Login

शल्य

..
शल्य


अनुराधा कालच तिच्या माहेरी म्हणजे रत्नागिरीला आली होती. तिचे वडील शामराव देशपांडे हे गावातील बडं प्रस्थ. स्वच्छ सदरा आणि धोतर हा त्यांचा रोजचा पेहराव. पहाडी आवाज, करारी चेहरा आणि व्यायामाने कमावलेलं बलदंड शरीर. गावात मोठा वाडा, भरपूर शेती, घरात भरपूर सुबत्ता. गावातील प्रत्येक माणूस त्यांना दबकूनच असे. याउलट माई, शामरावांच्या पत्नी जानकी. अगदी सोज्वळ, शालीन. जणू देवाने मायेचा कुंभ त्यांच्याच ओंजळीत रिता केलाय तशी सर्वांनाच भरभरून माया देणाऱ्या. या दोघांचं एकुलतं एक कोकरू म्हणजे अनुराधा.

अनुराधा.. रंगाने सावळी असली तरीही दिसायला अतिशय देखणी. सडपातळ बांधा, लांब केस, आणि पाणीदार गहिऱ्या डोळ्यांची. कोणाचंही लक्ष वेधून घेईल अशी. तिचा स्वभाव म्हणजे माई आणि आबांच्या स्वभावाचा मिलाफ होता. लहानपणापासूनच लाडात वाढलेली. आर्थिक सुबत्ता असल्याने कधीही कोणत्याही गोष्टीची उणीव नव्हती. घरात नोकर-चाकर होते. पण तरीही त्याचा गर्व या तिघांच्याही वागण्या बोलण्यात कुठेही नसे. अतिशय साधी राहणी होती. इतर कामाला माणसं असली तरी स्वयंपाकघर मात्र पूर्णपणे माईंच्या ताब्यात असे. अनुराधानेही लग्नाआधीच माईंकडून सर्व पदार्थ शिकून घेतले होते. माईंच्या हाताची चव अगदी पूर्णपणे अनुराधाच्या हाती उतरलीय असंच सर्व म्हणत.

अनुराधा काल माहेरी आली. जवळजवळ वर्षभराने. आबा आणि माईना भेटून तिला कित्ती आनंद झाला होता. कधी एकदा माई तिला कुशीत घेतायत असं तिला झालं होतं. राज ही आजी आजोबांच्या वाड्यात उड्या मारत फिरत होता. माईंना भारी कौतुक होतं नातवाचं. तो आला की त्यांना काय करू आणि काय नको असं होतं असे. मग त्याला आवडतो म्हणून त्या अगदी आठवणीने काजू बदाम घालून शिरा करीत. आबांनाही त्याचं प्रचंड कौतुक होतं. ते त्याला गाडीत बसवून अख्ख्या शेतातून फिरवून आणीत. संध्याकाळी गणपतीच्या मंदिरात घेऊन जात. तो ही मनमुराद कौतुक करून घेत असे आजी आजोबांकडून.

आज संध्याकाळीही आबा राजला घेऊन मंदिरात गेले होते. माई रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागल्या होत्या. अनुराधा तिच्या खोलीत कॉलेजची जुनी वह्या पुस्तकं घेऊन चाळत खिडकीपाशी बसली होती. त्या खोलीला दोन दारं. एक आतलं आणि दुसरं बाहेरच्या अंगणाकडे उघडणारं. तिची आवडती खोली होती ती. कारण त्या खिडकीतून तिला तिचं आवडतं पारिजातकाचं झाड दिसायचं. आंब्याची, काजूची झाडं दिसायची. त्या खिडकीपाशी बसलं की निसर्ग डोळ्यांत साठवून घेता यायचा. तिथे बसल्यावर तिच्या गतकाळातल्या आठवणी जाग्या होत होत्या. एक वही तिने जाणूनबुजून शेवटी ठेवली होती. अगदी सर्व वह्या पुस्तकं हाताळून झाल्यावर ती वही तिने हातात घेतली. एक अनामिक हुरहूर तिच्या मनात दाटून आली. त्या वहीला एक सुंदर कव्हर घातलं होतं. वहीचं पहिलं पान उघडून आपल्याच नावावरून तिने क्षणभर हात फिरवला आणि न राहवून तिने शेवटचं पान उघडलं. इतरांनी पाहिलं तर ती एक साधी वही होती पण तिच्या नजरेत तो तिच्या आठवणींचा अनमोल ठेवा होता..

तिने खोलीतील दिवा चालू केला. वहीच्या मागच्या कव्हर मधून एक कागद बाहेर काढला. ती पुन्हा एकदा मोहरली. कागद अलगद उघडून ती वाचू लागली.

"प्रिय राधा,
कसं सांगू तुला कळत नाहीये. आजचं हे सगळं का सांगतोय ते ही माहित नाहीये. राधा, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझं वागणं, बोलणं माझ्या मनाचा ठाव घेतं. तुझा प्रत्येक शब्द मी मनात साठवून ठेवतो. तुझं हसणं माझ्याही ओठांवर हसू फुलवतं. राधा, मला वास्तवाची पूर्ण कल्पना आहे. तू माझी होणं या जन्मी तरी शक्य नाही. माझ्या घरची परीस्थिती सर्वज्ञात आहे. तुमचं घर म्हणजे आमचा आधार. आबा आणि माई जणू नात्याची माणसं. तुमच्या आधारावर तर आम्ही जगतोय. तुझ्या आबांच्या आधारामुळे तुझ्या बरोबरीने एमकॉम पूर्ण केलं. गावात बातमी आहे की तुझं पुण्याच्या अमित जोशींशी लग्न ठरलंय. राधा ही बातमी तुम्हा सर्वांसाठी आनंददायी आहे पण यातील प्रत्येक शब्द माझ्या काळजाचा ठाव घेतोय गं.
मी कधीच स्वार्थी बनून आबा आणि माईंना फसवू शकत नाही. तू खरंच लग्न कर त्यांच्याशी आणि खूप सुखात राहा. पण मी तुला कधीच विसरू शकणार नाही. हे पत्र वाचून तू कदाचित रागावशील, माझी लायकी काढशील, कदाचित पत्र फाडून टाकशील. हो, पण ते ही मनात नसताना. कारण तुझी प्रत्येक स्पंदनं मी जाणतो. मला माहिती आहे राधा तू ही माझ्यावर खूप प्रेम करतेस. पण आबा आणि माईंमुळे ते कधी व्यक्त नाही केलंस. आता हे सगळं वाचून तुझ्या डोळ्यांत थेंबभर जरी पाणी आलं तरी ती माझ्या प्रेमाची सर्वात मोठी जीत असेल.
फक्त तुझाच,
राजेश. "

अनुराधा देहभान हरपून तो मजकूर वाचत होती. आजही ती तेवढीच रडत होती जेवढी पहिल्यांदा पत्र वाचताना रडली होती. तिचं मन विव्हळत होतं.

राजेश तुला असं कसं वाटलं रे की, मी रागवेन, तुझी लायकी काढेन आणि मग हे पत्र फाडून टाकेन? तुला काय माहित रे की स्त्री जेव्हा एखाद्याला आपलं मन समर्पित करते तेव्हा ते कायमचं करत असते. तिची अवस्था फक्त तिलाच माहित असते. तरी तू मला अचूक ओळखतोस रे. मी कधीही व्यक्त न होऊ दिलेलं प्रेम किती सहज ओळखलं तू. तुझं प्रेम ही मला तुझ्या डोळ्यांत लख्ख दिसायचं. किती प्रेम करायचास माझ्यावर.

आणि असं रे कुणी सांगितलं तुला की, गरीब होतास म्हणून मी तुला नाकारलं असतं. पण दोघांच्याही मनात असूनही तू मला हे सर्व माझं लग्न ठरल्यावर सांगितलंस. तेव्हा मात्र माझा नाइलाज झाला. मी मरणयातना भोगत होते आणि तू मात्र माझ्या लग्नाच्या तयारीला जोमाने लागला होतास. आबांचा प्रत्येक शब्द हा आज्ञा मानून काम करत होतास. कोणाला पत्ता ही नव्हता की तुझ्या मनाची काय अवस्था झालीय. खरंतर आबांचा भारी जीव तुझ्यावर म्हणून तर त्यांनी लग्नाची सगळी जबाबदारी तुझ्याकडे सोपवली होती.

आबा लग्नाच्या दोन दिवस अगोदर म्हणाले होते, "अनु, हे अमितरावना अगदी आपल्या राजेशसारखेच आहेत बघ. तुझी आणि राजेशची किती प्रामाणिक मैत्री आहे. तशीच प्रामाणिक भावना आपल्या पतीशी कायम ठेव."
त्यावेळी माझ्या मनात एक वेडी आशा डोकावून गेली. वाटलं की विचारावं आबांना, "आबा तर मग अमितपेक्षा तुम्ही माझं लग्न राजेशशीच का नाही लावून देत??" पण हे असलं काही बोलायची हिम्मत ही नव्हती आणि ती वेळ ही नव्हती.

अचानक दारावर माईंची थाप पडली. दरवाजा उघडून माई आत आल्या. तोपर्यंत अनुराधा डोळे पुसून खिडकीबाहेर बघत बसली होती. माई तिच्यापाशी येऊन बसल्या. काहीश्या हळव्या होतं त्यांनी प्रश्न केला, "अनु, तू नक्की सुखात आहेस ना? सात वर्षांनी मी हा प्रश्न विचारतेय खरा पण आज राहवलं नाही गं. आल्यापासून थोडी उदास वाटलीस म्हणून विचारलं. अमितराव काही..." माईंचा प्रश्न अर्धवट तोडून अनुराधा म्हणाली, "नाही गं माई. मी खूप सुखात आहे. आणि अमितचं खूप प्रेम आहे माझ्यावर. त्याला माझं खूप कौतुक असतं. राज तर त्याचा दुसरा प्राण आहे. कितीही दमून आला तरी त्याच्याशी बोलल्याशिवाय, खेळल्याशिवाय अमितचा दिवसच संपत नाही. आमच्या सुखासाठी तो दिवसरात्र राबत असतो गं. मी खूप सुखात आहे. अगदी तुझी, आबांची शपथ !"

"हो ना. मग मी निश्चिन्त आहे. तुझ्या पलीकडे आमचं जग नाही गं. तू सुखी तर आम्ही सुखी. तिकडे पुण्याला असलीस की, तुझ्या येण्याची वाट पाहत असतो. बरं ऐक, आबा आणि राज येतील एवढ्यात. तोपर्यंत चल पानं वाढायची तयारी करू." माई उठत म्हणाल्या.

"माई तू हो पुढे. मी येतेच." अनुराधा थोडी मूड बदलत म्हणाली. माई खोलीबाहेर गेल्याची खात्री करून तिने ती वही तिच्या कपाटात ठेवली. चेहरा ठीकठाक करून ती किचनकडे वळली.

आज तिच्या आवडत्या पुरणपोळीचा बेत असूनही तिला जेवण घशाखाली उतरत नव्हतं. पण आबा आणि माईंच्या समाधानासाठी तिने चार घास बळेबळेच पोटात ढकलले. सर्व आवरल्यावर माई-आबा झोपायला गेले. राज पण आजीच्या जवळच झोपायचा हट्ट करून त्यांच्या सोबत गेला. ती एकटीच परत आतल्या खोलीत आली. पुन्हा एकदा सगळ्या आठवणी उचंबळून आल्या. तिने दरवाजाला कडी घातली आणि येऊन पुन्हा त्याच खिडकीत बसली. अगदी समोर पंधरा वीस पावलांवरच तर राजेशचं घर होतं. तो लहान असताना त्याचे वडील वारल्यावर आबांनीच बांधून दिलेलं.
आज संध्याकाळची ती मिनिटभराची भेट, ती करारी नजर, आणि तो नाजूकसा इशारा. लग्नाच्या दिवसापासून तिने त्याला पाहिलं नव्हतं. ती माहेरी आली की तो कुठेतरी परगावी गेलेला असायचा. त्याच्या आईकडे एक दोनदा चौकशी केली तिने. पण कामासाठी बाहेरगावी गेलाय एवढंच कळायचं. खरंच काम असायचं की तिला टाळण्यासाठी तो काम काढून जायचा हे फक्त त्यालाच माहित. आज जवळजवळ सात वर्षांनी तो दिसला तिला.

रात्रीचे अकरा वाजून गेले होते. तिला खोलीच्या मागच्या दाराजवळ पावलांची चाहूल लागली. तिच्या छातीत एकदम धस्स झालं. तिने दबक्या आवाजात विचारलं, "कोण आहे?" पण तरीही प्रतिसाद मिळेना म्हणून ती उठली. जरा ही आवाज न करता तिने दार उघडलं आणि तिच्या नसानसात सर्रकन वीज सरकली. ती फक्त पुटपुटली. "राजेश.."

काही कळायच्या आत तिने त्याला खोलीच्या आत घेऊन दार बंद केलं. खिडकी बंद केली. दोन्ही दारांना कडी असल्याची खात्री केली. एक दीर्घ श्वास घेऊन ती खिडकीपाशी जाऊन बसली. तो ही तिच्यापासून काही अंतरावर बसला. काय बोलावं ते दोघांनाही सुचत नव्हतं. शेवटी अनुराधाच म्हणाली, "आज का आलास राजेश? एवढ्या सात वर्षात मला टाळत आलास मग आज का भेटावंसं वाटलं? एकदाही आठवण आली नाही का माझी? "

"अगं असं का बोलतेस? तुझी आठवण संपेल ती माझ्या सोबतच. राधा..." आणि तो अचानक गप्प बसला. फक्त एकटक तिच्याकडे पाहत राहिला.

"हं बोल ना रे. किती वर्षांनी आज \"राधा\" ही हाक पुन्हा ऐकतेय. पुन्हा एकदा हाक मार प्लिज."

"राधा.. राधा.. का गं हे दैव असं? मी काय असा गुन्हा केला की दैवाने त्याची अशी शिक्षा द्यावी? आज माझ्याकडे सर्व काही आहे. चांगली नोकरी, पैसा, घर. नाहीस ती फक्त तू. त्या लग्नाच्या रात्री पण मी तुला असाच भेटायला आलो होतो. तू रडून रडून दमली होतीस. मला पाहून तुझा हुंदका पुन्हा वाढला आणि तू झोकून दिलंस स्वतःला माझ्या कुशीत. कसलंच भान नव्हतं तुला. त्यावेळी तुला हे विश्व तुझ्या आणि माझ्या पुरतंच मर्यादित वाटलं होतं. जवळजवळ अर्धा तास तू माझ्या कुशीत स्फुंदत राहिलीस. मी ही स्वतःचे अश्रू दडवून तुला समजावत राहिलो. कशी विसरू गं ती रात्र?" बोलता बोलता त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

ती अनामिक हुरहूर पुन्हा एकदा तिला जाळून टाकत होती. न राहवून ती स्वतःला त्याच्या कुशीत झोकून देणारच होती पण वास्तवाचा चटका तिला जाणवला. चर्रर्रर्र.. राजेशच्या नजरेतून तिची हालचाल सुटली नाही. तो फक्त मंद हसला. तिच्या डोळ्यांत साठलेलं पाणी मधेच कधीतरी ओघळू लागलं.

"राजेश आठवतं तुला? एकदा आबांचा निरोप घेऊन मी तुमच्या घरी आले होते. मला समजायला लागल्यापासून मी तशी पहिल्यांदाच तुझ्याकडे आले होते. बरोब्बर त्याच्या आदल्या दिवशी ती वही तू माझ्याकडे दिली होतीस. आबांना काहीतरी कारण सांगून तुझ्याकडे यायचं असं ठरवत होते मी पण आबांनी खोटं बोलायची वेळ माझ्यावर येऊच दिली नाही. मी आले तेव्हा तू काहीतरी वाचत पाठमोरा बसला होतास. माझ्या पैंजणांचा आवाज ऐकून तू विचारलंस, "कोण? राधा?"

खरं सांगते तुझ्या प्रेमाची ओळख मला त्या क्षणी पटली. त्या एका हाकेत तुझ्या प्रेमाचा पुरावा मिळाला. कारण पैंजण घालणारी मी काही एकटीच नव्हते. म्हणून मी म्हणते की, माझी स्पंदनं जाणणारा फक्त तुच होतास आणि आहेस. तुझ्या प्रेमात पडल्यावर आजूबाजूचा निसर्ग मला आणखीन जवळचा वाटू लागला. मी कविताही तुझ्यामुळेच तर लिहू लागले. आता मी पुण्यात राहत असले तरी मन मात्र अजूनही या कोकणच्या लाल मातीतच गुंतून राहतं. राजेश मला खात्री होती तू आज येणार. कारण संध्याकाळी आबा आणि राजला बाहेर जाताना तू त्यांना भेटलास. आबा नातवाचं कौतुक सांगत होते ना रे? ते निघून गेल्यावर तू माझ्याकडे ओझरतं पाहून मागच्या दाराकडे पाहिलंस. त्या वेळेपासून कधी एकदा तुला भेटते असं झालं होतं. मी अमितला फसवत नाहीये. मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. पण ठरवून ही मी तुला विसरू शकले नाहीये. पण हे ही नक्की की मी अमितशी प्रामाणिक आहे आणि राहीन."

अनुराधाला अंगाची होणारी थरथर पूर्ण जाणवत होती. तरीही भान राखून तिने प्रश्न केला, "राजेश, तू लग्न का नाही केलंस?"

"जिच्यात मी माझं सुख मानलं, ती माझी राधाच माझी मैत्रीण, माझी सखी, माझी प्रेयसी आणि माझं सर्वस्व असताना अजून लग्नाची ती काय गरज? कदाचित मला आता जे समाधान मिळतंय ते दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यावर नसतं मिळालं. कधी कधी तुझी खूप आठवण येते. जीव कासावीस होतो अगदी. मग जाऊन बसतो समुद्रकिनारी. वाळूत कितीदा आपलं नाव लिहून त्याकडे पाहत राहतो. राधा मी नाही दुसऱ्या मुलीशी लग्न करु शकत" एक दीर्घ सुस्कारा सोडत तो बोलला.

"म्हणजे मी लग्न करून चूक केली का रे? मी नाही ना एकनिष्ठ राहू शकले?" अनुराधा कासावीस होतं बोलत होती. "पण काय करू रे? मी समाज आणि नात्यांच्या बंधनात जखडले होते. माझ्याकडे तेव्हा काहीच पर्याय नव्हता. माझं लग्न ठरल्यावर तू तुझ्या प्रेमाची कबुली दिलीस. तू का नाही अगोदर बोललास? आबांना मी समजावलं असतं कसतरी. गरीबी काय तू मागून घेतली होतीस का? तुला का नाही कळलं की मी ही तुझ्याशिवाय जगू शकणार नाही? पण एक सांगू अमित खूप चांगला आहे. कदाचित मीच त्याच्या योग्यतेची नाही कारण मी सतत त्याच्यात राजेशला शोधत असते. तुझी आठवण म्हणून मी मुलाचं नाव पण \"राज\" ठेवलं." तिला पुन्हा हुंदका अनावर झाला.

"राधा निघतो मी आता. फक्त तुझ्याशी मनातलं बोलावं म्हणून मी आलो होतो. ते बोललो. बस आता काहीच नको. पुन्हा मी असा कधीच तुला भेटणार नाही. पण या भेटीमुळे तुझ्या संसारात, वागण्यात काहीही फरक पडू देऊ नकोस. शेवटी तू कोणाची तरी बायको आणि आई आहेस. कर्तव्याला कधीच चुकू नकोस. राधा आपण कायम मर्यादेत राहिलो. त्यावेळी पण मर्यादाच आडव्या आल्या आणि बघ ना मगाशी जेव्हा तू माझ्या जवळ येत होतीस तेव्हा ही त्याच मर्यादांनी तुला मागे खेचलं. पण तरीही आपलं प्रेम अमर्याद आहे. ती भावना सच्ची आहे. ते पवित्र आहे. स्वार्थ, वासना यापलीकडचं. ते फक्त त्याग जाणतं. तू् सुखी राहावीस ही एकच इच्छा आहे माझी." त्याचा शब्दानशब्द ती मनात साठवत होती.

"राधा, लग्नापूर्वीच्या आणि आताच्या या भेटीत किती तफावत आहे ना? आपण कितीही सुखी झालो ना तरी हे शल्य आपल्याला सतत एकमेकांची आठवण देत राहील. खूप सुखात राहा राधे. आता मात्र ही शेवटची हाक. या आठवणींना विसरून एका मुलीचं, पत्नीचं आणि आईचं कर्तव्य पार पाड. कितीही अशक्य असलं तरीही. तू तशी खूप समजूतदार आहेस." एवढं बोलून तो दार उघडून निघून गेला. एकदाही मागे वळून न पाहता.

अंधारात धूसर होत जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहत राहिली. अशा माणसावर प्रेम केल्याचा अभिमान तिच्या डोळ्यांत दाटून आला होता. आता तिच्या डोळ्यांत अगोदरचे अश्रू नव्हते. त्या दुखऱ्या अश्रूंची जागा आता आनंदाश्रूंनी घेतली होती. त्या अश्रूंमधे समाधान ओसंडून वाहत होतं. शल्य होतंच पण आज त्या सोबतीला जगायला बळ देणारं काहीतरी गवसलं होतं तिला.

© वृषाली प्रभुदेसाई, कोल्हापूर..