शीर्षक:- शिकलेल्या बहिणी
भाग:-१
"ताई, काय विचार केला आहेस तू? " सारिका तिची मोठी बहीण वंदनाला फोनवर विचारत होती.
"कशाबद्दल बोलत विचारत आहेस तू? मला कळले नाही." वंदनाने तिला विचारले.
"अगं ताई, असं काय करतेस? परवा भाऊबीज आहे तर गावी दादाकडे जावे लागेल ना." सारिकाने आठवण करून दिली.
"अगं हो गं, मी विसरलेच होते. पण यावेळी मला जमणार नाही. तू जाऊन ये, माझ्या वाटणीचे तूच ओवाळून ये." वंदनाने भावाकडे जाण्यासाठी हात वर केले.
"अगं ताई, असं कसं म्हणतेस गं? आपलं तर ठरलं होतं ना, दोघी मिळून जायचे ते. मग ऐनवेळी असे कसे म्हणतेस? हे बघ तू जर येणार नसेल तर मी पण नाही जाणार, आताच सांगून ठेवतेय." सारिका जरा चिडतच दम दिल्यासारखे म्हणाली.
"अगं मला जास्त दिवस सुट्टी नाही. दोनच दिवस आहे. त्यात ह्यांनी फिरायला जायचा प्लॅन केलाय. तर कसे येणार तूच सांग, असंही आपल्या भिकारड्या दादाकडे जाऊन काय फायदा? त्याचंच रडगाण ऐकावं लागेल आणि वरून त्या त्याच्या बायकोचं पडलेलं तोंड पाहावं लागेलं. " वंदना तिचा दादा सुरेशला आठवत नाक मुरडत म्हणाली.
"तू म्हणतेस ते बरोबर आहे. राखी पौर्णिमा असो किंवा भाऊबीज असो, त्याच्याकडून ओवाळणी म्हणून फार फार तर शे-पाचशे रूपये भेटतात, नाही तर कसली तरी हलक्यातील साडी भेटते." सारिकाही सुरेशच्या गरिबीची खिल्ली उडवून तोंड वाकडे करत म्हणाली.
"हो ना, त्या व्यतिरिक्त तो आपल्याला देऊ तरी काय शकतो? शेतातलं थोडं फार धान्य काय देतो फक्त." वंदनाही तिच्या बोलण्याशी सहमत दर्शवत म्हणाली.
"जाऊ दे मग. नको जायला यावेळी. माझं तर मनच नाही होत त्याच्याकडे जायला. काय म्हणतेस तू?" सारिकाने तिला विचारले.
"मलाही तसंच वाटतंय. राहू दे मग. यावेळी सांगू काही तरी कारण त्याला? बोल काय म्हणतेस." वंदनाने तिला विचारले.
"ठीक आहे, तू म्हणशील तसं." सारिकाने असे म्हणून फोन बंद करून ठेवला.
'चला बाबा, एक प्रश्न तर मिटला. दादाकडे जायचं म्हटल्यावर मला तर बाई जीवावर आलं होतं. बरं झालं, ताई जाणार नाही तर मी तरी कशाला जाऊ तिकडे? मस्त आपली इथेच दिवाळी एंजॉय करते.' ती मनातच दिवाळीचे नियोजन करत म्हणाली.
तिकडे वंदनाही मनात विचार करू लागली,'दरवेळी जातोच की. काय मिळतं जाऊन? उगीच किती दगदग होते. जायलाच नको त्यापेक्षा. त्यालाही काही कळवायला नको.'
क्रमशः
दोघेही बहिणी सुरेशकडे जायचे नाही असे ठरवले मग तो त्यांची वाट पाहतोय हे त्यांना कळेल का?
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा