Login

सावली.. भाग ५ (अंतिम)

“आता पाऊस थांबला हाय पण आता तालुक्याला जाऊन काय होणार नाय. आपण जाऊस्तोर दवाखाने बंद होतील. अन् पाऊस परत यायची शक्यता बी हाय.” अर्जुन बाहेर बघत पावसाचा अंदाज घेत बोलला.
संध्याकाळचे पाच वाजत आले होते. अर्जुन आणि रमेशने बँक बंद केली. बँकेत असलेली रोकड रबराने बांधून एकत्र केली आणि माधवला देण्यासाठी घरी गेले.


“साहेब हे घ्या आजची रोकड. पावसामुळं फार काही ग्राहक आलं नाय.” रमेश बोलला.


“आता पाऊस थांबला हाय पण आता तालुक्याला जाऊन काय होणार नाय. आपण जाऊस्तोर दवाखाने बंद होतील. अन् पाऊस परत यायची शक्यता बी हाय.” अर्जुन बाहेर बघत पावसाचा अंदाज घेत बोलला.


“हो. तुम्ही दोघे जा आता उशीर होईल तुम्हाला.” माधव बोलला.


“नाय साहेब आज रातच्याला म्या हितंच थांबतू. पोरांची तब्बेत बरी नाय. पावसाचा रंग बी काय खरा दिसून नाय राहिला. अन् आज जे काही झालं त्यामुळं मी तूम्हासानी असं ऐकलं सोडू नाय शकतं. अडी अडचणीला सोबत हवी.” अर्जुन बोलला.


रमा आणि माधव नाही म्हणत असताना देखील आज अर्जुन हट्टाने तिथे थांबला.


“रम्या तू जाय. अन् घरला सांगून ठेऊ म्या आज हिथंच थांबणार हाय ते. काळजी करू नागा.” अर्जुन बोलला.


“मग म्या बी थांबतो. एक से भले दो.” रमेश बोलला.


“नको अरे. आम्ही अर्जुनलाच थांबू नको म्हणत आहोत पण तो ऐकत नाहीये. तू नको थांबुस उद्या लवकर ये फक्त.” माधव बोलला.


“बरं मग काळजी घ्या. काय बी वाटलं तर घरला या. मी घरला जातू तूया घरला बी निरोप देतो. अन् अर्जुन हे तुया जवळ असू देत.” म्हणत रमेशने खिशातील हनुमानाचा फोटो काढून अर्जुनाच्या हातात दिला आणि निघून गेला.


माधव, रमा आणि अर्जुनने जेवण केले.. मुलं मात्र अजूनही तापाने फणफणत होती. रमाने त्यांना कशी बशी अर्धा वाटी भाताची पेज खाऊ घातली आणि साधारण आठ वाजता सगळे झोपायला गेले. अर्जुन किचनमध्ये झोपला. रमा माधव त्यांच्या खोलीत झोपले. काही वेळात सगळ्यांना गाढ झोप लागली.


“अरे असे घाबरता काय? काही होणार नाही तुम्हाला. तालुक्याला जायची काही गरज नाही. त्या डॉक्टरला काही सांगता येणार नाही. मी सांगतो ते करा. मी ह्या घरचा मालक आहे. जातीने मारवाडी असल्यामुळे माझ्या घराच्या आवारात मास मच्छी दारू पिणाऱ्या त्या आधीच्या साहेबांना मी पळवून लावले. पोरी तू आलीस आणि घरला घर पण आलं. माझी बायको अशीच रोज पुजा करायची. आरती म्हणायची. तिच्या मंजुळ स्वरांनी घर पवित्र व्हायचं. पण दीर्घ आजारात ती वारली. मग राहिलो आम्ही दोघेच. मी आणि माझा मुलगा.

तुम्हाला त्या दिवशी दिसला तो माझा मुलगा. इंग्रजांच्या लष्करात होता. एक दिवस त्यां गोऱ्यांना समजले; की माझा मुलगा लष्करात राहून गुप्तहेर बनून क्रांतिकारकांची मदत करत आहे. मग काय जे घडायचे तेच घडले. दहा पंधरा इंग्रज इथेच ह्या घरावर चालून आले. माझ्या मुलाने एकट्याने शर्थीने लढा दिला पण शेवटी त्या नराधमांनी त्याच्या वर क्रूर हल्ला करत त्याचे मुंडके धडापासून वेगळे केले. हे बघताच माझा जागीच मृत्यू झाला. धडापासून मुंडके जरी वेगळे झाले असले तरी जीव मात्र गेला नव्हता. माझ्या रक्षणासाठी तो तसाच उभा राहिला ते बघून सैन्य पळून गेले. पण जाताना माझ्या मुलाच्या घोड्याचा देखील वध करून गेले. तो दिवस होता पौर्णिमेचा.

दुसऱ्यादिवशी त्यांनी वरच्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. सैन्य आपल्याला मारण्यासाठी येत ह्याचा सुगावा माझ्या मुलाला आधीच लागला होता म्हणून त्याने जनतेसाठी लुटलेला खजिना तिथे लपवून ठेवला होता. तो अजूनही तिथे सुरक्षित आहे.


माझी प्रत्येक इच्छा माझा मुलगा पूर्ण करत असे. पण माझी शेवटीची इच्छा त्याला पूर्ण करता आली नाही म्हणून त्याच्या आणि माझ्या आत्म्यास गेल्या सत्तर वर्षांपासून मुक्ती मिळत नाहीये. तुम्ही ती इच्छा पूर्ण करा, म्हणजे आम्हाला मुक्ती मिळेल. तू एखादा चांगला दिवस बघून घरात यथासांग सत्यानारणाची पूजा घाल. हीच माझी शेवटची इच्छा आहे. वचन दे तुझ्या मुलांचा ताप लगेच कमी होईल.” पांढरे शुभ्र धोतर घातलेला तो म्हातारा रमा आणि माधवला एकच वेळी स्वप्नात दिसत होता. दोघे हि स्वप्नात अस्वस्थ होत होते. शरीर घामाने ओले झाले होते.


दुसरीकडे अर्जुन शांत झोपलेला होता. तितक्यात माधवच्या खोलीचा दरवाजा जो आतून बंद होता. तो धाडकन उघडला गेला. रमा, माधव आणि अर्जुनला त्या आवाजाने जाग आली. बैठक खोलीत प्रकाश पसरला होता. तिघेही उठून बैठक खोलीच्या दारात आले. त्यानंतर समोर जे दिसले, ते तिघेही आयुष्यभर विसरू शकणार नव्हते.


त्यांच्या समोर तो म्हातारा उभा होता. सतेज चेहेऱ्यावर झळकणारी श्रीमंती आणि त्याच्या बाजूला उभा होता तो रुबाबदार काळा घोडा त्यावर सवार त्या म्हाताऱ्याचा मुलगा. तिघे बाहेर येताच मुलगा खाली उतरला पण त्याच्या धडावर शिर नव्हते.

“बिनशिऱ्या.” अर्जुन तोंडातच पुटपुटला.


“करशील ना मग पूजा? वचन देतोस का? मुलं लगेच बरी होतील तुझी.” तो म्हातारा बोलला.


“आम्हाला मुक्ती दे.” शिर नसलेल्या त्या मुलाचा आवाज आला.


“हो हो. आम्ही करू पूजा. यथासांग सत्यनारायण पुजू .” रमा माधव दोघे एकदम बोलले.

असे म्हणताच माधवच्या खोलीत एक प्रकाश चमकून गेला. सगळ्यांनी मागे वळून बघितले मागे काहीच नव्हते. परत समोर बघितले तर म्हातारा आणि त्याचा मुलगा तिथे नव्हते.


“आई बाबा. भूक लागली आहे.” म्हणत दोघे मुलं रमा आणि माधवकडे पळत आली. तिघांनी देवाला हात जोडले मनात म्हातारा आणि मुलाचे आभार मानले. मुलांचा ताप उतरला होता.


दुसऱ्यादिवशी पंचांग बघून सत्यनारायण पूजेचा दिवस निवडला दोन दिवसांनी चांगल्या मुहूर्तावर यथासांग पूजा केली. त्यावेळी म्हाताऱ्याचे अस्तित्व दोघांना ही जाणवत होते. रमाने सोबतीला छान जेवण बनवून म्हातारा आणि त्याच्या मुलाच्या नावाने ताट तयार केले. त्यात सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद वाढला.


“चूकभूल माफ करा. आमच्या परीने शक्य तितकं आम्ही केलं.” दोघांनी हात जोडून नमस्कार केला.


“सुखी रहा.” असा आवाज त्यांना आला. त्या दिवशी म्हातारा आणि त्याच्या मुलाला मुक्ती मिळाली. वरच्या जिन्यावर जाणाऱ्या दराचे कुलूप आपोआप खाली पडले. माधवने सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावून तिथे असलेली मालमत्ता सरकारी खजिन्यात जमा केली. त्यातला एक पैसा देखील माधवने ठेवला नाही.


पुढील तीन वर्ष रमा आणि माधव त्याच घरात राहीले. त्यानंतर त्यांना कसलेच भास झाले नाही आवाज आले नाही.
पण त्या रात्री घडलेल्या प्रकारची वाच्यता रमा, माधव आणि अर्जुनने कुठेही केली नाही. मुलांना रात्रीतून कसे बरे वाटले ह्याचे गूढ गावकऱ्यांना शेवटपर्यंत उमगले नाही.


समाप्त.


©वर्षाराज


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक घटना, व्यक्ती किंवा जागेशी कोणताही संबंध नाही. सदर कथेतून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही.

🎭 Series Post

View all