शापित ... एक प्रेमकथा
भाग:३
एका कक्षात राजवैद्य राजकुमारवर उपचार करीत होते. राजा सोमराज सुद्धा तिथे होता.
" वैद्यजी, काय झाले आहे राजकुमारला?" राजाने चिंतीत होऊन विचारले.
"राजन विषाची मात्रा कमी असल्याने जीवावरचे संकट टळले, तरी राजकुमार शुद्धीवर येण्यास वेळ लागणार." राजवैद्याने राजकुमाराची नाडी तपासत म्हटले.
" विष? पण हे सगळे कसे घडले?" राजांनी हा प्रश्न विचारताच प्रधानने उद्यानात घडलेला प्रकार राजांच्या कानावर घातला.
" काय विषकन्येचा स्पर्श झाल्याने हे घडले? याचा अर्थ आमचे गुप्त शस्त्र तयार झाले आहे प्रधानजी. ही खरेच खूप आनंदाची गोष्ट आहे. मला त्या विषकन्येला भेटायचे आहे."
"पण राजन, राजकुमाराची तब्येत अजून..." प्रधान
"त्याची काळजी घेण्यासाठी राजवैद्य आहेत. माझ्यासाठी याक्षणी महत्वाची गोष्ट जर काही असेल, तर ती आहे आपल्या राज्याची सुरक्षा." असे म्हणत राजा कक्षातून बाहेर गेले..
राजा आपल्या प्रधानाबरोबर सरळ रामचंद्र आणि वसुंधराला भेटण्यासाठी आला वसुंधरा उदास होती. रामचंद्र तिला समजावायचा प्रयत्न करत होता.
"पिढ्यान पिढ्या आमच्या घराण्यात हीच प्रथा चालत आली आहे. आमच्या घराण्यात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीचे विषकन्येत परिवर्तन करून, आम्ही तिला राज्याच्या सुरक्षेसाठी अर्पण करतो. मातृभूमीसाठी स्वतःचे अस्तित्व समर्पित करण्याचे भाग्य फक्त आमच्याच घराण्याला लाभले आहे."
"हे भाग्य नाही. हा तर आमच्या घराण्यातल्या मुलींना लागलेला शाप आहे. पण तुम्ही हे माझ्याबरोबर असे केले तरी कधी आणि कसे?" वसुंधराचा संताप तिच्या बोलण्यातून झळकत होता.
" तू जेव्हा चालायला बोलायला शिकली तेव्हापासून, तुला मी लहान लहान मात्रा विष घालायला सुरुवात केली होती. पुढे हळूहळू त्या विषयाची मात्राही वाढवली. आज तू कुठलेही विष सहज पचवू शकते, पण तुला स्पर्श करणारा जिवंत उरणे कठीण. तुझ्या आधी जन्माला आलेल्या तुझ्या कितीतरी बहिणी सुद्धा हे विष पचवू शकल्या नव्हत्या, पण तू..."
"काय? पचवू शकल्या नव्हत्या? म्हणजे तुम्ही स्वतःच्या मुलींना मारले?" वसुंधराने आपल्या वडीलांचे बोलणे मध्येच तोडत म्हटले.
आज आपल्या वडिलांच्या तोंडून येणारा प्रत्येक शब्द तिला खूप अस्वस्थ करीत होता
" मी मारले नाही. त्यांना मारले ते त्यांच्या दुर्बल शरीराने. पण तू मात्र ते विष पचवले. आता तुझ्या शरीरात, तुझ्या रक्तात विष भिनले आहे. तुझ्या सहवासात येणारा माणूस काही प्रहरातच मरू शकतो, एवढी विषारी झाली आहेस तू."
बोलत असताना अचानक त्यांची नजर राजावर पडली. रामचंद्रने पुढे येऊन राजाला नमस्कार केला. वसुंधरा मात्र आपल्या जागेवरुन हलली नाही.
राजा तिची मनस्थिती समजत होता. त्याने राज्यावर आलेल्या संकटाची माहिती त्यांना दिली.
"दोन राज्यांशी युद्ध करण्याएवढे सैन्यबळ आज आमच्यापाशी या समयी तरी नाही. म्हणूनच कमीत कमी आम्हाला त्यांचे समीकरण बदलावे लागणार, जर एक राजा मागे सरला, तर दुसऱ्या राजाशे आम्ही युद्ध करून आमची भूमी वाचवू शकतो. या राज्याचे भवितव्य आता तुझ्या हातात आहे. वसुंधरा, तू तयार आहेस ना?" राजाने विचारले.
"तुम्ही काय बोलत आहात आणि कशासाठी मी तयार असणार?" वसुंधरावाने मोठ्या आवाजात विचारले.
"वसुंधरा...." वसुंधराने राजावर आवाज चढवलेला पाहून रामचंद्र क्रोधित झाला.
"माझ्या अनुमतीविना तुम्ही माझा देह दूषित केला. माझ्या परवानगीविना मला हे विषारी शरीर दिले. मग आज का म्हणून माझी मान्यता घेत आहात? जराही लाज वाटत नाही का तुम्हाला? सरळ सरळ माझ्या देहाचा बाजार मांडला आहे तुम्ही. एक देहविक्री करणारी स्त्री बनायला सांगत आहात तुम्ही मला. एक वेश्या. कशी म्हणून तयार होऊ मी यासाठी." वसुंधराच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
"तू या भूमीत जन्माला आली आहेस, या जमिनीवर वाढली आहेस, तुझ्यावर या मातीचे ऋण आहेत आणि आज ही माती तुला ते कर्ज फेडायला सांगत आहे. हे तुझे भाग्य आहे वसुंधरा." रामचंद्रने वसुंधराला समजविण्याचा प्रयत्न केला.
तेव्हाच राजा सोमराजने रामचंद्राला थांबविले.
"नाही रामचंद्र, ती काही चुकीचे बोलत नाही. आम्ही मोठी चूक केली आहे. आम्हीच खरे अपराधी आहोत. तिच्या मर्जी विरुद्ध आम्ही तिला विषकन्या बनवली आहे आणि आता तर आम्ही तिला सरळ सरळ..." राजा पुढे बोलू नाही शकला.
"राजन, पण.." रामचंद्रने राजाला आधार दिला.
"नाही रामचंद्र, क्षमा करा मला. प्रधानजी तुम्ही सैन्य तयार ठेवा. आम्ही वसुंधराला तिच्या मर्जीविरुद्ध कुठेही पाठवू इच्छित नाही. जोवर आपल्या देहात जीव आहे, तोवर या राज्याचे रक्षण करु." राजा
राजाचे बोलणे ऐकून रामचंद्रलाही अश्रू अनावर झाले. त्याने राजाच्या पायावर लोटांगण घातले.
"राजन, मला क्षमा करा. मी अपयशी ठरलो. पिढ्यान पिढ्या आम्ही करत असलेले कार्य मी खंडित केले आहे. मी गुप्तशस्त्र तयार करू शकलो नाही. माझे जीवन व्यर्थ झाले आहे. मीच तुमचा अपराधी आहे. काढा तलवार आणि शासन करा. मला जगण्याचा अधिकारच नाही."
वसुंधरा आपल्या पित्याची अशी अवस्था पाहू नाही शकली. तिने आपल्या वडिलांना आजपर्यंत कधीही असा दुर्बल आणि दुःखी बघितले नव्हते.
"नाही तातश्री, असे बोलू नका. मी तयार आहे. मला काय करायचे आहे ते सांगा." आपल्या पित्याला हे शब्द सांगताना तिने आपल्याही मनाला समजावले.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा