Login

शब्दांचे वार- भाग 1

उंबरठ्याबाहेर नवरा बायकोने पाऊल ठेवलं की खोचक शब्द कानी यायचे
"मी रिकामी नाहीये घरातलं एकटीने बघायला..काम म्हटलं मी भटकायला सांगा तेवढं..भटकभवानी कुठची.."

दारात चपला पायात सरकवत असताना सुलभाच्या कानावर हे शब्द पडले आणि तिला धस्स झालं. तिचे पाय लटपटू लागले, घसा कोरडा पडला. कारण हे असले अभद्र शब्द आणि इतका घाणेरडा सूर तिने आजवर तिच्या माहेरी कधी ऐकला नव्हता.

सुलभाच्या नवऱ्याला त्याच्या मित्रांनी भेट म्हणून सिनेमाची तिकिटं काढून दिली होती. दुपारी चारचा शो होता. तीन वाजेपासून सुलभाच्या नवऱ्याने तिला तयारी करून ठेवायला सांगितली तसं तिने आवरलं. साडेतीन वाजता दोघेही खोलीतून बाहेर आले, सासूबाई हॉलमधेच सोफ्यावर लोळत पडल्या होत्या, त्यांनी या दोघांना असं तयार झालेलं पाहिलं आणि विचित्र आवाजात विचारलं,

"काय?? कुठे चालले दोघे यावेळी??"

"आम्ही सिनेमाला जातोय, सकाळी सांगितलं होतं ना आई तुला?" श्रीकांत म्हणाला,

"नाही सांगितलं तू मला..." सासूबाई धडधडीत खोटं बोलल्या..

"अगं आई एकदा नाही, दोनदा सांगितलं होतं..मला चांगलं आठवतं आहे.."

"खोटं बोलायला कधीपासून शिकलास तू? तू नाही तर नाही, तुझ्या बायकोनेही सांगितलं नाही मला.."

आता सुलभाची बाजू घ्यायला गेलं म्हणजे मी कसा 'बायकोचा बैल' झालो हे ऐकण्यात श्रीकांतला काडीचा रस नव्हता. तो सुलभाला म्हणाला

"चल, उशीर होतोय."

दारापर्यंत जाणं आणि तिथून पायात चपला सरकऊन गेटपासून बाहेर पडणं हा वेळ तिच्यासाठी प्रचंड कठीण असायचा, कारण या दोन ते तीन मिनिटात सासूबाई इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलत की ऐकूही वाटेना. त्यात श्रीकांत म्हणजे अख्ख्या जगाचा स्लो माणूस. हळूच बाहेर निघेल, सॉक्स बुट घालायला चारपाच मिनिटं लावेल आणि मग निघेल. आईची बडबड सुरू आहे तर पटकन निघावं हेही त्याला समजायचं नाही.

दोघेही बाहेर निघाले, श्रीकांत पुढे गेला आणि सुलभा त्याच्या मागोमाग जाताना तिने गेट बंद केलं आणि सासूबाई मुद्दाम ऐकू जाईल अश्या आवाजात बोलल्या,

"मी रिकामी नाहीये घरातलं एकटीने बघायला..काम म्हटलं मी भटकायला सांगा तेवढं..भटकभवानी कुठची..धुतलेली भांडी हिची आई जागेवर लावणार का.."

हे ऐकलं आणि सुलभाची एकदम धडधड वाढली, डोळ्यातलं पाणी आणि मनातला राग आवरत ती गाडीत बसली. गाडीत बसताच तिचा नवरा जणू काही झालंच नाही या आविर्भावात गाणं गुणगुणत गाडी चालवू लागला, सुलभाला त्याचा अजूनच राग आला आणि आता मनातला राग तिने एकदम मोकळा केला,

"सुखेपोटी कधी बाहेर निघताच येत नाही का आपल्याला?"

तिच्या नवऱ्याचे हावभाव एकदम बदलले आणि तो तिच्यावरच ओरडला,

"तुझीच चूक आहे सगळी..."

"काय???" सुलभा डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली..

क्रमशः
0

🎭 Series Post

View all