Login

शरद, क्षिप्रा आणि बसस्टॉप. भाग १

एक लव स्टोरी
शरद, क्षिप्रा आणि बसस्टॉप
भाग १
शरदची नाशिकला ट्रान्सफर होऊन आता चार महीने झाले होते. इतकी वर्ष त्याला मुंबईला ऑफिस मधे कामाची सवय होती पण आता तो फॅक्टरी मधे परचेस मॅनेजर होता. फॅक्टरीची संस्कृति जरा वेगळी असते. पण आता चार महिन्यात तो सरावला होता. बायकोचा एका रोड अॅक्सिडेंट मधे वर्षभरा पूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे एकटाच असल्याने फॅक्टरीत कितीही वेळ थांबायला लागलं तरी काही प्रॉब्लेम नव्हता. त्या दिवशी असंच त्याला रात्रीचे साडे नऊ वाजले फॅक्टरीतुन निघायला. बाहेर पडला. MIDC मधले रस्ते, एकदम सुनसान, फक्त शिफ्ट च्या वेळेसच रहदारी. चिटपाखरू पण नाही. थोडं दूर गेल्यावर बस स्टॉप वर एक मुलगी एकटीच उभी असलेली दिसली. आशा अवेळी एकटीच मुलगी पाहून शरदने बस स्टॉप वर बाइक थांबवली.
“मॅडम, बरीच रात्र झाली आहे. कुठे सोडू का तुम्हाला?” – शरद.
“मी बस स्टॉप वर उभी आहे, हे दिसतंय ना तुम्हाला.” – मुलगी.
“हो,” – शरद.
“मग तुम्हाला हे पण माहीत असेल की बस स्टॉप वर बस थांबते. बाइक नाही. तुम्ही का थांबला? निघा तुम्ही.” – मुलगी.
तिचं उत्तर ऐकून शरद सर्दच झाला. हे पाणी काही वेगळंच दिसतंय असा विचार करून त्याने बाइक बस स्टॉप च्या थोडी दूर हलवली, आणि बस स्टॉप वर येऊन बसला.
मुलीने त्याच्या कडे पाहीलं आणि अत्यंत त्रासिक आणि चिडक्या स्वरात बोलली,
“तुम्ही का बसला इथे? काय मनात आहे तुमच्या? भारी पडेल तुम्हाला. नंतर पश्चाताप होईल.” – मुलगी.
शरद बस स्टॉपच्या बाहेर आला आणि बस स्टॉप कडे बघत त्याने मुलीला विचारले,
“तुमचं नाव काय?” – शरद.
“ऑं, माझं नाव? या पंचायती तुम्हाला कशाला हव्यात? मिस्टर, तुम्ही आता लिमिट क्रॉस करत आहात. सभ्य दिसताहात, सभ्य माणसासारखे वागा.” – मुलगी.
“तुम्ही मला निघून जा म्हणालात म्हणून वाटलं की या बस स्टॉपची मालकी तुमच्या कडे आहे का? म्हणून तुमचं नाव विचारलं. पण इथे तसं काही दिसलं नाही.” –शरद.
“मग काय दिसलं तुम्हाला?” आता त्या मुलीचा स्वर थोडा सौम्य झाला. तिच्या लक्षात आलं की ही भाषा कोणा गुंडांची नाहीये, तसंही शरद १०-१५ फुट अंतर ठेऊन बोलत होता. जवळीक साधण्याचा त्याने मुळीच प्रयत्न केला नव्हता.
“तुमचं नाव आहे का त्यावर?” – मुलगी.
शरद हसला. वातावरण थोडं निवळलेलं दिसत होतं. तो म्हणाला,
“हे ठीक आहे. उगाच चीडचीड करून टाइम पास करण्यापेक्षा हसऱ्या चेहऱ्याने केलेला केंव्हाही चांगला. तुम्हाला काय वाटतं?” – शरद.
“हे बघा मिस्टर, बाश्कळ बोलून ओळख वाढवायचा प्रयत्न करू नका. तुम्ही निघा.” – मुलगी.
“निघणारच आहे. एक मुलगी रात्रीच्या वेळेस निर्मनुष्य रस्त्यावरच्या बसस्टॉप वर एकटीच उभी दिसली म्हणून मी केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्हाला सोबत करतो आहे. तुमची बस आली की मी पण जाईन.” – शरद.
ती मुलगी आता जरा विचारात पडली तेवढ्यात दुरून एक बस येतांना दिसली. ती मुलगी बस मधे चढली, जातांना शरदला हात हलवून थॅंक यू म्हंटलं. ती गेल्यानंतर शरद पण निघाला. या प्रसंगानंतर चार पांच दिवस गेले. शरद तो प्रसंग विसरून पण गेला. त्यानंतर विशेष काही काम नव्हतं म्हणून तो संध्याकाळी सहा वाजताच निघाला. एखादा सिनेमा टाकावा आणि एक त्यांच्या आवडतं सी फूड हॉटेल होतं तिथे मस्त जेवण करावं असा विचार करताच तो निघाला.
क्षिप्रा सुद्धा त्या दिवशी वेळेवरच निघाली होती. पावसाची लक्षणं होती. आणि बसची वेळ पण झाली होती, म्हणून बसस्टॉप वर पोचण्यासाठी ती भराभर पावलं उचलत होती. आता पावसाला पण सुरवात झाली होती. पण साधारण शंभर पावलावर बसस्टॉप असतांना बस तिला ओलांडून गेली. क्षिप्रा बस पकडायला धावली पण बस ती पोचायच्या आत सुटली. हताश होऊन ती थांबली. मागून दुसरी बस येत आहे का हे बघण्यासाठी ती मागे वळली. पावसाची भुर भुर थांबून आता जोर वाढला होता. तिने छत्री उघडली. आणि तिला समोरून शरद येतांना दिसला.
“अहो, थांबा, थांबा.” – क्षिप्रा ओरडली.
शरद थांबला. पण समोर अनोळखी मुलीला पाहून त्याला वाटलं की मागून तिच्या ओळखीचा कोणीतरी येत असेल, म्हणून त्याने मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं.
क्रमश:---
दिलीप भिडे
0

🎭 Series Post

View all