शापित झरा भाग १

जंगलात झरा बघायला गेलेल्या भावेश आणि जयमाला सोबत काय घडले असावे हे जाणून घेण्यासाठी वाचा शापित झरा.
शापित झरा भाग १

दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याला लागूनच ते जंगल होते. पाण्यापावसाचे दिवस असल्याने घनदाट हिरवळ वनराई दाटीवाटीने पसरली होती. मुक्त विहंग करणारे पक्षी एकमेकांना शीळ घालत साथ देत होते. मध्येच एखादा प्राणी त्या दाट झाडीतून संचार करत असताना झाडाझुडपांचा आवाज होत होता. तिथे पशु - पक्षांचे राज्य असल्याने मानवी संचाराला कदाचित बंदी असावी. अशा ह्या निर्जन परिसरात कुणी एकटं दुकटं यायची हिंमत करत नसेल. म्हणूनच की काय तो रस्ता तसा सुनसान होता.

त्या दुपारच्या भयाण शांततेला चिरत कुठून तरी दुरून दुचाकीचा फटफट आवाज यायला लागला. त्या आवाजाने ती हिरवी वनराई थरथरली. जणू काही म्हणत असावी की, " मागे फिर, इथे धोका आहे.'

ते दोघं शहरापासून बरेच लांब येऊन गेले होते. हसत खिदळत एकमेकांच्या प्रेमळ सहवासात रमत गमत ते तिथवर येऊन पोहचले होते. मानवी जगापासून थोडंसं अलिप्त होत आपल्याच जगात रममाण होण्यासाठी त्यांनी हे निर्मनुष्य स्थळ शोधून काढले होते.

" अजून किती लांब आहे भावेश ? "
दुचाकीवर त्याच्या मागे बसलेली जयमाला जराशी कंटाळून म्हणाली.

तो गालात हसला. इतक्या वेळ दुचाकीवर बसून आल्याने निश्चितच ती वैतागली असणार हे जाणून तो म्हणाला.

" हे बघ. ह्या इथे. ही पायवाट दिसतेय का तुला ? तिथून आत जायचयं आपल्याला."

" आपल्याला दोघांना इथे कुणी पाहिले तर ? "

एका मुलासोबत घरात कुणालाच न सांगता फिरायला बाहेर पडलेली ती, मनातली भीती ओठांवर आणत म्हणाली.

" इथे आपल्याला कुणीच ओळखणार नाही. आता पर्यंत तुला रस्त्याने कुणी दिसलं तरी का ?"

ती निश्चिंत होऊन हसली.

दुचाकी रस्त्यावरील एका मोठया झाडाखाली लावत दोघे पायी निघाले.

त्या निमुळत्या पायवाटेने ते जंगलात शिरले. घनदाट झाडीतून वाट काढत ते दोघं हातात हात घालून दबक्या पावलांनी चालत होते. ती पुढे पुढे जाणारी छोटीशी पायवाट त्यांना खुणावत होती. तिच्या भरवशावर अजून आत शिरत ते एकांत शोधत होते. बरेच अंतर आत जाऊनही त्यांना साजेशी जागा मिळत नव्हती.

" भावेश इकडे कुठे आलो आपण.? उगाच जंगलात शिरलो. केव्हापासून चालतोय. पण मोकळी जागाच मिळत नाहीये. दमले मी आता."

" इतके आलोच आहे तर अजून थोडंसं पुढे जाऊया ना जयू."

" मला भीती वाटतेय रे. कशाला इथे आणलं तू ? जंगल आहे हे. कळतंय का तुला ?"

मनातल्या भीतीपोटी तिचा राग थोडा उफाळून आला.

" ह्या, तू पण ना, सर्व गाव माझ्या आण्णाला घाबरत. त्या धवल आण्णाचा पोरगा तुझ्या सोबत आहे म्हटल्यावर तुला कुणाची भीती आहे का.?"

" भावेश नको तिथे फुशारक्या मारत नको जाऊ बरं. बोलतो तर असा आहे की हे जंगल तुमच्या मालकीचे आहे. ह्या जंगलातील प्राणीपक्षी तूझ्या आण्णाच्या अंगाखांद्यावर खेळून मोठे झाले आहेत."

" अग बाई, नुसतं नावाला जंगल आहे हे. इथे कुठून प्राणी येतील. फार तर एखाद दुसरे ससा-हरीण इकडून तिकडे उड्या मारताना दिसेल. बाकी छोटे मोठे निरुपद्रवी प्राणीच असतील. भित्री भागुबाई."

" ए काही पण बोलू नकोस. मी घाबरत नाही कुणाला."

" हो का.? मग आता तुला सांगायला हरकत नाही." भावेश तिच्या तोंडाकडे पाहून म्हणाला.

" काय.?" तिच्या कपाळावर प्रश्नचिन्ह उमटले.

" आमच्या गावात ह्या जंगलाविषयी खूप काही बोलले जाते."

" जसे की ?" तिने भुवया उंचावून विचारले.

" इथे आलेला माणूस परत जिवंत जात नाही म्हणे. म्हणून तर हा परिसर इतका निर्जन आहे. इतक्या वेळापासून साधं चिटपाखरू तरी तुला दिसलं का ?" तो गंभीर चेहऱ्याने म्हणाला.

जयमाला आता मात्र प्रचंड घाबरली.

" मग तू मला का आणलं इथे ?  चल माघारी. आपण परत जाऊ."

ती खरंच परत जायला मागे वळली.

" अग वेडी आहेस का ? गंमत करतोय मी. ह्या सगळ्या भाकड कथा आहेत. जुने लोक उगाच काहीपण अंधश्रद्धा पसरवतात. असं थोडी असतं. विनाकारण जंगलतोड होऊ नये आणि आपलं निसर्ग सौंदर्य अबाधित रहावं म्हणून या असल्या काल्पनिक कथा रचल्या जातात. असल्या बिनबुडाच्या गोष्टींवर विश्वास थोडी ठेवायचा असतो."

तिचे हावभाव टिपत तो गालातले हसू दाबत होता.

तिला समजावण्याचा सुरात तो म्हणाला खरं. पण त्याच्या शब्दांवर त्याचाच विश्वास नव्हता.

तो लहान असताना त्याच्या कानावर असल्या गोष्टी पडायच्या. मागे एकदा असेच एका पावसाळ्यात प्रेत पाण्यात तरंगत आले होते. त्यावेळी संपूर्ण गाव असच काहीतरी चावळत बसलं होतं. त्याने त्याचा आण्णाना खरं कारण विचारलं, तेव्हा ते बोलले होते की, पूर आलेल्या पाण्याच्या प्रवाहात पोहताना त्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. मग त्यानंतर ह्या जंगलाकडे कुणी फिरकायच नाही असा फतवाच गावात काढण्यात आला होता.

पुढे गावात चांगली सोय नाही म्हणून शिक्षणासाठी भावेशची रवानगी शहरात करण्यात आली. त्यामुळे ह्या असल्या घटना नंतर मात्र त्याच्या ऐकण्यात आल्या नव्हत्या किंवा मग त्याला कुणी सांगत नसावे. तसे आता कोण विश्वास ठेवतय ह्या असल्या बिनबुडाच्या गोष्टींवर. त्याने मनात येणारे सर्व विचार धुडकावून लावले.

" तू खर बोलतोय ना ? " तिने पुन्हा खात्री करण्यासाठी विचारले.

तिचा आवाज कानावर पडतात त्याची तंद्री भंग पावली.

" हो गं. विश्वास ठेव माझ्यावर. तुला उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजायचं आहे ना ? म्हणून आपण इथे आलो. ही जागा फारशी कुणाला माहीत नाहीये. माहीत असती तर लोकांनी इथे तुफान गर्दी केली असती."

धबधब्याचं नाव ऐकताच ती हरखून गेली. पाण्याखाली मनसोक्त भिजता येईल ह्या कल्पनेनेच ती ते सगळं विसरून उत्साहाने त्याला ओढत चालू लागली.

" तिकडून पाण्याचा खळखळाट ऐकू येत आहे. तिकडेच असेल धबधबा. चल लवकर. "

तिला घाई झाली होती. तो ही तिच्या पाठोपाठ झपझप चालू लागला.

त्याच्या मनातली एक सुप्त इच्छा आज पूर्ण होणार होती. असल्या एकांतात निसर्गाच्या सानिध्यात उंचावरून कोसळणाऱ्या झऱ्याच्या धारा झेलत प्रणयक्रीडेला उधाण येणार होते. त्या कल्पनेनेच त्याच्या डोळ्यात नशा उतरायला लागली होती.

दोघेही आवाजाचा मागोवा घेत उंचावरून कोसळणारा धबधबा शोधत होते. चालताना आजूबाजूची हिरवळ तिच्या मनावर आनंदाचे उधाण आणत होती. ती आसुसलेल्या डोळ्यांनी ते अप्रतिम निसर्गसौंदर्य न्याहाळत होती.

त्याचवेळी तो तिचे रूप एकटक निरखत होता.

" इथले पक्षी बघ, किती सुरेल गीत गात आहेत. त्या सुंदर गीताला खळखळ वाहणाऱ्या पाण्याची मधूर साथ आहे. अशा विलोभनीय वातावरणात तुझा हात माझ्या हातात आहे."

तो तिच्या लोभसवाण्या रुपाकडे बघत म्हणाला.

" बस झालं. अजून किती निरखून बघशील माझ्याकडे. सतत एकटक बघत असतो. जसे काही मला आताच खाऊन टाकशील."

त्याच्या गोड बोलण्यावर पुन्हा विरघळत ती म्हणाली.

दोघेही हातात हात घालुन त्या झरझर वाहणाऱ्या झऱ्याजवळ जाऊन पोहचले.

थोड्या वेळाने एक मोठीच किंकाळी आकाश भेदत उमटली. त्या हृदय भेदक आवाजाने संपूर्ण शांतता भंगली. पक्षीही घाबरून फडफडायला लागले. जंगल थरथरायला लागले. तिथल्या वाहणाऱ्या नदीत लाल रंग मिसळला होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all