Login

शब्द झाले मुके 54

कथा एका प्रेमाची.. कथा तिच्या कर्तव्याची..
शब्द झाले मुके 54

घरामध्ये स्वरा आजारी आहे तर इकडे हॉस्पिटलमध्ये मेघना. या दोघींच्या कचाट्यात राजन अडकला होता. राजनच्या आईने तर सगळे देव पाण्यात ठेवले होते. ती स्वरासमोरून हलली सुद्धा नाही. ती तिथेच बसून देवाचे नामस्मरण करत बसली होती. दोघी सुद्धा लवकर बरे होऊ देत असे ती देवाला सारखे विनवत होती. इकडे राजनला देखील खूप त्रास झाला होता. त्याच्याकडे इतका पैसा, इतके ऐश्वर्य असूनही आता उपयोगाचा नव्हता. त्याची पत्नी आणि त्याची स्वरा यांना तो वाचू शकत नव्हता. कितीही प्रयत्न केले तरी त्या दोघींच्या परिस्थिती समोर तो मात्र हतबल झाला होता.

बऱ्याच अथक प्रयत्नाने मेघनाला शुद्ध आली. तिचे श्वासोच्छ्वास सुरू झाले आणि डॉक्टरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यांनी लगेच येऊन राजनला सांगितले की "मेघना आता खतऱ्याच्या बाहेर आहे. ती लवकरच पूर्णपणे शुद्धीवर येईल, मग तुम्ही तिला भेटू शकता." हे ऐकून राजनला खूप आनंद झाला आणि त्याने लगेचच त्याच्या आईला फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली. इकडे मेघनाची आई आणि बहीण सुद्धा राजनच्या घरी गेले होते, त्यामुळे त्या दोघींनाही ती बातमी समजली. तेव्हा सर्वजण सुटकेचा निःश्वास घेतला.

"स्वरा बाळा, तुझी मेघना आई आता शुद्धीवर आली आहे. ती आता खतऱ्याच्या बाहेर आहे त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. तू सुद्धा लवकर बरी हो." असे म्हणून स्वराच्या आजीने स्वराला सांगितले.

आजीचे हे शब्द कानी पडताच स्वरा चटदिशी उठून बसली आणि मला मेघना आईला भेटायचे आहे असा जणू तिने हट्टच धरला. ती कोणाचेच ऐकून घ्यायला तयार नव्हती.

मेघना पूर्ण शुद्धीवर होती आणि तिला आता बाहेरच्या रूममध्ये शिफ्ट करणार होते. मेघनाला बाहेरच्या रूममध्ये शिफ्ट केल्यानंतर तिच्याशी मनातले सारे काही बोलायचे असे म्हणून त्याने मनातच शब्दांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली होती. डॉक्टरांनी मेघनाला बाहेर शिफ्ट केले आणि त्यांनी राजनला भेटण्यास सांगितले. राजन उत्सुकतेने तिला भेटण्यास आज जाऊ लागला. सारे काही मनात आहे ते तिला बोलायचे आणि तिची माफी मागायची. तिच्यासोबत सुखाने संसार करायचा. खरे तर ती निस्वार्थी मनाने माझ्यासोबत संसार करत होती. स्वराची अगदी व्यवस्थित काळजी घेत होती. थोडक्याच दिवसात तिने माझ्या मनावर राज्य करायला सुरुवात केले होते; पण मी मात्र छोट्या छोट्या गोष्टींनी तिच्यावर चिडत होतो. तिला घालून पाडून बोलत होतो. माझे चुकलेच. नाहीतर कोण स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्या मुलीला वाचवेल; पण हिने तसे केले नाही. अगदी आईचे कर्तव्य जे असतात ते पुरेपूर तिने पार पाडले. आता मात्र तिची माफी मागायला हवी; पण माफी कुठल्या शब्दाने मागू? खरंतर तिच्या या सर्व कार्यासमोर माझे शब्द मुके झाले आहेत. त्यांना बोलता येईनात. माझ्या मुलीसाठी एक सख्खी आई आपल्या मुलाचे जेवढे करू शकत नाही तितके मेघनाने केले आहे. मी बाप बनू शकणार नाही हे तिला माहीत असूनही ती माझ्यासोबत लग्नाला तयार झाली. तिची घरची परिस्थिती कशी का असेना; पण तरीही तिने हे लग्न पूर्णपणे व्यवस्थित करून तिची कर्तव्य पार पाडत होती. खरंच तिच्या या कर्तव्याला सलाम. ही मेघना खरंच पूर्णपणे जगापेक्षा वेगळी आहे. नाहीतर हिच्या जागी दुसरे कोणी असते तर या ऐश्वर्याचा उपभोग घेत बसले असते; पण तिने तसे अजिबात केले नाही. खरंतर मीच चुकलो असे वारंवार राजन मनाशीच बडबडत होता. आता मात्र आत जाऊन तिची माफी मागावी या उद्देशाने तो आत जात होताच इतक्यात स्वराचा आवाज त्याच्या कानावर आला.

"बाबा, मेघना आई कुठे आहे? मला तिला भेटायचं आहे." राजनने तिच्याकडे पाहिले.

"अगं स्वरा, तू इथे कशी आलीस? तुझी तर तब्येत बरी नाही ना? अगं आई, तू तिला इकडे का घेऊन आलीस?" राजन त्या सर्वांना उद्देशून बोलत होता.

"अरे, ही ऐकायलाच तयार नाही. मेघना आईला भेटणारच म्हणून तिने हट्टच केला होता, त्यामुळे मेघनाला भेटण्यासाठी तिला इकडे घेऊन यावे लागले. मेघना शुद्धीवर आली आहे ना. कुठे आहे ती?" असे राजनच्या आईने विचारच राजनने त्या रूमकडे बोट केले तसे सर्वजण रूममध्ये शिरले. राजन मात्र पुन्हा तसाच बाहेर उभा राहिला.

"मेघना आई, तू कशी आहेस? बरी आहेस ना?" हे विचारताना स्वराचे डोळे डबडबले होते. तिकडे मेघनाच्याही डोळ्यातून अश्रू ओघळत होते.


"मी बरी आहे बाळा, तू कशी आहेस? तुझी तब्येत बरी आहे ना?" मेघनाने तिला पण हा प्रश्न केला.

"हो आई, मी अगदी बरी आहे." असे म्हणून दोघींनी गळाभेट घेतली. एकमेकींची विचारपूस केली. मेघनाच्या आईने आणि सासूने दोघींनीही मेघनाची विचारपूस केली. बराच वेळ झाला तरी स्वरा मेघनाचा हात तिच्या हातातून बाजूला करत नव्हती. त्या दोघींच्या हाताची पकड अगदी मजबूत झाली होती. त्या दोघी आज खूप वेळ गप्पा मारत बसल्या. इकडे बाहेर राजनची मात्र तगमग सुरू होती. त्याला मेघनाशी एकांतात बोलायचे होते. सर्वांसमोर बोलायला त्याचे मन धजत नव्हते, त्यामुळे सर्वजण बाहेर आल्यानंतरच तिच्याशी बोलायला जायचे असे त्याने ठरवले होते.

इकडे मात्र राजन तिला भेटायला आला नाही म्हणून मेघना थोडीशी अस्वस्थ झाली होती. तिला वाटले होते की आता तरी राजनचे डोळे उघडेल त्याला मेघना खोटे वागत नसून ती खरी आहे हे समजून आले असेल असे वाटत होते; पण तसे मुळीच झाले नाही. हा भेटायला आलाच नाही याचा अर्थ याच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. अशा माणसासोबत मी राहू शकत नाही. थोडा वेळ वाट पाहीन आणि स्वराला सोबत घेऊन माझी मी त्याच्या आयुष्यातून निघून जाईन. जर प्रेमच नसेल तर तिथे राहण्यात काय अर्थ आहे? तसेही माझी पहिली प्रायोरिटी पैसा कधीच नव्हता. माझी पहिली प्रायोरिटी म्हणजे माझी सर्व कर्तव्य होती आणि त्या कर्तव्यातून माझी सुटका नाही. ही एवढीशी पोरं मला जीव लावते, माझे प्रेम ओळखते आणि बाकी राजनना का दिसू नये; पण मी त्याला सोडून गेले तर स्वराला पुन्हा वाईट वाटणार. या सगळ्या कचाट्यात मी अडकून बसले आहे, यामध्ये माझी काय चूक? या माणसासोबत संसार करावा तरी पाप आणि नाही करावा तरी पाप. अशा व्यक्तीसोबत मी राहू शकत नाही; पण याला सोडून गेले तर मात्र स्वराला मुकणार अशा विचित्र मनःस्थितीत मेघना बराच वेळ शांत बसली होती. ती काहीही बोलत नव्हती.

"पेशंटला थोडा वेळ विश्रांती घेऊ द्या. आता तुम्ही घरी जा." असे जेव्हा सिस्टर सांगत आली तेव्हा मात्र मेघनाची आई, स्वरा आणि स्वराची आजी मेघनाचा निरोप घेऊन घरी जायला निघाल्या. स्वराने जाता जाताच मेघनाच्या गालावर एक छोटीशी किस्सी दिली आणि आई, तू लवकरच घरी ये असे तिला सांगून ती निघून गेली. आता मात्र स्वराची तब्येत पूर्णपणे सुधारत होती, कारण तिने मेघनाची धास्ती घेतली होती. आता मेघना व्यवस्थित आहे म्हटल्यावर तिची कधीच काळजी मिटली होती, शिवाय तिच्या डोळ्यासमोर तो एक्सीडेंट झाला असल्याने ती खूपच घाबरली होती. आता मात्र ती व्यवस्थित झाली होती. स्वरा घरी गेल्यानंतर मात्र राजनची तगमग सुरू झाली. पुन्हा त्याने शब्दांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. मेघना सोबत आपल्याला रेग्युलर बोलायचे आहे, तर आता काय बोलायचे हा प्रश्न त्याच्या समोर निर्माण झाला होता. तो पहिल्यांदाच मेघनाशी इतक्या प्रेमाने बोलणार होता; पण काय बोलायचे आणि कसे बोलायचे हे शब्द त्याला आठवत नव्हते. बराच वेळ त्या विचारात राहून तो कसाबसा रूममध्ये गेला. त्याने जाऊन पाहिले तर मेघना झोपली होती.

"अरे बापरे! ही तर आता झोपली आहे. मग बोलायचे कधी? अशा विचारात तो दोन मिनिटं तसाच तिच्याकडे पाहत उभा राहिला आणि नंतर थोड्या वेळाने येऊ असे म्हणून तो बाहेर जायला वळला.

राजन त्याच्या मनातील भाव बोलून दाखवेल की नाही?