Login

शेवटी ती आई झाली

सावत्र आई म्हंटल की लोकं हेच म्हणतात की ती कधीच आई बनू शकत नाहीं.
चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५
लघुकथा फेरी ( संघ -कामिनी )

शीर्षक : शेवटी ती आई झाली

पंढरपूर तालुक्यात रामभाऊ पाटील यांचं नाव गावभर प्रसिद्ध होतं. शेतजमीन, बैलजोडी, घरात दळणवळणाची साधनं —कोणालाही वाटावं की हा संसार सुखाचा आहे; पण सुख हे फक्त बाहेरचं भासमान होतं. घरातली खरी ऊब त्यांच्या आयुष्यातून हरवली होती.

त्यांची बायको सुमन अचानक आजाराने गेली आणि दोन लेकरं —समीर (पंधरा वर्षांचा ) आणि अनया (बारा वर्षांची ) आईच्या मायेविना पोरकी झाली. आता घरात सगळीकडे शांतता होती. जेवताना हसणं, गप्पा मारणं जणू थांबलंच होतं.

नातेवाईकांना हे पाहवत नव्हतं. कोणी ना कोणी रामभाऊंना सल्ला द्यायचे की "पाटील, लेकरं लहान आहेत. दुसरं लग्न करा."

पण रामभाऊंचं मन मानत नव्हतं.
'यांच्या आईची जागा दुसरी कुणी घेऊ शकेल का?" असा प्रश्न त्यांना सतत त्रास द्यायचा.

शेवटी नातेवाईकांच्या आग्रहाखातर आणि मुलांचा विचार करून रामभाऊंनी या लग्नाला होकार दिला.

शैला नावाची स्त्री, तिचं वय सदतीस वर्षं असेल. ती लग्न करून त्यांच्या घरी आली. ती शिकलेली होती; पण तिला शेतसंसाराचा तसा काही अनुभव नव्हता.

शैलाचं पाऊल घरात पडलं खरं; पण लेकरांनी मात्र तिचं स्वागत केलं नाही.

समीर तर पहिल्या दिवशीच चिडून म्हणाला,"तू आमची आई नाहीस. आम्हाला तुझी गरज नाही."

अनया पण भावाच्या मागेच असायची. ती देखील तोंड वाकडं करून म्हणाली, "आम्हाला आमची आई पाहिजे होती, कोणी सावत्र बाई नाही."

हे सगळं ऐकून तर शैलाला जणू कोणी काट्यांनी टोचलं असंच वाटलं; पण तरीही ती शांत राहिली. तिच्या मनात ठाम विचार होता, 'ही लेकरं माझ्या रक्ताची नसली तरी माझ्या मायेची आहेत.'

ती पहाटे उठून घरकाम करायची. भाकरी भाजायची, दुधावरची साय काढायची, शेतात बैलांना पाणी द्यायची, मग शेतात जायची; पण मुलं तिचं हे श्रम ओळखतच नव्हती.

समीर म्हणायचा, "आईच्या हातची भाकरी चवदार असायची. ही तर कच्चीच आहे."

अनया बोलायची, "आई असती तर तिला शाळेतल्या गोष्टी सांगितल्या असत्या."

शेजारी लोकही पाठीमागे कुजबुज करायचे, "रामभाऊंनी नवीन बायको आणलीय, संसारासाठी की लेकरं वाढवायला?"

कधी कधी कुणी बोलायचं, "सावत्र आई कधी खरी होत नाही. उद्या संपत्तीवर डोळा ठेवेल."

हे सगळं शैलाच्या कानावर जायचं; पण ती हसत सगळं सहन करायची.


एका पावसाळी दिवशी रामभाऊ शेतात काम करताना घसरले आणि त्यांचा पाय मोडला. दोन महिने ते खाटेवरच होते. त्या काळात सगळी जबाबदारी शैलावर पडली होती.

शेतावर पाणी सोडणं, जनावरांचं काढणं, बाजारातून धान्य आणणं —सगळं तीच करत होती. रात्री लेकरांचा अभ्यास घ्यायची, सकाळीच डबा द्यायची. तिच्या मनात एकच प्रार्थना असायची, 'देवा, लेकरांनी मला कधीतरी आई म्हणून मानावं.'

समीर मात्र अजूनही कटाक्ष टाकून वागत होता.

"ही आमच्या बाबांच्या शेताची मालकीण व्हायचं म्हणून सगळं करतीये." असं तो मित्रांना म्हणायचा.

गावातल्या लोकांच्या कानावर हे पोहोचायचं आणि त्यांच्या कुजबुजीला अजून खतपाणी मिळायचं.

एके दिवशी अनया शाळेतून परतताना विहिरीजवळ घसरली. पायाला खोल जखम झाली. रक्त थांबेना. समीर घाबरला, रडत धावत घरी आला.
शैलाने क्षणाचाही विलंब न लावता अनयाला उचललं, गावातल्या दवाखान्यात नेलं.

डॉक्टरांनी सांगितलं, "रक्त द्यावं लागेल."

त्यावर शैलाने सांगितलं माझं रक्त तपासून घ्या. नशिबानी रक्तगट एकच होता. शैलाने तिला रक्त दिले.

अनया शुद्धीवर आली तेव्हा तिला पहिल्यांदा जाणवलं की 'ही आपल्या जीवाचा धोका पत्करून आपलं रक्षण करतेय. मग ही फक्त सावत्र आईच कशी असू शकते?'

तिने थरथरत हात धरला आणि म्हणाली, "आई..."

तो शब्द ऐकून शैलाचे डोळे पाणावले. कित्येक दिवसांचं दुःख, अपमान, टोमणे एका क्षणात विसरले गेले.

त्या घटनेनंतर घरातले वातावरण हळूहळू बदललं. अनया तिच्यासोबत बसून गप्पा मारू लागली. समीर मात्र अजूनही थोडा अबोल होता; पण त्याचं मनदेखील ढळू लागलं.

रामभाऊंची तब्येत सुधारली, शेतात काम परत सुरळीत झाले. लोकांना ते पाहवत नव्हतं. ते मुद्दाम बोलायचे, "सावत्र आईचं प्रेम म्हणजे दिखावा. उद्या घर-जमिनीसाठी धडपडेल."

समीरही गोंधळायचा; पण जेव्हा त्याने पाहिले की शैला वडिलांबरोबर कष्ट करतेय, तेव्हा त्याला जाणवलं की गावकऱ्यांचं बोलणं खोटं आहे.

दोन वर्षांनी समीरची कृषी महाविद्यालयात निवड झाली. निरोप देताना त्याने शैलाकडे पाहिलं.
तो मनातलं ओझं हलकं करत म्हणाला, "आई, तुमच्यामुळेच मी इथपर्यंत आलो. तुम्ही सावत्र नाही, खरी आई आहात. अशी सावत्र आई सगळ्यांना मिळो."

शैलाच्या डोळ्यांत अश्रू होते; पण ते दुःखाचे नव्हते. ते होते आईपणाच्या परीक्षेत यशस्वी ठरल्याचा अभिमान!

शेवटी निःस्वार्थ माया जिंकली होती.

समाप्त.
©®निकिता पाठक जोग
0