शादी का लड्डू भाग ४
मागील भागात आपण पाहिले कि पार्थ प्राचीला घेऊन डॉक्टरकडे जातो. नंतर तिला घरीही सोडतो.. प्राचीच्या मैत्रिणी तिला खूप चिडवत असतात.. पण ती त्यांना काही सांगत नाही.. बघू आता पुढे काय होते ते..
पार्थ ऑफिसमध्ये बसून उगाचच टाईमपास करत होता.. डोक्यात विचार सुरू होते.. हि प्राची घरी जाताना आपल्यासोबत जाते आहे, पण मग ऑफिसला येते कशी.. तिच्याकडे बघून ती भांडते असे अजिबात वाटत नाही.. मग त्या दिवशी ती टॅक्सीवाल्याशी का भांडत होती.. विचार करून डोके दुखायला लागले होते.. तोच राघवच्या गाण्याचा आवाज आला.. "बहारों फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है, मेरा मेहबूब आया है.." त्याने वर पाहिले.. ऑफिसच्या रिसेप्शनच्या इथे प्राची उभी होती.. तो ताडकन उठला.. प्राची रिसेप्शनीस्टशी बोलून आत येत होती.. त्याने टेबल आवरायचा अयशस्वी प्रयत्न केला. तोपर्यंत प्राची आलीच..
" हाय.."
" हॅलो.. तुम्ही इथे?" पार्थने विचारले. ऑफिसमधले सगळे कामात गुंतले आहेत असे जरी दाखवत असले तरी त्यांचे अदृश्य डोळे आणि दृश्य कान आपल्याकडेच आहेत याचे भान पार्थला होते..
" हो.. तुम्ही मला काल एवढी मदत केलीत. तुमचे आभार कसे मानू मला कळत नव्हते.. मग मी स्वतःच्या हाताने कोथिंबीरवडी करून आणली आहे.. तुम्हाला आवडते का?" प्राचीने विचारले..
" मला कोथिंबीर, तिची वडी, पिठले सगळे खूप आवडते.." राघव मध्येच बोलला.. "बघू इथे.. " असे म्हणत राघवने डब्बा हातात घेतला..
" व्वा.. काय सुंदर झाल्या आहेत या वड्या. " राघव मिटक्या मारत खात होता.. पार्थचा अंतरात्मा राघववर खवळला होता. पण सगळ्यांसमोर त्याला काही बोलताही येईना.. त्याने कसनुसा चेहरा करत प्राचीकडे पाहिले. तिने फक्त स्माईल केले आणि काहीच न बोलता ती तिथून निघून गेली..
" सगळ्यात आधी हि होती कोण?" वर्षाने विचारले..
" हो म्हणजे हिला मी आधी कधीच पाहिले नव्हते.." इति राखी..
" मी पण..एक सांगतो ती जी कोण होती तिला राग आला हे निश्चित.." सारंग गंभीर चेहरा करत म्हणाला. हे ऐकून पार्थचा चेहरा पडला..
"कशावरून?" मयुरेशने संवादात उडी घेत विचारले..
" कशावरून काय? जाताना चेहरा नाही पाहिला तिचा.. मी सांगते तिला राघवचे वागणे पटले नाही.." किमया म्हणाली.
" आता मी काय केले?" राघवने विचारले..
" काय केले म्हणजे? तिने पार्थसाठी आणलेल्या वड्यांना तू हात लावलास. या बायका जेव्हा एकासाठी गोष्ट आणतात तेव्हा दुसऱ्याने हात लावलेला त्यांना अजिबात आवडत नाही.." दिलीप सरांनी विश्लेषण केले.
" पण ती तर जाताना स्माईल देऊन गेली.." पार्थने स्वतःची समजुत काढायचा प्रयत्न केला.
" अरे वेड्या, तीच तर टेक्निक असते.. राग आलेला तर आहे पण दाखवायचाही नाही.." मयुरेश म्हणाला.
" बसला.. जोरात बांबू बसला.." इतका वेळ ऐकत असलेला प्रशांत म्हणाला..
" कसला बांबू?" पार्थ आवंढा गिळत म्हणाला..
" खर्चाचा.. म्हणजे बघ.. आता तुला तिच्याशी परत बोलायचे असेल तर तुला तिला खुश करणे गरजेचे आहे. मग एखादी छानशी भेटवस्तू तर पाहिजेच नाही का? कोथिंबीरवडी महाग पडणार गड्या तुला.." प्रशांत पार्थच्या खांद्यावर थोपटत हताशपणे म्हणाला..
" इतके काही नसते बरं का.." किमया म्हणाली..
" हो ना.. तिला फुले दिलीस ना तरीही ती खुश होईल.. " राखी म्हणाली..
" मग काय? बायकांना थोडे समजून घेतले कि झाले.." इति वर्षा..
" अरे काय हे ऑफिस आहे कि गप्पांची मैफिल? जेव्हा बघावे तेव्हा नुसत्या गप्पा सुरू असतात.." बॉस बाहेर येऊन सगळं ऐकत होते.. तोच त्यांचा फोन वाजला..
" अग हो.. लक्षात आहे तुझ्या आईला सोडायला स्टेशनवर जायचे आहे ते.. तू सतत चिडू नकोस बाई.. हो येताना रसमलाई आणि समोसे नक्की आणतो.. ठेवू का फोन? हो.. ऑफिसमध्येच आहे.. नंतर फोन उचलला असता तरिही चिडली असतीस.. " बॉस हळू आवाजात बोलायचा प्रयत्न करत होते.. पण तरिही सगळा स्टाफ ऐकत होता.. शेवटी त्यांनी फोन ठेवला.. आणि परत स्टाफकडे वळले..
" जरा कामं करा.. अजिबात पर्सनल गप्पा नकोत मला.."
बॉस त्यांच्या केबिनमध्ये जाताच हास्याचे कारंजे उडाले.. पार्थ सोडून सगळेच बॉसला हसत होते.. पार्थच्या पोटात गोळा आला होता.. ती खरेच चिडली असेल? असली तर मग तिची समजूत कशी काढायची ?
काम झाल्या झाल्या लगेचच पार्थ खाली गेला.. ऑफिसच्या मेनगेट पाशी जाऊन लपला.. कारण ऑफिसमधल्या परत कोणी बघितले तर नवीन अडचण यायला नको.. थोड्या वेळातच ती आली.. हलकेच पाय टेकवत.. सकाळी तिचे हे चालणे लक्षातच आले नाही.. एवढे अवघडल्यासारखे वाटत होते सगळ्यांसमोर कि काही दिसतही नव्हते कि सुचतही नव्हते..
" हाय.." पार्थ पुढे गेला..
"हॅलो.."
"आपण कॉफी घ्यायची?" पार्थने विचारले.. तिने पटकन त्याच्याकडे पाहिले..
" नाही म्हणजे थोडा वेळ असेल तुम्हाला तर आणि मुख्य म्हणजे चालणार असेल तरच.." पार्थने वाक्य पूर्ण केले.
" हो.. जाऊ या.." ती थोडा विचार करून बोलली..
" थांबा. मी पटकन गाडी आणतो.." पार्थ खुश झाला..
" गाडी कशाला?" तिने आश्चर्याने विचारले..
" ते तुम्हाला अजून चालता येत नाही ते दिसले.."
" एवढे काही नको.. मी चालते.." प्राचीने चालायला सुरुवात केल्यावर पार्थला चालावेच लागले.. आयुष्यात पहिल्यांदाच एका मुलीसोबत तो चालत होता.. पण आज प्राची एकदम शांत होती..कसलातरी विचार चालला होता बहुतेक.. पार्थही मनात विचार करत होता.. बोलू कि नको.. त्याच तंद्रीत रस्त्यावर पडलेले केळीचे साल प्राचीला दिसले नाही.. तिचा पाय घसरून ती पडणार तोच पार्थने तिला धरले.. अंगातून करंट गेल्यासारखे वाटले त्याला.. पण तो लगेच शुद्धीवर आला..
" तुम्हाला चालायला जमत नसेल तर हात धरू का आता?" त्याने कृतककोपाने विचारले..
" नको.. तो पाय जरा घसरला.."
" लागले का?"
" नाही.. पण परत कालचा पाय दुखावला.."
" हात धरलात तर चावणार नाही तुम्हाला.." हे ऐकल्यावर प्राची हसायला लागली आणि आपण बोललेल्याचे सार्थक झाल्यासारखे पार्थला वाटले.. तिने हळूच त्याचा हात धरला आणि परत न बोलता दोघेही पार्किंग पर्यंत आले.. पार्थने आईला फोन करून उशीर होईल असे सांगितले.. दोघे निघाले कॉफीहाऊसला..
" मला खूप आवडतो.." कॉफीचा घोट घेत प्राची म्हणाली..
" कोण?" पार्थच्या कंठाशी प्राण आले..
" समोरचा अथांग समुद्र.. त्याच्यासाठीच तर मी इथे आले.." पार्थला आपला जीव भांड्यात पडल्यासारखे वाटले..
" तुम्ही चिडला नाहीत ना?"
" मी कशासाठी चिडायचे?" तिने ओठांचा चंबू करत विचारले.. तिच्या एकेक अदा फक्त बघत रहाव्यात असे पार्थला वाटत होते.. पण त्याचा निश्चय त्याला ते करू देत नव्हता..
" ते राघवने, म्हणजे माझ्या मित्राने डब्बा घेतला, उघडला.."
" अच्छा.. तुम्हाला काय वाटते मी चिडायला हवे होते?"
" असे नाही पण.." काय बोलावे ते पार्थला सुचेना..
" आता बघा. मी नाही चिडले तरी ते तुम्हाला पटले नाही.. चिडले असते तर म्हणाला असता मुली भांडकुदळ आहेत.. बरोबर ना?"
" आपण एकमेकांना किती कमी ओळखतो ना?"
" आताच तर भेटलो.. ओळख होणार कशी?"
" ते ही आहेच.."
" निघू मग मी?"
" अं.."
" मी घरी जाऊ का?" प्राचीने हसत विचारले..
" अरे मी सोडतो ना.. "
" अच्छा मला वाटले तुम्ही इथेच थांबायच्या विचारत आहात. मला उशीर होतो आहे म्हणून म्हटले.."
" एक विचारू?"
" हो."
" तुम्ही ऑफिसला येता कशा?"
" हा प्रश्न?? त्याचे काय आहे, वृंदा माझी मैत्रीण सकाळी मला सोडते.. पण घरी जाण्याची तिची वेळ ठरलेली नसते म्हणून मला एकटीला जावे लागत होते.. म्हणून तर मी तुमच्या पाठी लागले घरी सोडा.. नवीन आहे ना मी. अजून तेवढे समजत नाहित रस्ते वगैरे.."
" मग उद्यापासून माझ्यासोबत यायला आवडेल?" पार्थच्या तोंडून निघून गेले.
ती हसली..
" चला घरी जाऊया का?"
प्राची पार्थचा लग्न न करण्याचा निश्चय मोडू शकेल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा