त्या बाळाला तिने जन्म दिला नव्हता, तरी ती बाळाची आईच होती. दत्तक घेतलं नव्हतं, ना बाळ तिच्यासोबत होतं. मग ती कशी आई झाली होती?
एके दिवशी बाळाची चाहूल लागली, ती आई होणार होती. तब्बल सात वर्षाने आनंदाची बातमी आली होती. तो आनंद केवळ तीच जाणत होती. बातमी कळल्यापासून स्वतःची खूप काळजी घेऊ लागली, हळूवार चालणं, वजन तर अजिबात उचलायची नाही. सगळं कसं व्यवस्थितपणे करत होती, पण जे स्वप्न होतं ते अधुरं राहिलं. अचानक कळलं की मिस्केरेज झालं. इतकी काळजी घेऊन असं कसं होऊ शकतं? स्वतःलाच दोष देत राहिली. माझ्याकडून काही चूक झाली का? डिप्रेशनमध्ये गेली. फार त्रास झाला.
नऊ महिन्याने जे चित्र दिसणार होतं ते आता दिसणार नव्हतं. जसं आपण विचार करतो तसं होतं का? कधी कधी नाही? तिच्याही बाबतीत तसंच झालं. जे घडलं होतं ते मनाविरोधात घडलं होतं. कधी कधी इतकं हतबल व्हायला होतं की, आपण काहीच करू शकत नाही. ती पोकळी कधीही भरून निघणार नाही हे जाणून होती.

बाळाची काही दिवसाची सोबत. असं बोलतात आत्मा ही स्वतः आई वडिलांची निवड करते. ती हाच विचार करायची जर बाळाने तीची निवड केली तर मग ते बाळ असं गेलं का? आई म्हणून ती जोडली होतीच ना? भावनिक बंध निर्माण झालेच होते ना? बाळ देखील भावनिकरित्या जोडले गेलेच असेल ना? मग का असं झालं? खूप सारे प्रश्न होते उत्तर मात्र सापडत नव्हतं. डॉक्टरांनी समजावून सांगितले की, कधी कधी बाळ पोटात नीट बनत नाही, त्यामुळेही असं होऊ शकतं. अनेक कारणं असू शकतात.
तसं तर तिला सगळं समजत होतं, पण मग मनाचे काय? कोण समजवणार त्या मनाला?
अनेक वर्षे लोटली त्या गोष्टीला, पण ती आजही विसरली नाही तो दिवस ज्या दिवशी प्रेग्नेंसी किटमधील दोन गुलाबी रेषांनी तीच्या चेहऱ्यावर हास्य आणलं होतं, ते आनंदाश्रू ती कधीच विसरु शकत नाही. तो दिवस आला की सगळं काही आठवतं. बाळाची चाहूल, तिने स्वतःला खूप जपलं होतं त्या काळात ते ही आठवत आणि तो काळा दिवस ज्या दिवशी डॉक्टर म्हणाल्या होत्या मिस्केरेज झालं आहे.
सोनोग्राफी करतांना तिला कल्पनाच नव्हती की, हे असं काही ऐकायला मिळेल. डोळ्यातून ओघळणारे अश्रू हेच सांगत होते की बाळाचा निरोप असा नको होता. सुरवात होण्याआधी सगळंच संपलं होतं, जे मनाला खूप वेदना देत होतं.

ती देवाकडे आजही हीच प्रार्थना करते की, माझ्या गेलेल्या बाळाची आत्मा जिथंही असेल त्याची काळजी घे. शेवटी ती आईच आहे ना? मूल डोळयांसमोर जरी नसलं तरी त्याचं अस्तित्व तिला जाणवतं.
ह्या जन्मी बाळ तिच्या आयुष्यात येऊ शकलं नाही म्हणून काय झालं? ती त्या बाळाची आई झालीच होती. काही दिवसाकरता तरी ती आई म्हणून जगली होती.
ती आयुष्यात कितीही पुढे गेली, तरी ती त्या बाळाची आई राहणार. कसेही असो ती आईपण जगली.
तिच्यासारख्या अनेक स्त्रिया आहेत. असंच आईपण जगतात, आठवणीने व्याकुळ होतात, तर स्वतःला धीरही देतात. हे सोप्प नाही. गेलेल्या बाळाचं अस्तित्व त्या कायम जपतात, शेवटी आई आणि बाळाची नाळ इतकी घट्ट जोडलेली असते की ती काही केल्या तुटत नाही. बरोबर ना?
अश्विनी ओगले.
८/१०/२०२५
८/१०/२०२५