Login

शब्द झाले मुके 52

कथा एका प्रेमाची.. कथा तिच्या कर्तव्याची..
शब्द झाले मुके 52

राजन तोंडातल्या तोंडात बोलत होता हे मेघनाने जाणले आणि ती मात्र तिचे सामान आवरण्यात व्यस्त झाली. 'याचे नेहमीचेच आहे. जे काही बोलायचे आहे ते स्पष्ट बोलत नाही आणि मागून असा बडबडत राहतो' असे ती मनातच म्हणाली आणि तिने तिची बॅग भरायला घेतली. कपाटातील कपडे काढून ती बँकेत भरत होती. किती दिवस जायचे हे तिचे अजून ठरले नसल्याने कमी जास्त कपडे ती बँकेत भरत होती. तेव्हाच तिच्या कानावर राजनचे शब्द पडले. "उद्या खरंच जायची गरज आहे का?" तेव्हा मात्र तिला प्रश्न पडला की नक्की याच्या मनात काय चाललंय? याला मला पाठवायचे नाही की हा स्वरासाठी असे बोलतोय. ती दोन क्षण तसेच स्तब्ध झाली.

बराच विचार करून तिने पुन्हा राजनला प्रश्न केला. "मी उद्या जाऊ की नको." तेव्हा मात्र राजन शांत झाला.

'हिला उद्या जाऊ नको म्हटले तर मी अडवतोय असे दिसेल आणि जा म्हटले तर ही लगेच निघून जाईल तेव्हा काय करावे.' अशा विचारात राजन तसाच उभा होता.

"मी काय सांगणार आहे? तुझे तू ठरव." असे म्हणून त्याने त्यातून बाजू काढून घेतली; पण तरीही तो मेघनाकडे पाहत उभा राहिला त्यामुळे मेघना द्विधा मनःस्थितीत तशीच उभी होती.

बराच वेळ विचार करून तिने माहेरी जायचा निर्णय घेतला, कारण ही सुद्धा एक प्रकारची विधी आहे जी लग्नानंतर करायची असते. मी जर माहेरी गेले नाही तर तिकडे आईला वाईट वाटेल. दोन चार दिवसांचा तर प्रश्न आहे. आपण लगेचच परत येऊ असा विचार करून मेघनाने पुन्हा बॅग भरायला घेतली. ती बॅक भरत आहे याचा अर्थ ती उद्या नक्कीच जाणारच हे राजनने जाणले आणि तो तरातरा आत जाऊन अंथरून टाकून झोपी गेला. तो असे का वागतोय हे त्याचे त्यालाही समजत नव्हते. नक्की त्याच्या मनामध्ये काय सुरू आहे हे मेघनालाही समजत नव्हते. तो हे सगळे स्वरासाठी करतोय की त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी जागा निर्माण झाली आहे हे कळायला वाव नव्हता. तरीही मेघनाने शांतपणे बॅग भरले आणि ती सुद्धा जाऊन झोपली.

सकाळ झाली. प्रत्येक जण आपापल्या कामाला लागले. मेघनाने स्वराचे आवरले आणि तिला शाळेला जाण्यासाठी तयार केले. स्वराचा उठल्यापासून मूड ऑफ होता. ती नेहमीसारखी बोलत नव्हती. ती शांत शांत बसली होती ते पाहून मेघनाला खूपच वाईट वाटले.

"अगं बाळा, आज इतकी शांत का आहेस? तुला काही हवं आहे का? मी आज टिफिनमध्ये तुझ्या आवडीचे पराठे बनवून दिले आहेत. पूर्ण टिफिन खाऊन ये बरं का." मेघना स्वराचे मन बदलण्यासाठी बोलू लागली.

"आई, मी आज शाळेतून आल्यानंतर तू घरी नसणार ना म्हणून मला वाईट वाटत आहे." असे जेव्हा स्वरा म्हणाली तेव्हा मेघनाला खूप वाईट वाटले; पण काय करणार तिला माहेरी तर जावे लागणारच होते.

"स्वरा बाळा, असे करायचे नाही. आईला जावे तर लागणारच आहे ना. तिची आई तिकडे वाट पाहतेय. आई दोन दिवसात नक्की परत येईल मग ती लवकर अजिबात जाणार नाही. ती इथेच राहील. तेव्हा शहाण्या मुलीसारखं वागायचं बरं का." राजनच्या आईने स्वराला समजावले.

"मेघना तुला घ्यायला कोणी येणार आहे की राजन सोबत जाशील." राजनच्या आईने मेघनाला प्रश्न केला.

"नाही आई, माझी मी नंतर जाईन." असे मेघना म्हणाली.

"अगं कशाला? जाता जाता तुला राजन सोडून जाईल ना. शिवाय तू कधी येणार आहेस ते सांग तुला घ्यायलाही तो येईल." असे राजनची आई म्हणताच राजनने एक तिरका कटाक्ष मेघनाकडे टाकला. तिने हळूच मान डोलवली आणि तिचे सामान घेऊन ती खाली आली. तिघेही गाडीत जाऊन बसले. मेघनाने तिच्या सासूला नमस्कार केला आणि ती सुद्धा गाडीत जाऊन बसली. त्यानंतर राजनने गाडी सुरू केली.

"स्वरा, आपण आधी तुझ्या आईला तिच्या घरी सोडू आणि मग मी तुला शाळेत सोडतो." असे राजन म्हणाला.

"नाही नाही बाबा, मला पहिल्यांदा तुम्ही दोघे मिळून शाळेत सोडा आणि मग तू एकटा आईला घरी सोडायला जा." स्वरा पटकन म्हणाली.

"स्वरा, असा हट्ट करू नकोस बाळा. मला जायला उशीर होतोय. आधी तुझ्या आईचे घर लागते आणि मग तुझी शाळा येते त्यामुळे मला सोडायला सोपे जाईल. माझे ऐक बाळा." असे राजन थोडासा आवाज मोठा करत म्हणाला.

"नको ना बाबा, प्लीज. मेघना आईला सोडून जाताना मला कसेतरीच वाटणार, त्यापेक्षा मला स्कूलमध्ये सोडून तुम्ही जा म्हणजे मला छान वाटेल. मला वाईट वाटणार नाही. प्लीज बाबा." असे म्हणून स्वरा केविलवाना चेहरा करून राजनकडे पाहू लागली. तिच्या इवल्याशा चेहऱ्याकडे पाहून राजनला कसेतरीच वाटू लागले आणि शेवटी त्याने स्वराला पहिल्यांदा सोडण्याचा निर्णय घेतला.

"मेघना आई, तू लवकरच येणार ना. मला तुझी खुप आठवण येईल तेव्हा मी तुला फोन केला तर चालेल ना?" स्वरा शाळेत जाईपर्यंत मेघनाला सारखे विचारत होती.

"हो बाळा, तुला हवे तेव्हा तू फोन कर आणि मी काही फार दिवसासाठी जात नाही. मी लगेच येईन." मेघनाने स्वराची समजत काढली. त्या दोघींचे बोलणे चालू असतानाच स्वराची शाळा आली त्यामुळे तिला नाईलाजाने गाडीतून उतरावे लागणार होते.

"चल मेघना आई, मी येते बाय." असे म्हणून स्वरा उतरू लागली, इतक्यात मेघनाने तिला अडवले.

"अगं बाळा थांब. मी सुद्धा तुझ्यासोबत आत येते. तसेही तुझ्या मॅडमला अजून एकदाही भेटले नाही. तेव्हा आता आलेच आहे तर त्याची भेट घेऊनच जाईन." असे मेघना जेव्हा म्हणाली तेव्हा राजनने मागे वळून पाहिले.

"जस्ट एक मिनिट मी लगेच आले." असे म्हणून त्या दोघी गाडीतून उतरल्या. राजनने गाडी साईडला पार्क केली आणि तो देखील त्यांच्या पाठीमागून आत जाऊ लागला. मॅडमची भेट घेऊन झाल्यानंतर मेघना आणि राजन दोघेही गाडीकडे यायला निघाले. इतक्यात त्यांना स्वराचा आवाज ऐकू आला. त्या दोघांनीही पाठीमागे वळून पाहिले तर स्वरा त्यांच्या पाठोपाठ पळत येत होती, ते पाहून ते दोघेही खूप घाबरले. कारण तो रस्ता रहदारीचा होता. तिथून शाळेला येणाऱ्या जाणाऱ्या तसेच इतर गाड्या ये-जा करत होत्या त्यामुळे स्वरा रोड क्रॉस करून कशी येणार या भीतीने दोघेही खूप घाबरले होते. मेघना स्वराला थांबण्यास खुणावत होती; पण स्वरा काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. तिकडून भरधाव वेगाने गाडी येत आहे हे मेघनाने पाहिले आणि ती पटकन तिकडे जाऊ लागली.

"अगं, तू कुठे चालली आहेस? तिकडून गाडी येत आहे." राजन म्हणाला.

"अहो, ती बघा स्वरा तिकडून येत आहे. ती गाडीच्या मध्ये आली तर?" असे म्हणून मेघनाने राजनचा हात झिडकारला आणि ती परत तशीच पुढे गेली. भरधाव वेगाने गाडी तिच्या अगदी जवळ आली. मेघनाने स्वराला बाजूला ढकलले आणि ती त्या संकटाला सामोरे गेली.
पुढे काय होईल? दोघी गाडीच्या मध्ये येतील की वाचतील? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः


🎭 Series Post

View all