेजण एकत्र जेवायला बसणार होते. याआधी स्वरा आणि स्वराची आजी जेवून बसायच्या आणि राजनला मात्र सुमन मावशी जेवायला वाढायची; पण यापुढे असे होणार नाही हे जणू मेघनाने त्यादिवशी दाखवूनच दिले.
"स्वरा आणि आई तुम्ही दोघीही या. आज आपण सर्वजण एकत्र जेवायला बसुयात." मेघनाने स्वरा आणि स्वराच्या आजीलाही जेवायला बोलावले. सर्वजण एकत्र डायनिंग टेबलवर बसले होते.
"आई, आज तू मला भरवणार नाहीस?" छोटी स्वरा म्हणाली.
"हो तर मी माझ्या बाळाला भरवणार आहे; पण सर्वांसोबतच. आजपासून आपण सर्वजण संध्याकाळचे जेवण एकत्र जेवायचे. सकाळ पासून आपण एकत्र नसतो त्यामुळे रात्रीचे जेवण आपण एकत्र जेवायचे. तसेही दिवसभरातील सर्व ताण निघून जातो. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला की आपला थकवा निघून जातो." मेघना स्वराला समजावून सांगत होती आणि त्यातूनच जणू ती सर्वांना हे बजावत होती की आजपासून आपण सर्वजण एकत्र जेवायचे आहे. हे जेव्हा मेघना स्वराला सांगत होती तेव्हाही राजनने एक कटाक्ष मेघनाकडे टाकला.
'आता ही आम्हाला शिकवणार का? काय कसे करायचे ते?' काही बोललं तर आई रागावेल म्हणून राजन शांत राहिला.
"मेघना आई, तू खरंच खूप चांगली आहेस ग. याआधी मला का भेटली नाहीस." स्वराने मेघनाला प्रश्न केला तेव्हा मेघना गालातच हसली.
"याआधी भेटली नाही; पण आता इथून पुढे मी तुझ्या सोबतच असणार आहे." असे म्हणून मेघनाने स्वराला तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले.
"हो मेघना आई, तू आता मला सोडून कधीच कुठेच जायचे नाही बरं. मी तुझ्या सोबतच राहणार आहे." स्वरा मेघनाला बिलगतच म्हणाली.
"हो बाळा नक्कीच." असे म्हणून मेघनाने स्वराच्या गालावरून हात फिरवला.
'उगाच लहान मुलीला खोटी आशा दाखवत आहे. काय गरज आहे तिला असे बोलायची. काय माहित या घरात किती दिवस राहील? मला नाही वाटत जास्त दिवस राहिलं; पण जाऊ दे. हिच्यामुळे किमान त्या मुलीचे चेहऱ्यावर हास्य तरी आले.' असे राजन मनातच म्हणत शांत राहिला.
"मेघना आई, तू उद्यापासून ऑफिसला जाणार आहेस का?" स्वराने मेघनाला प्रश्न केला.
"नाही ग बाळा, उद्या मी माझ्या आईकडे जाणार आहे आणि तिकडून आले की नंतर मी ऑफिसला जाईन. आता लगेच काही जाईन असे वाटत नाही. अजून माझी थोडी रजा शिल्लक आहे. त्यामुळे नंतर गेले तरी चालेल." मेघना म्हणाली.
"तुझ्या आईकडे म्हणजे! लगेच का चालली आहेस? आणि तू कधी येणार? आम्हाला सोडून जात आहेस का?" स्वरा थोडीशी घाबरतच म्हणाली.
"नाही बाळा, ही एक रितच असते. त्यामुळे मी जाणार आहे आणि लगेच येणार आहे. मी काही फार दिवस तिथे राहणार नाही." मेघना म्हणाली.
"आई, तू ऑफिस जॉईन केल्यावर माझ्यासोबत कोण खेळणार? मग तू इथे असलीस काय आणि नसलीस काय? मला रात्रीच भेटणार ना." स्वरा केविलवाण्या चेहऱ्याने विचारली. तेव्हा राजन मेघना काय उत्तर देते याकडे लक्ष लावून बसला होता.
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा