भेट शेवटची ?

Love is inspiration . Love is Life . Love can make every thing possible . This story is about a couple who love each other beyond a  limit but departs due to certain problems . Finally , one day love bring them together forever. 

आज सकाळपासूनच रश्मीला खूप भरून येत होत . कधी नव्हे ते राघवाची कमतरता आज तिला कमालीची सलत होती . लग्नानंतरच्या कटू गोड आठवणी तिच्या मनात पिंगा घालत होत्या . राघवपासून दूर होऊन साधारण वर्ष उलटायला आलं होतं पण अजूनही तो तिचाच होता . तिच्या नावाच्या मागे त्याचं करारी  नाव अजूनही तसंच लखलखत होतं . नातं उमलत व बहरत नसलं तरी अस्तित्वात मात्र नक्कीच होत . मनामनात प्रेमाचे धुमारे जरी फुटत नसले तरी नातं तुटावं असा द्वेषही नक्कीच नव्हता पण परिस्थितीने  मात्र आज त्याच वळणावर आणून सोडलं होत .

          आज सकाळी सकाळीच राघवचा फोन आला होता .रश्मीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता . फोन रिसिव्ह करताना का कोण जाणे ? पण एखाद्या नववधू प्रमाणे तीच हृदय धडधडत होत . आज कितीतरी दिवसांनी त्याचा आवाज ऐकून ती नखशिखांत मोहरली  होती . वाढदिवसाची पहिलीच शुभेच्छा राघव कडून मिळणार म्हणून मनापासून सुखावली होती . पण तिचा हा आनंद मावळायला एकच क्षण पुरेसा ठरला . वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दूरच राहिल्या पण त्याचे अनपेक्षित बोल तीच्या हृदयावरच घाव घालून गेले  आणि तिचे भानच हरपले . राघवने आज तिच्या जन्मदिवसाची कधीही न विसरता येणारी भेट तिला दिली होती ती म्हणजे घटस्फोटाची मागणी . तिचा तर तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता . तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता . तिच्या डोळ्यांपुढे अंधार पसरला . पायातलं त्राणच नाहीस झालं . मोबाईल हातातून गळून पडणार तेवढ्यात राघवच्या शब्दांनी ती भानावर आली . किती दिवस झाले तुला बघून ? शेवटचं तरी भेटशील एकदा ? संध्याकाळी सहा वाजता आपल्या नेहमीच्या गुलमोहराखाली जिथे आपल्या नात्याचा जन्म झाला होता ?  असो , येणार ना मग ? रश्मीने हुंकार दिला आणि अत्यंत जड मनाने फोन ठेवला .

               ज्या सुंदर गुलमोहराखाली एका रेशमी नात्याचा जन्म झाला आज त्याच गुलमोहराच्या साक्षीने ह्या नात्याचा अंत होणार ? रश्मीचा मन सैरभैर झालं.  हे काय होतंय ? आणि का होतंय ?  राघवने इतक्या निष्ठुरतेने  एकदम तोडायचीच भाषा केली ? इतकी का नकोशी झाली आहे मी त्याला ? माझ्या मनाला काय वाटेल असा साधा विचारही करू नये त्याने ?  रश्मी मनोमन विव्हळत होती . नकळत तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले . खरंतर आज त्याला दोष देत आहोत आपण पण ह्याही पेक्षा जास्त निष्ठुरपणे आपण त्याच्याशी वागलोय . आज जशी मी त्याच्या साठी वेडावले  आहे अगदी तसाच ह्यापूर्वी तो  माझ्यासाठी , माझ्या प्रेमासाठी आसुसलेला असायचा तेव्हा प्रत्येकवेळी त्याला झिडकाले होते मी अगदी दुष्टपणे . खरंच चूक तर माझीच आहे हे आता उमगतंय . सध्या क्षुल्लक कारणांवरून भांडण करायचे मी आणि माहेरी निघून यायचे .

                  राघव साधारण परिस्थितीतला , स्वकर्तृत्वावर मोठ्या पदावर पोचलेला तर आपण मात्र पिढीजात गडगंज श्रीमंत कुटुंबातले असल्याने माहेरच्यांनी आपलं प्रेम आणि लग्नाला कधीच मनापासून स्वीकारलं नाही . मग काय ? रश्मी अशी  भांडून माहेरी निघून आल्यानंतर माहेरच्यांनी प्रत्येक वेळी आगीत तेल ओतायचच काम केलं आणि रश्मीच्या मनातल्या गैरसमजांना खतपाणी घालून तिला राघवकडे परतूच दिले नाही . कितीतरी वेळा राघव तिला घरी परत चाल म्हणून आर्जवायला आला  , तिला समजावण्याचा , तिचं मन वळवण्याचा त्याने जीवापाड प्रयत्न केला पण रश्मीच्या मनात मात्र त्यावेळी खोटा अहंकार खदखदत होता . परिणामी राघवनेही हळू हळू तिच्याकडे जाणं तिला बोलावणं सोडलं आणि तिला फोन करणही त्याने सोडून दिलं ते आजतागायत पण ह्या दरम्यान रश्मीने पण एकही फोन करून त्याची चौकशी कधीच केली नाही . परंतू ह्या महिन्या दिड महिन्यात मात्र राघवाची उणीव रश्मीला खूपच सैरभैर करत होती . क्षणोक्षणी त्याच्या आठवणींबरोबर ती पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमात पडत होती . घरभर माणसं , खंडीभर नौकर , आणि सर्व भौतिक सुखाच्या राशीवर लोळताना सुद्धा तिच्या मनाला सतत एक टोचणी लागून राहिली होती . अश्यात ती कमालीची एकटी पडली होती . घरातल्यांच्या नजरेतली  परकेपणाची भावना तिचं काळीज पोखरायला लागली होती .  आपलं घर , आपला संसार सगळं काही तिला हवंस वाटू लागलं होत . देहभान हरवून आपल्यावर प्रेम करणारा आणि त्याच प्रेमापोटी  आपल्यावर रागवणारा आपल्या हक्काचा एकमेव माणूस म्हणजे आपला नवराच आहे हे तिला कळून चुकलं होत पण आज मात्र राघवच्या बोलण्याने तीच मन अतिशय विव्हळ झालं होत . तरीही इतक्या दिवसानंतर तो दिसणार , भेटणार म्हणून तिने स्वतःला सावरलं . मधला वेळ तिला खूपच असह्य झाला होता . प्रेमाच्या ओल्या चिंब आठवणींत तीच मन पुन्हा एकदा चिंब चिंब झालं होत . गुलमोहराखाली जायला ती कमालीची व्याकुळ झाली होती . राघवला आवडते म्हणून  आवर्जून ती साडीच नेसली , त्याच्याच आवडीच्या गर्द आकाशी रंगाची . हलकासा मेकअप आणि मोजके दागिने घालून , अर्धा तास आधीच ती निघाली . आश्चर्य म्हणजे कधीही वेळेत भेटायला न येणारा राघव आज मात्र वेळेच्या आधीच हजर होता . त्याला बघताक्षणी रश्मीच हृदय जोरात धडधडू लागलं . राघव भान हरपून रश्मीकडे बघतच राहिला . तिच्या मूळच्याच देखण्या रूपावर वेगळाच मोहक साज चढला होता जणू . राघवने स्वतःला सावरलं आणि रश्मीशी जुजबी बोलायला सुरुवात केली . तशी ती ही भरभरून बोलायला लागली . न जाणो परत कधी असा सोन्याचा क्षण येईल ह्या जन्मात ? बोलताना दोघेही एकमेकांकडे चोरट्या नजरेने बघत होते . ही अनोखी भेट सरूच नये असं दोघांनाही वाटत होत पण शेवटी वेळच ती , सरणार तर होतीच . अंधार चांगलाच दाटून आला होता घटस्फोटाची मागणी मनात घेऊन आलेला राघव त्याबद्दल एक चकार शब्दही बोलू पावला नव्हता . वेळ बराच झालाय निघूया का आता ? असं रश्मीने विचारताच राघव अस्वस्थ झाला आणि अचानक रश्मीचा हात हातात धरून म्हणाला , नको जाऊ ना रश्मी . नाही जगू शकत ग तुझ्या शिवाय मी . खूप जीवापाड प्रेम करतो आजही तुझ्यावर . आज वेगळं होण्यासाठी म्हणून शेवटचं भेटायला आलो होतो पण तुला बघितलं आणि तू फक्त माझीच असल्याची मनानं ग्वाही दिली . जस पहिल्या भेटीत मनाने ग्रीन सिग्नल दिला होता अगदी तस्साच आजही दिला . तुला कसं वेगळं करू मी माझ्या पासून ? मन शरीरापासून वेगळं का कुणी करू शकतं ? तशी ती ही सुखावली त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली ती त्याच्या मिठीत विसावली . तसा राघव पुन्हा एकदा व्याकूळ होऊन म्हणाला , काही तरी बोल रश्मी , माझा जीव निघेल नाहीतर . तशी रश्मी त्याच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाली , असा बरा निघू देईल तुझा जीव मी ? तो तुझा कुठे ? माझाच तर आहे ना ? असं म्हणत ती पुन्हा एकदा त्याच्या उबदार मिठीत शिरली . आज खऱ्या अर्थाने तिचा जन्मदिवस साजरा झाला होता . जीवनातला हरवलेला आनंद तिला जन्मभरासाठी गवसला होता. जी भेट शेवटची ठरणार होती तीच  आज नव्याने सुखाची नांदी  घेऊन आली होती .