शापित झरा भाग ३

भावेशच्या मृत्यूमागे कुणाचा हात असेल जाणून घेण्यासाठी वाचा शापित झरा.
झापित झरा भाग ३

त्या मुलांनी जयमालाला आण्णाच्या दारापुढे आणलं. हे माहीत असूनही की आता तिच्यावर ते उपचार करायला ते तयार होणार नाहीत. पण कुठेतरी भावेशशी तिचा सबंध असावा असे त्यांना आतून वाटत होते. धवल आण्णा नाही बोलला तर सरकारी दवाखान्यात दाखल करणे भाग होते.

धवल आण्णाला सत्य जाणून घ्यायचे होते. त्याने त्या मुलीवर उपचार करायला होकार दिला व त्या मुलांना परत पाठवून दिले. तिची काळजी घ्यायला धवल आण्णाची आई आणि बायको होतीच. त्यांनाही आपल्या मुलाच्या मृत्यू मागचे कारण जाणून घ्यायचे होते. काही वेळाने ती मुलगी शुद्धीवर आली. जरा बरं वाटल्यावर ती बोलायला लागली. तिने जे सांगितले त्यावरून आण्णाला भावेशचे जंगलात जाण्याचे कारण कळाले. आता तो सर्व घडामोडींचा विचार करत बसला होता.

भावेश आणि जयमाला दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकायचे. भावेश गावातल्या प्रसिध्द व्यक्तीचा एकुलता एक मुलगा असल्याने थोडा मनमौजी स्वभावाचा होता. अगदी मनात येईल तसे वागायचा. शहरी वातावरणात तर तो अजून जास्त उनाड झाला होता. काही आवडल तर ते मिळवण्यासाठी तो त्यामागे हात धुवून लागायचा. मग ती वस्तू असो की व्यक्ती, ती मिळवल्याखेरीज तो स्वस्त बसायचा नाही. त्यातच त्याची नजर सुंदर आणि हुशार असलेल्या जयमालावर पडली. तिच्या साध्या सरळ स्वभावावर तो प्रभावित झाला होता. त्याचं तिच्यावर प्रेम होतं की नाही माहीत नाही पण तिच्या सौंदर्याची भुरळ मात्र त्याला पडली होती.

जया लहानपणापासून शहरात वाढलेली असल्याने तिला गावाच फार अप्रूप वाटायचं. भावेश गावाकडचा होता. त्यामुळे तो तिला सर्व गोष्टी रंगवून सांगायचा. म्हणून तिच्या मनात अजून गाव आणि गावाकडचा परिसर याचे आकर्षण निर्माण झाले होते. तिला उंचावरून कोसळणारा धबधबा पहायची इच्छा होती. त्यासाठी तिने त्याच्याकडे हट्ट धरला. भावेश तिच्या स्त्री सुलभ हट्टापुढे झुकला. त्या जंगलाकडे कधीही फिरकणार नाही असे आपल्या वडिलांना दिलेले वचन त्याने मोडले.

बराच वेळ चालून चालून ते दमले होते. एव्हाना दिवसही मावळला होता. थोड्याच वेळात अंधार पडणार होता. तास दोन तास थांबून इथून निघून जाऊ ह्या विचाराने दोघेही त्या झऱ्याजवळ पोहचले.

उंच डोंगरावरून कोसळणारा धबधबा आणि त्यामुळे दुथडी भरुन वाहणारी नदी पाहून दोघांचा आनंद गगनात मावत नव्हता. जयमालाला त्या वरून पडणाऱ्या असंख्य जलधारा पाहुन त्यात भिजण्याचा मोह अनावर झाला. ती अंगावर जलधारा घेत मनसोक्त त्या पाण्यात भिजू लागली.

भावेश मात्र इकडेतिकडे काहीतरी शोधत होता. त्याची नजर सारखी भिरभिरत होती. त्याने तिथे कुणाला तरी पाहिले होते. त्याला आल्यापासून वाटत होते की त्यांच्या मागावर कुणीतरी आहे. पण इथे यायला मनाई आहे म्हणून त्याला भास झाला असावा असे त्याने गृहीत धरले.

मात्र झऱ्याजवळ पुन्हा त्याला संदिग्ध हालचाली जाणवल्या. जया आपल्याच धुंदीत त्या झऱ्याखाली भिजत होती. तिचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. भावेश नैसर्गिक विधीसाठी जाऊन येतो असे सांगून तिथून निघाला. पण थोड्याच वेळात तिला त्याची किंकाळी ऐकू आली. घाबरुन ती जीव मुठीत घेऊन तिथून बाहेर पळत सुटली. अंधारात तिला रस्ता देखील सापडत नव्हता. कशीबशी जीव वाचवत ती जंगलाबाहेर पडली. पण खूप दमछाक झाल्यामुळे तिला भोवळ येऊन ती तिथेच कुठेतरी पडली. रात्रभर ती तिथेच झुडुपात पडली होती.

भावेशला धोक्याची सूचना आधीच देण्यात आली होती. पण जयाच्या मोहाला तो बळी पडला. आपण जाऊन आल्यावर कुणालाच काही सांगायचे नाही ह्या आविर्भावात तो तिला घेऊन गेला होता. परंतु, तिथे गेल्यावर मात्र तिच्यासोबत एकांतात वेळ घालवण्याऐवजी त्याचाच प्राण त्याला गमवावा लागला.

धवल आण्णा झालेली घटना पुन्हा पुन्हा मनात आवळत होता. पण त्याला कुठूनच धागेदारे सापडत नव्हते. बरं या सर्वात त्या मुलीची पण चूक नव्हती. ती सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होती. उलटून तिच्या हट्टापायी भावेशचा जीव गेला म्हणून ती स्वतःला कोसत होती. आण्णाने तिला तिच्या घरी सोडून यायची व्यवस्था केली.

घरात सुतकी वातावरण होते. सर्व घर दुःखात बुडाले होते. आण्णाचे वडील वैद्यबुवा कित्येक वर्षापासून खाट धरून होते. त्यांनी त्याला नोकराकरवी आपल्या खोलीत बोलावणे धाडले.

" धवला आपल्या हेक्यापायी आपल्या पोराचा जीव गेला का रे ? "

त्यांच्या सुरकुत्या पडलेल्या गालांवर दुःखाचे पाणी ओघळले.

" तात्या मला पण तोच संशय येतोय. आपण जगापासून लपविण्यासाठी सर्व खेळ रचला. कधी वाटलं नव्हतं की आपलाच पोरगा त्या नादात जीव गमावून बसेल. " आण्णाला अश्रू अनावर झाले.

" रडू नको आण्णा. योग्य वेळी आपण त्याला सत्य सांगणारच होतो. तारुण्यात तितकी समज नसते. त्यात तो स्वभावाने चंचल होता. अजून थोडा समजदार झाला की आपण त्याला सगळं समजावून सांगणारच होतो. पोराने आपला वारसा चालवावा याची आपण किती स्वप्नं पाहिली होती. पण आता देवाच्या मर्जीपुढे कुणाचं काही चालत नाही हेच खरं." भरल्या डोळ्यांनी तात्या खंत व्यक्त करत होते.

" तात्या मी जाऊनच येतो. माझ्या पोराचा जीव घेणाऱ्याला मी मोकाट फिरू देणार नाही. तो कोण आहे ते समजायलाच पाहिजे. त्याशिवाय मला चैन पडणार नाही." मनाशी पक्का निर्धार करत आण्णा बोलला.

" अरे घरात दुःख असताना बाहेर फिरणं बर दिसेल का ? लोक काय म्हणतील ? "

" तात्या हीच वेळ आहे. त्याला वाटेल की आण्णाच घर दुःखात आहे. त्यामुळे तो गाफिलच राहील. जाळ्यात बरोबर सापडेल. फक्त काम थोड शिताफीने करावं लागेल."

" आण्णा जे काही करशील ते सांभाळून कर रे बाबा. मी जायला पाहिजे तर माझा नातवाचा जीव गेला. आता पोराला गमवायची ताकद नाही राहिली."

" तुम्ही काळजी करू नका तात्या. इतक्या वर्षात आपण कधी सापडलो का ? तुम्ही निश्चिंत रहा."

आपल्या वडिलांना दिलासा देऊन आण्णा त्यांच्या खोलीतून निघून गेला.

क्रमशः

🎭 Series Post

View all