Login

सावली... भाग १

“ए रम्या, आवर लवकर उद्यालाच साहेब आणि त्यांचं कुटुंब हितं येणार हायती. तवा आजच्या आज समदी साफ सफाई झाली पाहिजे बघ.” अर्जुन रमेशला माहितीवजा काम लवकर आवर सांगत होता.“आरं, पण साहेब हितं कशापाई राहणार हायीत? अन् म्या एकटा किती येळ आवरू हे समदं? अन् म्या आधीच सांगून ठेवतू, सांजच्याला म्या हितं थांबणार न्हाई.” रमेश जरा रागातच बोलला आणि हातातील झाडू घेत घरातील जाळी जळमटं काढू लागला.
“ए रम्या, आवर लवकर उद्यालाच साहेब आणि त्यांचं कुटुंब हितं येणार हायती. तवा आजच्या आज समदी साफ सफाई झाली पाहिजे बघ.”

अर्जुन रमेशला माहितीवजा काम लवकर आवर सांगत होता.


“आरं, पण साहेब हितं कशापाई राहणार हायीत? अन् म्या एकटा किती येळ आवरू हे समदं? अन् म्या आधीच सांगून ठेवतू, सांजच्याला म्या हितं थांबणार न्हाई.” रमेश जरा रागातच बोलला आणि हातातील झाडू घेत घरातील जाळी जळमटं काढू लागला.


“आरं ही मालमत्ता बँकेची हाय. त्यामुळे बँकेनं सायबांना हिथं राहायला जागा दिली हाय. येवड्या मोठ्या बँकेचे सायेब हायेत ते, ते काय आपल्यासारख्या कुडाच्या घरात राहतील व्हयं? न्हाय नाऽ? मंग?” अर्जुन बोलला.

“आरं, पण हिथं? तुला माहित हाय नव्हं?” रमेश बोलत होता तितक्यात बाहेरून आवाज आला.


“भाऊ येऊ का आत?” रख्मा घराच्या मुख्य दारात येत बोलली.


“ये ये बाय. तुईच वाट बघत हुतू. रम्या मला ठाऊक व्हतं का तुयाच्यान इतकं काम व्हनार नाय. म्हणून हे बघ तुझ्या मदतीला ह्या रख्माताईला म्या आधीच सांगून ठेवलं व्हतं. आता दोघं बी भराभरा हात चालवा. मी समोर बँकेत जाऊन बसतू. कोणी ग्राहक आलं तर तिथं कोणीच न्हाई.” म्हणत अर्जुन निघून गेला.


“ओ दादा. चला आवरू लवकर. म्या सांजच्यापातूर हिथं थांबू शकत न्हाय अन् तुम्ही बी थांबू नगा.” म्हणत रखमाने झाडू हातात घेत भराभर आवरायला सुरुवात केली.


बऱ्याच वर्षांपासून बंद असल्यामुळे घरात जाळ्यांचे साम्राज्य पसरले होते. घरात कुबट वास पसरला होता. दोघांनी घरासोबत पुढचं आणि मागचं आंगण देखील साफ केलं. घर छान धुवून साफ करण्यात आले. त्यामुळे कुबट वास बऱ्यापैकी कमी झाला होता.


तर,
महाराष्ट्रातील एका छोट्या खेड्यात बऱ्याच वर्षांपासून बंद असलेले ते खूप जुने घर आज उघडण्यात आले होते. खरं तर घर म्हणण्यापेक्षा त्याला वाडाच म्हणावं लागेल. तर हा वाडा दोन भागात विभागलेला होता. वाड्याच्या पुढच्या बाजूला दोन खोल्या होत्या ज्या वाड्यापसून वेगळ्या बांधलेल्या होत्या आणि मागच्या बाजूला मुख्य वाडा होता. जो दोन मजली होता. ज्याच्या वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याला लोखंडी दार लावून कायमस्वरुपी कुलूपबंद केले होते जिथे जाण्याची परवानगी कोणालाच नव्हती. खाली मोठ्या तीन खोल्या होत्या. वाड्याच्यासमोर आणि मागच्या बाजूला मोठे अंगण होते ज्याला कुंपणाने संरक्षित केले होते.


खरंतर हा वाडा कोणाचा? त्याचा मालक कोण? ह्याची माहिती कोणालाच नव्हती. त्याबद्दल सांगणारे कोणीच त्या गावात नव्हते. त्यावर मालकी हक्क सांगणारे देखील कोणीच नव्हते. म्हणून वर्षानुवर्ष पडीक असलेला हा वाडा काही वर्षांपूर्वी भारत सरकारच्या मालमत्तेत सामील करण्यात आला. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने तो वाडा सरकारकडून भाड्याने घेत तिथे एक छोटी शाखा उघडली होती. समोरच्या भागातील खोलीत शाखा आणि मागे मुख्य वाड्याचे गेस्ट हाऊस करण्यात आले होते.
त्यात सापडलेले पुरातन भांडी,वस्तू ह्या पुरातत्व खात्यात जमा करण्यात आल्या होत्या. पण दुसऱ्या मजल्यावर काय आहे हे कोणालाच माहीत नव्हते.


तिथे जाण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करण्यात आला पण कोणालाच यश आले नव्हते. एक अनामिक शक्ती तिथे जाण्यापासून रोखत होती ह्याची जाणीव सगळ्यांना झाली आणि म्हणून मग वर जाणाऱ्या त्या जिन्याला जाड लोखंडी दरवाजा लावण्यात आला आणि त्यावर मोठे कुलूप ठोकण्यात आले.


तर ही गोष्ट आहे सुमारे सत्तरच्या दशकातील. स्टेट बँकेची एक छोटी शाखा महाराष्ट्रातील वरूडखेड नावाच्या छोट्या खेडे गावात उघडण्यात आली. शाखा उघडून जेमतेम एक वर्ष झाले होते पण त्या ठिकाणी कामाला येणारा अधिकारी म्हणजे शाखा अधिकारी दोन महिन्यांहून जास्त तिथे काम करू शकत नव्हते आणि आत्तापर्यंत आलेले शाखा अधिकारी जवळपासच्या खेड्यात राहणारे होते त्यामुळे कुटुंबासोबत तिथे रहायला कोणीच आले नव्हते.


आता मात्र इथे येणारा नवीन शाखा अधिकारी हा दूरच्या गावातून येणारा होता. त्यामुळे बायको मुलांसोबत तिथे राहायला येणार होता. ही बातमी वरूडखेड मध्ये वाऱ्यासारखी पसरली.


नवीन साहेब ते पण मोठ्या गावातून येणार म्हणजे नवलच होते. पण सगळ्यांना काळजी होती ती वेगळीच.


इकडे रख्मा आणि रमेश काम संपवून दाराला कुलूप लावून बँकेत गेले.


“ताई उद्या निरोप दिला की, बाईसाहेबांच्या मदतीला या.” म्हणत अर्जुनने रख्माला कामाचा मोबदला दिला.

“व्हय, पण मी सांजच्याला पाचनंतर थांबणार न्हाय आधीच सांगून ठेवते.” असे म्हणत रख्मा पदर कमरेला खोचत झपझप पावलं टाकत निघून गेली. रमेश मात्र तिथेच थांबला कारण तो आणि अर्जुन त्याच बँकेत शिपायाचे काम करत होते.


“काय रं तुला काय वाटतं हा नवीन साहेब टिकलं?” रमेश हातातील कापडाने टेबल पुसत बोलला.


“खरं सांगू का? आजपातूर कोणी साहेब टिकला नाही हितं. ह्या बी साहेबाचं काही खरं वाटतं नाही बघं. त्यात बायकु पोरं बी हायेती सोबतीला.” अर्जुन हातातील फाईल बाजूला ठेवत बोलला.

“पण इथ राहणं म्हंजी..” रमेश बोलताना मध्येच थांबला.


“चल आता जाऊ घरला सांज व्हत आली हाय. बघू उद्या काय व्हतं ते. आता काही बोलू नगस. उद्या सकाळी दहापर्यंत साहेब बिऱ्हाड घेऊन येणार आहेत त्या आधी येऊन हजर रहा.”

म्हणत अर्जुन आणि रमेश बँकेला आणि कुंपणाला कुलूप लावून निघुन गेले. दोघांच्याही डोक्यात एकच विचार सुरू होता. हा नवीन साहेब टिकेल का? त्यात राहायला ह्या घरात म्हणजे अजूनच अडचणीचे होते.


हळूहळू काळोखाचे साम्राज्य पसरले आणि वाडा अंधाराच्या स्वाधीन झाला.
रस्त्यावरची थोडी बहुत वर्दळ देखील बंद झाली आणि निरव शांततेने आपले साम्राज्य पसरवले. तसे वाड्याभोवती असलेली जनावरे देखील पांगली. आता तिथे कोणाचेच अस्तित्व नव्हते.


दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि रमेश नऊ वाजताच बँकेच्या आवारात आले. सकाळची साफ सफाई केली आणि साहेबांची वाट बघू लागले.


नवीन साहेब वेळेचे फार पक्के आहेत हे त्यांना आधीच माहीत होते त्यामुळे दोघांनी आधीच येऊन सगळी व्यवस्था लावून ठेवली होती.


क्रमशः

© वर्षाराज

काय असेल ज्यामुळे त्या बँकेत कोणीच अधिकारी दोन महिन्यांच्या वर काम करत नव्हता? कसली चिंता असेल सगळ्या गावातील लोकांना? कळेलच पुढच्या भागात.


🎭 Series Post

View all