Login

शापित अप्सरा भाग 47

संघर्ष आणखी तीव्र होत चालला आहे

शापित अप्सरा भाग 47


मागील भागात आपण पाहिले सुगंधा आणि केशर ग्रंथ सुरक्षित करायला साधना सुरू करतात. इकडे चेटकीण गर्भ घेऊन बाहेर पडू शकत नाही. गुणवंताबाई गंगाधर शास्त्रींना घडलेल्या प्रकाराबाबत विचारायचे ठरवतात आता पाहूया पुढे.


सुभानराव गाढ झोपेत होते. सुगंधा रात्रभर जागी असल्याने तीही झोपी गेली होती. थोड्या वेळाने तिला जाग आली. शेजारी पहुडलेला पहाडी शरीर आणि मर्दानी सौंदर्य असलेला तरीही आतून एक हळवे मन जपलेला माणूस तिला सापडला होता. सुगंधा त्यांच्या आयुष्यात आल्यावर त्यांनी इतर सगळे छंद बंदच केले होते. त्यामुळे सुगंधा त्यांच्या अधिकाधिक प्रेमात पडली होती.




तिने त्यांच्या घनदाट केसात आपली नाजूक बोटे घातली आणि हळूवार त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याक्षणी सुभानराव जागे झाले. त्यांच्या अंगावर झुकलेली सुगंधा आणि तिचे प्रेमळ पाणीदार डोळे बघून त्यांचे भान हरपले होते. त्यांनी अगदी नकळत सुगंधाला जवळ ओढले



सुगंधाने हळूच त्यांच्या कपाळावर ओठ टेकवले आणि त्यांच्या बाहुपाशी स्वतःला झोकून दिले. काही वेळातच वस्त्रांची बंधने संपली आणि दोन देह खऱ्या अर्थाने एकरूप झाले. परंतु पुन्हा तेच प्रणय रंगात आला आणि अचानक सुभानराव थंड पडल्यासारखे बाजूला झाले.



त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि डोक्यात संताप होता. आपल्या पुरुष असण्याची ही अपूर्णता कशी निर्माण झाली त्यांना समजत नव्हते. सुगंधा मात्र ह्या प्रसंगाने सावध झाली.



आता ग्रंथ सुरक्षित केल्यावर याचे उत्तर मिळवायचे तिने ठरवले. सुभानराव काही काळ तसेच पडून होते. त्यांचा कातीव,पिळदार देह प्रचंड सुंदर होता. आजवर अनेक सुंदरी त्यांनी जिंकल्या होत्या आणि आज... त्यांच्या नकळत डोळ्यातून अश्रू वहात होते. सुगंधा हळूच त्यांचा जवळ गेली.



"राव,तुम्ही शांत व्हा बघू. जगातील प्रत्येक प्रश्नावर उत्तर असते. ह्याही असेल. आपण दोघे मिळून नक्कीच उत्तर शोधू."


तिने त्यांना शांत केले.


सुभानराव उठून अंघोळीला गेले. नग्न देहावरून पाणी घेतल्यावर मनातले विचार थोडे शांत झाले. त्यांनी आता ह्या सगळ्याचा माग काढायचे ठरवले होते. कारण अचानक अशी समस्या निर्माण होऊ शकत नव्हती त्यावर उपाय एकच होता घुंगरू.



आज रात्री गावाबाहेर मळ्यात शेतावर असलेल्या छोट्या वाड्यात जायचे त्यांनी ठरवले. अंघोळ करून बाहेर आल्यावर त्यांनी सुगंधाला हाक मारली.


"बरेच दिवस आम्ही शेतांच्या कामाकडे लक्ष दिले नाही. तेव्हा आज आम्ही तिकडेच मुक्काम करू. चालेल ना?"

सुगंधाला उलट ह्यामुळे फायदाच होणार होता. तिने होकारार्थी मान हलवली.



सुभानराव तयार होऊन त्यांच्या वडिलांच्या पाया पडायला गेले.


"शेवटी वळणाचे पाणी वळणाला जायचे." गुणवंताबाईंचा धारदार आवाज त्यांच्या कानावर पडला.


त्यासरशी सुभानराव तेवढ्याच करारी आवाजात म्हणाले,"आम्ही इथे फक्त आमच्या वडिलांना भेटायला येतो."


गुणवंताबाई रागाने निघून गेल्या. त्या गेल्यावर आपल्या वडिलांचे ओठ हलत असल्याचे सुभानरावांनी पाहिले. त्यांनी डोळ्यांनी जवळ ये खुणावले.


ओठांजवळ कान नेताच अस्पष्ट आवाजात ते कसेबसे बोलले,"जेवण." सुभानराव त्यांना जेवायला हवे असे समजून बाळूबाईला तसे सांगून निघून गेले.



इकडे चेटकीण प्रचंड चिडली होती. काल झालेला प्रकार पाहिल्यावर सुगंधा योगिनी आहे हे तिला समजले होते. आज काहीही करून गर्भ स्मशानात न्यायला हवा होता. त्याबरोबर योगिनी काय साधना करत आहेत हे देखील तिला शोधायचे होते.



तिने गर्भ एका कोपऱ्यात लपवला होता. त्याभोवती सुगंधी वनस्पती लपेटल्या होत्या जेणेकरून कोणालाही दुर्गंध येऊ नये. चेटकीण हळूच त्या गर्भाभोवती नवे आवरण ठेवायला गेली. कमळाला स्वयंपाकघरातून जेवण मागवायचे होते. ती तिच्या दासीला शोधत होती. तेवढ्यात चेटकीण घाईने आली.



"कुठ व्हती तू? काम करायला आणली तुला माहीत हाय ना?" कमळा रागावली.


"हितच व्हते म्या. आलेच जेवान घिऊन." ती पटकन बाहेर निघून गेली.


आपण सांगितले नसताना हिला जेवण आणायचे कसे समजले? कमळा विचार करत असताना अंतोजी आत आला. त्याबरोबर कमळा नाजूक हसून त्याच्या जवळ आली. त्याने दालनाचे दार लावून घेतले. कमळा आणि अंतोजी दोघे प्रणयात रमले असताना चेटकीण बाहेर उभी होती.



तिला अजून दोन गर्भ हवेच होते साधना करण्यासाठी. तिच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य उमटले. थोड्या वेळाने दरवाजा उघडला. जेवण झाल्यावर अंतोजी निघून गेला.



आवराआवर करताना चेटकीण म्हणाली,"मालकीण बाय केशर खात जावा व्हणार बाळ देखन व्हईल."


तिने असे म्हणताच कमळा जोरात हसली.


"का माज काय चुकल का?" चेटकीण मुद्दाम म्हणाली.


"सांगल तुला येळ आल्यावर." कमळाने तिला बाहेर जायला सांगितले.


चेटकीण बाहेर गेल्यावर कमळाने आरशात पाहिले आणि क्रूर हास्य उमटले. आरशात कमळा नव्हतीच.


"लवकरच माझ्या शक्ती जागृत होतील आणि मग सुभानराव आणि हा संपूर्ण महाल माझा गुलाम असेल."

तिचे हसू संपूर्ण दालन व्यापून उरले होते.



गंगाधर शास्त्री गुणवंताबाईंच्या दालनात येताना त्यांनी सुभानराव बाहेर पडताना पहिले. गुणवंताबाई बैठकीत अस्वस्थ फेऱ्या मारत होत्या. गंगाधर शास्त्री आत आले.


"शास्त्रीजी काल आनसाबाईंबरोबर जो भयंकर प्रकार झाला तो पाहता नक्कीच महालात काळया शक्ती वावरत आहेत. याबाबत काहीतरी उपाय करायला हवा." गुणवंताबाई चिंतेत होत्या.



"आक्कासाहेब काल झालेला प्रकार नक्कीच सामान्य नाही. निश्चित हे चेटकीण किंवा अघोरी पंथातील व्यक्तीचे काम आहे."
शास्त्री आपले मत नोंदवत म्हणाले.


"महालात अनेक नवीन लोक आलेत शास्त्रीजी, त्यातील कोण ह्या काळया शक्तींचा वाहक असेल? कसे कळेल आपल्याला?" गुणवंताबाई म्हणाल्या.


" आक्कासाहेब,त्यासाठी आपल्याला महालात एक अध्यात्मिक यंत्र लावावे लागेल त्यातून आपल्याला गुन्हेगार शोधता येईल."


"मग असे यंत्र मागवा. पण ते लावलेले कोणालाही समजू शकेल." "त्याची चिंता करू नका"
मंद स्मित करत शास्त्रीजी बोलले.



"शास्त्रीजी,असा प्रकार परत महालात व्हायला नको." गुणवंताबाई म्हणाल्या.


"त्यासाठी आधी आपल्याला ते अध्यात्मिक यंत्र लावावे लागेल. मी आजच संध्याकाळी ते यंत्र अभिमंत्रित करून घेऊन येतो." शास्त्रीजी महालातून बाहेर पडले.



त्यांनी ओळखले होते की महालात नक्कीच अघोरी काळी शक्ती आहे. इकडे गुणवंताबाईंनी सगुणाबाईंना बाहेर जाण्यासाठी तयार व्हायचा निरोप पाठवला.



सुभानरावांनी दिलेला निरोप ऐकून घुंगरू शेतावर पोहोचला. खरतर सुगंधा मालकांच्या आयुष्यात आल्यावर आता त्यांना आपली तशी गरज पडणार नाही असे त्याला वाटले होते. परंतु रात्रीसाठी खास तयार रहा. असा निरोप मिळताच घुंगरू तयारीत गुंतला होता.



सुभानराव नसल्याने सुगंधा निश्चिंत झाली होती. तिने आपल्याला ऐकू आलेला आवाज कोणाचा आहे हे शोधण्याचे अपुरे राहिलेले काम पूर्ण करायचे ठरवले होते. सुगंधा देवघरात आली. तिने ध्यान केंद्रित केले आणि त्या आवाजाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तिला दिसले की एका भिंतीत एक हाडांचा संपूर्ण सापळा आहे. त्यातच कैद होती ती.



"कोण आहेस तू? मला सावध रहा असे का सांगत आहेस? तुझा आत्मा असा कैद का आहे?"
तिने त्या आत्म्याला प्रश्न विचारले.



"जे माझे झाले तेच तुझे व्हायला नको. तू सावध रहा. शक्य झाले तर मला मुक्त कर."
पुन्हा तोच आवाज सुगंधाच्या कानावर येत होता.



"तू कुठे कैद आहेस?" सुगंधाने विचारले.

त्याक्षणी तिला भिंतीवर एक मोठ्या आकाराचे तैलचित्र दिसले.


"इथे कैद आहे मी. मला मुक्ती आणि सुड हवाय." ती पुन्हा म्हणाली.


सुगंधा मुक्ती मंत्र जपू लागली पण त्याचा परिणाम दिसेना. तिने पुन्हा ध्यानात पाहिले. ते तैलचित्र एका विशिष्ट कवचाने मंत्रित होते. सुगंधाने डोळे उघडले आणि तिचा शोध घ्यायचे ठरवले.



चेटकीण आज सावध होती तिने आज लवकरच महाल सोडला आणि ती रिंगणाच्या हद्दीच्या बाहेर तो गर्भ घेऊन एका ठिकाणी लपून बसली. कारण एकदा योगिनी रिंगण अभिमंत्रित करून बाहेर गेल्या तर तिला बाहेर जाणे शक्य नव्हते. त्यामुळे तिने आधीच बाहेर जाण्याचा सुरक्षित मार्ग निवडला.



सगुणाबाई आणि गुणवंताबाई दोघी महालातून बाहेर पडल्या. आपण कोठे चाललो आहोत याचे उत्तर गुणवंताबाईंनी दिले नव्हते. फक्त आज रात्री आपण परत येऊ शकणार नसल्याने मुलांना बाळूबाईकडे सोपवा एवढेच त्यांनी सांगितले होते.


गुणवंताबाई प्रचंड अस्वस्थ होत्या पंचवीस वर्षांपूर्वी ज्या दिव्यातून त्या गेल्या होत्या तेच सगळे पुन्हा घडू नये इतकीच त्यांची इच्छा होती. त्यासाठीच त्या पुन्हा तिथेच निघाल्या होत्या.



रात्रीचे चांदणे पडले आणि केशर,सुगंधा बाहेर पडल्या. त्यांनी पुन्हा ते गुप्त योगिनी मंदिर गाठले. आज साधनेचा दुसरा दिवस होता. तिकडे चेटकीणदेखील स्मशानात पोहोचली. तिने तो गर्भ समोर ठेवला आणि तिचा अघोरी विधी सुरू केला. गुणवंताबाई आपल्या सुनेला घेऊन पोहोचल्या आपल्या माहेरच्या गावातील त्याच वाड्याच्या बाहेर. पंचवीस वर्षांपूर्वी मिळालेली मदत आज पुन्हा मिळावी यासाठी.



घुंगरू संपूर्ण शृंगार करून तयार होता. एक किन्नर असूनही त्याला दैवी सौंदर्य लाभले होते. सुभानराव आणि घुंगरू यांचे नाते काही वेगळेच होते. चांदणे पडायला सुरुवात झाली आणि सुभानराव आले. घुंगरूने हसून त्यांना बसायला दिले. स्वतः त्यांना पोटभर जेवायला दिले.



त्यानंतर सुभानराव म्हणाले,"घुंगरू आजची रात्र आम्हाला अनेक उत्तरे देणार आहे.


" "मालक,तुम्ही आजची रात्र विसरू शकणार नाही एवढी खास असेल."


घुंगरू त्यांच्या डोळ्यात पहात म्हणाला आणि त्यांना हाताला धरून माडीवर घेऊन गेला.


प्रत्येकजण आपापल्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे. एकाचा विजय म्हणजे दुसऱ्याची हार आहे. अशा ह्या संघर्षात कोण टिकेल आणि कोणाचा बळी जाईल.