माधव आणि अर्जुन घरी आले. घरात काहीच हालचाल दिसत नव्हती. मुले देखील बाहेर खेळताना दिसत नव्हती.
“अर्जुन बाहेर कोणीच कसं नाही? घरात पण काही हालचाल दिसत नाहीये.”
म्हणत माधवने घाईत त्याची फटफटी लावली आणि दोघे आत पळत गेले.
समोर शालू बसली होती. माधव आणि अर्जुनला बघून पदर सावरत बसली.
“काय वं अशी काहून बसली? तू काय हिथं बसायले आली हाय काय? मले वाटलं तू मदत करत असशील पण हिथं तर काहीच हालचाल दिसत नाय. बाईसाहेब आणि मुलं कुठं हायती?” अर्जुन घरात नजर फिरवत बोलला.
तोपर्यंत रमा आतल्या खोलीतून बाहेर आली.
“साहेब. अहो दोघे पोरं तापाने फणफणत आहेत. केव्हा पासून पट्ट्या ठेवते आहे डोक्यावर पण ताप काही उतरत नाही. तुम्ही पटकन डॉक्टरला घेऊन या.”
रमाचे डोळे मुलांच्या काळजीने पाणावले होते.
माधव लगेच आत गेला पाठोपाठ अर्जुन देखील आत गेला.
मुलांचे अंग तापाने फणफणत होते. अंगाला हात लावला तर चटका बसत होता. अर्जुन लगेच डॉक्टरला घ्यायला गेला. काहीवेळात डॉक्टर आले. मुलांना तपासले पण ताप नक्की कशामुळे आला हे काही सांगता येत नव्हते. औषधांची यादी देऊन डॉक्टर निघून गेले.
इतक्या तापात सामान हलवणे शक्य नव्हते त्यामुळे रमा आणि माधव आता काही दिवस तिथेच राहणार होते. पुढील दोन दिवस मुलांची तब्बेत अजूनच बिघडली. काही केल्या औषधांचा गुण यायला तयार नव्हता.
“अर्जुन, काय रं, साहेबांच्या पोरांसनी बरं वाटून नाही राहिलं. डोक्यात ताप शिरला की काय?” रमेश बोलला.
“काय माहित अर्ं, साहेब काळजीत हायती बघ. डाक्टरनं औषधं बी बदलून दिली पण काय बी फरक नाय बघ.” अर्जुन बोलला.
“मला की नाय येगळीच शंका हाय बघ.” रमेश थोडा कचरत बोलला.
“काय?”
“त्या वाड्यातल्या भूतान तर..”
रमेश पुढे बोलायचं थांबला.
त्यांची ही कुजबुज माधव ऐकत होता. अर्जुनच्या मनात देखील हीच शंका होती. गावात सगळीकडे ह्या चर्चेला उधाण आले.
त्यांची ही कुजबुज माधव ऐकत होता. अर्जुनच्या मनात देखील हीच शंका होती. गावात सगळीकडे ह्या चर्चेला उधाण आले.
“साहेबांची पोरं काही वाचत नाही.” अशी कुजबूज होऊ लागली.
इकडे रमा आणि माधव मुलांच्या काळजीत होते. मुलांच्या तापाचा आज चौथा दिवस होता. आज तालुक्याच्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ असे त्यांनी ठरवले.
त्यादिवशी रमा पूजा करत होती. त्यादिवशी रमाने आरतीचे ताट घेतले आणि आरती म्हणण्यास सुरुवात केली. तिचा मंजुळ स्वर घरात घुमत होता आणि अचानक रमाचे स्वर कंठातच अडकले. ती चपापली हातात आरतीचे ताट तसेच होते.
इतक्या दिवस धूसर दिसणारी ती आकृती आज अगदी स्पष्ट तिच्यासमोर उभी होती. साधारण साठीतला तो माणूस. अंगात पांढरे शुभ्र धोतर, मोती रंगाचा सदरा, डोक्यावर मखमली टोपी, गळ्यात सोन्याची माळ, हातात छडी. वयस्कर असला तरी चेहेऱ्यावर तेज आणि श्रीमंती झळकत होती. अशी ती आकृती स्पष्ट दिसत होती.
“थांबलीस का? म्हण ना. छान वाटतं तू आरती म्हणतेस ते.” तो बोलला.
त्याचे शब्दं कानावर पडताच रमा अजून घाबरली.
“अगं अशी घाबरु नकोस. काही करणार नाही मी तुला. तू आरती म्हण.” पुन्हा तो बोलला.
त्याचे बोलणे ऐकून रमाने घाबरतच आरती म्हणायला सुरुवात केली. आरती संपली आणि तिने कपूर लावला. त्या म्हाताऱ्याने दुरूनच कपूर घेतला आणि पुन्हा अदृश्य झाला.
रमा मात्र घामाने डबडब ओली झाली होती. तिने आरतीचे ताट खाली ठेवले आणि दारातूनच माधव ला आवाज दिलं.
“आहों, आहों, अर्जुन भाऊ, रमेश भाऊ.” कोणीतरी ऐकेल ह्या हेतूने ती आवाज देत होती.
“बाई साहेब काय झालं?” तिचा आवाज अर्जुनने ऐकला. जागीच उभा राहून तो ओरडला.
“ह्यांना पाठवा लवकर.” रमा डोक्यावरचा घाम पदराने पुसत बोलली.
तिची अशी अवस्था बघून अर्जुन लागलीच आत गेला आणि माधवला सांगितले.
माधव आणि अर्जुन पळतच घरी गेले
“काय गं काय झालं? मुलं बरी आहेत ना? इतकी का घाबरली? माधव तिला जवळ घेत बोलला.
“आहों., ते .. ते मी आता .” रमाच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.
तितक्यात अर्जुन आतून पानी घेऊन आला.
“रमा आधी शांत हो. मग सांग.” माधव तिला पाण्याचा ग्लास देत बोलला.
थोड्यावेळात रमा शांत झाली. तिने घडलेला प्रकार सांगितला आणि माधव देखील घाबरला.
“बाई साहेब. त्या म्हाताऱ्याला आरती ऐकायला आवडत असेल म्हणून तो रोज तुमच्या पूजेच्यावेळी तिथे हजर असतो. तुम्हासानी तो काही करणार नाय. फक्त पूजा नियमित ठेवा. असं मला वाटतं. मुलांची तब्बेत बरी झाली की जाऊ आपण नवीन घरी.” अर्जुन रमा आणि माधवची समजूत काढत बोलला.
“हो रमा. आता आपण मुलांना तालुक्याला घेऊन जाऊ. आवर तू.” म्हणत माधवने रमाला शांत केले.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. भर दुपारी बाराच्या रखरखत्या उन्हात आभाळ दाटून आले विजांचा कडकडाट झाला आणि क्षणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाऊस इतका जोरात होता की एका फुटाच्या अंतरावरचे देखील दिसत नव्हते.
“साहेब तुम्ही हिथं थांबा. मी बँकेत जाऊन बसतो. पावसाचा जोर कमी झाला की जाऊ तालुक्याला.” म्हणत अर्जुनने बाकीचे गोणपाट अंगावर घेतले आणि निघून गेला.
“काय हो असा अवकाळी पाऊस? दोन तास होत आले तरी कमी व्हायचं नाव घेत नाही हा.” रमाच्या चेहेऱ्यावर काळजीची लकेर उमटली.
“बघ की, इतक्या पावसात मुलांना घेऊन जाणं योग्य नाही.” माधव काळजीत बोलला.
क्रमशः
© वर्षाराज
काय होईल पुढे? माधव आणि रमा मुलांना तालुक्याला घेऊन जाऊ शकतील की नाही? कळेलच पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा