शलाका दिगंबर मराठे.
भाग ३
ठरल्या प्रमाणे, दोघींनी जाऊन घर भाड्याने घेतलं, आणि शलाकानी फर्म मधे आर्टिकल शीप सुरू केली. तिथेही तिने चमक दाखवली. वरिष्ठ तिच्या कामाच्या प्रति असलेल्या आस्थे मुळे खुश होते. तिच्यावर नव नवीन कामांची जबाबदारी सोपवण्यात येऊ लागली. वर्ष भरात दिनकर सुद्धा कोल्हापुरात आला. त्यांच्या नवीन कामाची त्याने सुरवात पण केली. आता दिवस आनंदात जाऊ लागले. शलाकाची आर्टिकल ची दोन वर्ष संपत आली होती. पण बघा कसं होतं, म्हणजे रस्ता चांगला, कार नवीन, ड्रायव्हर सुद्धा उत्तम, प्रवास एकदम आनंदात चाललेला असतांना मध्येच चाक पंक्चर व्हावं, आणि दुधात मिठाचा खडा पडावा अशी अवस्था व्हावी. तसंच काहीसं झालं. निर्मलाला ताप आला आणि बघता बघता तो न्यूमोनिया वर गेला. निर्मलाला हॉस्पिटल मधे दाखल करण्यात आलं. सगळ्या टेस्ट करून झाल्या, औषध पाणी सुरू झालं पण निर्मलाच्या आजारात उतार पडतच नव्हता. शेवटी जे नको तेच झालं. निर्मला हे जग सोडून गेली. दिनकरने साठी ओलांडली होती, त्याला हा धक्का पचवणं कठीण गेलं. तो पण आता जरा खचला होता. निर्मलाच्या जाण्याचं दु:ख तो पचवू शकला नाही. त्याची प्रकृती हळू हळू ढासळतच गेली. अजून एक वर्ष उलटलं. शलाकाची CA फायनल ची परीक्षा आटोपली. यथावकाश रिझल्ट पण लागला. शलाका उत्तम मार्क घेऊन पास झाली होती. तिला त्याच फर्म ने नोकरीची ऑफर दिली आणि शलाका आता तिथे एक चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून रुजू झाली. आता तिला भरपूर पगार होता, आता दिनकरला काहीही काम करण्याची आवश्यकता नव्हती. शलाकाचा उत्कर्ष पाहून त्याला समाधान वाटत होतं.
एक दिवस दिनकरने शलाकाला आपल्या जवळ बोलावलं. म्हणाला “ शलाका बस इथे माझ्या जवळ. तुला डोळे भरून पाहू दे.” मामाला इतकं भावना प्रधान होतांना शलाकाने कधीच पाहीलं नव्हतं. तिला जरा आश्चर्यच वाटलं.
“काय झालं मामा, काही होतेय का तुम्हाला?” शलाकाने विचारलं.
“नाही, पण मला तुझी माफी मागायची आहे.” दिनकरच्या डोळ्यात पाणी होतं.
“मामा काही काय बोलताय तुम्ही. सख्खे आई वडील तर मला आठवत नाहीत, तुम्हीच मला आई वडिलांच्या जागी आहात. सख्खे आई वडील जसे वाढवतील तसंच तुम्ही मला वाढवलंय. उत्तम संस्कार दिलेत. मग असं का बोलता मामा? डोळे पुसा मामा.”– शलाका.
“मी तुझ्या वडीलांना नाही शोधू शकलो बेटा, शेवट पर्यन्त तुमची भेट घालून देणं काही मला साध्य झालं नाही. माफ कर मला.” दिनकर म्हणाला. त्र्यांचा गळा भरून आला होता. आता दिनकरच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागल्या. त्याला रडतांना पाहून शलाका पण आपल्या भावना आवरू शकली नाही. त्याच दिवशी रात्री दिनकरने देह ठेवला. शलाका पोरकी झाली. जवळ जवळ १५ दिवस शलाका त्या धक्क्यातून बाहेर पडू शकली नाही. पण काळ हे सर्व दु:खावर औषध असतं असं म्हणतात. हळू हळू शलाका पण सावरली. कामांमधे जास्त लक्ष घालू लागली.
“शलाका” एक दिवस फर्म चे पार्टनर तिला सांगत होते, “आपल्या फर्म ला एका पुण्याच्या कंपनी कडून इंटरनल ऑडिट चं काम मिळालं आहे. तुझ्या बरोबर दोघं जण घे, आणि ते ऑडिट करून या.”
“नाव काय सर त्या कंपनी चं?” – शलाका.
“डिगसन, ते सगळं तुला देतो. तू फर्मच्या वतीने ऑडिट करायला आली आहेस असं पत्र देणार आहे त्यात सर्व काही नमूद केलं असेल.” – साहेब
“ओके. केंव्हा निघायचं आहे? आणि राहण्याची काय व्यवस्था आहे?” – शलाका.
“तिथल्या जवळच्या हॉटेल मधे दोन रूम बूक केल्या आहेत. तुम्ही उद्याच सकाळी निघा.” – साहेब.
पुण्याच्या डिगसन कंपनी मधे ऑडिट सुरू झालं. ऑडिट संपल्यावर कंपनीच्या फायनॅन्स मॅनेजर बरोबर शलाकाची मीटिंग सुरू होती. शलाकाने कार्य पद्धतीत बऱ्याच सुधारणा सुचवल्या होत्या, त्याबद्दल ती मॅनेजर साहेबांना सविस्तर सांगत होती. मॅनेजर साहेब तिच्या हुशारीने खूप प्रभावित झाले होते. ते लक्ष पूर्वक तिच्या सूचना ऐकत होते. मीटिंग संपल्यावर, चहा पिता पिता, मॅनेजर साहेब कंपनी ची माहिती सांगत होते. इतक्यात कंपनीचे MD आत मधे आले.
“अरे, मीटिंग चालू आहे का? बरं मी नंतर येईन.” असं म्हणून ते जायला निघाले.
“नाही सर, मीटिंग संपली आहे, मी ओळख करून देतो या मिस शलाका आपलं ऑडिट त्यांनीच केलं बऱ्याच सुधारणा सुचवल्या आहेत त्यांनी. आणि मला पण पटल्या आहेत.” – मॅनेजर साहेब.
शलाकाने हात जोडून नमस्कार केला. MD साहेबांनी पण हसून नमस्कार केला आणि म्हणाले “मी दिगंबर श्रीनिवास मराठे.” मॅनेजर साहेब लगेच म्हणाले “आमचे MD साहेब.”
शलाका MD सरांकडे डोळे विस्फारून बघत होती. अगदी एक टक. मॅनेजर साहेब म्हणाले “ काय झालं मिस शलाका?”
“काही नाही. योगा योगाची गंमत वाटली.” – शलाका.
“कसला योगायोग?” – MD साहेब.
“माझ्या वडिलांच पण हेच नाव आहे. दिगंबर श्रीनिवास मराठे.” – शलाका.
“असं? अरे वा! काय करतात तुमचे वडील?” - MD साहेब
“माहीत नाही. म्हणजे आत्ता काय करतात हे माहीत नाही.” – शलाका.
“ओह, माफ करा, मी विचारलं हे चुकलंच” - MD साहेब.
“नाही, नाही सर तुम्ही समजता तसं काही नाहीये. मी लहानपणी एका जत्रेत हरवले होते. खूप प्रयत्न केला मामांनी शोधायचा, पण बाबा काही सापडले नाहीत. एवढंच.”
“तुमचं पूर्ण नाव काय?” - MD साहेब.
“शलाका दिगंबर मराठे” – शलाका.
“आणि मामांचं नाव काय?” - MD साहेब.
“दिनकर रघुनाथ भागवत पण ते माझे खरे मामा नाहीत, जत्रेत मी रडत रडत फिरत होते तेंव्हा त्यांना मी दिसले. आणि मग माझ्या बरोबर ते पण बाबांना शोधायला लागले.”– शलाका.
“तुम्हाला बाबांची काहीच आठवण नाही? म्हणजे ते कसे दिसतात वगैरे?-MD साहेब.
“अगदी अंधुक आठवताहेत. आईचं नाव आठवतंय. वसुधा होतं. आणि एक आमच्या घरावर जी पाटी लागली होती त्यावर दी. श्री. मराठे. बी. टेक. असं मराठीत लिहिलं होतं. मला पक्क आठवतंय कारण की बाबांनी माझ्याकडून पाठ करून घेतलं होतं. ते अजून लक्षात आहे.” – शलाका.
आता MD साहेब भावुक झाले. पण ते म्हणाले की तुम्ही थोडा वेळ बसा, मी आलोच. बाहेर आले आणि त्यांनी घरी फोन केला. आणि बायकोला दोघांचे जुने फोटो असलेला अल्बम घेऊन ताबडतोब ये म्हणून सांगीतलं.
शलाकाला त्यांनी अल्बम दाखवला. तिने बाबांचा आणि आईचा जुना फोटो ताबडतोब ओळखला. वसुधा बाईंच्या डोळ्याला आता धार लागली होती, शलाकाला पण आता कळून चुकलं होतं हेच आपले आई बाबा आहेत म्हणून. जवळ जवळ २० वर्षांनंतर सर्वांची भेट होत होती. आनंदाला पारावार उरला नव्हता.
*******
समाप्त.
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा