Login

शरद, क्षिप्रा आणि बसस्टॉप. भाग ५

एक लव स्टोरी
शरद, क्षिप्रा आणि बसस्टॉप
भाग ५ (अंतिम)

दुसऱ्या दिवशी बॅक टु बॅक मीटिंग होत्या, म्हणून तयारी करण्यासाठी शरद रोजच्या पेक्षा जरा लवकरच ऑफिसला निघाला. सोसायटीच्या बाहेर पडला तर त्याला क्षिप्रा पण जातांना दिसली. तो थांबला.
“आता पाय कसा आहे? बरं वाटतंय का?” – क्षिप्रानी विचारलं.
“एकदम ओके. चुन्याची कमाल. तुम्ही रोज इतक्या लवकर निघता?” – शरद.
“हो बसच्या वेळा सांभाळायच्या म्हणजे निघावंच लागतं. तुमचं ठीक आहे तुमच्या जवळ बाइक आहे.” – क्षिप्रा.
“मग माझी ऑफर आहे. माझ्या बरोबर येत चला.” – शरद.
“तुम्ही सर्वांनाच अश्या ऑफर देता का?” – क्षिप्रा म्हणाली. त्यावर शरद हसला.
“बसा.” शरद म्हणाला.
मग हेच रुटीन झालं सकाळी शरद बरोबर आणि संध्याकाळी शरद वेळेवर आला तर त्याच्या बरोबर नाही तर बस. शरद पण संध्याकाळची वेळ सांभाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचं. पण नेहमीच काही तरी घोळ व्हायचा. कधी संध्याकाळची वेळ जमली तर कॉफीचा प्रोग्रॅम व्हायचा. दर रविवारी न चुकता क्षिप्रा आणि शरद गॅलरी मधे चहा घेत अनेक विषयांवर बोलायचे. असेच एक दोन महीने गेले, पण एका निश्चित दिशेने काहीच प्रगती होत नव्हती. दोघंही एकमेकांच्या खूप जवळ आले होते, पण निष्पन्न शून्य.
शरद बरेच वेळा तिला लग्नाबद्दल विचारायची तयारी करायचा, पण मग त्याला वाटायचं की आपलं एक लग्न झालेलं आहे, तिला आपण विचारलं आणि तिला सेकंड हँड नवरा नको असेल तर, असलेली मैत्री पण धोक्यात यायची. हा विचार आला की त्याची हिम्मत व्हायची नाही आणि तो लग्नाचा विचार रद्द करायचा. अजून एक महिना गेला आणि शेवटी, काय व्हायचं असेल ते होऊ दे, असा विचार करून त्याने हिम्मत बांधली आणि क्षिप्राला विचारलच. त्या रविवारी ते दोघंही गॅलरीत चहा पित गप्पा मारत बसले होते.
“क्षिप्रा, एक विचारायचं होतं.” - शरद.
“आज परमिशन? काही विशेष आहे का?” – क्षिप्रा.
“हो, तुझी रिएक्शन काय असेल त्याचा अंदाज येत नाहीये म्हणून.” – शरद.
“मी अंदाज बांधू शकते. तुम्ही मला लग्ना बद्दल विचारणार आहात.” – क्षिप्रा.
“तुला कसं कळलं? मला नेहमीच नवल वाटायचं चित्राला सुद्धा माझ्या मनात काय आहे ते नेमकं कळायचं. आज तुला सुद्धा कळलं. गंमतच आहे.” – शरद.
“ते आम्हा स्त्रियांमधे उपजतच असतं. पण तुम्ही विचारा काय विचारायचं आहे ते.”-क्षिप्रा.
“आता काय विचारणार? तुला कळलंच आहे तर तूच उत्तर दे.” – शरद.
“मी काय सांगू? लग्न हा चॅप्टर माझ्या साठी बंद आहे. आपली एवढी छान मैत्री आहे ती काय वाईट आहे?” – क्षिप्रा.
“लग्नाचा चॅप्टर बंद आहे म्हणजे काय? मी समजलो नाही.” – शरद.
“काय सांगायचं? मी कधीच आई बनू शकणार नाही. मी होरपळतेच आहे, त्यात अजून भर कशाला?” – क्षिप्रा.
“माझं एक लग्न आधीच झालं होतं म्हणून तर तू असं कारण देत नाहीयेस न?”– शरद.
“नाही नाही कृपया करून असा गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही किती चांगले आहात. सर्व ठीक असतं तर मी आनंदाने तयार झाली असती.” – क्षिप्रा.
“असं असेल तर मग, माझी तयारी आहे. मी चुकून सुद्धा हा विषय काढणार नाही. तसं कशाला, वचनच देतो तुला.” शरद म्हणाला आणि आपला हात समोर केला.
“अहो असं नाहीये. काही वर्ष गेल्यावर म्हणजे चाळीशी उलटल्यावर तुम्हाला असं वाटुच शकतं की कोणी तरी वृद्धापकाळात आपली काळजी घ्यायला असावं म्हणून. माझं सोडा, तुम्हाला एखादी चांगली मुलगी मिळून जाईल. तुम्ही माझ्यासाठी आपलं आयुष्य पणाला का लावता आहात?” – क्षिप्रा.
“एखादा जीवघेणा अपघात झाला होता का?” – शरद.
“नाही अजून एकसंध आहे मी. वन पीस” – क्षिप्रा.
“मग असा कोण डॉक्टर आहे की जो काहीच कारण नसतांना असं निदान करतो आहे? उगाच टेंशन.-शरद.
“डॉक्टर नाही पण आमचे ज्योतीशी आहेत, त्यांनी सांगीतलेलं आज पर्यन्त जवळ जवळ सर्वच खरं ठरलं. त्यांनी सांगीतलेलं.” – क्षिप्रा.
“जवळ जवळ म्हणजे ९० टक्के. मग झालं तर, आपण १० टक्क्या मधे येतो. तू चिंता करूच नकोस. होकार देऊन मोकळी हो. आपण त्यांची भविष्य वाणी खोटी ठरवू.”- शरद.
“आणि खरी ठरली तर?” – क्षिप्रा.
“डोन्ट वरी. त्या वेळेस आपण दोघं असणार आहोत. तू एकटी नसणार.” – शरद.
क्षिप्राच्या आईवडिलांनी पण तीच शंका बोलून दाखवली, पण शरदच्या वडिलांनी नी:संदिग्ध शब्दांत सांगितलं की प्रारब्द्धात जे असेल तेच होईल मग तिथे क्षिप्रा असो वा अन्य कोणी. फरक पडणार नाही. तेंव्हा दुसरी काही अडचण नसेल तर हा संबंध आपण निश्चित करू.
विषय संपला. लवकरच शुभमंगल झालं आणि यथावकाश भविष्यवाणी पण खोटी ठरली.
********* समाप्त.*********
दिलीप भिडे
0

🎭 Series Post

View all