शापित (भूतकाळातील घाव) - भाग १

एका स्त्रीचा गुन्हा

शापित ( भूतकाळातील घाव) - भाग १

सुमन ताई बाबूजींचे प्रसिद्ध गाणं 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे' गुणगुणत दुपारी भांडी घासत होत्या. चार दिवसांपूर्वीच त्यांच्याकडे कामाला येणारी मालू काम सोडून कायमची गावाला गेली होती. त्यांनी दोन-तीन ठिकाणी कामाला बाईसाठी सांगून ठेवलं होतं. परंतु तोपर्यंत त्यांना घरातली काम करणं भागत होतं म्हणून त्या गाणी म्हणून काम निपटत असत. इतक्यात दारावरची बेल वाजली. सुमनताई मनात म्हणत होत्या अशा अवेळी कोण बरं आलं असेल आणि त्या हात धुऊन दार उघडायला गेल्या. एकट्याच असल्यामुळे त्यांनी आधी 'की होल' मधून बाहेर पाहिलं तर एक सोज्वळ चेहऱ्याची बाई उभी असलेली त्यांना दिसली. त्यांनी दार उघडून तिला विचारले,

"कोण आपण,आपल्याला काय हवं आहे?" चाळीशीच्या आसपासची ती बाई अत्यंत आर्जवी स्वरात म्हणाली,

"ताई माझं नाव कमल. मी कामाच्या शोधात आहे मला तुमच्या घरी काही काम मिळू शकेल का? मी जे पडेल ते काम करेन. कामात अजिबात कसूर करणार नाही परंतु मला कामाची अत्यंत गरज आहे." सुमनताईना आश्चर्यच वाटले. अरे आपल्याला बाईची निकड आहे आणि दारात बाई हजर. त्यांना आधी वाटलं त्या दोन-तीन ठिकाणी बोलल्या होत्या त्यांच्यापैकीच कोणी तिला पाठवले आहे की काय म्हणून त्यांनी तिला विचारले,

"तुम्हाला माझा पत्ता कोणी दिला का?"

"नाही माझी मीच आले. मी रोजच अशी एकेका बिल्डिंगमध्ये जाऊन काम मिळेल का अशी चौकशी करत आहे. कृपा करून तुम्ही जर मला काम दिलं तर माझ्यावर खूप उपकार होतील." सुमन ताईंना ती प्रथमदर्शनी बरी वाटली म्हणून त्यांनी तिला आत बोलावले आणि बसायला सांगितले. तिला पाणी देऊन त्या म्हणाल्या,

"तुम्ही जवळच राहता का? माझ्या घरी पडेल ते काम करावं लागेल. कमल म्हणाली,

"ताई तुम्ही मला अहो जाऊ नका करू मी तुमच्यापेक्षा लहान आहे. मला राहायला घर सुद्धा नाहीये मी चोवीस तास इथेच राहीन. माझ्यामुळे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. तुम्ही द्याल तो पगार मी स्वीकारेन. मला कुठेही अडगळीच्या खोलीत राहायला जागा द्या, स्वयंपाक घरात द्या मी तिथे मुकाट्याने राहीन." सुमनताई तिला आजमावत होत्या आणि विचार करत होत्या की ही खरंच चांगली असेल ना. आपल्याला फसवणार तर नाही ना. त्यांच्या अशा बघण्यामुळे ती म्हणाली,

"ताई मी चांगल्या घरातली बाई आहे हो परंतु आता माझ्यावर ही परिस्थिती उद्भवली आहे. तुम्ही एक महिनाभर माझ्याकडून काम करून घ्या. नंतर तुम्ही मला कायमस्वरूपी काम द्या."

"ठीक आहे तू आजपासूनच कामाला सुरुवात कर. मी भांडीच घासत होते ती पूर्ण कर तू. त्यांनी आधी तिला जेवायला दिलं. आणि थोडा वेळ आराम करायला सांगून पुढे काम करायला सांगितलं. त्या तिथेच सोफ्यावर आडव्या झाल्या. झोपताना सुमन ताईंच्या मनात विचार येत होते की ही कमल खूपच अडचणीत दिसते. तसे पण आपल्याला पण गरज आहेच. तिला काम देऊन आपण योग्य केले ना. अशा विचारातच त्यांचा डोळा लागला.

कमलला पण खूप आश्वासक वाटले. तिला वाटलं या ताईंनी आपल्याला ठेवून घेऊन खूप उपकार केले आहेत. आपण त्यांचं काम चोखपणे बजावून त्यांचा विश्वास सार्थ ठरवायला हवा. त्यांना आपलं काम आवडलं पाहिजे.

( सुमनताई कमलला कायमस्वरूपी कामावर ठेवून घेतात की नाही हे पाहूया पुढल्या भागात)