“वास्तुशांतीच बोलावणं शेजारीपाजारी करू या ना?” शालिनीताईंनी दबक्या आवाजात आपल्या सुनेला विचारले.
“कशाला माणसं वाढवता आहात? तसंही शेजारी कोण राहतं माहीत नाही; आपण कोणाला ओळखतही नाही.” नंदिनी वैतागून म्हणाली.
“अगं त्या निमित्ताने ओळखी होतील. नातेवाईक चार कोसावर असतात. वेळी अवेळी शेजारीच कामाला येतात.” शालिनीताई अनुभवाचे बोल बोलत होत्या.
“किती मोठं कॉम्पेक्स आहे आपलं. एवढी लोकं कशी मॅनेज होतील. ऑलरेडी केटरर्सला किती जण येणार त्याप्रमाणे ऑर्डर देऊन झालीय. तुम्ही आता कसलाच फाफटपसारा वाढवू नका.” सहा रो हाऊस आणि चार बारा मजली इमारती असलेल्या वसाहतीतील शेजाऱ्यांना बोलावणं नंदिनीला लॉजिकली पटलं नव्हतं. त्यामुळे निर्वाणीचे बोलत ती आत निघून गेली.
“सगळ्यांना बोलव, पानं वाढव कुठे म्हणते मी. आपल्या कंपाऊंडला लागून असलेल्या शेजारच्या दोन तीन घरात बोलावणं कर एवढंच माझं म्हणणं आहे. शंभरात दोन पाच जण सहज खपून जातात.” शालिनीताई विनायकरावांकडे बघत पुटपुटल्या.
“आपलं काय ठरलंय त्यांचा संसार त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्यायचा, आपण मध्ये पडायचं नाही आणि तसंही तुला कुठे इथे रहायचंय शेजारधर्म पाळायला.” विनायकराव नाराज झालेल्या शालिनीची समजूत काढत म्हणाले.
“एवढ्या मोठ्या रो हाऊसमध्ये ही दोघच राहणार. त्यात रितेश नोकरीनिमित्त सतत फिरतीवर. इथे असला तरी त्याला घरी यायला उशीर ठरलेला म्हणून वाटतं शेजारीपाजारी सलोख्याचे संबंध असावेत. काळ, वेळ सांगून येत नाही.” शालिनीताईंच्या स्वरातून काळजी डोकावत होती.
“नंदिनी तुझ्यासारखी भित्री भागुबाई नाही. बिनधास्त आहे. लाईट गेले तरी तुला घाबरायला होतं. छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येतं.” विनायकरावांनी शालिनीची थट्टा करत विषय आवरता घेतला.
शालिनीताईंना सतत कोणीतरी अवतीभवती लागायचं; माणसांच्या गोतावळ्यात रहायला आवडायचं. रीडेव्हलपमेंट झाल्यामुळे मानकर चाळ मानकर को. ऑपरेटिव्ह सोसायटीत परावर्तित झाली असली तरी चाळ संस्कृती रहिवाशांच्या नसानसात भिनली होती. शेजारी म्हणजे एक्सटेंडेड फॅमिली अशी आपुलकीची भावना अजूनतरी त्यांच्या मनात शाबूत होती. त्यामुळे “काकू लिंबू आहे का? दोन बटाटे द्या” म्हणत कोणीही त्यांच्या घरात हक्काने डोकवायचं. हेच नेमकं नंदिनीला खटकायचं.
“आई सताड उघड ठेऊन तास तासभर पॅसेजमध्ये गप्पा मारत उभ्या राहतात. बाबा कधीही, कोणालाही चहाला घरी घेऊन येतात. जरा प्रायव्हसी नाही या घरात.” नंदिनीची नेहमी रितेशजवळ कुरकुर करायची. लहानाचा मोठा याच वातावरणात झाला असल्याने त्याला यात काही वावगे वाटायचे नाही.
पैसा असला की फारशी कोणाची गरज लागत नाही असा काहीसा तुसडा नंदिनीचा स्वभाव होता. तिने आडून आडून शालिनीताईंना सांगून पाहिले पण त्यांच्या वागण्यात फरक पडत नव्हता. सारखी भुणभुण करून तिने रितेशला भंडावून सोडलं. अखेर वैतागून त्याने रीजन्सी रेसिडन्सीमध्ये रो हाऊस बुक केलं.
“आई, इथून ऑफिस फार लांब पडतं, रिजन्सी सगळ्या दृष्टीने सोयीस्कर आहे.” शहराच्या मध्यवर्ती भागात घर असणं किती गरजेचं आहे रितेशने आईबाबांना पटवून दिलं.
एकुलता एक मुलगा वेगळं होतोय म्हंटल्यावर शालिनीताईंच मन खट्टू झालं. “दोघं लाखात कमवतात म्हंटल्यावर हे एक ना एक दिवस होणारच होतं आणि ती दोघं तर आपल्याला सुद्धा तिकडे चला म्हणतायत; पण ज्या घरात उमेदीचा काळ घालवला, पस्तीस वर्ष सुखाने संसार केला ती वास्तू आपल्याला सोडवत नाही. त्यामुळे भलते सलते विचार मनात न येऊ देता मुलांच्या आनंदात सुख शोधायचं.” नेहमीप्रमाणे विनायकरावांनी शालिनीला समजावलं.
“सध्या तुम्ही नवीन जागेत राजा राणीचा संसार करा; आम्ही सणावारी, कारणानिमित्ताने येत जाऊ” विनायकरावांनी सोयीस्कर सुवर्णमध्य काढताच वर्षभराने नंदिनी आणि रितेश नवीन जागेत शिफ्ट झाले.
“नवीन शेजाऱ्यांना नाही तर नाही कमीत मानकर बिल्डिंगमध्ये तरी निमंत्रण करायला हवं होतं. रितेश विसरला आम्हाला, सगळी नावं ठेवतील.” शालिनीताईंनी झोपताना परत विषय काढला.
“अजून तेच चालू आहे का डोक्यात. कोणी काही बोलत नाही. मी स्वतः सगळ्यांच्या घरी जाऊन मिठाईचे बॉक्स देईन. मग तर झालं… झोपा आता.” विनायकराव चिडल्याने शालिनीताईंचा नाईलाज झाला त्या सगळं विसरून वास्तुशांतीच्या तयारीला लागल्या.
दोन दिवसांनी दणक्यात वास्तुशांत साजरी करून, शालिनीताई, विनायकराव आपल्या घरी गेले. हळूहळू रितेश आणि नंदिनीही आपल्या नव्या घरात रुळले. घर टू ऑफिस, ऑफिस टू घर त्यांचे रूटीन लाईफ सुरू झाले. पुढे नंदिनीला दिवस गेल्याचे कळताच शालिनीताईंच्या रिजन्सी रेसिडेन्सीच्या चकरा वाढल्या. नंदिनीला प्रवास झेपणार नसल्याने ती डिलिव्हरी झाल्यावरच माहेरी जाईल हे सर्वानुमते ठरल्याने शालिनीताई आणि विनायकराव लेकाकडे मुक्कामाला आले. नंदिनीही आता घरूनच काम करत होती. शालिनीताई दिमतीला असल्याने कशाचीच चिंता नव्हती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते.
त्या दिवशी नेहमीप्रमाणे नऊ सव्वा नऊच्या सुमारास विनायकराव शतपावली करायला बाहेर पडले. शालिनीताई मागची आवराआवर करत, सगळं झाकपक करून ठेवत होत्या. तेवढ्यात अचानक नंदिनीच्या पोटात दुखायला लागले; तिला वेदना सहन होईनात. खरं तर दोन दिवसांपूर्वीच सोनोग्राफी, रूटीन चेकअप झाले होते. पंधरा दिवसांनी डॉक्टरांनी परत बोलावले होते. डॉक्टरांची परवानगी घेऊनच रितेश हैदराबादला ऑफिसच्या कामानिमित्त गेला होता.
“घाबरू नकोस बाळा, पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊ. मी ह्यांना पटकन बोलवून आणते. तू कॅब बुक कर.” शालिनीताई नंदिनीला धीर देत म्हणल्या.
कॉम्प्लेक्समध्येच नाईटवॉकला जायचे असल्याने विनायकराव नेमके फोन घरीच ठेऊन गेले होते.
“नंदिनी मॅडमना हॉस्पीटलमध्ये न्यावं लागेल. काका बघ कुठे आहेत ते .” वॉचमनला सांगून शालिनीताई लगबगीने घरात आल्या.
“आई कॅब बुक होत नाही.” पोर्चमध्ये कार असून काही फायदा नव्हता. या अवस्थेत ती गाडी चालवू शकत नव्हती. विनायकराव, शालिनीताईंना गाडी येत नव्हती. आपल्या कारकडे असह्य नजरेने बघत
घाबरीघुबरी झालेली नंदिनी म्हणाली.
घाबरीघुबरी झालेली नंदिनी म्हणाली.
“थांब. मी हॉस्पीटलमध्ये फोन लावून अँब्युलन्स बोलावते.”
“आपल्या समोरच्या रो हाऊसमध्ये काहीतरी गडबड दिसतेय. वॉचमन पळत कुठेतरी गेला. शालिनीताई घाबऱ्या घुबऱ्या झाल्यात.” शेजारच्या थोरात वहिनींनी आपल्या मुलीला सांगितले. तिला ताबडतोब नंदिनीच्या घरी पाठवले.
तोपर्यंत वॉचमन विनायकरावांना घेऊन आला होता. त्यांच्यासोबत अजूनही दोन तीन जण आले होते. त्यापैकी एकाने आपली कार काढली होती.
सर्वजण मदतीला धाऊन आल्याने धोका टळला. नंदिनीवर उपचार सुरू झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे तिने गोंडस कन्येला जन्म दिला.
सर्वजण मदतीला धाऊन आल्याने धोका टळला. नंदिनीवर उपचार सुरू झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे तिने गोंडस कन्येला जन्म दिला.
“प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली असल्याने बाळाला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले आहे. पण घाबरायचे काहीच कारण नाही. बाळ आणि आई सुखरूप आहेत.” डॉक्टरांनी सांगितले.
“तुम्ही सगळे वेळेवर धावून आलात म्हणून. नाही तर .…” रात्रभर आपल्या सोबत थांबलेल्या थोरात वहिनींशी बोलताना शालिनीताईंना गहिवरून आले होते.
आपल्या शेजाऱ्यांचे आभार कसे मानावे हे रितेश आणि विनायकरावांनाही कळत नव्हते. ते दोघंही निशब्द झाले होते.
फार चांभारचौकश्या करतात म्हणून नंदिनी थोरातकाकू समोर आल्या की रस्ता बदलायची. ज्या श्रीवास्तव अंकल, अँटीकडे ती ढुंकूनही पहायची नाही त्याच अंकलने स्वतःच्या गाडीतून तिला हॉस्पिटलमध्ये आणले होते. मानकर बिल्डिंग असो की रिजन्सी रेसिडेन्सी सगळे शेजारी तिची, बाळाची आपुलकीने चौकशी करत होते. “काही लागलं तर हक्काने सांगा” विनायकराव, शालिनीताईंना बजावत होते.
हे सगळं बघून नंदिनीला आपलं पूर्वीच वागणं आठवलं, काळजात कुठेतरी धस्स झालं. सुखसुविधा उपलब्ध असूनही त्या क्षणी निरुपयोगी ठरल्या होत्या; मदतीला धावून आली होती ती आपली माणसं. हे सत्य तिला खोलवर उमजलं होतं.
यापुढे शेजारधर्म जपत, जमेल तशी मदत करत, मिळून मिसळून रहायचं आणि लेकीच्या बारशाला सगळ्यात पहिले शेजाऱ्यांना आग्रहाचे निमंत्रण देऊन वास्तुशांतीला केलेली चूक सुधारायचं असं तिने मनापासून ठरवलं.
समाप्त.
