शादी का लड्डू भाग ३..
मागील भागात आपण पाहिले कि पार्थला सिग्नलवर दिसलेली मुलगी त्याला ऑफिसमध्ये भेटते.. आणि त्याला घरी सोडायला सांगते.. पुढे बघू काय होते ते..
" मला घरी सोडाल का?"
" मी? अहो पण आपली ना ओळख ना पाळख.. मी?" पार्थ नाही म्हटले तरी थोडा बावरला होता..
" ओळख कशी नाही. काल आपण सिग्नलवर भेटलो.. नंतर सकाळी बोललो.. मग.. आणि तसेही आपण शेजारी तर राहतो.. आता जर तुमची कोणी मैत्रीण असेल आणि तिला आवडणार नसेल तर जाऊ द्या.." ती चेहरा पाडत म्हणाली..
" नाही ओ.. माझी कोणी मैत्रीण वगैरे नाही.. पण आपल्याला तर एकमेकांचे नावही माहित नाही.." पार्थ अजूनही थोडा टेन्शनमध्ये होता..
" बस्स.. एवढेच.. माझे नाव प्राची.. तुमचे?"
" माझे पार्थ.."
" अय्या किती छान.. प्राची पार्थ.."
" अहो.. काहिही काय?"
" तुम्ही सतत एवढे घाबरलेले असता का? कि फक्त माझ्याशी बोलताना असता.." तिने विचारले..
" त्याचे काय आहे मला मुलींशी बोलायची सवय नाही.." पार्थ थोडा लाजत म्हणाला..
" ओह्ह.. का ? मुली खातात का तुम्हाला?"
"खात नाही पण भांडतात.. माझे डोके उठते त्या भांडणाने.."
"कोणी सांगितले कि मुली फक्त भांडतात?" ती परत कंबरेवर हात ठेवत म्हणाली..
" बघा.. आता तुम्ही कशा बोलताय? जाऊ दे मी निघतो.. मला उशीर होतोय.."
" मग मला सोडणार का?" तिने परत विचारले..
" चला.." पार्थ शेवटी हो म्हणाला.. बुलेट असल्याचा आनंद त्या दिवशी पहिल्यांदाच पार्थला झाला.. प्राची पूर्ण रस्ता काहीतरी बोलत होती.. आणि बुलेटच्या आवाजात त्याला काहिही ऐकू येत नव्हते.. शेवटी एकदाचे ते दोघे तिच्या घरापाशी आले. ती उतरली..
" थॅंक यू.. तुम्ही मला एवढे घरापर्यंत सोडले , पण मला तुम्हाला साधे चहासाठी पण बोलावता येत नाही म्हणून सॉरी हं.." प्राची वर बघत बोलली.. वर खिडकीत तिच्या दोन मैत्रिणी वृंदा आणि श्रावणी उभ्या होत्या..
" इट्स ओके.. मी समजू शकतो.. तसेही मी ही आता घरीच जाणार आहे.." पार्थ स्माईल करत निघाला..
प्राची खोलीत जाताच त्या दोघी तिच्यावर तुटून पडल्या..
" अग दोन दिवसही झाले नाहीत तुला इथे येऊन.. तर आज डायरेक्ट हा हँडसम तुला आज सोडायला घरी?" वृंदा डोळे मोठे करत म्हणाली..
" दाल में नक्कीच कुछ काला है..." श्रावणी सीआयडी पोझ देत म्हणाली.
" हा खडूस.. आणि हिला सोडायला? असंभव.."
" काय असंभव, कोण खडूस.. मला काही कळत नाही बाबा.." प्राची हसत बाथरूमकडे निघाली..
" तू आता ज्याच्यासोबत आलीस ना तो.. आम्ही पाहिले खिडकीतून.. तो शहाणा इतर मुलींना भाव देत नाही.. आणि तुला बरे सोडले.. आणि दुसरी गोष्ट तू ओळखतेस कशी त्याला.."
" बडी लंबी कहानी है.. जेव्हा मूड असेल तेव्हा ऐकवीन.. आता मला जाऊ दे.." त्या दोघींना तसेच सोडून प्राची हसत आत गेली..
पार्थ आजकाल रोज हसत येतो आहे हे पाहून त्याच्या आईचा आनंद गगनात मावत नव्हता..
"मी काय म्हणते बाळा, आलाच आहेस तर तो फोटो डोळ्याखालून घालतोस का?" पार्थला चहा देत आईने विचारले..
" आई नको सांगतो आहे ना.." पार्थ उठून गच्चीवर गेला.. समोरच ती तिच्या मैत्रिणींसोबत हसताना दिसत होती... ते पाहून त्याच्या चेहर्यावर पण हसू आले.. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना ती खाली दिसते का ते तो बघत होता.. पण नाहीच.. तो तसाच ऑफिसमध्ये आला.. तिथे नेहमीप्रमाणे टाईमपास चालू होता..
" मला ना कळतच नाही लोक लग्न का करतात.." नेहमीप्रमाणे सारंगने सुरुवात केली..
" का करतात म्हणजे? त्यांना बायकांना छळायचे असते ना.." राखी तावातावाने म्हणाली..
" बायका पुरुषांकडून छळून घेतात ?" मयुरेशने सारंगला डोळा मारत विचारले.
" मग काय बायका छळणार? घरी कामे, ऑफिसमध्ये कामे.. हि कामे करून आमची शक्ती होते अर्धी.. छळायला अंगात त्राण तर असले पाहिजे.." वर्षा करवादली..
" हो.. बायका ना कशावरूनही छळू शकतात.. साधा कांदाभजी कि बटाटाभजी हा प्रश्नही जागतिक युद्धाचे कारण ठरू शकतो.." प्रशांत म्हणाला..
" मग फायनली डब्यात काय आहे? कांदा कि बटाटाभजी? " दिलीपसरांनी प्रश्न विचारला.. सगळे हसायला लागले..
" तुम्ही सगळे ना उगाच बायकांना बदनाम करता.." किमया नाक उडवत म्हणाली..
" पण मी काय म्हणतो, प्रत्येक वेळेस स्त्री विरूद्ध पुरुष हा वाद झालाच पाहिजे का? ते दोघेही पूरक आहेत, असे नाही का वाटत? म्हणजे दोघांनाही एकमेकांची गरज आहे असे? " पार्थने विचारताच सगळे शांत झाले आणि आपापल्या जागेवर गेले.
ऑफिस सुटल्यावर पार्थ खाली आला. समोर प्राची जाताना दिसली.. पण ती लंगडत होती. काळजीने पार्थ तिच्याशी बोलायला गेला..
" हाय.."
" हॅलो.." ती हसली..
" मग.. आज कशा जाणार घरी?" पार्थने सहज विचारतो आहोत असे दाखवत विचारले..
" बघते ना. काहीतरी सोय करायलाच हवी.. काल घरी लवकर जायचे होते म्हणून तुम्हाला विचारले.."
" आज पण विचारायचे ना?"
" अय्या.. रोज कसा तुम्हाला त्रास द्यायचा?" ती लाडिक मान हलवत म्हणाली..
" त्रास कसला त्यात? पायाला काही लागले आहे का? लंगडताना दिसलात म्हणून विचारले..
" हो.. मगाशी लॉनवर अनवाणी फिरत होते.. काटा गेला बहुतेक पायात.."
" अरेरे.. मग काढला का?"
" कसा काढणार? आता घरी जाऊन मैत्रिणींना सांगते.."
" मी गाडी आणतो इथे. आपण डॉक्टर कडे जाऊ. मग तुम्ही घरी जा.. काटा खूप आत गेला असेल तर.." पार्थ काळजीने म्हणाला..
" नको.. मी जाईन नंतर.."
" मी आणतो म्हटलं ना गाडी.. ऐका जरा.." पार्थ पटकन गाडी घेऊन आला. प्राचीला घेऊन डॉक्टरांकडे गेला.. काटा खरेच जास्तच आत गेला होता.. डॉक्टरांनी तो काढून ड्रेसिंग केले.. पार्थ तिला रूमवर सोडायला गेला..
" हि औषधे.. आणि हा माझा नंबर. काही लागले तर नक्की कळवा.." पार्थ आपले कार्ड प्राचीला देत म्हणाला..प्राचीने मान हलवली..
" टेक केअर.." असे म्हणत पार्थ निघाला.. वृंदा आणि श्रावणी त्याला बघून गप्पच झाल्या होत्या.. तो असेपर्यंत त्या काहीच बोलल्या नाही. तो जाताच दोघींची सुरुवात झाली.
" काल बिल्डिंगच्या खाली.. आज घरी.. उद्या?" श्रावणी हसत म्हणाली..
" प्राची हे नक्की काय चालले आहे, नक्की सांगशील का?" वृंदा गंभीरपणे बोलली..
" अग पायात काटा गेला होता माझ्या. त्याला नको म्हटले तरी तो डॉक्टरकडे घेऊन गेला.. आणि आता घरी सोडायला आला.. त्यात काय चालू असणार आहे.." प्राची मान खाली घालत म्हणाली..
" नसेल सांगायचे तर नको सांगू.. ते म्हणतात ना कोणालातरी झाकून ठेवले तरी चंद्र उगवायचा रहात नाही म्हणून.." श्रावणी बोलली..
" अग बाई.. कोंबडे झाकून ठेवले तरी सूर्य उगवायचा रहात नाही असे आहे ते.. " वृंदाने तिचे बोलणे दुरूस्त केले.
" तेच ते.."
"ते जाऊ द्या.. एवढी मी डॉक्टरकडे जाऊन आले आहे.. काही खायला द्याल कि नाही?"
" का तुझ्या हिरोने काही दिले नाही का?"
" दिले असते तर तुमच्याकडे मागितले असते का?" तिघींचीही नोकझोंक चालूच होती..
प्राचीच्या मनात दुसर्या दिवशीचे प्लॅन चालले होते.. आणि ज्याच्यासाठी हे प्लॅन चालले होते.. तो निग्रहाने आलेल्या स्थळाचा फोटो बघायला नकार देत होता..
बघू यांची कथा पुढे सरकते का ते पुढच्या भागात.. तोपर्यंत कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा