शापित... एक प्रेमकथा
भाग:२
"काय? माझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली आहेस?" वसुंधराने आश्चर्याने विचारले.
" हो वसुंधरा. मी कुणी धेनू चारणारा गुराखी नव्हे."
"काय? गुराखी नाही? मग कोण आहेस तू?"
" मी सारंगनगरीचा राजकुमार, राजा सोमराजाचा पुत्र, मदन आहे."
" उगाच काहीही बडबडू नकोस." वसुंधराने हसत म्हटले.
" हे सत्य आहे वसुंधरा."
हे ऐकताच वसुंधराच्या मुखावरचे हास्य कुठेतरी गडप झाले. खरे म्हणजे तिला एका राजकुमाराने विवाहासाठी मागणी घातली आहे, याचा आनंद व्हायला पाहिजे होता, पण ती दुःखी झाली.
"तू कशाला असत्य बोललास? तू एवढे मोठे सत्य माझ्यापासून का लपवलेस? प्रेमात विश्वास नावाचा एक अतूट धागा असतो, त्यात असत्य आले की त्या धाग्याला गाठ पडते." वसुंधरा रागाने म्हणाली.
"मला क्षमा करा, पण मी खरेच सांगतो यामागे माझा काहीच हीन हेतू नव्हता. जर मी माझी खरी ओळख तुला आधीच सांगितली असती, तर तू आज जेवढी मोकळेपणाने माझ्याशी बोलत आहे, तेवढी बोलूच शकली नसती. आमच्यामध्ये सदैव एक अदृश्य भिंत उभी राहिली असती. वसुंधरा, तू एका गरीब मदनच्या हृदयावर प्रेम केले आहे, एका राजकुमारावर नाही." मदन
" पण माझ्या मनी मला कोणीतरी फसवले आहे, अशी भावना निर्माण झाली आहे." वसुंधरा
"या गुन्ह्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे. मी तुला वचन देतो, तुझ्या वडिलांकडून मोठ्या सन्मानाने तुझा हात जोवर मागत नाही, तोवर मी तुला माझे मुखही दाखवणार नाही आणि तुला स्पर्शही करणार नाही." असे म्हणतात राजकुमार गेला.
वसुंधरा त्याला पाहताच उरली.
**************
वसुंधरा घरातल्या कामात गुंतलेली असतानाच अंगणात घोड्याच्या टापांचा आवाज आला. रामचंद्राने बाहेर जाऊन बघितले. बाहेर राजा सोमराजाच्या दरबारातला एक सैनिक आला होता.
" प्रणाम रामचंद्रजी. तुम्हाला राजाने अतिशीघ्र दरबारात येण्यास सांगितले आहे." सैनिक नमस्कार करत म्हणाला.
" काही विशेष प्रयोजन?"
" त्याबद्दल काहीही सांगितलेले नाही. पण कार्य खूपच महत्त्वाचे आहे."
वसुंधरा आतून त्यांचे संभाषण ऐकत होती. सैनिकाचे बोलणे तिच्या कानावर पडले. ती खूप आनंदित झाली.
'राजकुमाराने आपल्या प्रेमाबद्दल राजमहालात सांगितलेले असणार.' तिने मनातच विचार केला.
रामचंद्र आत आला.
"पुत्री वसुंधरा, मला राजांनी दरबारात आमंत्रित केले आहे. मला अतिशीघ्र जावे लागणार."
"तातश्री, मी येऊ का तुमच्यासोबत?"
" तू?"
"हो खूप दिवस झाले, मी कुठे गेलेच नाही."
"ये. माझी काहीच हरकत नाही."
**********
रामचंद्र आणि वसुंधरा राज महालाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचतात पहारेकर्यांनी त्यांच्यासाठी द्वार खुले केले. दोघंही राजवाड्यात पोहोचली. वसुंधरा बाहेर उद्यानातच थांबली आणि रामचंद्र महाराजांना भेटायला आत गेला.
उद्यान खूपच सुंदर होते. सगळीकडे हिरवेगार, उद्यानात असलेल्या वेली विविध रंगाच्या फुलांनी बहरल्या होत्या, लहान लहान झाडावर रंगीबेरंगी पाखरे किलबिलाट करत होती. स्वच्छ पाण्याचे मधोमध असलेले कारंजे त्या उद्यानाच्या सुंदरतेत भर टाकत होते. एकूण एक तो नजारा पाहून तिचे मन हर्षीत झाले.
राजकुमार आपल्या कक्षात होता. तो सहज म्हणून बाहेर बघत होता. तेव्हाच त्याची नजर उद्यानात असलेल्या वसुंधरावर पडली. वसुंधराला बघताक्षणीच तो आश्चर्यचकित झाला. वेळ न दवडता तो तसाच धावत धावत तिच्यापाशी आला.
" वसुंधरा तू इथे?" त्याने आनंदीत चेहऱ्याने विचारले.
" हो महाराजांनी तातश्रींना आमंत्रित केले आहे. मी त्यांच्या सोबतच आले आहे. तू इतक्या लवकर त्यांच्या कानावर ही वार्ता घालणार असे वाटले नव्हते."
"नाही वसुंधरा, मी तर अजून काहीच सांगितलेले नाही. कदाचित त्यांना बाहेरून ज्ञात झाले असणार. या गोष्टी लपून राहत नाहीत. तुझा तातश्री इथे आला आहे हे उत्तमच झाले. आता मीच जाऊन तुझा हात माझ्या हातात द्या, अशी त्यांच्याकडे याचना करतो."
" तातश्रीचे सोडा. महाराजांनी नकार दिला तर?" वसुंधराने प्रश्न केला.
"महाराज नकार देणारच नाहीत, समजा जर त्यांनी आमच्या प्रेमाचा स्वीकार केलाच नाही, तर मी ह्या राजवैभवाचा त्याग करुन तुझ्यासोबत संसार थाटायला तयार आहे."
"खरेच?" असे म्हणत वसुंधराने राजकुमाराच्या हाताला धरले.
"विश्वास नाही माझ्यावर?"
पुढचे काही क्षण ती दोघंही एकमेकांना बघतच राहिली. दोघांच्याही नजरा खूप संवाद साधत होत्या. त्यांना कशाचेच भान त्यांना राहिले नव्हते आणि अचानक राजकुमाराला आपला घसा सुकल्यासारखा भासू लागला. अचानक त्याला घाम फुटला. त्याचे पाय थरथरू लागले आणि त्याचा तोल जाऊन तो जमिनीवर पडला.
वसुंधराने त्याला घट्ट धरला आणि आकांताने तिथे असलेल्या पहारेकऱ्यांना आधारासाठी बोलाविले. वसुंधराची आरडाओरड ऐकून पहारेकरी, प्रधान आणि रामचंद्रही तिथे पोहोचला.
वसुंधराच्या हातात राजकुमाराला पाहून प्रधान संतापला.
" चांडाळणी, तू राजकुमाराला स्पर्श करण्याचे पाप केलेच कसे? रामचंद्र हिला याक्षणी इथून घेऊन चल." प्रधानाने आदेश दिला.
रामचंद्राने हात जोडून प्रधानाची माफी मागत वसुंधराला तिथून नेले. प्रधानने राजकुमारला त्याच्या कक्षात नेले आणि राजवैद्याला बोलावणे धाडले.
रामचंद्राने हात जोडून प्रधानाची माफी मागत वसुंधराला तिथून नेले. प्रधानने राजकुमारला त्याच्या कक्षात नेले आणि राजवैद्याला बोलावणे धाडले.
**********
वसुंधरा जे काही घडले, ते समजलेच नव्हते. तिच्या डोळ्यात दुःखांचे मेघ दाटले होते.
" तू राजकुमाराबरोबर काय करत होतीस?" रामचंद्राने संतापच विचारले.
" तातश्री तो मला लग्नाची मागणी घालणार होता पण.."
" लग्नाची मागणी? काय स्वप्ने पाहत आहेस तू?" रामचंद्रने मध्येच तिथे वाक्य तोडले.
"स्वप्ने नाहीत तातश्री, हे सत्य आहे. आम्ही दोघंही एकमेकांवर प्रेम करत आहोत."
" वसुंधरा, एक शब्दही बोलू नकोस. राजकुमारच नव्हे तर या विश्वातील कुठल्याही पुरुषावर तू प्रेम करू शकत नाहीस. सत्य हे आहे की, तुझ्या नशिबी हे सगळे सुखच नाही."
" हे तुम्ही काय बोलत आहात तातश्री?"
"मी जे काही बोलत आहो त्यातला शब्दन-शब्द अचूक आहे, आज अचानक राजकुमाराचे आरोग्य बिघडले आहे ते फक्त तुझ्यामुळेच. तुझा त्याला स्पर्श झाला म्हणूनच हे सगळे घडले. वसुंधरा तू एक सामान्य कन्या नाहीस. तू एक विषकन्या आहेस."
"काय विषकन्या?"
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा