शब्द झाले मुके 53
भरधाव वेगाने गाडी येत असल्याचे पाहून मेघना पटकन पळत स्वराकडे चालली. ती गाडी स्वराकडेच येत असल्याचे तिने पाहिले होते. मेघना धावत गेली आणि तिने स्वराला बाजूला ढकलून दिले. ते पाहून राजनला पहिल्यांदा मेघनाचा खूप राग आला; पण नंतर तिकडून भरधाव वेगाने आलेली गाडी पाहून त्याने मेघनाला आवाज दिला. राजन जोरात मेघना म्हणून ओरडला. मेघना राजनकडे पाहू लागली. इतक्यात त्या गाडीने मेघनाला येऊन धडक दिली. मेघना बाजूला जाऊन पडली. ते पाहून स्वराने देखील जोरात किंकाळी फोडली. आजूबाजूचे सर्वजण मेघना भोवती गोळा झाले. राजन धावत पळत मेघना जवळ गेला. स्वरा देखील मेघनाजवळ जाऊन जोरात रडू लागली.
अशा अचानक आलेल्या प्रसंगाने राजनला काय करावे ते समजेना. त्याने मेघनाला उचलून घेतले आणि गाडीत बसवले. स्वराला देखील गाडीत बसण्यास सांगितले आणि तो हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे जाऊन त्याने मेघनाला ऍडमिट केले आणि तो तसाच बसला. स्वरा मात्र खूप रडू लागली. स्वराला घेऊन ते सगळे हँडल करणे त्याला शक्य नव्हते, म्हणून त्याने ड्रायव्हरला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेऊन स्वराला घरी नेण्यास सांगितले. स्वरा घरी गेली. राजन मात्र मेघना सोबत हॉस्पिटलमध्येच बसून राहिला. एक्सीडेंट झाल्यामुळे मेघनाचे भरपूर रक्त गेले होते, त्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. बराच वेळ झाला तरी ती शुद्धीवर आली नव्हती. ही एक्सीडेंट केस असल्यामुळे काही वेळातच तिथे पोलीस आले. त्यांनी येऊन सगळी माहिती घेतली आणि ते निघून गेले. अजूनही मेघनाला शुध्द आली नव्हती म्हणून राजनला काळजी लागली होती.
'ही माझ्या आयुष्यात येऊन चार-पाच दिवस झाले नाही तर हिने माझ्या मनामध्ये घर केले आहे. स्वरासाठी हिची जागा खूप मोठी आहे. तिने या पाच दिवसातच स्वराला आपलंसं केलं आहे. स्वरा आता तिची मुलगी म्हणूनच वावरत आहे. स्वराला तिचा लळा लागला आहे; पण आता हिला काही झाले तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. मी हिच्यासोबत खूप चुकीचे वागलो; पण हिने स्वराला वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राण्याची काळजी देखील केली नाही. तिच्यासाठी स्वराची जागा खूप मोठी आहे. तिने स्वराला मनापासून आपलंसं केलं आहे. ही आईची देखील खूप चांगली काळजी घेते. त्यांच्यासाठी ही खूप काही करते आणि मी मात्र तिच्यासोबत खूप चुकीचे वागलो. मी असे करायला नको होतो.' असे म्हणून राजन पश्चातापाने युक्त झाला होता; पण आता मेघनाचे काय होईल ते सांगता येणार नव्हते. मेघना देखील त्याच्या आयुष्यातून निघून गेली तर पुन्हा एकदा तो कोलमडून पडेल. पुन्हा एकदा सारे काही संपल्याची त्याला जाणीव होईल आणि यातून तो पुन्हा बाहेर येईल हे कोणालाही सांगता येणार नाही.
स्वराच्या इतक्या छोट्याशा बालमनावर इतका मोठा आघात झाला होता. सुरुवातीस आघात जेव्हा झाला होता त्यातून ती सावरली होती; पण आता या गोष्टीतून ती सावरेल हे सांगता येणार नाही. इतक्याशा बालमनाला एवढ्या मोठ्या गोष्टी सहन कराव्या लागत होत्या. तिच्या डोळ्यासमोर इतक्या मोठ्या गोष्टी घडत होत्या. नियतीच्या पुढे कोणाचेही काहीही चालत नाही असे म्हणतात. असे नियतीने स्वरासोबत, राजनसोबत आणि त्याच्या आईसोबत इतका मोठा खेळ मांडला होता.
पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी त्याच्या आयुष्यात रिपीट होत होत्या. यामध्ये त्याची काय चूक की नियतीलाच हे मान्य नाही हेच त्याला समजत नव्हते. त्याच्या आयुष्यामध्ये सुख आहे की नाही असे विचार त्याच्या मनात येत होते. आता कुठे सुखाची चुणूक लागली होती की इतके मोठे दुःख त्याच्यासमोर येऊन ठेपले होते. पुन्हा सुखाची झलक दिसेल की आयुष्यभर दुःखच ओढून घ्यावे लागेल असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. पुन्हा त्याने मेघनाला लवकर बरे करण्याबाबत प्रार्थना केली. कित्येक दिवसांनी तो देवाला पुन्हा प्रार्थना करत होता. मागच्या वेळेपासून बरेच दिवस झाले त्याने देवाला साधा नमस्कार सुद्धा केला नव्हता; पण आज मेघनासाठी त्यालाही करावे लागत होते. इतका मोठा बिझनेसमॅन असूनही त्याला हतबल झाल्यासारखे वाटत होते. तो पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन मेघनाच्या तब्येतीबाबत विचारणा करत होता; पण डॉक्टर तरी काय सांगणार? मेघनाला अजूनही शुद्ध आली नव्हती. जेव्हा तिला शुद्ध येईल तेव्हाच तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा करता येणार होती.
डॉक्टरांनी मेघनासाठी 24 तासांचा अवधी दिला होता. 24 तासांमध्ये जर तिला शुद्ध आली तरच पुढची ट्रीटमेंट करता येणार होती. नाहीतर ती कोम्यात जाण्याची शक्यता होती, त्यामुळे राजनला आणखीनच भीती वाटू लागली. घरात स्वराने तिच्या आजीला सारे काही सांगितले, त्यामुळे तिचा फोन राजनला आला होता. तिने राजनचे सांत्वन केले होते. इकडे मेघनानाच्या आईने देखील राजनला फोन करून सगळ्या गोष्टींची विचारणा केली होती; पण त्या तरी काय करणार? मेघनाला शुद्ध आल्याशिवाय कोणालाच काहीच करता येत नव्हते. त्यामुळे सर्वजण फक्त देवाकडे मेघनासाठी प्रार्थना करत होते.
24 तासातले दहा तास असेच निघून गेले होते; पण तरीही मेघनाला शुद्ध आली नव्हती. तिला सलाईन वगैरे लावून आयसीयूमध्ये ठेवले होते. तिथे कुणालाही सोडण्यात येत नव्हते. राजन बाहेरच बसून राहिला होता. मेघना कधी शुद्धीवर येते याची तो वाट पाहत बसला होता; पण दहा तास निघून गेले तरीही ती शुद्धीवर आली नव्हती त्यामुळे सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली होती. राजन तर उठून येरझाऱ्या घालत होता. त्याला काय करावे ते समजत नव्हते. शिवाय त्याचे सांत्वन करायलाही तिथे कोणीच नव्हते, त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. मेघना शुद्धीवर यावी म्हणून जे काही प्रयत्न करावे लागतील ते करा म्हणून तो डॉक्टरांकडे सारखी विनवणी करत होता. डॉक्टरही त्यांच्या पद्धतीने पूर्ण काळजी घेत होते सर्वकाही करत होते; पण तरीही मेघनाला शुद्ध येत नव्हती त्यामुळे कोण तरी काय करणार? सर्वजण परिस्थितीसमोर हतबल झाले होते.
बराच वेळ झाला तरी मेघनाला शुद्ध येत नव्हती. राजन तसाच अस्वस्थ होऊन बाहेर बसला होता. काही वेळाने त्याच्या फोनवर घरून फोन आला. त्याने पटकन फोन उचलला. फोन राजनच्या आईचा होता.
"अरे राजन, मेघना शुद्धीवर आली की नाही? ती कशी आहे आता?" राजनची आई काळजीने म्हणाली.
"अगं आई, तिला अजूनही शुद्ध आली नाही. डॉक्टर त्यांचे काम करत आहेत. बघूया येईल तिला लवकर शुद्ध." राजनने आईचे सांत्वन केले.
"अरे राजन ऐक ना बाळा, स्वराची तब्येत खूप बिघडली आहे. तिला खूप ताप आला आहे. शिवाय ती घाबरली आहे. सारखे मेघनाचे नाव घेत आहे. मला तर घरामध्ये काय करू ते समजेना. तिलाही दवाखान्यात घेऊन येऊ का?" पुन्हा राजनची आई म्हणाली.
"आई नको, स्वराला घेऊन येऊ नकोस. थांब तिथेच. मी काही होतंय का पाहतो. नाहीतर एक डॉक्टरांना फोन करून घरी येऊन तपासायला सांगतो. इकडे आणलीस तर ती मेघनाला पाहायला जाणार आणि पुन्हा तिची अशी तब्येत बिघडणार. त्यापेक्षा थांब. मी डॉक्टरांना तिकडे पाठवून देईन." असे राजन म्हणाला. त्याला प्रचंड ताण आला होता. इकडे आधीपासूनच मेघनाला शुद्ध येत नव्हती आणि तिकडे आता स्वराची तब्येत बिघडली आहे. या परिस्थितीत त्याला धीर धरून राहायला लागणार होते. त्याने लगेच स्वराच्या डॉक्टरांना फोन लावला आणि त्यांना घरी जाऊन स्वराला तपासण्यास शिवाय तिच्या तब्येती विषयी सांगितले. राजनने फोन केल्यानंतर काही वेळातच डॉक्टर स्वराच्या घरी गेले आणि स्वराला त्यांनी तपासून पाहिले. काही औषधे लिहून शिवाय एक इंजेक्शन देऊन त्या घरातून बाहेर निघाल्या. बाहेर निघताना त्यांनी पुन्हा राजनला फोन केला.
"हॅलो मिस्टर राजन, मी स्वराची डॉक्टर बोलतेय. मी स्वराला चेक करून आत्ताच बाहेर पडले आहे. तिला एक इंजेक्शन दिले आहे. मला वाटतेय ती प्रचंड घाबरलेली आहे. कशाची तरी भीती तिच्या डोक्यापर्यंत गेली आहे आणि त्यामुळेच तिला ताप आला आहे. यातून तिला लवकरात लवकर बाहेर काढणे गरजेचे आहे. नाहीतर तिचा ताप डोक्याला चढून ती कोम्यात जाऊ शकते." हे ऐकून राजनच्या हातून फोन गळून पडला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा