Login

शरणागतांची वाहे चिंता भाग १

शरणागतांची वाहे चिंता
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ।।
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी ।।
नलगे मुक्ति धन संपदा। संतसंग देई सदा ।।
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ।।
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ।।

बोला पुंडलिकावरदा हरि विठ्ठ्ल..... श्री ज्ञानदेव..... तुकाराम पंढरीनाथ महाराज कि...जय

या अभंगाच्या ओव्यांनी भजनाची सांगता झाली. ती संध्याकाळ, तिथे उपस्थित इमारतीमधील प्रत्येक जणाला सोबत घेत त्या भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. दरवर्षी त्या सोसायटीमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भजन-कीर्तनाचे आयोजन केले जात होते.

यावर्षी ही ते उत्तमरीत्या पार पडले होते. ह्यावेळेस त्या भजनाचे मुख्य आकर्षण म्हणजे त्या सोसायटीमधील दहा वर्षाचा सार्थक. मोठ्या माणसांच्या संगतीने त्यानेही तीन तास मृदुंगावर भजनाला उत्तम साथ दिली होती.

त्या भजनीमंडळाच्या मुख्य मृदंगवादकाच्या हाताला ऐनवेळेला कसलातरी फटका बसल्याने हाताला चांगलीच सुज आलेली होती. आता ऐनवेळेला वाजवायला कोण बसणार? हा प्रश्न पडला होता. मग सुमन आज्जींनी सार्थकच नाव सुचवलेलं होत.

सार्थकला ही आवड होतीच. त्याला मृदंग, तबला अस बरचं काही वाजवता येत होत. मागे एकदा सार्थक त्याच्या कुटुंबासह गावाला आला होता त्यावेळेस गावात नेमकी भजनाचा कार्यक्रम चालू होता. तेव्हापासूनच सार्थकला भजनाची आणि वादनाची आवड निर्माण झाली होती. त्यावेळेस मोठ्या आजोबांच्या संगतीत तो चांगलाच रमला होता. त्यांनी सांगीतलेल्या पांडुरंगाच्या गोष्टी, वारीच्या गोष्टींनी सार्थकच मन भारावुन गेलेल होत.

सार्थकचे मोठे आजोबा नियमीत वारीला जात होते. पण सध्याच्या गुडघेदुखीमुळे सार्थकचे आजोबा त्यांच्या मोठ्या भावाला बाहेर जाऊच देत नव्हते. मग त्यांच्यानंतर कोणीही वारीला गेलेल नव्हतं. मोठ्या आजोबांनी त्यांच्या लहान भावाला, सार्थकच्या वडीलांना वारीसाठी विचारुन पण पाहील होत. पण त्यांना वेळच भेटत नाही असच ते नेहमी सांगत होते. मग त्यांच्या घराण्यात वारीची परंपरा खुंटली असच मोठ्या आजोबांना वाटायला लागल होत.

गावावरून आल्यावरच लगेचचं सार्थकने आई वडीलांच्या मागे लागुन तबला, मृदंग वादनाचा क्लास लावुन घेतला होता. आजकाल मोबाईलच्या मागे लागणारी मुल कुठे आणि दुसरीकडे तबला वादनाचा क्लास लावण्यासाठी हट्ट धरणारा सार्थक कुठे. त्यामुळे सार्थकच्या आई वडीलांच्या अंगावर नाही म्हटलं तरी मुठभर मांस चढलं होत.

सार्थकनेही त्याला येत असलेले कौशल्य पणाला लावत आजच्या भजन-कीर्तनाला उत्तम साथ दिलेली होती. उपस्थित सगळ्यांनीच त्याचे भरभरुन कौतुक केलेलं होत.

“एवढं काय कौतुक?” रमण थोड तुच्छतेनेच बोलला. “शिकलं का कोणीही वाजवु शकत ते.”

“पण त्यात आवड असेल तेव्हाच ते वाजवता येत.” सुमन आज्जी “ते काही बॅन्ड नाही. घेतल हातात की लागलं वाजायला.” सुमन आज्जी जरा कडक आवाजात बोलल्या होत्या. त्यांच बोलण ऐकुन रमण तोंड वाकडं करत तिथुन निघुन गेला होता.

त्या रमणला चांगलच ओळखत होत्या. त्याच काय? पुर्ण सोसायटीला त्यांचा संकुचीत स्वभाव माहीती होता. त्यामुळे सार्थकला त्यांच्या बोलण्याने काही फरक पडलेला नव्हता.

“जाऊद्या ओ आज्जी.” सार्थक आज्जींचे हात हातात घेतले. “खुप खुप थँक्यु आज्जी. आज तुमच्यामुळेच मला एवढ्या मोठ्या कार्यक्रमात भाग घेता आला.”

“अरे त्यात काय.” आज्जींनी ही प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला. “मी तर फक्त निमित्तमात्र. सगळा कर्ता करवीता तो आहे.” आज्जींनी पांडुरंगाच्या मूर्तीकडे बोट केल.

“आज्जी.” सार्थक त्या पांडुरंगाकडे बघत बोलला. “आपण आई बाबांची मनापासुन सेवा केली. तर खरचं देव आपल्याला भेटायला येतो?” सार्थकने निरागस मनाने प्रश्न केला.

“येतो?” सुमन आज्जी हसुन बोलल्या. “फक्त येत नाही. तर आपण जर सेवेत असलो ना. तर आपली वाट पण तो बघतो. उगाच का तो एवढी वर्ष विटेवर उभा आहे?”

सार्थकच्या डोळ्यात एक वेगळीच चमक सुमन आज्जींना दिसली होती. गावाला जायच्या आधीचा सार्थक आणि आत्ताचा सार्थक खुप फरक होता दोघांमध्ये. तसा तो गुणी बाळ होता. पण इतर मुलांप्रमाणेच हट्टी पण होता. राग आलाच तर कोणाचचं ऐकत नव्हता. त्याच्या आई वडीलांना त्याच्या वागण्यामुळे त्याची खुपच चिंता वाटत होती. अशातच तिन महिन्यापुर्वी ते गावाला गेलेले होते. तिथे चाललेल्या भजन-कीर्तनाच्या सप्ताहामध्ये त्याच्यात आमुलाग्र बदल घडून आलेला होता. त्या सप्ताहामध्ये तो गावातल्या बऱ्याच आजोबांच्या, समवयस्क मुलांच्या संगतीत आलेला होता. कदाचीत हा त्याचा परीणाम होता. पण विटेवरच्या पांडुरंगाच रुप त्याच्या मनावर अगदीच कोरल गेल होत.

कार्यक्रम झाल्यावर सार्थक त्याच्या आई वडील आणि मोठ्या बहिणीसोबत घरात आला होता.

“माझा क्युटी पाय.” सावीने सार्थकला जवळ घेतलं.

“आज खुपच प्रेम उतु चालल आहे.” सार्थक “नाही तेव्हा फक्त भांडत असतेस माझ्याशी.” सार्थकने भुवई उंचावली होती.

“कारण आज माझ्या भावाने कामच असं केल आहे.” सावी “मीच काय, ती बघ आई पण तुझ्यावरची आज नजरच उतरवून टाकणार आहे.” सावीने तिच्या आईला हातात काहीतरी घेऊन येताना पाहील होत आणि त्यावरूनच तिने अंदाज बांधला होता.


क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all