Login

शापित अप्सरा भाग 60

सुगंधाला मुक्ती मिळणार. अप्सरा शापमुक्त होणार. पुढील अंतिम भागात.

शापित अप्सरा भाग 60


मागील भागात आपण पाहिले सुपर्णा सुगंधाला कैद करायचा प्रयत्न करते. सुगंधा इनामदार घराण्यातील सर्वांना संपवायचा प्रयत्न करते. तिकडे केशर ग्रंथ शोधायला जाते. कलिका आणि सुपर्णा दोघींनाही सुगंधाच्या शक्ती हव्या आहेत. आता पाहूया पुढे.



केशरने आपल्याकडील दोन्ही चित्रे उलगडली त्याबरोबर श्रेयसने उरलेल्या चित्रांचे फोटो तिला दाखवले. त्या प्रत्येक चित्राखाली असलेले चिन्ह केशरने वाचायला सुरुवात केली. सगळी सातही चिन्हे वाचून केशरने पुढे चालायला सुरुवात केली. डोंगराच्या आत कोरलेल्या भव्य लेण्यात असलेले ते मंदिर प्राचीन वास्तुकलेचा अप्रतिम नमुना होते.


केशर एका ठिकाणी थांबली. प्रचंड आकाराच्या सभागृहात मध्यभागी एक चौरसाकृती उंचवटा होता. केशर तिथे थांबली. चंद्राचा प्रकाश बरोबर त्या उंच भागावर मध्यभागी पडत होता.


"श्रेयस आता तुला पुढची कामगिरी करायची आहे. तुझ्या हातावर उमटलेली चिन्हे पुढचा मार्ग आहेत."

श्रेयस पुढे जाणार इतक्यात त्यांच्या चौघांच्या डोक्याला पिस्तूल लावले गेले.


" मिस्टर श्रेयस खबरदार हालचाल केली तर."
मृणमयीचा आवाज ऐकून सारिका दचकली.


" मृणमयी काय चाललय हे?"
राघव चिडला.


" मिस्टर राघव आणि द इन्स्पेक्टर सारिका, स्वतः ला फार हुशार समजता तुम्ही. पण एक साधा प्रश्न नाही पडला. मृणमयी प्रत्येक संकटात वाचते कशी? राघवच्या अंगावर असलेली चिन्हे मला इथवर घेऊन येत होती. परंतु पुढे काय? म्हणून तुमच्यावर पाळत ठेवली."

तिने थंडपणे योजना सांगितली.


" पण हे सगळे कशासाठी? काय मिळणार आहे तुला?"
केशर चिडली.


" अमर जीवन. गेली कित्येक शतके असे इतरांची शरीरे वापरून थकले आहे."
असे म्हणून मृणमयी खऱ्या रूपात प्रकट झाली.


" तिमिरा? कसे शक्य आहे?"
केशर ओरडली.


" तुम्ही मला योगिनी पंथातून काढून टाकले आणि त्या कामाक्षीला ठेवले. माझ्यासमोर जगण्याचा हाच एक मार्ग होता. सुगंधाला कैद करण्यासाठी माझ्याकडे शक्ती नाहीत. ते काम आता ती मूर्ख सुपर्णा करेल."

मृणमयी उर्फ तिमिरा बोलत असताना सारिकाने आपले कौशल्य दाखवले आणि तिच्या माणसांच्या हातातील पिस्तुले गळून पडली.


श्रेयसला धोका पोहोचू नये म्हणून गप्प असलेल्या केशरने मृत्यूमंत्र जपायला सुरुवात करताच तिमिरा वेगाने बाहेर पळून गेली.



महादेव आणि नयना दोघेही रात्रीच्या अंधारात जायला निघाले. तेवढ्यात आवाज आला,"यळकोट यळकोट जय मल्हार! कुठं निघाला र पोरांनो."
मल्हारिकाका आडवे झाले.


" काका,समदी महालात गेल्यात. कायतरी येगळ घडतय." महादेव म्हणाला.

" तुमी व्हा फूड आलोच म्या." असे म्हणून मल्हारी अंधारात गायब झाला.



सुपर्णा आणि कलिका दोघींनी एकत्रित आपल्या शक्ती वापरल्या आणि सुगंधाला पुन्हा कैदे केले. तोपर्यंत पळून आलेली तिमिरा तिकडे पोहोचली होती.

" तू जिवंत आहेस?"
कलिका ओरडली.


" होय, मानव रक्त पिशाच्च मला घेऊन गेले आणि त्यांनी मला जीवदान दिले. ह्या सुपर्णाला मीच शोधून काढले."
तिमीरा मोठ्याने हसून म्हणाली.


" म्हणजे आता योगिनी पंथात असलेल्या सगळ्या शक्ती,सगळे ज्ञान आपल्याला मिळणार."
कलिका मोठ्याने हसली.


सुपर्णा पुन्हा धैर्यशीलजवळ गेली. तिने मानव लांडगे बोलावले.


" याला नग्न करून माझ्यासमोर उभे करा. सुभानराव त्या जन्मात नाही पण आता मला कोणी अडवू शकत नाही. "

सुपर्णा मोठ्याने ओरडली.


धैर्यशील नग्न रिंगणात उभा होता. कलिकाने वशीकरण मंत्र वापरल्याने धैर्यशील पूर्ण सहकार्य करत होता.



" सुपर्णा आणि धैर्यशील यांचा भोग पूर्ण होताच सुपर्णा त्याच्या गळ्याची नस कापेल तेच रक्त समोरील रिंगणात उडेल आणि मग आपण सुगंधाचा आत्मा कैद करायचा विधी सुरू करणार."


कलिका मोठ्याने हसून म्हणाली.


" खबरदार माझ्या लेकाला हात लावला तर."

शालिनीताई धावत होत्या त्याबरोबर कलिकाने एक फुंकर मारली आणि अभिजीत, करुणा,शालिनीताई गाढ निद्रेच्या अधीन झाले.


आता कोणताही अडथळा उरला नव्हता. सुपर्णा रिंगणात आली. आज पुन्हा एकदा कमळासमोर इनामदार घराण्यातील पुरुष होता. ज्या सुभानरावांनी तिला झिडकारले त्यांचाच वंश आज तिचा बळी ठरणार होता.




इकडे श्रेयसने आपल्या हातावर असलेली चिन्हे वाचायला सुरुवात केली. त्याबरोबर चंद्राच्या प्रकाशात तो दिव्य ग्रंथ प्रकट झाला. श्रेयस ग्रंथ घ्यायला पुढे गेला. त्याने तो ग्रंथ हातात घेतला आणि त्याक्षणी चंद्राचा प्रकाश नाहीसा झाला.


" चला,आपल्याला इनामदार महालात जायचे आहे."

केशर घाई करत होती.


" तिकडे कशासाठी? आधी आपण घरी जाऊ."
राघव म्हणाला.


" राघव,इनामदार घराण्याचा शाप संपवून सुगंधाला मुक्ती द्यायची असेल तर आधी आलेले संकट संपवावे लागेल."

केशर एवढे बोलून सूक्ष्म देह धारण करून निघाली.


तिच्या पाठोपाठ तिघेही धावत बाहेर पडले. केशर महालात प्रकट झाली.

" सुपर्णा थांब,अन्यथा तू वाचणार नाहीस."
केशर ओरडली.


तेवढ्यात कलिकाने इशारा करताच मानव लांडगे पुढे आले आणि त्यांनी केशरला एका धाग्याने बांधले. हजारो अतृप्त आत्मे असणारा तो धागा केशरला एका जागी जखडून ठेवत होता. दोन्ही बाजूंनी मानव लांडगे तो धागा धरून उभे होते.



सुपर्णा धैर्यशीलजवळ गेली. तिने त्याला मिठीत घेतले आणि प्रणय सुरू झाला. सुपर्णा आता धैर्यशीलच्या जागेवर सुभानरावांना पहात होती. प्रणय क्रीडा पूर्ण होत आली आणि तिने खंजीर काढला. सुपर्णा वार करणार इतक्यात खंडोबाचा भंडारा उधळला गेला आणि क्षणात धैर्य भानावर आला. सुपर्णा दूरवर उडून पडली.



तेवढ्या वेळात कलिकाचे लक्ष विचलित झाले आणि इरावती रिंगणाच्या बाहेर आली. तिच्या शरीरात असलेली सुगंधा प्रचंड संतापली होती. सुपर्णा पुन्हा उठून उभी राहिली परंतु तोपर्यंत मागून आलेल्या शकुंतलाने देवीच्या मंदिरातील पवित्र कुंकू तिच्या अंगावर टाकले.


सुपर्णा जोरात किंचाळी फोडून शकुंतलाच्या अंगावर धावली. ती पाठमोरी वळताच दबा धरून बसलेल्या सारिकाने एकाच झटक्यात तिची वेणी कापून काढली आणि सुपर्णा खाली पडली. केशरला धरून ठेवलेल्या मानव लांडग्यांना राघवने संपवले.


" सारिका तिच्या शरीराला आग लाव."
केशरने समोरील रिंगणात पडलेले एक जळते लाकूड फेकले.


सारिकाने हवेतच लाकूड पकडले आणि समोर उभ्या असलेल्या सुपर्णाच्या शरीरावर फेकले. पवित्र कुंकवाने पेट घेतला आणि सुपर्णा जळू लागली. तोपर्यंत कलिका आणि तिमीरा सावध झाल्या होत्या. त्यांनी पळायचा प्रयत्न केला. परंतु राघव आणि सारिका त्यांच्या मार्गात उभे होते.



"कलिका थांब! पळतेस कुठे?"
केशर ओरडली.


केशरने आपले जादुई हत्यार काढले . अघोरी चेटकीणी मारायला खास सिद्ध केलेले ते हत्यार बघताच आपला मृत्यू जवळ आल्याची जाणीव कलिकाला झाली. तरीही ती हार मानणार नव्हती.
कलिकाने आपल्या कैदेत असणाऱ्या सगळ्या आत्म्यांची फौज भोवताली उभी केली.


" मी तुमची मालकीण तुम्हाला आदेश देते,समोर असलेल्या योगिनीला संपवा. हे नरक पिता माझी मदत कर.तुझ्या जगात असलेले मी कैद केलेले दुष्ट आत्मे माझ्या मदतीला पाठव."

कलिका मंत्र म्हणू लागताच काळया सावळ्या आजूबाजूला घिरट्या घालू लागल्या. तिकडे तिमिराने तिच्या गुलाम मानव लांडगे आणि रक्त पिशाच्च यांना आवाहन केले. काळे आत्मे केशरला कमकुवत बनवू लागले.


" श्रेयस तुझ्या गळ्यात मी दिलेला टाक हाय,ते हत्यार घिवून फूड हो."
मल्हारीकाका ओरडले.


श्रेयसने केशरचे हत्यार घेतले आणि समोर धावत निघाला. मंत्र म्हणत असलेल्या कलिकाचे धड त्याने एकाच झटक्यात उडवले आणि काळया सावल्या गायब झाल्या.



तिमिरा आणि तिच्या गुलामांना राघव आणि सारिका संपवत होते. मल्हारीकाका इराला थांबवत होते. इकडे शालिनीताई, करुणा आणि अभिजीत जागे झाले. आश्लेषा अजूनही बेशुध्द होती.


मल्हारी काका प्रयत्न करत होते परंतु सुगंधाच्या शक्ती अफाट होत्या. तिने मल्हारी काकांना पकडले आणि दूरवर फेकले. मल्हारी काकांची शुद्ध हरपली. इरावती पुढे चालत धैर्यशील
जवळ पोहोचली.


इकडे सारिका आणि राघव दोघांनी मिळून हत्यार प्रकट केले आणि तिमीरावर वार केला. त्याचक्षणी ती जळून भस्म झाली.


इरावतीचे रुप भयंकर दिसत होते. केशर तिला थांबवायला पुढे झाली परंतु सुगंधाने शकुंतला आणि केशर दोघींना एका कवचात बंद केले.


इराच्या अंगाला जळक्या मांसाचा वास येत होता. ती प्रचंड चिडली होती.


" आज तुमच्यातील कोणीही वाचणार नाही. तुमच्याच लेकीच्या शरीराचा वापर करून तुम्हाला संपवणार मी."

क्रूर आवाजात सुगंधा ओरडत होती.


धैर्यचा श्वास गुदामरत होता. राघव आणि सारिका त्याला वाचवायला धावले परंतु त्यांना सुगंधाने आपल्या शक्तीने बांधले. आता धैर्य वाचेल याची कोणतीही खात्री नव्हती.


आश्लेषा जागी झाली समोरचे दृश्य बघून आधी ती प्रचंड घाबरली. परंतु मग तिला इरा आत्याने सांगितलेले स्वप्न आठवले. ती धावतच इरावती जवळ गेली. तिने तिच्या पायाला मिठी मारली आणि ओरडली.


"आई,आई,आम्हाला मारू नको. आम्ही तुझ्याच लेकी आहोत."


तिची हाक ऐकताच इरावतीच्या हाताची पकड ढीली झाली आणि धैर्य खाली पडला.


सुगंधा कशी मुक्त होईल?

ग्रंथ आणि त्याच्या शक्ती कोणाला मिळणार?

सारिका आणि राघव पुढे काय निर्णय घेतील ?


पाहूया अंतिम भागात.

©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all