Login

शिदोरी संस्काराची भाग १

संस्कार आई बाबांकडून मुलांना जातात
"स्नेहा, प्लिज मला समजून घे . तुला माहीत आहे आपली परिस्थिती." केतन स्नेहाचा हात पकडत म्हणाला.

स्नेहा तोंड फुगवून बसली होती.
ती काहीच बोलत नव्हती.

"स्नेहा, मी तुझ्याशी बोलतो आहे. एकदा माझ्याकडे बघ." गहिवरलेल्या आवाजात तो बोलत होता.

स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू येत होते.

"तू अशी रडलेली मला आवडत नाही. प्लिज रडू नको."
केतन तिच्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणाला.

"केतन,किती ईच्छा मारायच्या? कुठे बाहेर फिरणं नाही की, नवीन कपडा नाही. माझी घुसमट होते रे आणि नंदुसाठी तू इतकं ऍडजस्ट नाही करू शकत का?."
रडक्या स्वरात ती म्हणाली.

केतनला देखील तिची बाजू समजत होती. तो तरी काय करणार? त्याचे हात जणू दगडाखाली होते. सगळं सोंग करता येतं; पण पैश्याचे सोंग करता येत नाही.


केतनला पाठचे सारे दिवस आठवले.

स्नेहाला पाहायला गेला तेव्हा बोलक्या डोळ्यांची स्नेहा त्याच्या मनात भरली.

स्नेहावरून त्याची नजर बाजूला होत नव्हती.
स्नेहा त्याला मनापासून आवडली.

आई बाबांना तर लगेच सांगून मोकळा झाला मला मुलगी पसंत आहे.


स्नेहाचे देखील काही वेगळे नव्हते. तिलाही केतन पसंत पडला होता.

केतनला पाहिले आणि तिचं मन भुलले. मुलगा पसंत आहे हे तिने कळवले.

मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत आहे म्हंटल्यावर घरच्यांनी देखील मोजक्या माणसात लग्न उरकलं.

केतन आणि स्नेहा दोघांची परिस्थिती बरीच होती. खाऊन पिऊन सुखी.


नव्याचे नऊ दिवस संपले आणि संसाराला खऱ्या अर्थाने सुरवात झाली.

केतनचे आई वडील राहायला गावीच होते. अधून मधून त्यांचे येणं जाणं व्हायचे.


स्नेहा ग्रॅज्युएट होती. वाणिज्य शाखेतून पदवी घेतली होती. ती देखील थोड्या दिवसात कामाला जाऊ लागली.

घरातलं आणि बाहेरचे करतांना कसरत होत होती; पण केतनच्या सपोर्टमुळे तिला सगळं शक्य होत होतं.

स्नेहाला कामावरून यायला उशीर झाला की, तो कुकर लावून ठेवत. भाजी चिरून ठेवत. अगदी घरातला पसारा आवरून ठेवत असे.

केतन हॉस्टेलला राहायला होता त्यामुळे तो घरच्या कामात पारंगत झाला होता. जमेल तितकी मदत तो करत होता.

स्नेहावर त्याचा खूप जीव होता.

त्या दोघांचं नातं असं होतं की, कोणालाही हेवा वाटेल.

परफेक्ट कपल. अरेंज मॅरेज आहे असं सांगितलं तरी कोणाला विश्वासच बसायचा नाही.

स्नेहाच्या माहेरी देखील जावयाचे म्हणजेच केतनचे खूप कौतुक होत होते.


वर्ष झाले आणि स्नेहाला मातृत्वाची चाहूल लागली.

दोघांचा आनंद गगनात मावत नव्हता.

"केतन, तुला वाटत नाही का की खूप घाई होते आहे. ही जबाबदारी घेण्यास आपण सक्षम आहोत का?"
त्याच्या खांद्यावर अलगद डोकं टेकवत म्हणाली.


"स्नेहा, का नाही सक्षम? तू आणि मी आपण दोघेही छान पद्धतीने ही जबाबदारी घेऊया. जास्त विचार करू नको. स्नेहा, ही जबाबदारी आज ना उद्या घ्यायची आहेच. मनात शंका कुशंका आणू नको. सगळं छान होईल. कशाला काळजी करते? मी आहे ना." तिचा हात अलगद हातात घेत म्हणाला.


दिवस जसजसे भरत आले तसतसा स्नेहाला त्रास होऊ लागला.

केतनला तो त्रास बघवत नव्हता.

"स्नेहा, आता तू नोकरी करायची गरज नाही. तू आता घरी बसून आराम कर."

"मी घरी बसले की, प्रॉब्लेम होईल केतन." काळजीच्या सुरात ती म्हणाली.

"काही प्रॉब्लेम होणार नाही. सर्वकाही मी मॅनेज करेल."

"खरंच केतन?"

" तू काहीही चिंता करू नको. तू फक्त तुझी आणि आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घे."

स्नेहाने नोकरी सोडली.
पहिल्या बाळंतपणासाठी ती माहेरी गेली.


स्नेहा गेल्यापासून तो एकटा पडला.
रोज फोन, विडिओ कॉल असायचा.

एक दिवस फोन बघत असतांना तिला तिच्या मैत्रिणीचा फोटो दिसला तिने छान फोटोशूट केला होता. मस्त गाऊन घालून. ते बघून स्नेहाला देखील ईच्छा झाली आपणही असाच फोटोशूट करूया.

तिने ती ईच्छा केतनला बोलून दाखवली.

स्नेहासाठी तो देखील तयार झाला.
स्नेहा आणि केतनने फोटोशूट केला.

नेहमीसाठी गोड आठवण फोटोत कैद झाली होती.

स्नेहाचा आनंद हा केतनसाठी महत्वाचा होता.

स्नेहाचे आई बाबा देखील केतनचे स्नेहावर असलेले प्रेम बघून खुश होत.

स्नेहाला कसलीच कमी नव्हती. स्नेहाच्या सर्व ईच्छा तो पूर्ण करायचा.


बघता बघता दिवस सरले आणि तो आनंदाचा दिवस आला.

तिने गोंडस मुलीला जन्म दिला.

केतनने जसं बाळाला हातात घेतले तसे त्याला गहिवरून आले. आज खऱ्या अर्थाने तो बाबा झाला होता.

आता एक जीव आपल्यावर विसंबून राहणार ह्याची त्याला कल्पना आली होती.

सर्वात आधी स्नेहा आणि बाळ हीच जबाबदारी आपली.

स्नेहा आणि बाळ घरी आले. त्याने जल्लोषात स्वागत केले.

बारसं देखील थाटामाटात केले. नंदिनी नाव ठेवले.

केतन म्हणाला तर होता जबाबदारी घेईन; पण इतकं सोप्प नव्हतं.

नंदिनीचा खर्च, घर खर्च सगळंच वाढलं होतं. त्यात घराचे हफ्ते देखील चालू होते.

स्नेहाचा दिवस नंदिनीमध्ये निघून जात. हल्ली तिचीही चिडचिड वाढली होती.
केतन जमेल तितकी मदत करत होता.

केतन आता पहिल्यासारखं खर्च करत नव्हता. स्नेहाच्या ते लक्षात येऊ लागले.

नव्यानेच पालक झालेले स्नेहा आणि केतन स्ट्रेसमध्ये होते.
काय होईल पुढे.

क्रमशः

कथा लेखन- अश्विनी कुणाल ओगले.
कथेचा वापर यू ट्यूब किंवा कुठेही करू नये. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.