शापित... एक प्रेमकथा
भाग:१
भाग:१
सारंगनगरीच्या राजदरबारात नर्तनाचा एक अनोखा सोहळा सुरु होता. राजा सोमराज तंद्री हरवून नर्तकीच्या नृत्याचा आस्वाद घेत होता. राज्यकारभाराच्या व्यापातून जरासा विसावा म्हणून नृत्यकलेचा आनंद घेणे, हे त्याचे नित्याचेच होते. मृदंगाच्या तालावर नर्तकीची पाऊले थिरकत होती. सर्वत्र एक हर्षोउल्हासाचे वातावरण होते. तेव्हाच एक सैनिक धावत राज दरबारात आला. त्याला पाहून राजा सोमराजने नृत्य थांबविण्याचा इशारा केला आणि नर्तकींनी आपले नृत्य थांबविले.
"क्षमा असावी राजन, परंतु पंचगिरीत तुम्ही जो गुप्तहेर पाठवला होता, तो परत आला आहे. तो तुम्हाला याच समयी भेटू इच्छित आहे." सैनिकाने सांगितले.
"आत पाठवा त्यांना." राजानी परवानगी दिली
काही क्षणातच गुप्तहेर दरबारात आला आणि त्याने राजांना प्रणाम केला.
" राजन, मी इथे असा अवेळी आलो त्यासाठी क्षमा मागतो, पण वार्ताच इतकी महत्त्वाची होती की, वेळ न दवडता तुमच्या कानी घालणे गरजेचे होते." गुप्तहेर अदबीने म्हणाला.
" एकांत.." राजाने आदेश दिला आणि एका क्षणातच नर्तक, वादक, नृत्यांगना आणि कक्षात असलेले इतर सर्वजण बाहेर गेले. कक्षात फक्त राजा आणि गुप्तहेरच उरले.
"राजन पंचगिरीचा राजा उग्रसेनने शाश्वतपुरीच्या राजाला एक खलिता पाठवला आहे. दोन्ही राजांनी संघटित होऊन एकत्रपणे आपल्या सारंगनगरीवर आक्रमण करण्याची योजना आखली आहे." गुप्तहेराने माहिती दिली.
" काय?"
"हो राजन दोन सप्ताहाच्या आतच शाश्वतपुरीचा राजा आपल्या सैन्यासह पोहचणार आहे." गुप्तहेर
"पण शाश्वत पुरी आणि पंचगिरी या दोन्ही राज्यांशी आमचे संबंध उत्तम आहेत. तुमची माहिती चुकीची तर नाही ना?"
" माझ्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द सत्य आहे राजन. मला जराही संदेह असता, तर मी तुमच्या समोर येण्याचे धाडसच केले नसते." गुप्तहेराने सांगितलेली वार्ता ऐकून राजा चिंतित झाला.
अचानक एक मोठे संकट आपला जबडा उघडून उभे होते.
अचानक एक मोठे संकट आपला जबडा उघडून उभे होते.
"कोण आहे तिकडे?" राजांनी सैनिकांना हाक दिली आणि राजांचा आवाज ऐकताच एक सैनिक आत आला.
" सर्व मंत्र्यांना आणि प्रधानांना निरोप द्या. तत्काल सभेचे आयोजन केले आहे असे सांगा. सर्वांना अतिशीघ्र सदरेवर हजर राहण्यास सांगा."
*****************
काही क्षणातच सदरेवर सभा भरली. राजाने गुप्तहेराने दिलेली माहिती सर्वांना सांगितली. हे ऐकताच राजाचा विश्वासू तथा अनुभवी प्रधान उभा राहिला.
"राजन, राजा उग्रसेन हा अत्यंत कपटी माणूस आहे. मला वाटते त्यानेच शाश्वतपुरीच्या राजाला आपल्या जाळ्यात ओढले असावे. जर त्यांच्या सैन्याने सारंगनगरीवर एकत्रितपणे आक्रमण केले, तर आपली खूपच मोठी हानी होऊ शकते." प्रधान
"सत्य. आणि आपल्याकडे दोन राज्यांच्या सैन्याशी दोन हात करण्याएवढे मनुष्यबळही नाही." राजा
" कमीत कमी रक्त सांडून आम्हाला उग्रसेनाचा काटा काढावा लागणार आणि त्यासाठी एकच उपाय आहे. आम्हाला आपल्या गुप्त शस्त्राचा वापर करावा लागेल." प्रधान
" गुप्त शस्त्र?" एक मंत्री
" हो गुप्तशस्त्र. या क्षणी तरी त्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाही." प्रधान
"तुम्ही जे बोललात ते अचूक आहे प्रधानजी. पण गुप्त शस्त्र तयार आहे?" राजा
" क्षमा असावी राजन. दोन मासांआधी मी रामचंद्राकडे विचारपूस केली होती. तेव्हा त्यांनी सांगितले होते, की जरासा अवधी लागणार आहे." प्रधान
" अवधी? या क्षणी तोच तर आमच्याकडे नाही. पुढच्या दोन सप्ताहाच्या आत मला गुप्त शस्त्र तयार पाहिजे." राजाने आदेश दिला.
" राजन, पण कुठल्या गुप्त शस्त्राबद्दल तुम्ही बोलत आहात?" दुसऱ्या एका मंत्र्याने प्रश्न केला.
"या गुप्त शस्त्राबद्दल काहीही न बोललेलेच उत्तम." राजाला कुणावरच विश्वास नव्हता. शत्रूच्या कानी जर गुप्त शस्त्राची गोष्ट पडली तर ते गुप्तशस्त्र सुरक्षित राहणार नाही, हे त्याला माहीत होते.
राजाने काही वेळ विचार केला आणि आदेश दिला.
" रामचंद्राला निमंत्रण पाठवा, मी त्यांना स्वतः भेटून राज्यावर आलेल्या संकटाविषयी सांगतो."
***********************
रामचंद्र आपल्या निवासाबाहेर लाकडे तोडण्यात व्यग्र होता. तेव्हाच त्याने पाहिले, की त्याची कन्या घरातून हळूच बाहेर जात आहे.
" वसुंधरा, तू याक्षणी कुठे जात आहे?"
" कुठेच नाही तातश्री. इथेच काळ्या झऱ्यावर जात आहे." हे सांगताना वसुंधराचे हृदय धडधडले.
" ठीक आहे. शीघ्र ये."
" ठीक आहे. शीघ्र ये."
वसुंधरा ही रामचंद्राची एकुलती एक कन्या. रामचंद्राने तिला खूपच मायेने वाढवली होती. त्याला राज्यातल्या जनतेवर विश्वासच नव्हता, म्हणून त्याने वसुंधराला लोकांपासून जरा दूरच ठेवले होते. तिला परपुरुषाचा स्पर्श होऊ नये, म्हणून तो तिला कुठेच एकटीला जाऊ देत नव्हता. फक्त काळ्या झऱ्यावर जाण्याचीच तिला परवानगी होती. कारण तो झरा भिंतीसारख्या काळ्या दगडांनी बंदिस्त होता. त्यामुळे राज्यातला कोणीही तिथे येणे अशक्यच होते.
**********
वसुंधरा काळ्या झऱ्यावर पोहोचली. तिथे पोहोचताच तिच्या हृदयाची धडधड जरा जास्तच वाढली. तिथे मदन तिची वाट पाहत उभा होता. वसुंधरा येत असल्याचे पाहून त्याने आपल्या हातात असलेले कमलपुष्प पाठीमागे लपवले.
"काय लपवतोस?"
"काहीच तर नाही."
" दे ते कमलपुष्प देखिले आहे मी."
"ते असे सहज द्यायचे नसते."
" मग कसे द्यायचे असते?"
"वसुंधरा, समय कसा निघून गेला बघ. तुला कधी भेटलो, कधी मैत्री झाली आणि कधी तुझ्या प्रेमात पडलो, ध्यानीच नाही आले."
"खरंच? एवढे प्रेम करतो माझ्यावर?"
"म्हणूनच तर असा इथे तुझ्या दर्शनास येतो. वसुंधरा, माझी एक इच्छा आहे. मला तुला माझ्या बाहुपाशात घ्यायचे आहे."
"नाही नाही. तातश्री म्हणतात पाणीग्रहण होण्याआधी परपुरुषाला स्पर्श करणे म्हणजे एक मोठे पाप आहे."
" पण मी तुझ्यावर प्रेम करतो."
"ज्ञात आहे मला. सदैव गाय हरवली असे सांगून इथे शोधायला येण्याचे नाटक करत होतास तू. जसे की तुझी गाय नेहमीच या काळ्या झऱ्या पाशीच हरवत होती." वसुंधरा हसली.
"तुझ्यासाठी तर ती नाटके करावी लागायची, कारण काळा झरा सोडून दुसरीकडे जायला तुझे तातश्री तुला अनुमती देत नाहीत. मग तुझ्या सुंदर रूपाचे दर्शन घडावे, म्हणून इथेच यावे लागायचे."
" तुला आठवतो तो पहिला दिवस?"
" हो, तो दिन मी कसा विसरेन. त्या दिवशी मला तू पहिल्यांदा दिसली आणि तुला पाहताच मी मलाच विसरलो. तुला बघताक्षणीच तू माझे हृदय काबीज केले.
"मलाही तू खूप आवडतो."
" वसुंधरा, मला तुला काहीतरी सांगायचे आहे."
"सांग ना.."
" तू माझ्याशी विवाह करण्यास तयार आहे?" मदनने कमलपुष्प पुढे करत विचारले.
यावर वसुंधराने काहीच उत्तर दिले नाही. फक्त ते कमलपुष्प आपल्या हातात घेत स्मितहास्य करत तिने लाजत नजर खाली केली.
मदन आनंदीत झाला. त्याने वसुंधराला आणखी एक सत्य सांगण्याचे ठरवले.
" वसुंधरा, मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे.
मी तुझ्याशी खोटे बोललो होतो. मी एक गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली आहे."
मी तुझ्याशी खोटे बोललो होतो. मी एक गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली आहे."
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा