Login

शेवटचे स्थान...

आदित्य हाईट्सचे रहस्य.
शेवटचे स्थान...


रात्रीचे बारा वाजत आले होते. मुंबईतील सातव्या मजल्यावर असलेल्या सी-703 फ्लॅटमध्ये अजूनही दिवे लागले होते. खोलीत कागद सगळीकडे पसरलेले, लॅपटॉपची स्क्रीन उघडीच आणि मध्ये बसलेला आदित्य कुलकर्णी, २७ वर्षांचा क्राईम-जर्नलिस्ट, चेहऱ्यावर तीव्र थकवा पण डोळ्यांत तसाच तीक्ष्ण संशय.

गेल्या तीन महिन्यांपासून आदित्य एक विचित्र केसवर काम करत होता. शहरात ज्या लोकांचे अचानक गायब होणे सुरू होते, त्या सर्व लोकांचं शेवटचं लोकेशन एकाच टॉवरभोवती सापडत होतं, आदित्य हाइट्स.

पण या नावाचं अपार्टमेंट प्रत्यक्षात कुठेही अस्तित्वात नव्हतं. सरकारी नोंदींमध्ये नव्हतं, बिल्डिंग परवानगीमध्ये नव्हतं, आणि शहराच्या नकाशावर तर अजिबातच नव्हतं. तरीही लोकेशन-ट्रॅकर त्याच नावाने पिंग दाखवत होते. ही गोष्ट त्याला अस्वस्थ करत होती.

आणखी भयानक गोष्ट म्हणजे, गायब झालेल्या सर्व लोकांच्या मोबाईलवरून त्यांच्या कुटुंबीयांना एकच मेसेज गेला होता, “मी काही तासात परत येतोय. काळजी करू नका.” आणि त्यानंतर सर्वांचे फोन कायमचे बंद.

त्या केसची फाईल आदित्यच्या हातात आली होती कारण त्याच्या वरिष्ठांना खात्री झाली होती की हा काही साधा गुन्हा नाही. पण आदित्यला या सर्वात एक वेगळाच पॅटर्न दिसत होता. तो कागद चाळत बसला होता, तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर अननोन नंबर.
आदित्यने फोन उचलला.

“हॅलो?” फोनच्या दुसऱ्या बाजूने क्षीण आवाज…
थोडा थरथरलेला… भीतीने भरलेला.
“आ…आदित्य… please… मला मदत कर… ते… ते मला इथे ठेवून घेत आहेत…”

आदित्य दचकलाच. आवाज ओळखीचा होता.
रोहन साळुंखे, गायब झालेल्या लोकांपैकी एक.
“रोहन!? कुठे आहेस तू? सांग पटकन!”
फोनच्या दुसऱ्या बाजूला काही सेकंद शांतता… मग आवाज म्हणाला, “मला दिसतंय… खूप उंचून… फक्त… फक्त काळोख… आणि एक मोठा बोर्ड, Aditya Heights.”

आदित्यच्या अंगावर काटा आला.
“रोहन, फोन कट करू नकोस. मी येतोय!”
“नाही… तू… तू इथे आलास तर…”
इतक्यात मोठा धक्का बसल्यासारखा आवाज आला.
टाळ्यांचा आवाज. पावलांचा आवाज.

आणि मग रोहनचे शेवटचे शब्द, “तू उशीर केलास… ते… ते तुला...” फोन कट.
आदित्यच्या हातातून फोन जवळजवळ सुटला.
त्याचे डोळे मोठे झाले. हृदय जोरात धडधडू लागले.

त्याने जॅकेट उचलले, मोबाईल, नोटपॅड घेतला आणि घरातून बाहेर धावला. कारमध्ये बसायला न बसताच त्याने नेव्हिगेशन उघडले. सर्चमध्ये टाइप केले, Aditya Heights.

स्क्रीन काळी चमकली…आणि अचानक लोकेशन दिसले, पूर्वेकडील जुना इंडस्ट्रियल झोन. जिथे मोठमोठे वेअरहाऊस, कोसळलेले शेड, आणि कोणीही गेले तर समजेल, एक भयानक शांतता.

आदित्यची कार वेगाने तिकडे निघाली. पावसाचे हलके थेंब पडायला लागले होते. रस्त्यावर कोणीही नव्हते.
जवळ पोहोचल्यावर त्याला एक विचित्र जाणवलं, गुगल मॅप लोकेशन तिथे पोहोचल्यावर लगेच गायब झालं… स्क्रीनवर “Location not found” दिसलं.
तो गोंधळला… पण मागे वळला नाही.

समोर एक अंधारात लपून बसलेलं, १० मजली जुनाट इमारतीसारखं काहीतरी दिसत होतं. पण ती काही आधुनिक अपार्टमेंटसारखी दिसत नव्हती. लोखंडी फ्रेम्स, तुटलेल्या काचा, आणि मुख्य गेटवर faded अक्षरं,
Aditya Heights

त्याने घाईघाईने मोबाईलने फोटो काढला.
पण फोटो उघडला तेव्हा त्याला भांबावून टाकणारी गोष्ट दिसली, फोटोमध्ये इमारत दिसतच नव्हती.

फोटो पूर्ण काळा. आदित्यला घाम फुटला.
त्याने पुन्हा कॅमेरा उघडला, समोरची बिल्डिंग दिसत होती.
फोटो घेतला उघडला आणि पुन्हा काळा.

ही इमारत फोटोमध्ये का दिसत नाही?
मेंदूला शंका आली, ही जागा खरंच अस्तित्वात आहे का?
पण रोहनचा आवाज… तो खरंच ओरडत होता. त्याने ऐकलं होतं. शेवटी मन घट्ट करून आदित्यने गेट ढकललं.
सळसळणारा आवाज…गेट सावकाश उघडला.

आत वातावरण अजून काळोखात बुडालेलं. शांतता तर एवढी की स्वतःचा श्वासही मोठा वाटत होता.
तिसऱ्या मजल्यावर कुणीतरी चालत असल्यासारखे आवाज येत होते, टक…टक…टक…

आदित्य थरकापला. “रोहन?” तो हळूच ओरडला.
आवाज थांबला. एक खोल गडद शांतता.
आणि मग अचानक तिसऱ्या मजल्यावरून एक दरवाजा आपटून बंद झाला, धाड!!

आदित्य भीतीने मागे हटला, पण त्याने स्वतःला सावरले.
त्याच्याकडे टॉर्च होता. तो पायऱ्या चढू लागला.
प्रत्येक मजल्यावर एक गोष्ट विचित्र दिसत होती,
भिंतींवर हातांचे ठसे. खूप हातांचे. वेगवेगळ्या आकारांचे.
काही लहान, काही मोठे.

जणू इथून बाहेर पडण्यासाठी लोकांनी सारा जोर लावला होता. चौथ्या मजल्यावर पोहोचल्यावर अचानक टॉर्च बंद पडला. आदित्यचे हृदय थांबल्यासारखे झाले.

खूप अंधार होता. फक्त स्वतःच्या श्वासाचा आवाज.
त्याने मोबाईलचा फ्लॅश उघडला. अचानक समोर भिंतीवर काही अक्षरं चमकली, मोबाईलच्या फ्लॅशमध्ये दिसू लागली. “Turn Back”

आदित्य घाबरून मागे वळला. त्याला काहीच दिसलं नाही. पण दिवे हळूहळू चमकू लागले. कॉरिडोरमध्ये पिवळसर लाईटस् पेटल्या.

पाचव्या दरवाजावर नावाची प्लेट होती, Rohan S.
आदित्यचे पाय गोठले.हा योगायोग होऊ शकत नाही.
रोहनचं नाव इथे कसं?

त्याने दरवाजा ढकलून उघडला. आत खोली पूर्ण रिकामी.
फक्त एका कोपऱ्यात छोटा मोबाईल आणि त्याच्यासोबत एक चिठ्ठी. चिठ्ठी उचलून त्याने वाचली,
“तुला वाटतंय तू चौकशी करतोस? खरं तर आम्ही तुला इथे बोलावलंय. ज्यांनी शहरातून गायब होणे सुरू केलं…
त्यांना आणणारा, तूच.”

आदित्यचा श्वास अडकला. “मी!? पण मी तर...”
त्याच क्षणी दरवाजा आपटून बंद झाला. आदित्य धडपडला. मोबाईल बंद पडला. लाईटसुद्धा गेले.
पूर्ण काळोख झाला. कानाशी कोणाचातरी श्वास…
“आदित्य… तुला अजूनही आठवत नाही?”
त्याच्या मागे उभं असलेली सावली आकृतीसारखं कुणीतरी त्या अंधारात हलत होतं.

आदित्य मागे फिरला, मोठे, लालसर डोळे असलेलं, मानवीसारखं पण वेगळंच काहीतरी. त्याचा आवाज खरखरलेला, “तू या जागेचा निर्माता आहेस…
ही इमारत त्रास देत नाही…ही तुझी आहे…तूच ती तयार केलीस…लोकांना इथे आणण्यासाठी…”

आदित्य पूर्ण हादरला. “नाही!! मी काहीच केलं नाही!”
आकृती हसली. भिंतीवर अचानक प्रोजेक्टरसारखा प्रकाश पडला. फोटो दिसू लागले, एकामागोमाग एक.

गायब झालेल्या सर्व लोकांचे फोटो. आणि सर्वांबरोबर, आदित्य. वेगवेगळ्या वेळचे फोटो. काही केफेमध्ये, काही रस्त्यावर, काही ऑफिसमध्ये. पण आदित्यला स्वतःला काहीच आठवत नव्हते.

“हे… हे शक्य नाही…” आकृती पुन्हा बोलली,
“तू दोन जीवनं जगतोस, आदित्य.
एक पत्रकार… आणि एक शिकारी.
पण आज तुझा पर्दाफाश झाला.”

अचानक संपूर्ण इमारत हलली. आदित्य जमिनीवर आदळला. तुटलेल्या काचांचा आवाज, धावण्याचे आवाज, किंचाळण्यांचे आवाज.

तो उठून पळाला. कॉरिडोरमधून खाली उतरायला लागला. पायऱ्या हलत होत्या. भिंती जणू आत खेचत होत्या. हो-नाही करत तो ग्राउंड फ्लोअरवर पोहोचला.
गेट दिसला, उघडा होता.

तो धावतच बाहेर पडला. रस्त्यावर आला.
श्वास रोखून त्याने मागे वळून पाहिलं.
इमारत गायब होती. मोकळा मैदानी भाग होता.
काहीच नाही. ना बोर्ड, ना गेट, ना इमारत.

फक्त एक सावलीसारखा आकार काही सेकंद दिसून अदृश्य झाला. आदित्यचा फोन अचानक सुरू झाला.
स्क्रीनवर मेसेज, “तू वाचलास, की आम्ही तुला परत बोलवू?”

मेसेज पाठवणारा, Aditya Heights
आदित्यचा चेहरा पांढरा पडला. त्याचा हात थरथरू लागला. मग शांत वातावरणात पुन्हा एक कॉल आला.
त्याच नंबरवरून ज्यावरून रोहनने फोन केला होता.
आदित्य डोळे मोठे करून स्क्रीनकडे पाहत राहिला…
आणि काळोखात फोन हळूच वाजत राहिला.

(त्या आकृतीने आदित्यला कायमचे आपल्या जगात ओढून घेतले होते)