शापित अप्सरा भाग 46
मागील भागात आपण पाहिले सुगंधा केशरच्या सांगण्यावरून चित्र काढायला घेते. इकडे सुगंधा आणि सुभानराव एकांतात असताना त्यांना वेगळा अनुभव येतो. आता पाहूया पुढे.
सुभानराव रात्री घडलेल्या प्रकारातून सावरले नव्हते. आजवर त्यांचा स्वतः च्या पुरूषत्वावर असलेला अभिमान हलवून टाकणारा प्रकार घडला घडला होता .
सुगंधादेखील ह्या झाल्या प्रकाराने अचंबित झाली. परंतु ह्याचा माग काढायला तिने तिच्या काही खास माणसांना कामावर लावले. तर तिसरीकडे सगुणाबाई आपली योजना यशस्वी होत असल्याचे पाहून प्रचंड आनंदी झाल्या .
त्यांनी आपली योजना यशस्वी झाल्याचे ओळखले आणि त्या थेट गुणवंताबाईंना भेटायला निघाल्या .
"या सूनबाई . तुमचीच वाट बघतोय आम्ही. प्रसाद घ्या." देवघरातील पूजा आटोपून बाहेर आलेल्या गुणवंताबाई म्हणाल्या.
सगुणाबाई प्रसन्न चित्ताने प्रसाद घेऊन त्यांच्यासोबत बैठकीत आल्या.
"आत्या,आपली योजना यशस्वी झाली आहे. आता बघतेच ती सटवी किती दिवस टिकते ."
सगुणाबाई क्रोधाने म्हणाल्या.
"सूनबाई ही चूक अजिबात करू नका. शत्रूला कधीही हलके समजायचे नाही. सुगंधा याचा विचार नक्की करणार. आपल्याला सदैव सावध राहायला हवे."
गुणवंताबाई समजावून सांगत होत्या.
सगुणाबाई आता बऱ्याच निश्चिंत होऊन आपल्या दालनात परतल्या.
इकडे सुगंधा आणि केशर दोघींनी पुढील योजनेवर काम सुरू केले.
"सुगंधा,आधी ग्रंथ सुरक्षित करायला हवा. गावाच्या बाहेर असलेल्या एका स्थळावर आपल्या सर्व साथीदारांना घेऊन आपल्याला सुरक्षा चक्र निर्माण करावे लागेल."
"हो,पण त्यासाठी किमान तीन रात्री लागतील. सुभानराव असताना ते कसे शक्य आहे?"
"सुगंधा,नाईलाजाने वशीकरण वापरावे लागेल. तीन रात्री आपल्याला ती साधना करावीच लागेल. तरच मला इथून निश्चिंत मनाने निघता येईल."
केशर समजावत होती.
"संकेत देणारी चित्रे जवळपास पूर्ण होत आली आहेत." असे म्हणून सुगंधा अचानक थांबली.
तिच्या चेहऱ्यावर असणारे गंभीर भाव बघून केशरने ओळखले काहीतरी सुगंधाला सलत आहे.
"सुगंधा काय झाले? काही अडचण आहे का?"
केशर आता थोडी काळजीत पडली.
"केशर,खरेतर मला...." सुगंधा बोलत असताना अचानक थांबली.
"सुगंधा पती पत्नी मधील काही गोष्टी सांगणे नाही शक्य होत. तुला योग्य वाटेल तेव्हा सांग."
केशरने तिला समजावले.
केशरने तिला समजावले.
सुगंधा एक क्षण थांबली आणि मग काल रात्री घडलेला सगळा प्रकार तिने सांगितला.
"सुगंधा,एकदा घडलेल्या प्रकारातून निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. आपल्याला आज पुन्हा सगळे पडताळून पहावे लागेल. मग आपण यावर विचार करू."
केशर सुगंधाला समजावून स्वतः च्या दालनात निघून गेली.
सुगंधाने दुपारचे जेवण खाली जाऊन करायचे ठरवले. त्याप्रमाणे ती दालनातून खाली उतरली. सुभानराव नसताना असे खाली यायची पहिलीच वेळ होती. कमळा बाहेर जेवत होती.
सुगंधाला जिन्यातून उतरताना पाहून ती हसली आणि मोठ्याने म्हणाली,"राती बैठक लई लांबली वाटत?"
त्याबरोबर सुगंधा रागावली आणि तिने उत्तर दिले,"आम्ही इनामदरांच्या पत्नी आहोत. सांभाळून बोलायचे आमच्याशी."
तेवढ्यात कमळाची दासी तिला जेवण वाढायला आली. सुगंधाला आजूबाजूला अचानक नकारात्मक ऊर्जा जाणवू लागली. इतक्यात सुभानराव आत आले. त्यांना आलेले पाहून कमळा मुद्दाम रेंगाळली.
"सुगंधा, रातीची जागरूक डोळ्यात दिसली तरच पिर्तीला रंग चढत असतो. काय भावजी बरोबर नव्हं?"
सुभानराव काहीच न बोलता आत जायला वळले.
"आता, आमच्यापासन काय लपवत फिरता आमी समद पायल हाय की."
सुभानराव गरकन मागे वळले.
तेवढ्यात सुगंधा हसून म्हणाली,"राव,आज एकत्र जेवू. चला आत मी वाढते तुम्हाला."
दोघेही आत गेले तेव्हा एक म्हातारी दासी एका गृहस्थाला हाताने भरवत होती.
"बाळूबाई तुम्ही कशाला त्यांना इथे घेऊन आलात? आईसाहेब रागावतात मग."
सुभानराव चिडले.
"मालक त्या बंद खोलीत त्यासनी जेवण जात न्हाई." बाळूबाई घाबरत म्हणाली.
तेवढ्यात त्या इसमाने सुगंधाला पाहिले.
सुगंधा काही बोलणार तेवढ्यात सुभानराव म्हणाले,"आमचे वडील आहेत ते."
सुगंधा पटकन पुढे झाली आणि तिने त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. बाळूबाई घाईत त्यांना घेऊन गेली.
सुगंधा आणि सुभानराव जेवायला बसले. रात्रीच्या घटनेचा कोणताही उल्लेख न करता सुगंधाने त्यांना तिचे प्रेम फक्त शरीरावर नसल्याची जाणीव करून दिली. दोघेही जेवण करून दालनाकडे निघाले.
चालत असताना सुगंधा एकदम थांबली. तिला प्रचंड नकारात्मक ऊर्जा जाणवत होती. परंतु सोबत सुभानराव असल्याने तिला शोध घेता येत नव्हता. दालनात आल्यावर सुगंधाने त्यांना शांत पडून राहायला सांगितले.
"सुगंधा,तुम्ही खरच खूप सुंदर आहात. शरीरानेच नाही तर विचारांनी देखील."
सुभानराव तिचा हात हातात घेत म्हणाले.
सुगंधा फक्त हसली आणि तिने त्यांना एक सुंदर भक्तीगीत ऐकवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्या शांत वातावरणात त्यांना झोप लागली.
सुगंधा आता उठून दिवा मालवणार एवढ्यात तिला हाक ऐकू आली,"सुगंधा ! सावध रहा."
ती हाक ऐकताच सुगंधा थबकली. तिने लगेच देवघरातील आसनावर बैठक लावली आणि ध्यान केंद्रित केले. येणारा आवाज एका स्त्रीचा होता.
सुगंधाने आपल्या योगिनी शक्तीने ध्यान लावून शोध सुरू केला आणि तिला दूर एका भिंतीत कैद असलेली ती दिसली. सुगंधा तिला बंधमुक्त करण्यासाठी मंत्र जपणार इतक्यात खालून प्रचंड रडारड ऐकू येऊ लागली आणि सुगंधा ध्यानातून बाहेर आली.
सुगंधा धावत खाली आली ज्या दालनातून आवाज येत होता तिकडे धावत निघाली. बायकांची गर्दी दार अडवून उभी होती. सुगंधा आत गेली आणि आतले दृश्य बघून तिला काय झाले ते समजायला वेळ लागला नाही.
इनामदार घराण्यातील एक गर्भार सून रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तिच्या उदरातील गर्भ गायब होता.
सुभानरावांचे धाकटे सावत्र बंधू सटवाजीराव यांची गरोदर पत्नी अनसाबाई यांची ही अवस्था पाहून सगळ्याजणी घाबरल्या होत्या.
सुगंधाने याचा अर्थ ओळखला होता. जवळपास नक्कीच चेटकीण आहे. तेवढ्यात गुणवंताबाई आल्याची वर्दी मिळाली. सगळ्याजणी रडत होत्या.
त्याही परिस्थितीत त्यांनी सुगंधाला सुनावले,"तुझे अशुभ पाऊल ह्या घरात पडले आणि संकटे सुरू झाली."
सुगंधा काहीच न बोलता तिथून निघाली. सकाळी जाणवली ती नकारात्मक ऊर्जा काय होती याचे उत्तर मिळाले होते.
तोपर्यंत सगळ्या महालात हाहाकार उडाला होता. अनसाबाईंचे अंत्यसंस्कार आटोपायला मध्यरात्र उलटून गेली होती. दमलेले सुभानराव येऊन झोपी गेले. त्यांच्या कपाळावर हात ठेवून सुगंधाने मंत्र जपला आणि ती नियोजित कार्य करायला बाहेर पडली.
"सुगंधा,खर तर आता बाहेर पडणे जास्त धोक्याचे आहे परंतु आपला नाईलाज आहे."
केशर मागे वळली आणि तिने संपूर्ण महालाभोवती रिंगण आखले.
"आता कोणीही इथून आपला पाठलाग करणार नाही." सगळ्या योगिनी नियोजित ठिकाणी निघाल्या.
मध्यरात्री चेटकीण जागी झाली. तिने पळवून आणलेला गर्भ घेऊन स्मशानात जायचे होते. तिथेच पुढचा विधी तिला करता येणार होता.
ती हळूच उठून बाहेर आली. संपूर्ण महाल जणू संमोहित झाल्यासारखा गाढ झोपी गेला होता. चेटकीण काळया कपड्यात तो गर्भ गुंडाळून बाहेर आली. महालाच्या बाहेर पाऊल टाकायचा प्रयत्न करताच ती मागे फेकली गेली.
"कोणी आखले रिंगण. सोडणार नाही त्याला." ती प्रचंड रागाने महालाच्या भोवती फिरत होती.
तेवढ्यात तिची नजर महालाच्या मागील प्रचंड मोठ्या वडाच्या झाडावर पडली. तिने काळा जादू वापरला आता तिला ते रिंगण स्पष्ट दिसत होते. वडाची एक फांदी रिंगणाच्या बाहेर पोहोचत होती. चेटकीण झाडावर चढली आणि तिने हळूच फांदीवर चालायला सुरुवात केली. तिचा अंदाज चुकला होता रिंगण महालाच्या अवकाशातदेखील होते.
चेटकीण नाईलाजाने खाली उतरली. तिने आत जाऊन तो गर्भ लपवला आणि वाट पाहू लागली कारण ज्याने रिंगण आखले तो नक्कीच आत महालात नसणार याची तिला खात्री होती.
सुगंधा आणि केशर त्यांच्या सगळ्या साथीदारांना घेऊन गावाच्या बाहेरील जंगलात पोहोचल्या. तिथल्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गुहेत गेल्यावर त्यांनी एक गुप्त मार्ग शोधला. आतमध्ये प्राचीन योगिनी मंदिर होते.
"ह्या गुहेत पिशाच्च वावरतात अशी अफवा असल्याने इथे कोणीही येत नाही. आपल्याला आता इथे साधना सुरू करायची आहे."
केशर भराभर सूचना देत होती. ग्रंथ एका संदुकित ठेवून ती संदुक ज्या ठिकाणी आठही दिशांचे बिंदू मिळतात अशा ठिकाणी ठेवली आणि साधनेला सुरुवात झाली.
आठही दिशांची शक्ती जागृत करून पहिले सुरक्षा रिंगण योगिनी स्त्रियांनी आखले.
पहाट व्हायला आली त्याबरोबर साधना संपवून निघायचा इशारा केशरने दिला.
इकडे चेटकीण रात्रभर जागीच होती. सुगंधा,केशर आणि सगळ्या योगिनी परत आल्या. त्यांनी महालाभोवती आखलेले रिंगण नष्ट केले. चेटकीण त्या आत येतायेत हे बघून पटकन निघून गेली. कारण तिचे असतित्व योगिनी सहज ओळखू शकत होत्या.
सुगंधा गुपचूप दालनात आली. आता सूर्योदय होताच सगळा महाल पुन्हा जागा होणार होता.
गुणवंताबाई कालचा प्रकार पाहून समजून गेल्या की आसपास काळया शक्ती वावरत आहेत. त्यांनी आजच गंगाधर शास्त्रींना भेटायचे ठरवले.
कारण आज एक बळी गेला अजून किती जातील? विचार करुनही अंगावर काटा येत होता. त्यांनी गंगाधर शास्त्रींना बोलवायचा निरोप दिला आणि अस्वस्थ मनाने देवपुजेला बसल्या.
सुगंधा आणि केशर सगळे कार्य पूर्ण करू शकतील?
चेटकीण पुढे काय करेल?
सगुणाबाई आता कोणती चाल खेळातील.
वाचत रहा.
शापित अप्सरा.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा