Login

शब्द झाले मुके 55 अंतिम

कथा एका प्रेमाची.. कथा तिच्या कर्तव्याची..
शब्द झाले मुके 55 अंतिम
राजन मेघनाला भेटण्यासाठी आत जात होता; पण मेघना झोपली आहे हे पाहून तो दारातच घुटमळत उभा होता. काही वेळाने तो बाहेर जायला निघाला तेव्हाच त्याच्या कानावर मेघनाचा आवाज ऐकू आला.

"काही बोलायचं होतं का?" हा मेघनाचा आवाज ऐकताच राजन मागे वळला आणि तो मेघनाजवळ गेला. तिच्या जवळ तो बसला आणि तिचा हात त्याने हातात घेतला. ते पाहून मेघनाला खूप नवल वाटले.

'याला नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी वाटत आहे; पण याने बोलून दाखवायला हवे. ह्याला खूप मोठा इगो आहे. इतक्यात हा बोलणार नाही.' मेघना मनातच म्हणाली.

राजनला तर खूप काही बोलायचे होते; पण त्याच्या तोंडावर ते शब्द फुटत नव्हते. शब्द फुटणार तरी कसे? त्याने सुरुवातीपासूनच मेघनाला समजावून घेतले नव्हते. आता तिचे राजनवर इतके उपकार आहेत की आयुष्य गेले तरी तो त्याची परतफेड करू शकणार नाही आणि त्यामुळेच राजनला काही बोलावे हे समजत नव्हते. तो तसाच थोडावेळ शांत झाला. मेघना मात्र पुन्हा डोळे बंद करून स्वस्थ झोपली होती. तिला माहित होते हा काही लवकर बोलणार नाही. आतापर्यंतच्या सहवासाने तिने त्याला बरोबर ओळखले होते; पण आताही तो बोलेल याची तिला खात्री नव्हती म्हणून ती तशीच पडून होती. राजनचे शब्द मात्र तोंडातच अडकले होते. जणू ते मुके झाले होते.

शब्द झाले मुके
बोलती ही मने..
जुळतील का आता
राहिलं काही उणे!

तो मनातच शब्दांची जुळवाजुळव करत होती. त्याची चुळबूळ चालू होती. खूप वेळ झाला तो तसाच शब्दांची जुळवाजुळ करत बसला. अखेर त्याने मनातील बोल बोलण्याचे ठरवले आणि तो बोलू लागला.

"मेघना, खरंच माझं चुकलं. आय एम सॉरी." इतकं बोलून तो पुन्हा शांत झाला. मेघना मात्र त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. राजन पहिल्या झटक्यात सॉरी बोलेल याची तिला अपेक्षा नव्हती. तो खरंच आज तिचे आभार वगैरे मानेल असे तिला वाटले नव्हते; पण डायरेक्ट त्याने माफीच मागितली म्हणून ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली.

"असे काय पाहतेस? मी खरं तेच बोलतोय आणि तू माझे बोलणे होईपर्यंत माझ्याकडे असे पाहू नकोस. नाहीतर मला काय बोलायचे आहे ते सुचणार नाही." असे म्हणून राजनने मेघनाला ऑर्डर दिली होती, त्यामुळे मेघना पुन्हा इकडे तिकडे पाहू लागली.

"आतापर्यंत मी तुझ्याशी खूप वाईट वागत आलोय आणि आताही बघ ना मी तुला समजून न घेता तुलाच ऑर्डर देत आहे. खरंच, मी खूप चुकलो. तुला ओळखू शकलो नाही; पण आता प्रेमाने मनातील बोल बोलणार आहे. तू फक्त ऐकून घ्यायचं.

तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या आयुष्याचं जणू सोनं झालं. तुझ्यासारखी मुलगी मला मिळाली खरंतर हे माझं खूप मोठं भाग्य आहे; पण मी तुला समजून घेतले नाही. तू सुद्धा इतर मुलींसारखीच आहेस असे मी समजत होतो; पण तू खूप वेगळी आहेस. मीच तुला समजून घ्यायला चुकलो. स्वराचे आणि तुझे नाते तर काही बोलायलाच नको. अगं, एक आई आणि मुलीचं नातं सुद्धा इतकं घट्ट नसतं तितकं तू स्वराला आपलंस केला आहेस. जणू तिची आईच बनली आहेस यासाठी हेडस ऑफ यु. आणि तू हे नाटके करत नाहीस हे मला समजले आहे. तू तिच्यावर मनापासून प्रेम, माया करतेस आणि ते खरे आहे. यासाठीही खूप थँक्यू. तुझ्यासारखं मला खूप काही बोलता येत नाही. जे काही आहे ते मुद्दे अगदी मनात शब्दांची जुळवाजुळ करून बोलत आहे; पण तरीही माझे शब्द अपुरे पडत आहेत. तुझ्याशी बोलायला आलो आणि सगळे शब्द मुके होऊन बसले आहेत, त्यामुळे मी फार नाही बोलत; पण तू माझ्या भावना समजून घेशील एवढीच अपेक्षा आहे." असे बोलून राजनचे डोळे भरून आले. मेघनाने त्याच्याकडे पाहिले तर तिचेही डोळे भरलेले होते. हेच खरे प्रेम असेल का? हेच खरे नाते असेल का? जे मनाचे मनाशी जोडले गेले असेल. जिथे शब्दांची अजिबात गरजच भासत नसेल. राजन आणि मेघना हे दोघेही वेगवेगळ्या गरजांसाठी एकत्र आले होते; पण ते दोघे एक झाले होते.

पुन्हा बराच वेळ थांबून राजन बोलू लागला. "मेघना, अशीच मला आयुष्यभर माझी पत्नी म्हणून तू मला साथ देशील. मी तुझ्यावर ओरडणार नाही की चिडणार नाही. मी सुद्धा तुला एक पती म्हणून आयुष्यभर साथ देईन. आपण दोघे मिळून स्वराचे संगोपन अगदी चांगल्या पद्धतीने करू. तुझ्यासारख्या मुलीला मला गमवायचे नाही. तुझी साथ असेल तर मी आयुष्यभर सुखी आणि आनंदी राहीन. प्लीज, तू आता पुन्हा त्या घरामध्ये प्रवेश करताना स्वराची आई म्हणून नाही तर राजनची पत्नी म्हणून येशील ना?" राजन खूप हळवा झाला होता. त्याला पुढे काही बोलवत नव्हते. मेघनाने त्याचे डोळे पुसले आणि त्याला अगदी हसत होकार दिला.

"खरंतर तुम्ही असे काही बोलाल याची मला अपेक्षाच नव्हती. मी नेहमीच तुमची साथ द्यायला तयार आहे." असे मेघना म्हणाली आणि इतक्यात जोरजोरात टाळ्यांचा आवाज आला आणि ते दोघे भानावर आले. त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर स्वरा, स्वराची आजी आणि मेघनाची आई, बहीण हे सगळेजण हॉस्पिटलमध्ये आले होते. त्या सर्वांना या गोष्टीचा खूप आनंद झाला होता. खरंतर ते सर्वजण घरी गेलेच नव्हते. या दोघांचे बोलणे त्यांना ऐकायचे होते. मेघनाचा एक्सीडेंट झाल्यानंतर राजन तिच्याशी कसा रिऍक्ट होतो हे त्यांना पहायचे होते. राजनच्या मनामध्ये मेघनाबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे, प्रेम भावना निर्माण झाली आहे हे राजनच्या आईला समजले होते आणि त्यामुळेच तो तिच्याशी चांगलेच बोलेल अशी खात्री तिला होती. त्यामुळे त्यांचे बोलणे लपून-छपून पहायचे असे त्यांनी ठरवले होते आणि त्यांना सुखद असा धक्का बसला. आता मात्र यांची संसाराची गाडी रुळावर आली अशी त्यांची खात्री झाली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा झळकत होता.

"आई, तुम्ही सगळेजण इथे! तुम्ही तर घरी गेला होतात ना?" राजन आश्चर्याने म्हणाला.

"आम्ही घरी गेलो असतो तर हे सगळे आम्हाला थोडीच ऐकायला आणि पाहायला मिळाले असते. मला माहित होते तुझ्या मनामध्ये मेघनाबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे आणि तू तिच्याशी काय बोलतोस हे मला ऐकायचे होते. अरे, तुम्ही दोघं सुखी तर आम्ही सर्वजण सुखी. तुम्ही दोघेजण मिळून स्वराला प्रेम दिले तर तिची चांगलीच प्रगती होईल. जर तुमच्याच नात्यांमध्ये दुरावा असेल तर तुम्ही त्या मुलीचे संगोपन कसे करणार? हेच मी दोघांनाही वेळोवेळी समजावून सांगत होते; पण कुणीच ऐकायला तयार नाही. तुमच्यामध्ये अजूनही पती-पत्नीचे नाते नाही हे मला समजत होते; पण परमेश्वरानेच सारे काही घडवून आणले. आता मी खूप आनंदी आहे. मेघना बाळा, आता त्या घरची सून म्हणून तू त्या घरामध्ये लवकरच प्रवेश करायचे." असे जणू राजनच्या आईने तिला ठणकावूनच सांगितले. आता त्या सर्वांच्या नात्यांमध्ये एक गोडवा निर्माण झाला होता. मेघनाने त्या सर्वांच्या मनामध्ये तिचे एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. राजन आणि मेघनाच्या सुखी संसाराला आता सुरुवात झाली होती.

समाप्त..