Login

शापित बंगला भाग 1

राहुल आणि श्वेता नवीन शहरात, नवीन घरात राहिला येतात.. त्यांचा सोबत तिकडे काय होता. तेचं या कथेत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी-२०२५
जलद कथालेखन स्पर्धा (संघ- कामिनी)

शीर्षक : शापित बंगला भाग -१

शहराच्या काठावर जुन्या रस्त्यावर एक बंगला होता. बरीच वर्षं तिकडे कोणी राहत नव्हते. लोक तिकडे जायला घाबरायचे. स्पष्ट कोणी काही सांगत नव्हते; पण लोकांच्या डोळ्यांत वेगळीच भीती असायची.


राहुल आणि श्वेता दोघांचे नुकतेच लग्न झाले होते. त्यांनी आपल्या राहण्याची सोय करण्यासाठी हा बंगला घ्यायचा ठरवले कारण ते त्या शहरात नवीन होते. म्हणूनच त्यांना काही माहिती नव्हते की लोकं बंगल्याच्या बाबतीत काय बोलतात.

राहुल खूप खूश होता की त्यांना कमी पैशांमध्ये इतके छान घर मिळाले होते. दोघेही खूप शिकलेले होते म्हणून त्यांना तसाही या भूतप्रेतांच्या गोष्टींवर विश्वास नव्हता.

ते त्या घरात रहायला आले.
घर पाहून राहुल म्हणाला, "बघ ना श्वेता घर किती छान आहे."

परंतु घरात आल्या आल्या श्वेता मात्र दचकली होती.

बंगला खूप मोठा होता. त्यात वर जायला लाकडी जिना होता. खूप मोठा हॉल, खिडकीला जाडसर पडदे लावलेले होते. मात्र धुळीचा वास सगळीकडे पसरला होता.

"खूप वेळ जाईल हे सगळं स्वच्छ करायला." श्वेता हळूच म्हणाली.

"काही हरकत नाही गं, आपण करू काही तरी." राहुलने तिला दिलासा दिला.

पहिले काही दिवस खूप सुरळीत गेले. रंगरंगोटी केली, सामान लावले. पूर्ण बंगला स्वच्छ केला होता.

रात्री कधी कधी शांतता इतकी जड वाटायची की श्वेताला झोप लागत नसे; पण ती विचार करायची की शहराच्या कोलाहलातून लांब शांततेत असल्यामुळे आणि नवीन शहर असल्यामुळे असे होत असेल.

एका रात्री श्वेता पाणी प्यायला म्हणून स्वयंपाकघरात गेली असता गॅलरीतून येणाऱ्या मंद चांदण्याच्या प्रकाशात तिला स्पष्ट दिसले की भिंतीवर एक सावली हलते आहे.

सावली जिन्याकडे जात होती. काही आवाज नाही, काही हालचालही नाही.

श्वेता पाच मिनिटे तशीच थांबून राहिली. मग तिला वाटले की मीच जास्त विचार करते आहे. समोर तर कोणीच दिसत नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी पन्नाशी ओलांडलेली घरकामासाठी येत असलेली शांता नेहमीप्रमाणे आली. ती अचानक बेशुद्ध झाली.
"काय झालं हो शांता काकू?" श्वेताने घाबरतच विचारले.

शांता डोळे उघडत कुजबुजली,
"मला इथं..‌. येऊ नको सांगितलं होतं..."

"कोणी?" श्वेताने विचारले.

उत्तर देण्याआधीच शांता परत बेशुद्ध झाली. डॉक्टर आले, शांताला औषधे दिली गेली.
पण त्या दिवसानंतर ती परत कामाला आलीच नाही.

"हा फक्त योगायोग असेल, तिची तब्येत कधीच बरी नसायची बहुतेक." राहुल तिला समजावत म्हणाला.

पण श्वेताच्या डोक्यातून त्यांचे ते वाक्य जातच नव्हते.

थोड्या दिवसानंतर त्यांनी एका दूधवाल्याला घरी येऊन दूध द्यायला सांगितले.
सकाळी त्याने दार वाजवले. श्वेताने दरवाजा उघडला. दूधवाला दुधाचे भांडे हातात देताना अचानक थांबला. त्याचे डोळे खोलीच्या आत वळले आणि त्याच्या चेहऱ्यावर अचानक भीती पसरलेली.

"काय झालं?" श्वेताने विचारले.

पण तो दूधवाला काहीच उत्तर न देता, दुधाचे भांडे खाली ठेवून गडबडीत निघून गेला.

ही गोष्ट संध्याकाळी तिने राहुलला सांगितली.

"तू पण काय एवढी शिकलेली असून अश्या गोष्टी मनात आणतेस? नवं घर, नवीन वातावरण म्हणून थोडा वेळ द्यावा लागेल तुला." राहुल म्हणाला.

पण श्वेताचे मन शांत नव्हते. तिला सतत जाणवायचे की कुणीतरी तिला पाहतंय.
स्वयंपाकघरात काम करताना सारखे कुणी नजर ठेवून आहे असे तिला वाटत असे; पण मागे वळून बघितले की कुणीच दिसायचे नाही. तरीही तिला खात्री होती की आपल्याशिवाय दुसरेही कोणीतरी या घरात आहे.

एके रात्री ती पुस्तक वाचत बसली होती. खिडकीतून आलेल्या थंड वार्‍याच्या झोताने दिवा विझला. अंधारात तिला स्पष्ट जाणवले की तिच्यासमोर कुणीतरी उभे आहे. श्वास जवळच जाणवला. ती किंचाळायच्या आत राहुलने दिवा लावला तर खोलीत कोणीही नव्हते.


एका रात्री राहुलला जिन्याखालून पावलांचे आवाज आले. त्याने टॉर्च घेतला आणि तो खाली आला. हॉलमध्ये कुणीच नव्हते; पण दाराजवळ लाकडावर कोरलेले काही शब्द त्याला स्पष्ट दिसले.

'जा इथून... नाहीतर उशीर होईल.'

क्रमशः
©®निकिता पाठक जोग
0

🎭 Series Post

View all