Login

शेंडेफळ भाग ३(अंतिम)

नेहमीच झुकतं माप हे बारक्या लेकाकडे का सासूबाई?
टीम : श्रावणी
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५


"अगं तसं नाही, म्हणजे सॉरी अगं.. खरंच सॉरी. तुला जे वाटेल ते कर. तू काय बनवते आहेस? बरं मी येतांना चणे घेऊन येतो भिजवलेले म्हणजे मग तू तुझ्या हातचा स्पेशल वाला चण्याचा काढा बनव. सर्दी झाल्यावर खास बनवतेस ना तो."वैष्णवीचा राग घालवण्यासाठी विवेक बोलत असतो.


"हम्म आता जास्त कौतुक करू नका चणे सकाळीच भिजत घातलेत मी. काही गरज नाही बाहेरून भिजवलेले चणे घेऊन येण्याची."वैष्णवी जरा तोऱ्यातच म्हणाली.


"बरं.. दुसरं काही आणायचं असेल तर मॅसेज करून ठेव मी स्टेशनला पोचलो की घेऊन येतो."बाकी जुजबी बोलून विवेकने फोन ठेवला.


सासूबाईंना लवकर जेवायला वाढून वेळेत औषध देऊन झाल्यावर विवेक आणि वैष्णवी दोघांनी मिळून आईजवळ तिच्या तब्बेतीबद्दल बोलायचं ठरवलं.


"आई.. बरं वाटतेय का आता?"विवेकने विचारलं


"हो बरं वाटतेय पण जरा डोकं जड आहे."


"बरं..मी काय म्हणतो, बघ हां..तुला पटलं तर घे नाहीतर विषय सोडून दे."विवेक म्हणाला.


"बोल"

"हे बघ..तुझ आता वय झालं आहे. तू कामं करतेस ठीक आहे पण तू इतकही काम करू नको की तुझ्या शरीराला ते सहन होणार नाही. विशालला आणि त्याच्या बायकोला तुझी गरज आहे समजू शकतो मी पण त्यांची काळजी घेण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नको. तुझा बीपी लो का झाला माहीत आहे तुला? तुझी होणारी जास्तीची धावपळ,वेळेत खाणं नाही यामुळे तुला आता त्रास झाला.
अगं ती दोघे त्यांची कामं करू शकतात रादर त्यांना ती करू दे असं म्हणेन मी. दोघेही लहान नाहीत. तिला सध्याच्या काळात सोबत पाहिजे समजू शकतो मी. पण त्यांची काळजी घेतेस तेवढी स्वतःची पण घे. मला माहित आहे विशालकडे तुझं जरा जास्तच झुकतं माप आहे त्याबद्दल काहीच आक्षेप नाही मला. आमच्याबद्दल जेवढं तुला वाटतं नाही तितकं किंवा त्याहून जास्त तुला त्याच्याबद्दल प्रेम जिव्हाळा आहे पण जे तू करतेस त्यादोघांसाठी त्याची थोडी तरी कदर आहे का त्यांना? किती कदर आहे आणि आदर आहे हे तुलाही चांगलच माहित आहे. त्यामुळे बघ विचार कर."विवेक बोलायचा थांबला.


"मला सगळं माहित आहे. पण तो लहान आहे त्याला काय हवं नको ते त्याच्या बायकोला समजत नाही. नेहमी चांगल चुंगलं खाणारा त्याला बायकोने बनवलेलं खायला होत नाही. तिला सांगितलं बोललं की राग येतो मग दोघांमध्ये भांडण होतं त्यापेक्षा आपण करून खायला घातलेलं काय वाईट. त्याला सवय नाही कसं पण जेवण जेवायची."


"अगं येत नाही ते शिकता येतं की..नवऱ्याला जे आवडतं ते शिकूच शकते ना ती. चल जेवणाचं सोड..पण बाकी कामं. ती सुद्धा तूच करतेस. ती पण त्याच्या बायकोला जमत नाही. कपडे धुता येत नाहीत लादी पुसता येत नाही घरातली इतर कामं करता येत नाही. काही बोलल किंवा सांगितलं की राग तेवढा पटकन येतो. बघ मला याविषयी जास्त काही बोलायचं नाही. तुझी काळजी घेणं आमचं कर्तव्य असलं तरी तुला चांगलं वाईट सांगणं ही पण आमची जबाबदारी आहे. आणि त्याला काही कमी पडलं तर आम्ही आहोतच की. तू फक्त स्वतःला जप स्वतःची काळजी घे. त्यांचा संसार त्यांना करू दे. थोडं धडपडले तर सावरायला शिकतील ना! बाकी बघ तुला जे योग्य वाटेल ते. आम्ही असही मोठे आहोत. सगळ्यांची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे.


वैष्णवीने एक नजर सासूबाईंकडे पाहिलं पण त्यांना इतकं सांगितलेल्या आणि समजावलेल्याचा जराही परिणाम झालेला दिसला नाही. अंगावर पांघरून घेऊन त्या झोपी गेल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी फोनची रिंग झाली आणि सासूबाई लगबगीने निघाल्या.


"आई.. काय झालं? इतक्या गडबडीत कुठे निघालीस?कोणाचा फोन होता?"विवेकने विचारलं.


"अरे विशालचा फोन होता. बायको कामाला गेली जेवण बनवायला बोलवलं आहे घरी. त्याची बायको पण दुपारी जेवायला घरीच येणार आहे. घाई झाली म्हणून काही बनवलं नाही तिने. आणि कपडे पण धुवायचे आहेत.काल रात्री धुतले नव्हते. त्याला रुमाल नाहीये संध्याकाळी घेऊन जायला."


"आई..अहो चहा तरी घ्या!" वैष्णवी म्हणाली


"नाही नको..निघते मी."

इतकं बोलून त्या तरतर तरतर निघून गेल्या. इतक्या गडबडीत निघून गेल्या की त्यांना त्यांच्या गोळ्यांचा पण पुन्हा विसर पडला.
समाप्त
श्रावणी लोखंडे


0

🎭 Series Post

View all