Login

शापित...एक प्रेमकथा भाग:४ (अंतिम भाग)

A Periodical Love Story
शापित... एक प्रेमकथा
भाग:४ ( अंतिम भाग)

राजकुमारने डोळे उघडले. त्याच्या बाजूला फक्त राजाच होता. डोळे उघडाक्षणीच त्याने राजाला वसुंधराबद्दल विचारले. राजाने त्याला घडलेली गोष्ट कथन केली. हे ऐकून राजकुमार संतापला.

"तुम्ही तिला का अडवले नाही? पिताश्री, अजूनही वेळ गेलेला नाही. थांबवा तिला." राजकुमारने पलंगावरुन उठत म्हटले.

" आता तिने पंचमगिरीची सीमा ओलांडली पण असेल."
 
"पिताश्री, मी वसुंधरावर खूप प्रेम करतो. मी तिच्याशिवाय जगू शकणार नाही."

"हे शक्य नाही राजकुमार. प्रेम करण्यासाठी ती कोणी साधारण स्त्री नाही. ती एक विषकन्या आहे. या राज्याचे मानवी अस्त्र आहे. आमचे गुप्त शस्त्र."

"शस्त्र? हे काय बोलत आहात तुम्ही? वसुंधरा सुद्धा तुमच्या आमच्या सारखीच आहे."

" हे तू नव्हे, तुझ्या तारुण्यातले सळसळते रक्त बोलत आहे. ही तलवार बघितली आहे का? या तलवारीवर पण मी खूप प्रेम करतो. पण याचा अर्थ असा नव्हे की, मी ही तलवार माझ्या छातीला कवटाळून धरावी. मी तसे केल्यास, ही तलवार मलाच जखम करणार. जी वस्तू स्वतःला त्रासदायक ठरते, त्या वस्तूपासून चार पाऊले दूरच राहण्यातच शहाणपणा आहे." असे म्हणत राजा तिथून निघून गेला.

राजाचे ते बोल राजकुमारच्या कानात घुमतच राहिले. वसुंधराच्या प्रेमात तो आकंठ बुडाला होता. त्या प्रेमापुढे संसारातल्या सर्व गोष्टी त्याला ठेंगण्या वाटत होत्या. तो तसाच कक्षातून बाहेर गेला आणि आपला घोडा घेऊन पंचमगिरीच्या दिशेने जायला निघाला.

**********

इकडे रामचंद्र वेशांतर करून पंचमगिरीचा राजा, उग्रसेनच्या दरबारात पोहोचला. त्याने राजांना भेटण्याची परवानगी मागितली. त्याची नीट तपासणी करून त्याला राजाला भेटण्याची मान्यता दिली.

" महाराज, मी एक व्यापारी आहे. कामाच्या निमित्याने दुसऱ्या राज्यात जात होतो. पण धनाची अडचण निर्माण झाली आहे. काही मदत मिळाली तर कृपा होईल. धनाच्या बदल्यात मी माझी पुत्री तुम्हाला भेट म्हणून देऊ शकतो." असे म्हणत त्याने राजासमोर वसुंधराला उभे केले.

वसुंधराचे सौंदर्य पाहून राजा उग्रसेन भुलला. स्वर्गातली अप्सरा सुद्धा लाजेल अशी सौंदर्यवती, साक्षात त्याच्या समोर उभी होती. तो तिला पाहून मोहित झाला. त्याने त्याच्या प्रधानाला आदेश दिला.


"प्रधानाजी या व्यापाऱ्याला मोहरा द्या आणि या मुलीला माझ्या शयनकक्षात पाठवा."

"पण महाराज..." प्रधानला जरासा संशय आल्याने, त्याने आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. पण मनात वासनेचा संचार झालेल्या उग्रसेनने, त्याचे काही एक ऐकून घेतले नाही.

दासींनी वसुंधराला शयनकक्षात आणले. राजा उग्रसेनाचा शयनकक्ष उंची अत्तराच्या सुगंधाने परमळीत झाला होता. कक्षाच्या मध्यभागी एक पलंग सुशोभित करुन ठेवला होता. जवळच मदिरापानाची व्यवस्था पण केली होती.

वसुंधराने दासींना बाहेर जाण्यास सांगितले. काही वेळाने राजा उग्रसेन शयनकक्षात आला आणि सजवलेल्या पलंगावर आडवा झाला. वासनेने भरलेल्या विचित्र नजरेने त्याने वसुंधराकडे पाहिले.

"तू अशी दूर का? ये इथे." असे म्हणत त्याने वसुंधराला आपल्या मिठीत ओढले.



****************
पहाटे वसुंधराचे डोळे उघडले. अस्पष्ट उजेडात तिने बाजूला पडलेल्या उग्रसेनावर नजर मारली. त्याचा देह निळवर्णीय होऊन निर्जीव पडलेला तिला दिसला. ते पाहताच ती चोर पावलानी महालातून बाहेर पडली आणि मार्ग मिळेल तशी चालू लागली.


सूर्य उगवायला लागला होता. तेव्हाच तिला घोड्यांच्या टापांचा आवाज आला. उग्रसेनचे सैनिक आपला पाठलाग करत आहे असे तिला वाटले. तिने भीतीने आपल्या कमरेची कट्यार काढून हातात घेतली.

तो घोडेस्वार आता जवळ पोहोचला होता. त्याला वसुंधरा दिसली. त्याने आपली गती वाढवली. वसुंधराच्या हृदयातली धडधड जास्तच वाढली. तिने त्याच्यावर वार करण्यासाठी आपली कट्यार वर उचलली, तोच तिची नजर त्या माणसाच्या चेहऱ्यावर पडली. तो तिचा मदन होता.

" राजकुमार, तुम्ही इथे?"

"मी तुला माझ्यासोबत न्यायला आलो आहे वसुंधरा." असे म्हणत राजकुमार घोड्यावरून उतरला.

" नाही नाही, जवळ येऊ नका. मी जहाल विषारी आहे. माझा देह विषारी आहे. तू ज्या वसुंधरावर प्रेम करत होता, ती वसुंधरा देहाने एक विषकन्या आहे. माझा देह दूषित आहे." वसुंधरा रडत रडत म्हणाली.

" मला त्याने काहिच फरक पडत नाही. मी तुझ्या देहावर कधीच प्रेम केले नव्हते. मला तू हवी आहेस वसुंधरा. तुझे मन हवे आहे."

हे ऐकताच वसुंधरा घाबरली. एकदा तिने राजकुमारला हात लावला होता, तेव्हा त्याचे प्रकृती बिघडली होती. आता पुन्हा तिला त्याच्या जीवाशी खेळायचे नव्हते.

" माझे ऐका राजकुमार. तुम्ही परत जा."

" नाही वसुंधरा."

" तुला माझे म्हणणे मान्य करावेच लागेल."

" नाही वसुंधरा, ते शक्य नाही."

" ते शक्य नसेल तर मी स्वतःला या विषारी देहातून मुक्त करते. मला क्षमा करा." असे म्हणत तिने आपल्या हातातली कट्यार आपल्या उरात घुसवली. दुसऱ्याच क्षणी वसुंधरा जमिनीवर कोसळली.


"वसुंधssssssssssरा." राजकुमार मोठ्याने रडत ओरडला. अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो धावत तिच्यापाशी गेला.

" वसुंधरा उठ. वसुंधरा उठ. मी तुला न्यायला आलो आहे. मला काही नको. राज्य नको, युद्ध नको, धनदौलत नको. मला फक्त तू हवी आहेस."

जमिनीवर पडलेल्या वसुंधराचे डोके त्याने आपल्या मांडीवर घेतले. त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबण्याचे नावच घेत नव्हते.

" वसुंधरा, ए वसुंधरा... काहीतरी बोल ना गं. तू मला तुझ्या तातश्रीना भेटायला सांगितले होतेस ना? मला त्यांच्याकडून तुझा हात मागायचा आहे. पण मध्येच हे काय केलेस तू? तुझ्याशिवाय मी आता जगू तरी कसा? बोल ना वसुंधरा...अशी गप्प का?" असे म्हणत त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिच्या केसातून हळुवारपणे हात फिरवला.

त्याच्या डबडबलेल्या डोळ्यांनी तिच्या केसातून फिरणाऱ्या आपल्या हाताकडे बघितले. त्याचा हात निळा होऊ लागला होता. ते पाहताच त्याने हलकेच हसत आपले डोळे बंद केले.


समाप्त
0

🎭 Series Post

View all