Login

शेवटचा कॉल... भाग - १

शेवटचा कॉल सगळं उघड करतो, खरा गुन्हेगार तोच नव्हता ज्याच्यावर सगळ्यांचा संशय होता. सत्याचा चेहरा शेवटी सर्वांना थरारून सोडतो.
शेवटचा कॉल... भाग - १


रात्रीचे बारा वाजून गेले होते. मुंबईच्या वांद्रे स्टेशनच्या मागे असलेल्या एका जुन्या इमारतीत पोलिसांचे मोठे जमावबळ दिसत होते. लाल-निळ्या लुकलुकणाऱ्या लाईटमध्ये ती इमारत अधिकच भीतीदायक वाटत होती.

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर, फ्लॅट नंबर 302 मध्ये, एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिची ओळख झाली, रियान्का देशमुख, २४ वर्षांची, MNC मध्ये काम करणारी, एकटी राहणारी.

केस हातात घेतली होती क्राईम ब्रँचचा कुशल अधिकारी इन्स्पेक्टर आर्यन सावंत यांनी, त्यांना "मानसिक गुन्हे" वाचण्यात तरबेज म्हणून ओळखले जायचे.

“सर, मृत्यू साधारण ८ ते ९ तासांपूर्वी झालाय,” फॉरेन्सिक ऑफिसर सोनम बोलली. “कारण - गळा आवळून खून.”

आर्यनने घरभर नजर टाकली. कुठेही जबरदस्तीचे चिन्ह नव्हते. दार आतूनच लॉक केलेले होते. खिडकीलाही सुरक्षित गज होते.लॉक्ड रूम मर्डर, असे प्रकार क्वचितच घडतात.

आर्यनने डायनिंग टेबलकडे चालत जाऊन पाहिले. तिथे एक मोबाईल ठेवलेला होता. स्क्रीन तुटलेला. पण त्यावर एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, “1 Unheard Voicemail – 10:14 PM”

आर्यनचा श्वास एकच अडला. “फोन ताब्यात घ्या.”

फॉरेन्सिक टीमने फोन सील केला. पण आर्यनच्या डोक्यात एकच प्रश्न फिरत होता, रियान्काचा शेवटचा कॉल कोणाचा होता?

पुढच्या सकाळी, क्राईम ब्रँच लॅबमध्ये फोन तपासणी सुरू होती. आर्यनने व्हॉइसमेल ऐकण्यासाठी हेडफोन घातले.
पण व्हॉइसमेलमध्ये फक्त एकच वाक्य ऐकू आलं,
“आर्यन... मला माहितीये… सत्य तुझ्यापासून लपणार नाही...”

आर्यन स्तब्ध झाला.हे त्याच्यासाठी होतं? त्याचं नाव?कुठलं सत्य? कोणाच्या संबंधात? तपास अधिक गुंतागुंतीचा होत होता.

“सर, कॉलर आयडी ब्लॉक होता. P-3 एनक्रिप्शन. हे साधारण लोकं करू शकत नाहीत,” तंत्रज्ञ रोहित बोलला.

आर्यनच्या मनात एक अपराधी भावना डोकावू लागली.
मी तिला ओळखत होतो? नाही… त्याला असा कोणी आठवत नव्हतं. काहीतरी वेगळं होतं.

घटनास्थळाची पुन्हा तपासणी केली गेली. आर्यन खिडकीजवळ उभा राहिला. त्याच्यावर सकाळचं ऊन पडत होतं. खिडकी लॉक होती. पण काचेवर बारीक स्क्रॅचेस होते. जणू कोणी बाहेरून काहीतरी वापरून ती उघडायचा प्रयत्न केला होता.

“हे साधं काम नाही,” आर्यन पुटपुटला. “व्यावसायिक गुन्हेगारच असू शकतो.” घरात सगळं सामान्य दिसत होतं. पण आर्यनला एक छोटी, जवळजवळ न दिसणारी, काळी USB ड्राईव्ह टीपॉयखाली सापडली.

USB उघडली. आत एकच व्हिडिओ फाईल. व्हिडिओ सुरू होताच आर्यनची नजर थिजली.
रियान्का कॅमेऱ्यासमोर बसलेली होती. तिचे डोळे लाल, चेहऱ्यावर भीती.

ती बोलत होती,“जर मी मेले… तर ज्याच्याकडे हा व्हिडिओ जाईल… त्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी…
माझा खून हा फक्त गुन्हा नाही… तो एक सत्य दाबण्यासाठी केलेला प्रयत्न आहे…आणि…आर्यन सावंत… तुला हे सगळं माहित आहे.”

आर्यन दचकून मागे सरकला. “ही काय बोलतीये? मी तिला कधीच भेटलो नाही!” रोहितने व्हिडिओ तपासला.
“सर, हा deepfake नाही. ओरिजिनल आहे.” आर्यनच्या अंगावर काटा आला.

रियान्काच्या शेजारीण, किरण ताम्हाणे, मध्यमवयीन बाई, तपासासाठी आल्या.

“मॅडम, तुम्हाला तिच्याबद्दल काही विशेष आढळलं होतं का?” आर्यनने विचारलं.
“हो… दोन आठवड्यांपासून तिच्यासोबत एक मुलगा यायचा. उंच, सडपातळ. चेहरा बराचसा… तुमच्यासारखा,” ती म्हणाली.
आर्यनचा चेहरा उतरला. “तुम्ही नीट पाहिलं होतं?”
“हो… मी दोनदा पाहिलं. एकदाच नाही.”
आर्यनचा मेंदू वेड्यासारखा धावू लागला.
कोणी माझ्यासारखं रूप धारण करत होतं का? की… हा सगळा कट माझ्याभोवती फिरतोय?

रिपोर्ट आला. खुन्याच्या हाताचा प्रेशर मार्क रियान्काच्या गळ्यावर स्पष्ट होता. पण, तो प्रेशर मार्क आर्यनसारख्या हाताच्या आकारासारखाच होता.

“हे अशक्य आहे!” तो ओरडला.

सोनम शांतपणे बोलली, “खरा गुन्हेगार तुझ्यासारखा दिसतोय. किंवा… तुझा क्लोन.” आर्यनला हसूही येईना आणि रडूही.

बिल्डिंगचे CCTV मिळाले. १०:०५ PM ते १०:४५ PM सर्व फुटेज गायब. कोणी तरी सिस्टीम हॅक केली होती.

पण ९:५८ PM चा ५ सेकंदांची एक छोटी क्लिप मिळाली. त्यात एक माणूस जिना चढताना दिसत होता.

गडद कोट, चष्मा आणि आर्यनसारखाच चेहरा.
“हा कोण आहे???” आर्यनचा आवाज कापला.

रोहित म्हणाला, “सर, हे face masking tech आहे. पण हे एवढं अचूक बनवणं… हे जगातल्या फारच थोड्या गुन्हेगारांना जमू शकतं.”

आर्यनच्या मेंदूत एक नाव चमकलं, “कबीर खन्ना”

अत्यंत धोकादायक, तंत्रज्ञानातील पारंगत गुन्हेगार.
त्याची शैली, गुन्हा करून तो दोष दुसऱ्यावर ढकलत असे. पण कबीरला आर्यनवर राग का?

मग त्याला आठवलं…ती जुनी केस, ५ वर्षांपूर्वी.
कबीरची बेकायदेशीर मेडिकल लॅब, आर्यनने ती उद्ध्वस्त केली होती. कबीर तुरुंगात गेला…पण एक वर्षात पळून गेला. मग तो गायब झाल.

त्या रात्री आर्यन घरी जाण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात फोन वाजला. ब्लॉक नंबर, तरीही त्याने उचलला.

फोनवरून मंद आवाज आला,

“आर्यन… तुझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर खेळ सुरू झालाय.” आर्यन थरकापला.
“कबीर!! तू रियान्काचा खून केला???”
हास्य ऐकू आलं. “नाही रे… मी खून नाही केला.”
“पण मी तिच्या आयुष्यात तुझा ‘भास’ निर्माण केला.”
“तिला वाटू लागलं की तू तिच्या मागावर आहेस
तू तिच्यावर नजर ठेवतोयस, तू तिच्या रहस्याला उघड करशील.”

“आणि शेवटच्या क्षणी… जेव्हा मी खोलीत शिरलो… तेव्हा तिच्या डोळ्यात एकच भीती होती, आर्यन सावंत.”
आर्यनच्या डोळ्यात रागाने पाणी येऊ लागलं.
“तू मानसिक छळ करून तिचा जीव घेतलास…”
“नाही,” कबीर म्हणाला. “तिने स्वतःच माझा गळा पकडून मला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला… आणि मी फक्त… तिला थांबवलं.”

“गुन्हा नाही. फक्त, परफेक्ट फ्रेमिंग.”

कॉल ट्रेस झाला. स्थान, भांडुप MIDC मधलं एक जुने वेअरहाऊस.
आर्यन तिथे पोहोचला. जागोजागी वायरिंग, कंप्यूटर, सर्व्हर. एक भलामोठा स्क्रीन आणि स्क्रीनवर कबीरचा चेहरा. लाइव्ह व्हिडिओ कॉल.
“स्वागत आहे, आर्यन.“तू खोलीत येऊ शकतोस.
पण मी इथे नाही.”
आर्यनने दात ओठात चावले. “तुझा हा खेळ आज संपवतो.”

कबीर शांतपणे म्हणाला, “खेळ संपत नाहीत, आर्यन… ते रूप बदलतात.” आणि स्क्रीन काळा झाला.

तेवढ्यात, मागून एक दार जोरात आपटल्यासारखा आवाज झाला. आर्यन तिकडे धावला.
दार उघडलं, तेथे कोणीतरी स्टीलच्या खुर्चीवर बसलेलं होतं.

हातपाय बांधलेले, तोंडावर टेप. आर्यनने टेप काढली.

आणि त्याचे डोळे थरथरले, खुर्चीवर बसलेला माणूस… कबीरसारखाच दिसत होता.

पण तो ओरडला, “मी कबीर नाही! मी— आर्यन… आर्यन सावंत!” आर्यनचा श्वास रोखला.

समोर बसलेला माणूस त्याच्यासारखाच दिसत होता.
तोंड, डोळे, केस… सर्व काही.

तो पुन्हा ओरडला, “मी खरा आर्यन… आणि तू… तू त्याचा बनवलेला ‘फेस’ आहेस.”

आर्यन मागे सरकला. डोळ्यासमोर सारं फिरू लागलं.
खरा कोण? नकली कोण? तेवढ्यात स्पीकर्सवर कबीरचा आवाज आला, “शेवटचा प्रश्न, आर्यन…
तू ‘आर्यन सावंत’ आहेस हे सिद्ध कसं करणार?
तू स्वतःलाच ओळखतोस का?” सायरनचा आवाज दूरून ऐकू येऊ लागला.

पोलिस येत होते. कबीर म्हणाला,
“एक चेहरा… दोन माणसं…
आणि अनंत शक्यता. खेळ आत्ता फक्त सुरू झालाय.”
स्क्रीन बंद झाला.

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं.
दोघांकडे एकसारखेच बोटांचे ठसे, एकच DNA पॅटर्न,
एकच आवाज. फॉरेन्सिक सुद्धा गोंधळली.

कबीरने क्लोन तयार केला होता? की advanced bio-masking? की deep genetic modification?

सरकारने केस सीलबंद केली.
पण आजही हवालदारांच्या चहात एकच चर्चा असते,

“त्या दोघांपैकी खरा आर्यन कोण? आणि नकली कोण?”

कोणीही सांगू शकत नव्हतं. कारण दोघेही समान एकच वाक्य म्हणत असतात, “मीच आर्यन सावंत.”

आणि… कबीर अजूनही गायब आहे.