गुडघ्यापर्यंत असलेले बुट घातलेले पाय दिसत होते. रक्ताने माखलेल्या त्या बुटांचे ठसे त्यांच्या खोलीत उमटत होते, सोबतीला रक्ताचे थेंब पडत होते. पायांच्या सोबतीला रक्ताने भरलेली धारदार तलवार जमिनीवर घासली जात होती. जणू कोणी गंभीर जखमी होऊन चालत होते. वर बघण्याची हिम्मत दोघांनीही केली नाही आणि डोळे घट्ट बंद करून घेतले.
तलवारीचा तो आवाज कर्कश वाटतं होता. पावलांचा आवाज हळूहळू दूर जातांना ऐकू येऊ लागला तसं, माधवने हळूच एक डोळा उघडून बघितले. पावलं बरीच पुढे गेली होती. त्या सोबत पडणारे रक्ताचे थेंब आपोआप नाहीसे होत होते. आता त्या पायांचा आवाज वाड्याच्या वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याकडे येत होता. माधव उठून त्या दिशेने जाणार तोच रमाने त्याला हाताला धरून खाली बसवले. थोड्यावेळात सगळीकडे शांतता पसरली. त्यानंतर मात्र रमा आणि माधव एक क्षण देखील झोपू शकले नाही. कशी बशी रात्र काढली मुलं मात्र झोपलेली होती. दोघांच्या तोंडून शब्द देखील फुटत नव्हते. काहीही न बोलता दोघे तसेच बसून राहिले.
पहाट होताच माधवने घराचे दरवाजे उघडले. बाहेरची थंड हवा आणि कोवळे ऊन घरात पसरले. दोघेही चातकासारखी अर्जुनची वाट बघत होते. एव्हाना त्यांची आणि अर्जुनची चांगलीच ओळख झाली होती.
“अरे आलास बरं झालं. तुझीच वाट बघत होतो आम्ही.” अर्जुन येताच माधवने त्याला घरी नेले.
“काय झालं साहेब? काय चुकलं का मायं? अन् तुम्ही काहून इतके काळजीत वाटतायत? समदं ठीक हाय नव्हं?”
म्हणत अर्जुनने प्रश्नाचा भडिमार केला.
“भाऊ जरा बसा तरी. सांगतो सगळं.” रमा बोलली.
माधवने रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला. रमाने देखील तिला होणाऱ्या भासांबद्दल सांगितले.
“म्हंजी आजपातूर जे ऐकून होतं ते खरं हाय तर.” अर्जुन डोक्यावरचा घाम पुसत बोलला.
“काय? काय ऐकून होतास तू?” माधव रमाकडे बघत बोलला.
“हेच की, हिथ भुताचा वास हाय. साहेब, म्हणूनच इथं कोणीच साहेब दोन महिन्याच्या वर काम करू शकला नाय बघा.” अर्जुन बोलला.
“साहेब अजून काय दिसलं तुमास्नी? म्हणजे कोणी माणूस की काय?” अर्जुन अजून जाणून घेण्याच्या हेतूने बोलला.
“नाही रे, फक्त पायच दिसले. बाकी वर बघायची हिंमतच झाली नाही बघ.” माधव पाण्याचा घोट घेत बोलला.
“तो घोड्यांचा, तलवारीचा आवाज अजूनही कानात घुमतो आहे.” म्हणत रमाने कानावर हात ठेवले.
“घोड्यांच्या टापांचा आवाज, तलवार म्हंजी तो आहे हे खरं हाय. माझा आजा बरुबर सांगत व्हता.” अर्जुन भूतकाळात गेला.
“काय सांगितलं होतं त्यांनी?” रमा बोलली.
“काय न्हाय. कालची पूर्णिमा होती नव्हं. जाऊद्या नगा खोलात जाऊ.” माधव आणि रमा अजून घाबरतील म्हणून अर्जुनने पुढे बोलणे टाळले..
“अर्जुन गावात दुसरं घर बघ. छोटं पण चालेल. पण इथे नाही राहणार आम्ही.” माधव बोलला.
“व्हय साहेब. पण एक दोन चार दिवस लागतील तोवर तुम्ही माझ्या घरला चला.” अर्जुन बोलला.
“अरे नाही. तुझी अडचण नको.”
म्हणत रमा आणि माधवने जाण्यास नकार दिला.
अर्जुनने खूप आग्रह केला पण रमा आणि माधव गेले नाही. त्यांना अर्जुनची परिस्थिती माहित होती. आधीच घर लहान. त्यात राहणारी माणसं जास्त. अशा परिस्थितीत तिथे जाणं म्हणजे अर्जुन आणि त्याच्या घरच्यांना त्रासात टाकणं त्यांना योग्य वाटलं नाही.
“साहेब मी आत्ताच जातू. घर बघतू. बाजूच्या गावात बी बघतू हाय का ते? तोवर तुम्ही काळजी घ्या अन् काय बी वाटलं तर माझ्या घरला या.” अर्जुन बोलून निघून गेला.
माधव बँकेत निघून गेला. रमाने नेहमीप्रमाणे पूजा केली. आजही तिला कोणीतरी समोर असलेल्या दुसऱ्या खोलीच्या दारातून बघत आहे असं जाणवले. पांढरे शुभ्र धोतर, मोतिया रंगाचा सदरा घातलेली एक आकृती असल्याचा भास तिला होत होता.
“साहेब आपल्या नाय पण बाजूच्या गावात एक खोली भाड्याने हाय. तशी काही फारशी चांगली नाय पण बरी हाय. गाव बी काय जास्त दूर नाय. हिथून पंधरा मिनिटांच्या अंतरावर हाय फटफटीनं गेलं तर. तुमच्या कडं तर हाय ना फटफटी त्यामुळं जमलं तुम्हास्नी.”
संध्याकाळी चारच्या सुमारास येत अर्जुनने सांगितले.
“ठीक आहे. उद्याच जाऊन बघून येऊ आणि लगेच सामान हलवू आपण.” माधव बोलला.
संध्याकाळी नेहमीप्रमाणे रमाने काम आवरले. मुलं देखील जेऊन झोपली. रमा आणि माधवला मात्र झोप लागत नव्हती.
“आहों. मी काय म्हणते?” रमा हळूच बोलली.
“काय?” माधव बोलला.
“घर तर बदलुच आपण पण तुम्ही साहेबांशी बोलून बदली करून घ्या ना इथून. नकोच इथ राहणं. घर नाही पण कामाला तर तुम्हाला इथेच यावे लागेल ना? काळजी वाटते हो मला.” रमाच्या डोळ्यात आसवे जमा झाली.
“अगं येऊन पंधराच दिवस झालेत. त्यात नोकरीही नवीन आहे. लगेच बदली मिळणार नाही. काही दिवसांनी करतो प्रयत्न. असही कामावर मला कसला त्रास होत नाही पण घरात हे असं म्हणजे तुझी आणि मुलांची काळजी वाटते मला. असही बँक तर पाच वाजता बंद होते त्यामुळे रात्री इथे थांबण्याचा प्रश्न येत नाही. मी उद्या सकाळीच बाजुच्या गावातलं घर बघून येतो.” माधव अडचणी आणि त्यावरचे समाधान सांगत रमाला समजावत होता.
“जसं असेल तसं घर चालेल पण इथून निघणं महत्त्वाचं.” रमा बोलली.
“हो. उद्या गेलो की मालकाला पैसे देतो आणि लगेच साफ सफाईला सांगून येतो. म्हणजे दुपारी समान हलवू.” माधवने त्याची योजना सांगितली.
छताकडे बघता बघता दोघांचा डोळा केव्हा लागला ते समजलेच नाही. ती रात्र तर शांततेत गेली. नं कोणता आवाज न काही दिसले. दुसऱ्या दिवशी माधव सकाळीच अर्जुन सोबत घर बघायला गेला.
“रमा मी जाऊन येतो. तू तयारीला लाग. तोपर्यंत येतोच मी.” माधव सांगून निघून गेला.
रमा सोबत कोणीतरी पाहिजे म्हणून अर्जुनची बायको शालू काहीवेळाने तिथे आली आणि पळतच रमाकडे गेली.
दोघी मिळून सामान बांधून ठेवतील ह्या विचारात माधव आणि अर्जुन साधारण एक दिड तासाने परत आले. पण घरी काय घडणार होते ह्याची कल्पना देखील दोघांना नव्हती.
क्रमशः
© वर्षाराज
माधवला नवीन घर मिळाले तर खरं. पण आता त्याच्या मागे रमा आणि मुलांसोबत काय झाले असेल? शालू का पळत गेली असेल? पुढच्या भागात कळेलच.