Login

शापित बंगला भाग 3

राहुलही आता घाबरला होता.आता त्याला ही खूप भीती वाटत होती.
चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५
जलद कथालेखन स्पर्धा (संघ - कामिनी)

शापित बंगला भाग -३

राहुल तो कागद हातात घेऊन बराच वेळ बघत राहिला.

"हे बघ श्वेता... आता हे फक्त तुझ्या कल्पनेतलं नाही. कुणीतरी खरंच आपल्याला इशारे देतंय." राहुलचा आवाज थरथरत होता.

"आपण इथून निघून जाऊया." ती हळू आवाजात म्हणाली.

"हो; पण आधी हे काय आहे ते कळलं पाहिजे. नुसते पळून गेलो तरी भीती राहील." राहुल ठाम होता.

दुपारी राहुल शिंदे काकांकडे गेला.

"काका, खूप विचित्र सगळं होतंय. हे घर खरंच?"

शिंदे काका थोडावेळ शांत राहिले मग म्हणाले,
"हे घर कधीच साधं नव्हतं. इथे वीस वर्षांपूर्वी एक कुटुंब राहत होतं. बायको आणि मुलाचा मृत्यू झाला आणि बापाने स्वतः गळफास घेतला. लोक म्हणतात त्यांचा आत्मा अजूनही इथेच आहे. म्हणून हे घर कायम रिकामं पडलं."

राहुल घाबरला आणि त्याने विचारले,
"पण हे सगळं तुम्ही पहिले का नाही सांगितलं?"

काका म्हणाले, "मला वाटलं आता ते सगळं थंड झालं असेल. पण नाही, तुम्ही लवकरात लवकर हे घर सोडा."

त्या रात्री ते दिवे बंद न करता झोपले. पाऊस थांबला होता; पण बाहेर खूप वारा सुटला होता.
मध्यरात्री काचेचा आवाज आला म्हणून श्वेता उठली. हॉलमध्ये गेली आणि बघितले तर खिडकीची काच फुटलेली होती; पण जमिनीवर काहीच नव्हते.

तेवढ्यात तिला आवाज आला.

"जा जा..... निघून जा."

ती ओरडली. राहुल धावत आला.

"कुठे?कोण बोललं?"

श्वेताने भिंतीकडे बोट दाखवले; पण तिकडे काहीच नव्हते.

दोन मिनिटांनी तिकडे लिहलेले दिसले.
'जा इथून.'

ते दोघेजण खूप घाबरले होते.

दुसऱ्या दिवशी राहुलने ठरवले की घरात शोधू. बघू काही सापडतेय का...
तो स्टोअर-रूममध्ये गेला. तिथे खूप जुने सामान होते. एका पेटीत त्याला एक वही मिळाली.

वही उघडल्यावर त्याला त्यात तिकडे राहिलेल्या माणसाने जे लिहिले होते ते दिसले.

'२१ जून - घरात भीती वाटते. बायको आजारी असते. मुलगा झोपेत घाबरतो.'

'३० जून - कुणीतरी आपल्याला बघतोय. लालसर अक्षरं दिसली.'

'३ जुलै - जर कोणी हे वाचलं तर या घरातून निघून जा.'

राहुल घाबरून श्वेताकडे गेला.

"श्वेता, मलाही कसंतरी होतंय गं."

ते दोघे बोलत होते तोपर्यंत परत तो कुजट वास आला. यावेळेस मात्र वासाबरोबर पूर्ण घर थंडगार झालेलं.

आरशात परत तो पांढरट चेहरा दिसला. यावेळेस लाल डोळे चमकत होते.

राहुलने तिचा हात धरून तिला ओढले.
"चल, पुरे झालं. आपण इथून लगेच निघू."

ते दोघे धावत बाहेर आले. पावसाने पुन्हा जोर धरला होता.
गाडी रस्त्यावर निघाली. मागे वळून पाहिले तेव्हा घराच्या खिडकीतून दोन सावल्या उभ्या राहिल्यासारख्या दिसल्या. एक मोठी आणि एक लहान...

राहुलने गाडीचा वेग वाढवला; पण त्याचा मनात एकच प्रश्न होता- 'हे अजूनही कुणाच्या प्रतिक्षेत आहेत?'

क्रमशः
©® निकिता पाठक जोग
0

🎭 Series Post

View all