Login

शिस्त हवी पण वळ नको भाग १

शिस्तीचा अतिरेक होऊ नये.एक कथा.
शिस्त हवी पण वळ नको.भाग१

देशमुख कुटुंबाचा प्रशस्त वाडा सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशाने उजळून निघाला होता. दाराशी काढलेली रंगीत रांगोळी, अंगणात वेलींनी वेढलेलं तुळशी वृंदावन, ओसरीवर मांडलेली तांब्या-पितळी भांडी – सगळीकडे एक शिस्तबद्धता आणि मराठवाड्यातील पारंपरिक घराचं सौंदर्य जाणवत होतं.


आजी रोजच्याप्रमाणे अंगणातल्या झोपाळ्यावर बसून मंद स्वरात रामरक्षा म्हणत होती. तिच्या आवाजातली ठराविक लय घरातील प्रत्येकाच्या मनात रुजलेली होती. जणू त्या मंत्रोच्चारामुळेच घराला एक लय मिळत होती.


स्वयंपाकघरातून मसाल्याचा सुवास दरवळत होता. सुमन देशमुख परातीमधे पीठ मळत होती. तिचे हात चपळाईने काम करत होते, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी काटेकोर शिस्त जाणवत होती. स्वतःशीच ती पुटपुटली—
सुमन मनाशी पुटपुटली,

“घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत, शिस्त आणि संस्कारांनी बांधलेलं जग असतं. जर ही शिस्त सुटली, तर घराचं घरपण हरवायला वेळ लागणार नाही.”
सुमन फार शिस्तप्रिय होती शिस्तीच्या चौकटी बाहेर माणूस जगायला लागला तर सगळं आयुष्य बिघडतं असे तिचे ठाम विचार होते


इतक्यात मोठा मुलगा विनय तयार होऊन हॉलमध्ये आला. टेबलावर ठेवलेल्या डब्याकडे पाहून त्याने आईला विचारलं—

“आई, आज डब्यात काय दिलं आहेस?”
सुमन जरा चिडूनच म्हणाली


“अरे रोज तोच प्रश्न काय विचारतोस? भाजी पोळी केली आहे, बटाट्याचा रस्सा आहे. जे मिळालंय ते समाधानाने घेऊन जा.”

आई चिडलेली आहे हे कळलं तरी विनय हसत म्हणाला


“आई मित्र खुश होतील आज. तुझ्या हातचं खायला त्यांना नेहमीच आवडतं. म्हणतात, तुझ्या आईच्या स्वयंपाकात वेगळाच गोडवा असतो.”

आईच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेष उमटली, पण लगेचच तिने पुन्हा गंभीर चेहरा केला.


तेवढ्यात धाकटा मुलगा सिद्धार्थ हातात मोबाईल घेत खोलीतून बाहेर आला. त्याच्याचेहऱ्यावर उत्साह, आणि डोळ्यांत आत्मविश्वास होता.
सिद्धार्थ आईला म्हणाला ,

“आई, आज मी उशिरा घरी येईन. ऑफिसनंतर मित्रांसोबत एक मीटिंग आहे. आमच्या स्टार्टअपसाठी काही महत्त्वाचं ठरवायचं आहे.”

सुमनच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिने हात धुऊन परात बाजूला ठेवली आणि त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाली,

“हे काय रोजचंच झालंय? कधी मित्र, कधी नवी मीटिंग! या घरात वेळेचं, जेवणाचं, उठण्या-बसण्याचं सगळे नियम तू मोडतोय. नियम मोडून घर सांभाळता येत नाही.”

सिद्धार्थ थोडा ठामपणेम्हणाला


“आई, काळ आता बदललाय. माझं काम वेगळं आहे. जर मला स्वतःचं काहीतरी करायचं असेल, तर या मीटिंग्स घ्यायलाच हव्यात. सगळं तुझ्या जुन्या चौकटीत कसं बसवणार?”


सुमनचा आवाज आणखीन उंचावला.


“माझ्या घराचे नियम माझ्यासाठी नाहीत, तर सगळ्यांसाठी आहेत. हे नियम सगळ्यांच्या भल्यासाठी आहेस तू कोण टिकोजीराव लागून गेलास?तू सतत नियम मोडतोस. तू मोठ्याचा मान ठेवला नाहीस, तर पुढच्या पिढीला काय दाखवणार?”

आत्तापर्यंत शांत बसलेले अनंत देशमुख, घराचे प्रमुख, बोलले. निवृत्त शिक्षक असल्याने त्यांचा आवाज मृदू पण वजनदार होता.

“सुमन, मुलं मोठी झाली आहेत. त्यांच्या स्वप्नांचा विचार आपण केला पाहिजे. कधीतरी उशीर झाला तरी हरकत नाही. शिस्त म्हणजे गुदमरवणं नव्हे. मी आजपर्यंतच्या आयुष्यात तुझा हा नियमानबद्दलचा अट्टाहास सहन केला पण आता पूर्वीचा काळ राहिलेला नाही तू या लोकांच्या जगाशी ओळख करून घेणं आवश्यक आहे. तुझे नियम थोडे शिथिल कर.”


सुमनने नाराजीने त्यांच्याकडे पाहिलं आणि कडक आवाजात बोलली,

“तुम्हीच जास्त मवाळ वागता म्हणून मुलांना मोकळीक मिळते. शिस्त मोडली तर घर मोडायला वेळ लागणार नाही.”


तेवढ्यात आजीने रामरक्षा थांबवली आणि हळुवार आवाजात म्हणाली—


“सुमन,अग इतकी रागावू नकोस घरातील वातावरणात ताण निर्माण झालंय बघत तुझ्या रागल्यामुळे. पोरं पोरांसारखीच वागणार. सिद्धार्थ काही वेगळं करून पाहतो आहे तर त्याला थोडी सूट दे नियमातून आणि पाठिंबा दे तरच त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि तो काहीतरी वेगळं करू शकेल. नियम असावे ग सुमन पण त्यांनी कोणी गुदमरून जाईल इतके कडक नसावे.”


“मला काय करायचंय मी घराचं घरपण हरवू नये म्हणून नियमामध्ये सगळ्यांना वागायला शिकवते पण तुम्ही मोठ्या असूनही जर याला मोडता घालत असाल तर मी आता मध्ये पडणार नाही एका घराची दोन घर झाली तर मला म्हणू नका”

सुमन रागाने आजींना बोलली आणि तरातरा स्वयंपाक घरात निघून गेली.
आजींनी कपाळाला हात मारला आणि म्हणाल्या,


“अगं कुठला विषय कुठे नेतेस घराचे दोन घरं होण्या इतकं काहीही घडलेलं नाही आणि घडणारही नाही एवढं लक्षात ठेव”

विनयने वातावरणातील ताण हलका करण्याचा प्रयत्न केला.

विनय म्हणाला,

“आई, काळजी करू नकोस. मी बघतो सिद्धार्थला. कामासाठी उशीर झाला तर चालेल पण तो घराण्याचं नाव खराब होईल असं कधीच वागणार नाही याचा मला विश्वास आहे”

सिद्धार्थने दादाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला,

“हो दादा, वचन देतो मी कधीच वेड वाकडं वागणार नाही.पण माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मला थोडी मोकळीक हवी आहे. जर मी प्रयत्न केला नाही, तर आयुष्यभर मला पश्चात्ताप करावा लागेल.”

सुमनने काही उत्तर दिलं नाही. ती पुन्हा परातीत पीठ मळायला लागली, पण तिच्या डोळ्यांत चिंता आणि राग मिसळलेले होते.
ती आपल्या मनातील राग त्या परातीमधील पिठावर काढत होती.
0

🎭 Series Post

View all