शापित झरा भाग ४ (अंतिम भाग)

काय असेल त्या झऱ्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी वाचा शापित झरा
शापित झरा भाग ४ (अंतिम भाग.)


धवल आण्णा एका महत्त्वाच्या कामासाठी शेजारच्या गावात जात आहे असे सांगून भल्या पहाटे घरून निघाला. घरात दुखवटा होता म्हणून त्याला त्याची बायको आणि आई जाऊ देत नव्हते. पण तात्याने मध्यस्थी केल्यावर त्यांचा नाईलाज झाला.

आण्णाला संपूर्ण जंगल परिचित होते. प्रत्येक पावसाळ्यात तो इथे यायचा. त्याला यावेच लागायचे. त्याशिवाय त्यांचा धंदा तरी कसा चालणार होता. त्या जंगलात एक आयुर्वेदिक वनस्पती होती. ती फक्त पावसाळ्यात उगवायची. ती घ्यायला त्याला यावे लागायचे.

त्याचे आजोबा त्याकाळी फार मोठे वैद्य होते. वनस्पती शास्त्राचे ते गाढे अभ्यासक होते. विविध वनस्पतींचा अभ्यास करून त्यांनी आयुर्वेदिक वनौषधी बनवल्या होत्या. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी माणसांचा कल्याणासाठी केला. त्यासाठी ते अनेक जंगल तुडवायचे. एके दिवशी असेच त्या जंगलात ते काही सापडतं का म्हणून शोधायला गेले असताना तिथे झऱ्याजवळ त्यांना एक अनोखी वनस्पती दिसली. ती वनस्पती या आधी त्यांना कधी दिसली नव्हती. त्यांनी ती घरी आणून तिच्यावर अभ्यास करायला सुरूवात केली. बऱ्याच प्रयोगाअंती त्यांच्या असे निदर्शनास आले की ती वनस्पती त्वचा रोगांवर अतिशय प्रभावी आहे. पण अडचण एकच होती की ती फक्त पावसाळ्यात उगवायची. त्याहून अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती वनस्पती पावसाच्या पाण्याचे थेंब अंगावर पडल्यावरच उमलायची. त्यामुळे संपूर्ण पावसाळा त्यांना ती वनस्पती हाती लागावी म्हणून लक्ष ठेवावं लागायचं. त्वचा रोगांवर रामबाण इलाज सापडल्याने फार कमी अवधीत ते पंचक्रोशीत नावारूपास आले. त्यांचा मुलगा तात्या पण त्यांच्या हाताखाली तयार व्हायला लागला होता.

तात्याला आपल्या वडिलांची परोपकारी वृत्ती थोडी खटकायची. त्या वनस्पतीचे ज्ञान फक्त त्यांच्या घराण्यापुरतेच मर्यादित राहावे असा त्याचा अट्टहास असायचा. हळूहळू आपल्या वडिलांचा संपूर्ण कारभार त्याने स्वतःच्या हातात घेतला. ती वनस्पती त्याचे वडील आधी पाण्यातून द्यायचे. वनस्पतीचे ज्ञान अजून कुणापर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्यावर शक्कल लढवली. दर पावसाळ्यात ती वनस्पती मिळवायला फक्त तोच जाऊ लागला. मग ती वनस्पती आणल्यानंतर तिला वाळवून त्याची पावडर तो करून ठेवत असे. त्यामुळे कुणालाच त्या वनस्पतीबद्दल कळायचे नाही.

आम्रपालीतील वैद्य बुवांनी कसलीतरी पावडर पाण्यात दिल्याने आपला आजार बरा होतो, हेच जनमाणसात पसरत राहिले. पुढे वर्षानुवर्षे हेच चालत होते. ही वनस्पती काय आहे हे आजूबाजूच्या वैद्यांनी जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

तात्याला याची कुठून तरी कोण कुणकुण लागली. यावर उपाय म्हणून त्याने एक बनाव रचला. एके दिवशी जंगलात फिरायला गेलेल्यापैकी कुणाचा तरी मृत्यू झाला आणि गावात एक प्रेत वाहून आले.  तात्याने शापित झऱ्याची आवई उठवली. जेणेकरून कुणी त्या झऱ्यापर्यंत पोहोचू नये. पर्यायाने त्या वनस्पतीवर कुणाची नजर पडू नये. त्याकाळच्या अशिक्षित लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. वैद्यबुवाच्या घरचे हुशार आणि प्रसिद्ध असल्याने कुणी त्यांच्यावर अविश्वास दाखवला नाही. तेव्हापासून जंगलाकडे येणेजाणे सर्वांनी बंद केले.

आतापर्यंत सर्वकाही तात्याच्या मनासारखे झाले होते. पुढे त्याने आपल्या मुलाला धवलला आपल्या हाताखाली तयार केले. पावसाळा आला की त्याचा मुलगा धवल आण्णा गुपचूप जाऊन ती वनस्पती घेऊन यायचा आणि मग पावडर बनवायच्या कामाला लागायचा. या कामात त्यांना भरपूर वेळ लागायचा त्यामुळे ते पावसाळ्यात रुग्णसेवा बंद ठेवायचे

गत आठवणींच्या सहवासात हरवून धवल आण्णा जंगलात लपून बसला होता. त्याच्या स्वार्थीपणाने आज त्याच्या मुलाचा जीव गेला होता. त्याच वनस्पतीच्या शोधात कुणीतरी तिथे आले असावे आणि भावेशला बघून घाबरून त्याचा जीव घेतला असावा असा प्राथमिक कयास आण्णाने लावला होता.

विचारात हरवलेल्या आण्णाला कोणीतरी झऱ्याकडे येत असल्याचे भासले. आण्णा आधीच तयारीत दबा धरून बसले होते. त्यांनी पाहिले की शेजारच्या गावातल्या वैद्याचा मुलगा गणेश झऱ्याजवळ आला होता. गणेश त्या वनस्पतीला शोधत होता. इतक्या सगळ्या झाडाझुडपांमध्ये हिरव्या वनराई मध्ये त्याला ती वनस्पती ओळखू येत नव्हती. तरीही हार मानायची नाही म्हणून तो तिथे रोज येत होता आणि त्याला वाटेल ती वनस्पती घरी घेऊन जात होता. त्याच्या वडिलांनी ती वनस्पती पाहिलेली असल्यामुळे ते ती ओळखू शकत होते. पण देखील वयोमानानुसार अंथरुणाला खिळून होते. रोजच्याप्रमाणे गणेश वनस्पती शोधायचा प्रयत्न करू लागला.

त्याचवेळी आण्णाने त्याला आपल्या मजबूत हातांनी जखडले. आता तो रंगेहात सापडला होता.

" बोल का केलं तू असं ? माझ्या मुलाला का मारलं ?त्याने तुझं काय बिघडवलं होतं ?"

आण्णा खुनशी नजरेने गणेशकडे पाहत ओरडला. गणेश खूप घाबरला होता. खरे बोलण्यावाचून त्याच्याकडे पर्याय नव्हता.

तो सांगू लागला.

त्याचे वडील आणि आण्णाचे वडील मित्र होते. दोघांनी मिळून त्या वनस्पतीचा अभ्यास करून एकत्र काम करायचे ठरवले होते. पण नंतर काय झाले कुणास ठाऊक ? आण्णाच्या वडिलांनी नंतर त्या गोष्टीला नकार दिला. गणेशच्या वडिलांच्या मनात ती सल कायम राहिली पण त्यांना काहीच करता येत नव्हते. कालांतराने त्यांनी ही गोष्ट गणेशला बोलून दाखवली. अंथरुणाला खिळलेल्या वडिलांचे दुखणे गणेशला सहन झाले नाही. ती वनस्पती आपल्याला मिळावी व आपण पण तितकेच प्रसिद्ध व्हावे म्हणून तो दिवस रात्र स्वप्न पाहू लागला. त्याने आण्णा आणि त्याच्या घरच्यांवर पाळत ठेवायला सुरुवात केली. ती वनस्पती मिळावी म्हणून तो खटाटोप करत होता. ती वनस्पतीचे पाहता यावी म्हणून गणेश त्यांच्या घरी रुग्ण बनून गेला. पण त्याच्या हाती केवळ पावडर लागली. ती वनस्पती कशी दिसते हे त्याला माहीतच नव्हते. त्या दरम्यान त्याला एक रहस्य समजले की, ती वनस्पती पावसाळ्यातच जंगलात मिळते.

त्यादिवशी तो असाच जंगलात वनस्पतीच्या शोधात आला होता. पण नेमकं त्याचवेळी भावेश पण तिथे आला. भावेशने त्याला वनस्पती तोडताना बघून घेतले होते. आता भावेश त्याच्या घरी सर्व काही सांगून देईल म्हणून गणेश गडबडून गेला. त्यामुळे घाबरून त्याने हातात असलेल्या कोयत्याने भावेशवर वार केला. जयमाला मात्र त्याच्या हातून निसटली. जयमाला ने त्याला पहिलेच नव्हते त्यामुळे तिच्यापासून त्याला काहीच धोका नव्हता. त्यामुळे तो गप्प बसला.

आण्णाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले व सर्व कर्म कहाणी मांडली. आता सर्वकाही आरशासारखे स्वच्छ होते.

आण्णा आणि तात्याच्या स्वार्थीपणामुळे बिचाऱ्या भावेशला काहीही चुकी नसताना आपला जीव गमवावा लागला होता.

समाप्त.

🎭 Series Post

View all