शेतातील खजिना (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
शेतातील खजिना

रामाने भर बाजारात केलेला राजपुरोहित तथाचार्यचा अपमान आणि त्यांच्यात झालेली वादावादी आत्तापर्यंत सगळ्या गावात पसरला होती आणि त्याची अम्मा त्याचीच वाट बघत होती. रामा मात्र घराच्या छतावरून अम्माकडे बघत होता. गुंडप्पा तिला समजवायचा प्रयत्न करत होता पण ती चिडलेली होती. काठी आपटत आपटत ती आपला संताप व्यक्त करत होती आणि रामा घाबरला होता. त्याचा पाय छतावरून घसरला आणि तो खाली पडला. शारदा आणि गुंडप्पाने मिळून त्याला उभं केलं पण अम्मा त्याच्या मागे काठी घेऊन लागली. तो शारदाच्या मागे लपत होता, पळत होता पण अम्माचा राग काही शांत होत नव्हता. ती खुणा करून बोलत होती आणि शारदा तिला काय म्हणायचं आहे हे सांगत होती.

“निर्ल्लज, पापी, दुष्ट, नालायक!” शारदा अम्माच्या वतीने म्हणाली.

“हे काय बोलतेस?” रामा गोंधळून म्हणाला.

“असं मी नाही या म्हणतायत. बिनकामी, कामचोर, अधर्मी, काय गरज होती एवढ्या मोठ्या प्रख्यात, राजपुरोहित पंडित तथाचार्य सोबत वाकडं करून घेण्याची. संपूर्ण गावाने तुझा बहिष्कार केलाय. कोणीही तुझ्याशी संबंध ठेवण्यासाठी तयार नाही. वाळीत टाकलंय आपल्याला.” इति अम्मा

शारदाने हे अम्माच्या वतीने बोलणं रामाला सांगितलं आणि एक क्षण स्तब्ध गेला. रामा अचानक जोरजोरात हसायला लागला. शारदा आणि अम्मा एकमेकींकडे बघू लागल्या.

“ग्या! हसतोय बेशलम” गुंडप्पा म्हणाला.

“हसू नाहीतर काय करू? बरंय ना सगळ्यांनी माझ्याशी संबंध तोडलेत ते. म्हणजे आता मी ज्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं ते मला परत करण्याची काहीच गरज नाही. वा! व्वा! चांगलं झालं.” रामा आनंदात म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून तर अम्मा डोक्याला हात लावून घराच्या चौथऱ्यावर बसली.

“शी! शी! शी! तुमच्यासारखा कपटी माणूस नाही बघितला ज्याने एवढ्या मोठ्या गोष्टीतही स्वतःचा स्वार्थ बघितला.” शारदा म्हणाली.

“असं पण हीच म्हणतेय का?” रामाने अम्माकडे बोट दाखवून विचारलं.

“नाही! मी म्हणतेय. आजपासून मला तोंडही दाखवू नका.” शारदा म्हणाली.

“अम्माला?” रामाने विचारलं.

“नाही मला. आजच्या नंतर काहीच संबंध नाही.” शारदा वैतागून म्हणाली.

“माझा आणि अम्माचा?” रामाने घाबरून विचारलं.

“नाही! माझा आणि तुमचा.” शारदा रागात म्हणाली आणि तिथून निघून गेली.

तिला रामाने हाक मारली पण ती चिडून गेलेली होती. तो अम्माला विनवायला म्हणून गेला खरा पण तिथेही त्याचं काही चाललं नाही.

दुसऱ्या दिवशीची सकाळ झाल्यावर आळस देत रामा घराबाहेर आला आणि स्वतःशीच म्हणाला; ‘चला आपल्यावर बहिष्कार टाकलाय त्याची मजा घेऊन येऊ. बघूया तरी आजचा पहिला दिवस कसा जातोय.’ असं म्हणून तो घरा बाहेर पडला.

तो रस्त्याने येताना दिसला की लोकं वाट बदलून जात होते. त्याने कोणाला अभिवादन केलं की लोक दूर पळत होते आणि याची मजा घेत रामा बाजारात फिरत होता.

“बघितलं रामा! तुझ्यावर बहिष्कार टाकल्याने कोणीही तुझ्या जवळ भटकायलाही तयार नाही.” रामाची शेंडी म्हणली.

तो हसू लागला आणि पुन्हा अजून काय मजा घेता येईल हे पाहू लागला. फिरता फिरता त्याने काल लग्न लावण्यासाठी आलेल्या गुरुजींना बघितलं आणि ते एका बैलगाडीच्या खाली जाऊन लपलेत हेही बघितलं. तो लगोलग मागच्या बाजूने तिथे गेला. पंडित ना वाटले की तो गेला पण त्यांच्याच बाजूला तो येऊन बसला होता.

“तुम्ही इथे का बसलाय?” रामाने विचारलं.

त्याच्या अचानक अश्या बोलण्याने आणि आवाजाने पंडित घाबरले आणि स्वतःला सावरू लागले.

“खूप ऊन होतं म्हणून सावलीत बसलो. चल मला आता जायचं आहे.” असं म्हणून ते जायला उठले पण रामाने त्यांचा कमंडलू धरून ठेवला.

“अरे मला जाऊ दे.” ते घाई करत म्हणाले.

“असं कसं? काल तुम्ही माझा विवाह लावण्यासाठी आला होतात तर त्याचे धन तुम्हाला द्यायला हवे ना! कालच्या सामानाचे आणि बाकी तयारीचे किती धन झाले?” रामाने विचारलं.

“नंतर दे. आत्ता मला जायचं आहे.” ते गडबडून म्हणाले.

“असं कसं? नंतर मला देता नाही आले तर?” रामा म्हणाला.

“तर विवाहाची भेट म्हणून ठेव.” ते म्हणाले.

“पण विवाह झालाच नाही मग भेट कसली?” रामाने विचारलं.

“मग असेच ठेव पण कमंडलू सोड.” ते म्हणाले.

“याचा अर्थ असा की, आता मी तुम्हाला कोणतेही कर्ज परत करायचे नाही?” रामा आनंदात म्हणाला.

“अरे नाही बाबा! पण मला जाऊ दे ना.” ते म्हणाले.

“असं कसं काहीतरी घ्या.” रामा आनंदाने बोलत होता पण त्यांचा कमंडलू सोडायला तयार नव्हता. शेवटी त्या पंडितांनी तो कमंडलू, हातातील आणि गळ्यातील रुद्राक्षमाळा, उपरणे सर्व काढून रामाच्या हातात ठेवले.

“हे सगळं घे पण मला जाऊ दे. तू मला काहीही देणे लागत नाहीस.” ते म्हणाले आणि जवळ जवळ तिथून पळून गेले.

रामा हसत हसत पुढे निघाला. पुढे गेल्यावर एका भाजीच्या गाडीवर त्याला सावकार खरेदी करताना दिसला. तोही तिथेच गेला.

“राम राम सावकार.” रामा हात जोडून म्हणाला.

सावकाराने न बघता राम राम केलं आणि त्याच्याकडे बघितल्यावर मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.

“तुम्ही! तुम्ही कोण?” त्याने आवंढा गिळत विचारलं.

“अहो सावकार मी रामा! रामाकृष्णा बैल खरेदी करण्यासाठी तुमच्याकडून कर्ज घेतलं होतं पण इतके वर्ष झाले ना मी मुद्दल फेडली ना व्याज. असे कसे विसरलात?” रामाने विचारलं.

“सगळा नियतीचा खेळ आहे बेटा! काल स्नान गृहात जोरात पडलो त्यामुळे डोक्याला मार लागला आणि काहीकाही गोष्टी विसरून गेलो. मग मला काही आठवतच नाही तर कसली देवाण घेवाण? मी तुला ओळखत नाही तूही मला विसरून जा.” सावकार म्हणाला आणि त्याची पिशवी घेऊन जाऊ लागला.

रामाने त्याला हाताला धरून थांबवले आणि बोलू लागला; “म्हणजे सगळं कर्ज माफ?”

“आता काही लक्षातच नाही तर माफ.” सावकार म्हणाला आणि त्याने तिथून काढता पाय घेतला.

“अभिनंदन रामा. तुझ्या डोक्यावरची सगळी कर्ज माफ झाली.” बंधू म्हणाली.

“हो रे. हा तथाचार्य मोठी कामाची गोष्ट निघाला. चला आता भरपूर काम केलं आता थोडी विश्रांती घेऊ.” तो म्हणाला आणि त्याच्या नेहमीच्या जागी आंब्याच्या झाडाखाली येऊन पडला.

“यार बंधू खूप भूक लागली आहे पण अम्मा तर खायला काही देणार नाही आणि विकत घ्यायला एवढे धन नाही. आज कदाचित उपवास करावा लागणार.” तो सुस्कारा टाकत म्हणाला.

“गे. का.” गुंडप्पा जेवणाची टोपली रामापुढे करत म्हणाला.

“यात काय आहे?” रामाने उठून बसत विचारलं.

“देवन. शालदाने पातवलय.” तो म्हणाला.

“मला माहित होतं शारदा माझ्यासाठी नक्की जेवण पाठवणार. कुठे आहे ती? ती नाही आली?” रामाने ती टोपली उघडत विचारलं.

“नाई. नालाज आहे ती तुद्यावर. तुद तोंद पन नाई बगनाल मनाली.” तो वैतागून म्हणाला.

“चल खोटारडा. ती काय तिथे झाडाच्या मागे आहे.” रामा डाव्या बाजूला हात करत म्हणाला.

“तल पागल. ती त्या दाडाच्या पाठी नाई त्या आहे.” गुंडप्पा स्वतःच्या मागे हात करत म्हणाला.

रामा हसू लागला आणि गुंडप्पाने स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला.

“अच्छा गुंडप्पा यात पोळी आहे, भाजी आहे पण खीर का नाहीये? जा जरा शारदाला विचारून ये खीर का नाही केली माझ्यासाठी?” रामा म्हणाला.

गुंडप्पा लगेच शारदा लपलेली त्या झाडाजवळ गेला. त्याने तिला रामाने जे विचारलं होतं ते सांगितलं आणि त्याबरोबर तिने स्वतःच्या पायातील चप्पल काढून गुंडप्पाच्या हातात दिली. त्याने पळत येऊन ती चप्पल रामा समोर टाकली आणि त्याच्या बाजूला बसला.

“हे पातवल आहे. कानार?” त्याने विचारलं.

“वेडा आहेस का? मी शाकाहारी आहे. चामडे कसे खाणार?” रामा म्हणाला आणि त्याचे हे बोलणे ऐकून लपलेली शारदा चिडून बाहेर आली.

“बघितलं? आहे काही लाज यांना? अजून किती दिवस असं जीवन जगत राहणार आहे? जिथे जागा मिळेल तिथे झोपायचे, जे मिळेल ते खायचं. ना माझी काही चिंता ना अम्माचा कोणता विचार.” ती रागाने म्हणाली.

“थोडं जास्त नाही झालं?” रामाने विचारलं.

“राग देणार तर…” ती बोलत होती तर तिला तोडत रामा पुन्हा म्हणाला; “नाही. भाजीत तिखट थोडं जास्त नाही झालं?”

त्याच्या या बोलण्याने गुंडप्पाने डोक्याला हात मारून घेतला.

“बघितलं गुंडप्पा यांना कोणाचीच नाही पडली. आमचं जाऊदे पण यांना हेही नाही माहित त्यांच्या मित्राच्या तुझ्या कुटुंबावर काय वेळ आली आहे.” ती गुंडप्पाच्या हनुवटीला धरून वर करत म्हणाली.

रामाने फक्त खुणेने काय म्हणून विचारले.

“तो सावकार! आधी यांचे बैल जप्त केले आणि आता सांगतोय जर एका रात्रीत पूर्ण शेत नांगरून पेरणी नाही केली आणि वेळेत कर्ज नाही फेडले तर घरही बळकावेल. तुम्हाला तर याच्या वडिलांची प्रकृती कशी असते हेही माहीत आहे. अश्यात एवढे मोठे शेत ते कसे नांगरतील?” ती गुंडप्पाला कुरवाळत म्हणाली.

रामा एकदम गंभीर मुद्रेने त्याच्याकडे पाहत होता. त्याचा चेहरा पडला होता.

“काय रे गुंडप्पा सांगितलं का नाहीस? मित्र म्हणतोस आणि मित्रालाच सांगितलं नाहीस?” रामाने विचारलं.

तो गप्प बसून होता.

“हे तुझ्या हातात काय आहे?” रामाने त्याच्या हातात काहीतरी आहे असं बघून विचारलं.

“तोन्याचे नाने. आता पक्त हेत राहिलं आहे आमत्याकले.” गुंडप्पा दुःखी स्वरात म्हणाला.

रामा फक्त ते बघत होता आणि अचानक त्याच्या हातून ते नाणं मला दे म्हणून घेऊन हवेत उडवत खेळू लागला.

“बिचाऱ्याची मदत करायची सोडून हे काय करताय?” असं म्हणून शारदा चिडून निघून गेली.

तिथेच एका झाडाखाली एक साधूबाबा हे सर्व बघत होते.

रामा ते नाणं अजूनही हवेत उडवत खेळत होता आणि जेव्हा त्याने गुंडप्पाचे तोंड बघितले तेव्हा त्याने काहीतरी विचार केला आणि त्याला काहीतरी सांगून बाजारात घेऊन आला.

“जसं सांगितलं आहे तसंच कर.” रामा त्याच्या कानात म्हणाला.

“हा.” आनंदी होत गुंडप्पा म्हणाला.

“आता आपले चांगले दिवस आलेच आहेत तर मी करतोय की आपल्या घराचा कायापालट करूया. त्या सावकाराच्या घरासारखे घर बांधून घेऊ.” रामा बोलत होता.

त्याच्या मागोमाग येऊन गावातील लोकंही त्याचे बोलणे ऐकत होते पण आपण नाही ऐकत नाही आहोत असा आविर्भाव आणत होते. रामाच्या हातात सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक पिशवी होती आणि अचानक त्याच्याकडे एवढे धन कुठून आले हेच शोधण्यासाठी गावकरी त्यांचा पाठलाग करत होते. नाणी वरखाली करताना रामाने मुद्दाम एक सोन्याचे नाणे खाली पाडले. गुंडप्पा ते उचलायला वाकात होता पण रामाने त्याला अडवलं.

“अरे नको उचलू. इथे सगळ्यांना आपलं गुपित समजेल. आपल्याकडे आता खूप धन आहे. चल लवकर.” रामा म्हणाला आणि दोघे आनंदाने घरी जाऊ लागले.

मागून येणाऱ्या गर्दीतून सावकाराने ते नाणे तपासून पाहिले आणि ते शुद्ध सोन्याचे असल्याचे त्याने सर्वांना सांगितले. सर्व गावकरी त्यांच्या मागावर गेले आणि रामा गुंडप्पाच्या हातात भरपूर नाणी ओतत आहे अशी सावली त्यांनी रामाच्या घराच्या भिंतीवर पाहिली आणि सर्वजण दडून बसले. रामा त्याला सोडायला बाहेर आला आणि मुद्दामच बोलू लागला; “गुंडप्पे चुकूनही कोणालाही कळू देऊ नकोस तुझ्या वडिलांच्या शेतात खजिना आहे ते. आपण हे फक्त थोडेच धन बाहेर काढले आहे पण तिथे हिरे, माणिक, मोती, भरपूर सोन्याची नाणी असलेले हंडे असं खूप काही आहे. आपण उद्या सकाळी लवकर ते काढू. मग अर्धा खजिना माझा आणि अर्धा तुझ्या वडलांचा. जर कोणाला ही बातमी समजली तर आज रात्रीच ते लोक जमीन खोदून खजिना काढतील म्हणून प्रार्थना कर हे कोणाला कळणार नाही. शेवटी जो शेत खोदणार खजिना पण त्यालाच मिळणार.”

“हा लामा.” गुंडप्पा म्हणाला आणि तो त्याच्या घरून निघाला.

तो साधू देखील हे सर्व पाहत होताच. रात्री उशिरा रामा आणि गुंडप्पा त्यांच्या शेतात आले. तिथे एक एक जण करत संपूर्ण गाव शेत खोदायला आलेले होते. सगळ्यांना शेत खोदताना बघून ते दोघे मागच्या मागे झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पुन्हा ते आले. सोबत गुंडप्पाचे वडील देखील होते. सर्व गावकरी थकून शेतातच लोळत पडले होते आणि संपूर्ण शेत नांगरून झालेले होते.

“मी कोणत्या शब्दात तुझे आभार मानू हे मला कळत नाहीये रामा. तू खरंच खूप मोठे काम केलेस.” ते हात जोडून बोलत होते.

“मी काहीच नाही केले गोपाळ काका. जे काही केले ते या सगळ्या गावकऱ्यांनी केलं आहे. धन्यवाद म्हणायचं असेल तर त्यांना म्हणा. ते खरे पात्र आहेत.” रामा त्यांचे जोडलेले हात खाली करत म्हणाला.

“कसले पात्र? पूर्ण शेत खोटं बोलून खोदायला लावले.” सावकार कंबर धरून उठून बसत म्हणाला.

“पूर्ण गावाला माहित आहे सावकार हा रामा कधीच खोटं बोलत नाही. एका शेतकऱ्याला त्याची शेती खजिनाच असते. जेव्हा या शेतात आता पिके डोलू लागतील तेव्हा गोपाळ काकांना ते खजिन्याहून कमी नसेल. आपल्या भारतातील सर्वच शेतकरी घाम गाळून दरवर्षी असा खजिना तयार करतात पण दुर्भाग्य तर हे आहे असल्या सावकारांमुळे ना शेतकरी कुटुंब दोन वेळचे सुखाने खाऊ शकत ना आत्मसन्मानाने राहू शकत. पण असो! कधीतरी कोणीतरी येईलच जे अश्या अन्यायाविरुद्ध लढा देईल.” रामा म्हणाला आणि तिथून निघून गेला. हे सर्व तो साधू बाबा पाहत होताच. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान आणि तुप्तीचे हास्य होते.

साधारण चांगलं उजाडल्यावर रामा नदीकिनारी कलिंगड खात खात फिरत होता. तिथेच तो साधू गाईला अंघोळ घालत होता.

“कसं वाटलं?” अचानक त्या साधूने विचारलं.

“थोडं कमी गोड आहे पण चालेल.” रामा पुन्हा कलिंगडाचा घास घेत म्हणाला.

“मी या फळाबद्दल नाही तर तू आज जे करून दाखवलं त्याबद्दल विचारतोय. अच्छा रामा एक सांग तुला आज एका गरजुला मदत करून कसं वाटलं?” साधू त्याच्या जवळ येत म्हणाला.

“चांगलंच वाटलं. मदत करून तर छानच वाटतं ना! ते तर माझ्या खास मित्राचे वडील होते मग त्यांची मदत करणं तर माझं कर्तव्यच होतं.” रामा म्हणाला आणि पुन्हा कलिंगड खाऊ लागला.

“मानवता हा एक धर्म आहे आणि जगात असे किती दुर्बल माणसे असतील ज्यांना रामाची गरज असेल. तू त्यांच्यासाठी काही करत का नाहीस?” साधूने विचारलं.

“मुनिवर मला कुठे अडकवताय? मी तर एक साधा सरळ माणूस आहे. मी काय करणार?” रामा चाचरत म्हणाला.

“हे तोच बोलतोय ज्याने आत्ता त्याच्या बुध्दीच्या जोरावर एका सावकाराला धडा शिकवला? हे तोच बोलतोय ज्याने सावकाराला चांगलेच बोध शिकवले?” त्यांनी विचारलं.

“ते तर उत्साहाच्याभरात कमी जास्त बोलून गेलो पण म्हणून काय आता जीव घेता या गरीब पंडितचा. बरं आता आज्ञा द्या विश्रांतीची वेळ झाली आहे.” रामा घाबरत म्हणाला आणि तिथून जाऊ लागला.

“आणि जर मी तुला असा उपाय सांगितला ज्यामुळे तुला कोणतेच कष्ट न घेता कायम विश्रांती घेता येणार असेल तर?” ते म्हणाले आणि रामा पुन्हा धावत त्यांच्या जवळ आला.

“परिमश्रम न करता फक्त विश्राम?” त्याने पुन्हा विचारलं.

“हो! जर तुझ्याकडे धन, धान्य, वैभव सगळं असेल तर तुला परिश्रम करण्याची काहीच गरज नसेल.” साधू बाबा म्हणाले.

“खरंच?” रामाने विचारलं.

“हो. अगदी शंभर टक्के.” ते म्हणाले.

“म्हणजे अम्मा, शारदा, शारदाच्या घरातले सगळे खुश?” रामाने आनंदात विचारलं.

“हो.” ते म्हणाले.

“मग लवकर उपाय सांगा ना मुनिवर.” रामा म्हणाला.

“सगळ्यात आधी काली मातेच्या देवळात जा आणि तिला पूर्णपणे शरण जा. मी तुला एक बिजमंत्र देईन त्याचा जप कर. मातेला प्रसन्न करून घे आणि मग तुझ्या भाग्यात जे आहे ते तुला मिळेलच.” ते म्हणाले आणि त्यांनी मंत्र रामाला सांगितला.

रामा लगेचच काली मातेच्या मंदिरात आला. दगडी बांधकाम आणि शिल्पकाम असलेले ते सुंदर मंदिर होते. त्याने आत पाऊल टाकले आणि मनापासून प्रार्थना करून त्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली. आधी तर त्याचं लक्ष सारखं विचलित होत होतं. एक डोळा हळूच उघडून तो आजूबाजूला बघत होता पण नंतर एकदम व्यवस्थित बसून तो मंत्र जप करू लागला. थोड्याच वेळात जोरात वारे वाहू लागले, देवळातल्या घंटी आपोआप वाजू लागल्या. सर्व पालापाचोळा उडून दूर गेला आणि एक दिव्य प्रकाश देवळात पसरला. साक्षात काली माता रामासमोर प्रकट झाली होती. रामा थरथरत्या हाताने नमस्कार करून होता.

क्रमशः……

Credit:- Sony SAB “Tenali Rama serial”

🎭 Series Post

View all