सावली...भाग २

“नमस्कार बाईसाहेब. प्रवास नीट झाला नव्हं?” म्हणत अर्जुनने रमाची विचारपूस केली आणि शामला उचलून घेतले.“अरे हो, प्रवास छान झाला. रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती त्यामुळे सकाळी लवकर निघालो. तू अर्जुन आणि तू रमेश बरोबर ना?” माधवने दोघांची ओळख बरोबर सांगितली. तसे दोघे खुश झाले.
सुचनेप्रमाणे बरोबर दहा वाजता साहेबांची गाडी वरुडखेड बँकेच्या शाखेच्या आवारात येऊन उभी थांबली. गाडीने हॉर्न वाजवला, तसे अर्जुन आणि रमेश आतून बाहेर आले.


“या या साहेब. राम राम.” म्हणत दोघांनी माधवला सलाम ठोकला.


माधव म्हणजे त्या शाखेचा नवीन साहेब. त्याच्या हाताखाली आता रमेश आणि अर्जुन काम करणार होते. माधवसोबत त्याची पत्नी रमा आणि मुलं पाच वर्षांचा शाम आणि तीन वर्षांची कांचन होते.


“नमस्कार बाईसाहेब. प्रवास नीट झाला नव्हं?” म्हणत अर्जुनने रमाची विचारपूस केली आणि शामला उचलून घेतले.


“अरे हो, प्रवास छान झाला. रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती त्यामुळे सकाळी लवकर निघालो. तू अर्जुन आणि तू रमेश बरोबर ना?”

माधवने दोघांची ओळख बरोबर सांगितली. तसे दोघे खुश झाले.


“रमेश टेम्पोमधील समान आत ठेवायला सांग.” माधव असे म्हणत प्रथम बँकेत शिरला. त्याच्या मागोमाग रमा, मुले आणि अर्जुन आत गेले.


माधवने बँकेचे बारकाईने निरीक्षण केले. जेमतेम पाच लोकांची बसायची व्यवस्था होती. मधवला धरून पाच कर्मचारी बँकेत कामाला होते. त्यातील रमेश आणि अर्जुन भेटले आणि दोन जे कारकून होते त्यांची भेट उद्या होणार ह्याचा माधवला अंदाज आला होता.


माधव बँक बघत होता तोपर्यंत अर्जुनने सगळ्यांना पाणी दिले. पंखा देखील लावला.

“साहेब, रमेश सामान आत ठेऊन घेतूया तोवर तुम्ही माझ्या घरला चला हातपाय धुवा. दमून आला असताल. म्या शालूला आधीच सांगून ठेवलं आहे सैपाकाच. लागलीच जेवणं करून घ्या मंग् येऊ हिथं परत. तोवर रम्या म्हणजे रमेश बी येईल.”

अर्जुन अगदी आपुलकीने बोलत होता.


“अरे नको. कशाला त्रास तुम्हाला? करू आम्ही काहीतरी.”

माधव बोलला.


“अवं तरास कसला त्यात? तुम्ही आमचे साहेब हायसा, त्यात सोबतीला बायको पोरं बी हायती. चला बाईसाहेब चला बरं. आमास्नी बी पाहुणचार करायची संधी द्या.”

अर्जुन आग्रहाने बोलत होता.


त्याचं प्रेम आणि आग्रह बघून माधव आणि रमा त्याला नकार देऊ शकले नाही. त्याच्या घरी त्यांना जावेच लागले. अर्जुनचे घर गावात होते आणि बँक गावाच्या बाहेर. अर्जुनने एक टांगा थांबवला आणि सगळ्यांना त्याच्या घरी घेऊन गेला.


अर्जुनचे घर छोटे होते. घरात बायको आणि आई वडील होते. घर छोटे असले तरी मनाची श्रीमंती रमा आणि माधवला तिथे दिसली. सगळे जेवण करून परत वाड्यावर आले. त्यांच्या मागोमाग रख्मा देखील आली.


“बाईसाहेब ही रख्मा हाय. तुमास्नी सामान लावू लागेल. काळजी करू नका आम्ही आहोत सगळे.”

म्हणत अर्जुनने ओळख करून दिली.
बघता बघता संध्याकाळ होत आली. छोटा संसार होता माधवचा त्यामुळे घर देखील लावून झाले होते.


“बाईसाहेब, रातच्याला काही आवाज आले तर उगा बघायला जाऊ नगा कुटं. गुमान झोपून राव्हा.”
रख्मा बोलून निघून गेली.
रमाला मात्र तिच्या बोलण्याचा अर्थ लागला नाही.


“साहेब आणि बाईसाहेब रातच्याला घराबाहेर एकटं पडू नका. काही आवाज आला तरी बी बघाया जाऊ नगा. अन् हो, हिथं वर कुणालाबी जायची परवानगी न्हाय. मुलांना तर इकडच्या बाजूला येऊच देऊ नगा. म्या निगतो. आता मला हिथं थांबता येणार नाय.”

म्हणत अर्जुनने खिशातील लिंबू मिरचीचा धागा काढला आणि तो घराच्या दारावर लावला आणि निघून गेला.


रमा आणि माधव विचारात पडले की रख्मा आणि अर्जुन असे का बोलले असतील? हळूहळू अंधार पडू लागला. रमाने संध्याकाळची दिवाबत्ती केली. सर्वत्र अगरबत्तीचा मंद सुगंध दरवळू लागला. आज इतक्या वर्षांनी त्या वाड्यात दिव्यांचा प्रकाश दिसत होता. रात्रीचे जेवण करून रमा माधव शाम आणि कांचनला घेऊन झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच अर्जुन आला तेव्हा माधव तयार होऊन बँकेत जाण्यासाठी निघाला होता.


“साहेब झोप लागली नव्हं? काही आवाज न्हाय ना आले?” अर्जुनने हळूच विचारले.


“नाही रेऽ, छान झोप लागली आणि कसले आवाज? तू काल पण असच काही बोलत होतास. काय आहे हे?”

माधवने बँकेत शिरत विचारले.


“नाय, काय न्हाय. मी आपलं सहज विचारलं.”

अर्जुनने विषय बदलला.


माधवने राहिलेली दोन कर्मचाऱ्यांची ओळख करून घेतली. त्याच्या काम करण्याच्या पद्धती, नियम, सूचना सांगून कामाचा श्रीगणेशा केला.


नवीन आलेला साहेब थोडा कडकं आहे हे सगळ्यांना समजले होते. पण तोच साहेब एक चांगला व्यक्ती आहे हे देखील त्यांना जाणवले.


इकडे घरी रमा आवरून पूजेला बसली. रोजची तिची नित्याची पूजा असे. ती केल्याशिवाय रमा जेवत नसे. आज देखील ती पूजेला बसली. पूजा आवरली. दिवा अगरबत्ती लावली आणि आरतीला सुरुवात केली.


आरती करत असताना तिला अचानक दरदरून घाम फुटला. डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघितले तर तिला जाणवले की तिच्यामागे कोणीतरी उभं आहे. पण घरात तिच्या आणि मुलांच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हते. मुलं देखील घरात नव्हती. अंगणात खेळत होती. तिने तशीच आरती पूर्ण केली आणि मागे वळली तर तिथे कोणीच नव्हते.

आपला भास असेल म्हणत तिने कपाळावरील घाम पुसला आणि दुर्लक्ष केले.


बघता बघता त्या वाड्यात येऊन रमा आणि माधवला पंधरा दिवस झाले. पण आता हळूहळू त्यांना एक एक विचित्र अनुभव येऊ लागले. हळूहळू गावच्या लोकांकडून त्या वाड्याबद्दल काही गोष्टी कानावर येऊ लागल्या.

त्यादिवशी नेहमीप्रमाणे सगळे बँक बंद करून घरी निघून गेले. रात्रीचे साम्राज्य पसरले. आकाशात पूर्णीमेचा चंद्र चमकत होता. त्या रात्री रमा माधव नेहमी प्रमाणे लवकर जेवून झोपी गेले. पण मध्यरात्री अचानक कसला तरी आवाज झाला आणि दोघांचा डोळा उघडला. खरंतर दोघे खूप घाबरले होते. एकमेकांना पकडून ते बसले. मनात देवाचा धावा सुरू होता. डोक्यात विचारांचे थैमान सुरू होते आणि बाहेरचा तो आवाज आता अजून जवळ येत होता.
शरीरात भीतीने थरकाप होत होता. धरणी कंप पावत होती.

तो आवाज होता असंख्य घोड्यांच्या टापांचा. घराभोवती कोणीतरी जोरात घोडे फिरवत असावं असा तो आवाज रात्रीच्या दोन वाजता येत होता. थोड्यावेळाने घोडे गेल्यासारखे वाटले आणि आता एकच घोडा तिथे आहे असे वाटतं होते. काही वेळात घोड्याचा वेग कमी झाला पण आता आवाज अगदी जवळ येत होता. असा की अगदी दारात आहे असा. क्षणात वीज चमकल्यासारखे वाटले आणि समोर जे दिसले ते कोणाच्याही विचार क्षमतेपलीकडील होते.


क्रमशः

© वर्षाराज


काय असेल? कोण दिसलं असेल रमाला पूजा करताना? काय बघितले असेल? काय होईल पुढे? कळेलच पुढच्या भागात.


🎭 Series Post

View all