स्नेहा आईकडे रहायला गेली.
ह्यावेळेस मात्र स्नेहा उदास दिसत होती. नेहमी जशी खुलून बोलते तशी बोलत नव्हती.
ह्यावेळेस मात्र स्नेहा उदास दिसत होती. नेहमी जशी खुलून बोलते तशी बोलत नव्हती.
केतनचा फोन आला तरी ती मोजकं बोलत होती.
शेवटी ती आईच. मुलांमध्ये झलेला बदल हा प्रत्येक आईला समजतो. तसाच बदल तिलाही जाणवला.
नंदिनी झोपली होती.
स्नेहा शून्यात नजर लावून होती.
आईने डोक्यावर हात ठेवला.
स्नेहा शून्यात नजर लावून होती.
आईने डोक्यावर हात ठेवला.
"काय गं स्नेहा ? इतका काय विचार करते आहेस?"
"काही नाही आई."
आई तिच्या बाजूला बसली.
"स्नेहा, तुझं सोनलशी बोलणं झालं का?"
सोनल म्हणजे तीच मैत्रीण जिने स्वतःच्या मुलाचा वाढदिवस जोरदार केला होता.
"नाही आई तिच्याशी माझं बोलणं झालं नाही."
"मला वाटलं तुझं बोलणं झालं असेल." आई.
"नाही गं आई. काय झालं आहे का? कारण खूप दिवस झाले तिचे स्टेटस दिसत नाही.
"कसे दिसणार?" आई कोड्यात बोलली.
"म्हणजे काहीतरी झालंय." स्नेहा.
"हो अगं. तिच्या आईशी बोलणं झालं. मुलाचा वाढदिवस दणक्यात साजरा करावा ही ईच्छा होती. वाढदिवस चांगला साजरा केला आणि.."
आई बोलत असतांना थांबली.
"आणि काय आई?" स्नेहा आई काय बोलते ह्याची वाट बघत होती.
"अगं तिच्या नवऱ्याकडे पैसे नव्हते आणि हिने वडीलांकडून पैसे मागितले. वडिलांनी देखील पैसे दिले. वाढदिवस झाला. वर्ष झाले अजून त्याने एकही रुपया तिच्या वडिलांना दिला नाही. तिच्या वडिलांना गरज होती तरी देखील त्याला पैसे द्यायला जमले नाही. आता काय जावई आणि सासरा बोलत नाही. दोघांमध्ये वाद. सोनलचे त्यात मरण. जावई काय सासरी पाय ठेवत नाही. सगळं चांगलं चाललं होतं आणि हे असं होऊन बसले. एकंदरीत हा असा प्रकार घडला बघ."
हे ऐकून स्नेहा चकित झाली.
आई पुढे बोलू लागली.
"स्नेहा, नात्यांमध्ये पैश्याचा व्यवहार आला ना की हे असंच होतं बघ. अंथरून पाहून पाय पसरलेलं कधीही योग्यच."
स्नेहाला आईचे बोलणे पटले.
"बरोबर बोलते आहे आई तू. पैश्याचा व्यवहार नको."
"स्नेहा,पटतंय ना तुला?" आई वाक्यावर जोर देत म्हणाली.
"हो आई पटलं मला."
"स्नेहा, चार पावसाळे जास्त पाहिले आहे म्हणून सांगते. जावई बापू तुला आणि नंदिनीला कसल्या गोष्टीची कमी पडू देत नाही. अगदी आई बाबांना देखील काही कमी पडू देत नाही. बरं इतका सगळा खर्च एकट्याने उचलतात. त्यांच्या बाबांचे ऑपरेशन झालं,लाखभर खर्च झाला तो देखील त्यांनी केला."
"काय? लाखभर खर्च केला त्यांनी? मला काहीच बोलले नाही." स्नेहा मोठ्याने बोलली.
"मला अंदाजा आलाच. तुला माहीत नसणार. हे पुरुष असेच असतात, तुझे बाबा देखील असेच. सारं युद्ध एकट्याने लढायचे. आपण बायका कश्या असतो माहीत आहे का? बोलून मोकळं होणाऱ्या आणि हे पुरुष शांत राहून स्वतःच्या कुटूंबाला जपणारे. जावई बापू फार स्वाभिमानी आहेत बघ. मला माहित आहे तुला नंदिनीचा वाढदिवस चांगला साजरा करायचा होता; पण तसा साजरा झाला नाही. म्हणून तू नाराज होती. तू इतकी खुश नव्हती. तू त्यांच्याशी नेहमीप्रमाणे बोलत देखील नव्हती. स्नेहा, असं बालिशपणे नको वागू.
संसार हा शब्द बोलायला सोप्पा आहे; पण करायला अवघड. मला माहित आहे तुझ्या मनासारखे काही झाले नाही की तू रागावते, अबोला धरते. हे करत असताना समोरच्या व्यक्तीवर आपण अन्याय तर करत नाही ना हे तपासून बघावे. "
स्नेहा सारं काही मन लावून ऐकत होती.
केतनचा चेहरा आठवत होता.
"स्नेहा, हे असे दिवस आम्हीही पाहिले आहे. मनासारखं घडलं नाही की , आपण आपल्या जोडीदाराला धारेवर धरायचे नसते तर तो क्षण त्याला साथ देण्याचा असतो. बोल लावणं सोप्प असतं, पण अवघड असतं ते त्यांच्या ठिकाणी उभं राहून परिस्थिला सामोरे जाणे. स्नेहा, तू त्यांना साथ द्यायची सोडून त्यांचे मनोबल खच्चीकरण करते आहेस. हे चुकीचे आहे. असं वागू नको. स्वाभिमानी जीवनसाथी असल्याचा तुला गर्व पाहिजे.
हीच वेळ आहे साथ देण्याची. नातं मजबूत बनवण्याची. रबर ताणला की तो तुटणार. तू जावई बापू पासून दूर जायचं की, त्यांच्या सोबत राहून त्यांना साथ द्यायची हे तूच ठरवायचे."
आईच्या बोलण्यामुळे स्नेहाला मार्ग दिसला.
"अजून एक गोष्ट स्नेहा जावई बापूंनी मित्राकडून घेतलेले पैसे परत करण्यासाठी स्वतःचे ब्रेसलेट मोडले आहे. म्हणून त्यादिवशी मी बाबांना त्यांना पैश्याची गरज आहे का हे विचारायला सांगितले, तरी त्यांनी मदत घेतली नाही."
"आई, इतकं सगळं झालं आणि त्याने मला सांगितले नाही. त्याने सांगायला पाहिजे होते."
"स्नेहा, तुला त्रास होईल म्हणून त्यांनी तुला सांगितले नसेल; पण आता तुला समजलं आहे, तर कसा मार्ग काढायचा हे तुझ्या हातात आहे."
"आई, मी उद्या घरी जाते." तिने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं.
आई डोक्यावरून हात फिरवत होती.
आईने योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले होते.
स्नेहा काय करणार होती?
पाहू पुढच्या आणि शेवटच्या भागात.
स्नेहा काय करणार होती?
पाहू पुढच्या आणि शेवटच्या भागात.
क्रमशः
अश्विनी ओगले
अश्विनी ओगले