शापित झरा भाग २

काय असेल त्या झऱ्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी वाचा शापित झरा.
शापित झरा भाग २

डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेले "आम्रपाली" गाव म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण. तिथले सृष्टी सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असायचे. विविधरंगी पक्षांचा सुमधुर किलबिलाट, निरुपद्रवी प्राण्यांचा थयथयाट, वाऱ्यासंगे डोलणारी झाडेझुडपे, उंचावरून कोसळणारे धबधबे, तुडुंब भरलेल्या नद्या, जिकडे तिकडे हिरवीशार वनराई असा हा आम्रपाली गाव परिसर सद्यस्थितीत निर्जीव पडला होता. हेच सृष्टी सौंदर्य आता त्यांना शापित वाटत होते. लोक एका अनामिक दहशतीखाली वावरत होते. उघडपणे कुणी बोलत नसले तरी सर्वांच्या मनात भीतीचे सावट निर्माण झाले होते. पोटापाण्यासाठी का होईना जगरहाट अविरत चालू होती. पण गावात सुतकी वातावरण होते.

आज सकाळीच आम्रपालीवर अवकळा पसरली होती. एकदम पहाटेच्या प्रहरी रुपेश लाकडे गोळा करायला गेला होता. नदीलगतच असलेल्या दाट झाडीकडे बाहेरूनच पाहत कुठे काही मिळतंय का म्हणून तो शोधत होता आणि पाहतो तर काय ? दुरूनच पाण्यात काहीतरी तरंगत येत होत. घाबरुन त्याने एकच बोंब मारली. गावाच्या दिशेने आरोळी ठोकत तो सुसाट सुटला. पिसाळल्यागत वाट फुटेल तिकडे जीव मुठीत धरून पळायला लागला.

पहाटेच्या वेळी सडासारवण करणाऱ्या महिला आणि गुरेढोरे राखणारी माणसे पेंगुळल्या डोळ्यांनी उठत काम करत होती. त्याचा घाबरलेला आवाज ऐकून साखर झोपेत असलेलं गाव खडबडून जागं झालं. धावाधाव करत लोकं उठून त्याच्याकडे पळत यायला लागली होती.

घामाने ओलाचिंब झालेला रुपेश " शापित झऱ्याने बळी घेतला. आण्णाला बोलवा. " म्हणून ओरडत होता. त्याच्या आवाजात थरकाप होता. त्याचे शब्द कंपन पावत होते.
त्यामुळे त्याचे शब्द हवेतच विरत होते.

पूर्ण गाव गोळा व्हायला लागला होता. सर्वांच्या तोंडावर बारा वाजले होते. तो बडबडत होता. त्याला पाहून लोकांमध्ये गोंधळ सुरू झाला.

कुणीतरी गावच्या वैद्याला धवल आण्णाला बातमी दिली. तो पण हातातलं काम टाकून पळत आला. त्याच्या पाठोपाठ त्याची आई आणि बायको पण धावत आले.

सर्व जमताच रुपेश पुढे काय सांगेल त्यावर लोकांनी कान टवकारले.

" रुप्या, बोल ना बाबा. इथे जीव टांगणीला लागला आहे. कुठे काही पाहिलं का तू ?" शेखरच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

" हो." रुपेश भीतीच्या छत्रछायेखाली बोलला.

" काय ?" शेखरने हिंमत एकवटून विचारले. पण त्या एका शब्दात शंभर टणाहून जास्त भीती भरली होती.

रुपेशने तोंड उघडले. आता पुढे काय वाढून ठेवलं होत कुणास ठाऊक.

" चला. दाखवतो."

धवल आण्णासहीत पूर्ण गावकरी त्याच्या मागे जायला निघाले.

एक पाऊल पुढे टाकून पुन्हा तो मागे फिरला. तिथे उभी असणारी धवल आण्णाची आई सोयराबाई आणि तिची सून गंगा दोघांना उद्देशून तो म्हणाला.

"आजी, आक्का तुम्ही पण चला."

चांगले तरणेताठे पुरुष मंडळी त्याच्यासोबत जायला निघाले असताना हा त्या बाई माणसांना चला का म्हणतोय, म्हणून सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झाला.

" रुपेश, बाईमाणूस नको. आपण आधी जाऊन बघू." आण्णानी त्याला समजावले.

" नको. येऊ दे त्यांना पण." तो खाली मान घालून बोलला.

नक्कीच आण्णाच्या घरातलं काहीतरी होत.

" बरं."

शेखरने मान हलवून त्यांना चला असे खुणावले. आण्णा मात्र चिंताग्रस्त स्थितीत होते.

बायकामंडळी घाबरून तिथेच उभी होती. सोयराबाई आणि गंगा सोडून एकही बाई पुढे जायला धजावत नव्हती. पुरुषांपैकी जे हिंमतीने सामोरे जाऊ शकतील तेच त्या दिशेने निघाले होते.

थोडे अंतर चालून गेल्यावर सर्वांच्या मनातले भय वाढू लागले. आधाराला एकमेकांचा हात पकडुन सर्व नदीपात्रातून पावले टाकत होती. नदीकाठचा परिसर तसा खूप शांत होता. पण मनात भीतीची सावट पसरलेले असल्याने सर्वांना त्या शांततेची प्रचंड भीती वाटतं होती.

थोडंसं दूरपर्यंत पाण्यातून चालत गेल्यावर त्यांना एक प्रेत दिसलं. कुणाचं आहे म्हणून सर्वांची भीतीने गाळण उडाली.

आण्णा हिमतीने पुढे गेले आणि त्यांनी तिथेच अंग टाकून दिले. तो दुसरा तिसरा कुणी नसून त्यांचा मुलगा भावेश होता.

आपल्या मुलाचं प्रेत पाहून ते सुन्न झाले होते. गंगाने एकच टाहो फोडला. सोयराबाई धाय मोकलून रडत होती. आम्हाला का नाही उचललं देवा म्हणून दोघी भावेशला बिलगून रडत होत्या. ते दृश्य पाहून सगळ्यांचे हृदय गलबलून आले. काही तरुण मुलांनी त्यांना आवरले.

तिथून त्याचे प्रेत आणण्यात आले. प्रेत रात्रभर पाण्यात पडून असल्याने बरेच फुगले होते. त्यामुळे जास्त वेळ न दवडता लागलीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गावात चर्चेला उधाण आलं होत. भावेश तर शहरात शिकत होता. मग तो जंगलात कसा पोहचला ? शापित झऱ्याकडे कुणी जायचं नाही हा फतवा पंचायतने फार पूर्वीच काढला होता. मग हे वैद्याच्या पोराला माहीत नव्हतं का ?  जंगलातल्या झऱ्याजवळ जो पण गेला तो कधीच परत आला नाही. नक्कीच भावेश त्या ठिकाणी गेला असेल.

जे पण झालं होतं. ते खूप वाईट झाल होत. गावातल्या लोकांनी विरोध करूनही त्यांना न जुमानता लागलीच आठ - दहा पोरांनी गाड्या काढायला सुरुवात केली. सगळे एकमेकांच्या साथीने जंगलाकडे जायला निघाले होते. तरीही जंगलात शिरायचं नाही ही तंबी देऊनच गावकऱ्यांनी त्यांना जायची अनुमती दिली.

त्या रस्त्याला शोधाशोध केल्यावर भावेशची गाडी त्यांना एका झाडाखाली लावलेली दिसली. पण तो एकटा तर इतक्या लांब येणार नाही. म्हणून ते पुन्हा कुठे काही दिसतंय का म्हणून तपासून पाहू लागले.

तर दूरवर एका झाडाझुडपात त्यांना एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसली. तिला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ही मुलगी अशा बेशुद्ध अवस्थेत जंगल परिसरात एकटी काय करतेय हे मोठं कोडच होत.

तिच्या अंगावर काही ओरखडे पडले होते. अंगावर काट्याकुट्यांच्या जखमा पण पडलेल्या दिसत होत्या. प्रथमदर्शनी पाहता असे वाटत होते की, जसे काही स्वतःचा जीव वाचवत जंगलातुन बाहेर आली असावी. त्याच धावपळीत दम खाऊन बेशुद्ध पडली असावी.

त्यांनी तिला उचलले उपचारासाठी धवल आण्णाकडे घेऊन आले.

आम्रपाली गावात धवल आण्णाचे वडील म्हणजे एकदम प्रसिध्द वैद्य. त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. त्वचेचे विकार ते त्यांच्या जवळील एका आयुर्वेदिक पावडरने पळवून लावत असतं. त्यामुळे त्यांच्याकडे अलोट गर्दी असायची. कित्येक वेळा तर तीन-तीन, चार-चार महिन्यांनी रुग्णांना उपचाराची तारीख मिळायची. रुग्ण सेवेसाठी त्यांनी बंगल्याजवळ मोठीच जागा उभारली होती. बस एक गोष्ट वेगळी होती. पावसाळ्याचे तीन - चार महिने वैद्यसेवा पूर्णपणे खंडित असायची. कितीही काहीही होऊ दे. पण पावसाळ्यात रूग्ण सेवेचे काम पूर्णपणे बंद असायचे.

आता मात्र त्यांचं वय झालं होत. त्यामुळे त्यांचा वारसा त्यांचा मुलगा धवल चालवत होता. आपल्या तरुण मुलाच्या अकाली निधनाने आण्णा खचला होता. त्यापेक्षा जास्त तो बुचकाळ्यात पडला होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all